प्राचीन हिंदू मंदिर देवठाण –
नाशिक जिल्ह्यातील येवल्यापासून संभाजीनगर महामार्गावर साधारण २० किलोमीटर गेल्यावर संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीवर देव नदीच्या किनारी देवठाण हे गाव वसले आहे. देवनदीच्या कुशीत वसलेलं देवाचं ठिकाण म्हणून देवठाण असे या गावाला नाव पडले असावे असे ग्रामस्थ सांगतात. महामार्गावरून डाव्या हाताला दोन किलोमीटर आत गेल्यानंतर आपापल्या पन्नास एक घरांचे लहानशे गाव लागते. गावात गेल्यावर दगडी बांधणीच्या दोन घरांच्या मधून एक रस्ता देवठाणच्या महादेव मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो. काही अंतरावर एका लहानशा टेकडीवर चौकोनी आकाराचे मंदिर इतर मंदिरापेक्षा वेगळ्या पद्धतीने साकारलेले असल्याने आपले लक्ष वेधून घेते.(प्राचीन हिंदू मंदिर देवठाण)
साधारण वीस एक पायऱ्या चढून गेल्यावर आपला मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. मंदिराचे शिखर आज अस्तिवात नाही. मंदिराचा समोरचा सभामंडपाचा शिल्लक भाग सध्या अठरा खांबांवर उभा आहे. मंडपातील खांबांवरील शिल्पवैभव, समोरासमोर सजलेल्या दोन देवळ्या व त्यावरील नक्षीकाम तसेच नर्तिकी अन् हत्तींचा नक्षीकामातील वापर आपल्याला मोहात पाडतो. सुंदर नक्षीकाम व स्त्रीसौंदर्याने सजलेल्या मूर्तींचा सोहळा द्वारशाखेवर बहरलेला दिसतो. ही द्वारशाखा आपल्याला गर्भगृहात घेऊन जाते.
मंदिरातील हे गर्भगृह म्हणजे खरे तर सभामंडप आहे. हा सभामंडप पंचवीसहून अधिक खांबांनी पेलला आहे. आयताकृती छत सपाट आहे. येथे फक्त दरवाज्याच्या अगदी समोर एक लहानशी देवळी आहे याशिवाय आत काहीच नाही. येथे पूर्वी महादेवाची पिंड होती, असे स्थानिक लोक सांगतात. सध्या येथे पिंड नाही. त्यामुळे पुरातत्त्व विभागही मंदिर शिवमंदिर असल्याचे न म्हणता हिंदू मंदिर अशी नोंद केलेली दिसते.
मंदिराच्या कोटाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन खांबांचे अवशेष पडलेले दिसतात. यावरून कोटाचा दरवाजाही सुंदर असेल याची कल्पना येते. ही वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. देवठाणचे मंदिर साधारण इ.स. ८५० ते १०६० या काळात साकारले गेल्याचा दावा केंद्रीय पुरातत्त्व विभाग करतो. त्यांच्याकडून होत असलेल्या देखभालीमुळे मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर दिसतो. कधी या महामार्गवरून गेलात तर मंदिर स्थापत्यातील हा आगळा वेगळा सोहळा अनुभवण्यासाठी एकदा देवठाणला आवर्जून भेट दयावी!!
संदर्भ – ‘वारसायन’ श्री. रमेश पडवळ
©️ रोहन गाडेकर