कुंभोजमधील पाषाणी चक्रातून रोम-कोल्हापूर प्राचीन व्यापार अधोरेखित…
कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज (ता. हातकणंगले) गावाच्या परिसरात आढळलेल्या दगडी चक्रव्यूह संरचनेच्या पाऊलखुणांतून सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा कोल्हापूर-रोम व्यापारी संबंध अधोरेखित झाला आहे.
कोल्हापूरचे इतिहास संशोधक सचिन पाटील यांच्या या संशोधनाची दखल स्वीडन येथील अभ्यासक जॉन क्राफ्ट यांनी आपल्या ‘वॉल ऑफ ट्रॉय’ या पुस्तकात घेतली आहे.
🔸 पुण्यातील डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या पुरातत्त्व :-
शाखेमधून ‘अमूर्त कातळशिल्प’ या विषयावर सचिन भगवान पाटील हे पीएच.डी. करत आहेत. ‘पश्चिम महाराष्ट्रातील दगडी चक्रव्यूह संरचना’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी आपल्या संशोधनातून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील 11 दगडी चक्रव्यूह रचना शोधून काढल्या आहेत. हे संशोधन 2021 व 2023 यावर्षी लंडन येथील चक्रव्यूह संरचनेवर जागतिकस्तरावर माहिती प्रकाशित करणार्या ‘केडोरिया 50 व 52’ या जर्नलच्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये प्रथम स्थानावर प्रकाशित झाले आहे.
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील हजरत बाबुजमाल साहेब कलंदर पहाडी शरीफ दर्गा परिसरातील पाठीमागील डोंगर पठारावर म्हणजे मजले गावाच्या हद्दीत सेव्हन सर्किट क्लास्सिकॅल लॅबरींथ, म्हणजे सात कडी असलेला दगडी चक्रव्यूह संरचना आहे. तसेच, दर्ग्याच्या पूर्व बाजूकडील डोंगरावर म्हणजे कुंभोज गावाच्या हद्दीत बाबुजमाल दर्ग्यापासून दानोळीकडे जाणार्या पायवाटेवर दुसरी महत्त्वाची दगडी चक्रव्यूह संरचना आहे. मजले चक्रव्यूहाच्या ईशान्येस अंदाजे 0.75 किलोमीटर अंतरावर, तसेच कुंभोजच्या आग्नेय बाजूस 2.7 किलोमीटर अंतरावर, ते खडकाळ जमिनीच्या क्षेत्रात स्थित आहे. हे दगडी चक्रव्यूह नाईन सर्किट स्वरूपाचे म्हणजे नऊ कड्यांचे आहे. ज्याचा व्यास 14.6 मीटर आहे. त्या ठिकाणाचे अक्षांश : 16.7986080 उत्तर, रेखांश : 74.4546330 पूर्व असे आहे. या दोन्ही रचनांमध्ये पूर्व बाजूकडील असलेले दगडी चक्रव्यूह म्हणजे कुंभोज गावाच्या हद्दीतील हे नऊ कड्यांचे दगडी चक्रव्यूह असून, ते अतिशय महत्त्वपूर्ण असल्याची माहिती संशोधक सचिन पाटील यांनी दिली.
🔹 ब्रह्मपुरी टेकडी उत्खननापासूनचे संशोधन :-
कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीकाठी असणार्या ब्रह्मपुरीच्या टेकडीजवळ 1942 च्या पुरातत्त्वीय उत्खननात तत्कालीन राजाराम कॉलेजचे प्रा. के. जी. कुन्दनगर यांना रोमन समुद्र देवता (पोसायडोन) च्या मूर्तीसह विविध वस्तू मिळाल्या. 1945 मध्ये डेक्कन कॉलेजचे डॉ. एच. डी. संकालिया व डॉ. एम. के. दीक्षित यांनी शास्त्रीय पद्धतीने केलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात सातवाहन कालखंडापासूनचे अवशेष, #प्राचीन_नाणी सापडली. यावरून इसवी सनाच्या पहिल्या-दुसर्या शतकापासून कोल्हापूर व परकीय देशांचे व्यापारी संबंध सिद्ध झाले. प्रचलित चलनावरील म्हणजे क्रेट नाण्यावर चक्रव्यूह रचनेतून प्राचीन ग्रीक व रोमन व्यापाराच्या पाऊलखुणा आहेत.
Yogesh Shinde