महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,662

जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील प्राचीन अवशेष भाग १

Views: 1517
11 Min Read

जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील प्राचीन अवशेष –

जुन्नर हे ( उत्तर अक्षांश १९* -१२ आणि पूर्व रेखांश ७३* – ५३ ) पुणे जिल्ह्याच्या ९० किलोमीटरवर सह्याद्रीच्या कडे कपारी पासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. प्राचीन व्यापारी राजमार्ग नाणेघाट ज्याच्या द्वारे सातवाहन काळात सोपारा, कल्याण, चौल, प्रतिष्ठानशी तसेच पाश्चिमात्य देशातील रोम सारख्या देशाशी व्यापार चालत असे . असा नाणेघाट जुन्नरच्या पश्चिमेला चाळीस किलोमीटर वर आहे. जुन्नर हे समुद्रसपाटीपासून सुमारे ७०० मीटर उंचीवर कुकडी नदीच्या उजव्या किनाऱ्यावरील दक्षिणेस वसलेले असून नदीच्या दोन्ही बाजूकडील खोऱ्यात सह्याद्री रांगेतील लहान – मोठ्या टेकड्यांच्या रांगेत जुन्नर परिसर सामावलेला आहे.(जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील प्राचीन अवशेष)

कुकडी नदीच्या आग्नेयस रुंद पठार असून संपूर्ण गाव आठ ते दहा किलोमीटरच्या परिघात अनेक लहान मोठ्या ‘ पांढरी ‘ मातीच्या टेकड्यांनी वेढलेले आहे. कुकडी, पुष्पावती, मीना नदीच्या काठावरील ‘ पांढरी’ माती असलेल्या टेकड्या सुमारे २०० ते ४०० मीटर उंचीच्या आहेत . सध्याचे जुन्नर गाव हे जुन्या प्राचीन सातवाहन काळातील गावावर वसलेले ऐतिहासिक गाव आहे. जुन्नर परिसरात ‘ पांढरी ‘ प्रकारची माती असलेल्या टेकड्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अगरगाव, माळीवाडा, पाडळी, गोळेगाव, उदापूर, डिंगोरे, कुसुर आदी परिसरात सातवाहनकालीन लोकवस्ती स्थळांचे भरपूर अवशेष आजही दिसून येतात.

१९६२ च्या अगोदर कुकडी, पुष्पावती , मिना , माडवी नदीला पावसाळ्यात सतत येणाऱ्या पुरात आज दिसत असलेल्या बऱ्याच टेकड्यांचा नाश झाल्याचे दिसून येत आहे. तरी काही पाढरीच्या टेकड्या आपल्या शेवटच्या घटीका मोजत आहे. काही सातवाहन काळातील लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने घराची बाधकामे झाली तसेच चालू असल्याची पाहायला मिळतात. तर काही पाढरीच्या टेकडी वरील सातवाहन लोकवस्ती स्थळाची जागा सपाटीकरण करुन आजमितीला तेथे बागायती शेती केली जात आहे. तरी गोळेगाव – लेण्याद्री परिसरात वरचेवर शेत नांगरटीच्या वेळी तसेच उन्हाळ्यात कुकडी नदीचे पात्र कोरडे पडल्यावर नदीत अनेक वेळा प्राचीन सातवाहन काळातील वस्तू आढळून येतात . सन १९७० ते १९७२ च्या दरम्यान कुकडी नदीचे पात्र पुर्ण उघडे पडले होते त्या वेळी झारेकरी मंडळींना काही प्रमाणात सिंह छाप नाणी ,नागणिका राणीची नाणी मिळाली होती. गोळेगाव – लेण्याद्री येथील बापूजी ताम्हाणे प्रस्तुत लेखकास जुन्नर परिसरातील कुकडी, पुष्पावती, मीना, माडवी नदी काठावरील सातवाहनकालीन लोकवस्ती स्थळांच्या अभ्यासासाठी तेथील परिसराचे निरीक्षण करीत असताना त्यांच्या या निरीक्षणातून अनेक प्राचीन सातवाहनकालीन अविशेष उजेडात आल्या व येत आहेत .

जुन्नर च्या उत्तरेस साधारणपणे १३ किलोमीटर अंतरावर पुष्पावती नदीच्या किनारी उदापूर येथे मोठे पांढरीचे प्राचीन अवशेषांची गंढी पाहिला मिळाली. जुन्नरच्या दक्षिणेस मीना नदीच्या काठावर कुसुर, निरगुडे या गावी तीन ते चार पाढरी मातीच्या टेकड्या आढळून आल्या . जुन्नर गावातून वाहणाऱ्या कुकडी नदीच्या किनारी माणिकडोह, पाडळी इत्यादी भागात काही अवशेष मिळाले आहेत . विशेषतः लेण्याद्री जवळील गोळेगाव, माळीवाडा , अगरगाव तसेच जुन्या एस् . टी. स्टँडच्या परिसरात भरपूर प्रमाणात सातवाहन कालीन वस्तूंचे अवशेष आजही दिसून येतात.

लेण्याद्री येथे कोरलेल्या विहारात ‘ कपिचीत’ नावाचा एक भिक्खू संघ निवास (वर्षावास ) करीत होता. त्यांच्या भिक्षेसाठी , निर्वाहासाठी आश्रय देणाऱ्या लोकांच्या काही वस्त्या सध्या गोळेगाव येथील पांढरीच्या टेकडीच्या ठिकाणी भंग्न सुरुवात आजही पाहायला मिळतात . त्या ठिकाणातून भाजलेल्या मातीचे भिक्षुपात्राचे अवशेष अभ्यासकांना आढळून आलेले आहेत. त्यापैकी प्रस्तुत लेखात त्या वस्तूंची माहिती प्रकाशित करीत आहे.

१) जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील भांडी–
जुन्नर परिसरात सातवाहनकालीन लोक वस्ती स्थळांच्या भागात भाजलेल्या मातीच्या भांड्यांची खापरे पुष्कळ आढळून येतात. ह्या भाड्याचे महत्त्व पुरातत्त्वीय संशोधनात इतके अनन्यसाधारण आहे की, त्यांना ” पुरातत्त्वीय मूळाक्षरे” असे संबोधिले जाते. सातवाहन कालीन थरात काही अखंड भाजलेल्या मातीची भांडी मिळाली आहेत. तसेच रोमन बनवाटीची खापरे , भांडी सापडली असून त्या भांड्यांना लाल रंगाची झिलाई लावलेली आढळून आलेली आहे. लहान आकाराच्या थाळ्या, वाडगे, डिश, लहान आकाराची बुरकूळी , माठ,मातीचे दिवे ह्या सारखे अवशेष उपलब्ध झालेले आहे. ही भाजलेल्या मातीची भाडी हजारो, शेकडो वर्षे मातीत गाडून राहिली तरी त्याचा आकार बदलत नाही. त्यामुळे भांड्याचा पुरावा व त्याचा अभ्यास फार महत्वपूर्ण ठरतो.

२) प्राचीन पदके व मणी —
भाजलेल्या मातीची गोल आकाराची वेगवेगळ्या प्रकारची पदके मिळाली असून लंबगोल आकाराची स्त्रीच्या कानात घालावयाची चंद्रकोर आकाराची कर्णभूषणे उपलब्ध झालेली आहेत. त्यावर फुलाफुलांची बारीक नक्षी आहे. सुपारीच्या आकाराचे भाजलेल्या मातीचे मणी मिळालेले आहेत. त्या मातीच्या मण्यापैकी १० सें मी. गोलाई आणि २ सें मी. उंचीचे तर काही ७ सें मी. गोलाई आणि २ सें. मी. उंचीचे सुपारीच्या आकाराचे मणी लेण्याद्री जवळील गोळेगाव मधील पाढरीच्या टेकडीवर मोठ्या संख्येने आढळून आलेले आहे. काही मणी मौल्यवान दगडाचे , हाडांचे , धातूचे, विविध रंगाच्या काचेचे आहे. या सर्व मण्यांचा बारकाईने अभ्यास केल्यावर समजते की, सातवाहनकालीन जुन्नरची कला आणि सामाजिक जीवनाची अंगे याचे ज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते .

३) शुभ चिन्ह असलेला दंगडी पाटा —
जुन्नर परिसरातील सातवाहनकालीन लोकवस्ती स्थळाच्या भागात आढळणारी मुख्य वस्तू म्हणजे चार पाय असले दगडी पाटे – वरंवटे सुस्थितीत प्रस्तुत लेखकाला आढळले आहेत. हे पाटे एकसंघ दगडातून खोदून काढलेले असून त्यावर दोन प्रकारचे स्वस्तिक, त्रिरत्न अशा प्रकारची काही धार्मिक चिन्हे प्रामुख्याने दिसून आली आहेत. ज्याच्या भुजांची अग्रे डावीकडे वळविली जातात .ते ” डावे स्वस्तिक” आणि ज्याच्या भुजांची अग्रे उजवीकडे वळविली जातात. ते ” उजवे स्वस्तिक ” अशाप्रकारे डावे आणि उजवे असे दोन प्रकार स्वस्तिक चे आहेत. जुन्नर परीसरातून स्वस्तिक चिन्हाचे पुरावे मिळालेले आहेत. त्याच प्रमाणे मोहेजोदडो मध्ये तसेच जौगड येथील सम्राट अशोकाच्या शिलालेखात जुन्नर परिसरात आढळलेल्या चार पायाच्या दंगडी पाट्यावर जशी दोन प्रकरची स्वस्तिक चिन्ह आहेत तशीच चिन्ह शिलालेखात आहे. इतर काही ठिकाणी झालेल्या उत्खननात स्वस्तिक चिन्हाचे पुरावे मिळालेले आहे.स्वस्तिक हे अतिप्राचीन मानवाने निर्माण केलेले सर्वात पहिले ‘ धर्मप्रतीक’ असल्याच समजल जात पण ते कुठल्या एका धर्माच प्रतीक नाही. स्वस्तिक चिन्हाच मूळ जुन्नर परिसरातून पाहायला मिळते. वरील स्वस्तिक चिन्हांचा विचार करता आपल्या असे लक्षात येते की, जुन्नर परिसरातील लेणी , शिलालेख, गवाक्ष कोरण्याचे काम चालू असतानाच अशा प्रकार ची प्रमुख शुभचिन्ह असलेले पाटे , लांबट गोल वरंवटे निर्माण करण्यात आले असावे. अत्यंत लहान आकाराचे ( मिनीऐचर) पाटे जुन्नर परिसरात मिळाले आहे. हे सर्व अवशेष इ. स पूर्व १ ल्या शतकातील आहे .
चार पाय असलेल्या दंगडी पाट्याचा पुढील एक शिरोभाग थोडा पुढे असून त्या खाली मृदचक्रातील थाळी ठेवत असत. त्या पाट्यावरील वाटलेला पदार्थ हा जमिनीवर न पडता थाळीत पडतो अशा प्रकारे पाटे जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील लोकवस्तीच्या ठिकाणी मिळालेले आहेत. जुन्नर परिसरात इसवी सनाच्या सुरुवातीच्या एक दोन शतकात धान्य दळण्याची जाती प्रचलित झाली. त्यापूर्वी कदाचित रात्रभर धान्य भिजवत ठेवून सकाळी ते चार पाय असलेल्या दंगडी पाट्यावर लांबट गोल वरवट्याने जाडसर रवाळ वाटून त्या पासून जाडी भरडी भाकरी ( रोट) बनविले जात असत.

४) आडव्या दांड्याचे जाते –
सातवाहन काळातील महिलाचे जीवन सुखकर करणारे प्राचीन काळातील आडव्या दाड्याचे दगडी जाते जुन्नर जवळील लेण्याद्री परिसरातील सातवाहन कालीन लोकवस्ती स्थळाच्या गोळेगाव मधून उपलब्ध झाले आहे. हे जाते रोमन पद्धतीचे असून प्राचीन जुन्नर आणि प्राचीन रोम यांच्या २००० वर्षे जुन्या संबंधाचा पुरावा म्हणून ओळखला जातो.
इ. स. पहिल्या शतकाच्या अगोदर जुन्नर परिसरात धान्य दळण्यासाठी जाती नव्हती या काळात महिला रात्रभर धान्य भिजत ठेवून सकाळी दगडी पाट्यावर वरवंट्याच्या सहाय्याने वाटून त्याची जाडी भरडी भाकरी बनवून ती विस्तावर भाजून खात असत. मानव संस्कृतीच्या इतिहासात प्रथम पाटा – वरवंटा आणि उखळ निर्माण झाल्या नंतर जात्याचा शोध लागला असावा. कारण जाते हे पाटा – वरवंट्याची सुधारित यंत्रिक आवृत्ती आहे . जुन्नर चा रोमन साम्राज्याशी नाणेघाट मार्गे व्यापार सुरू झाल्यानंतर आडव्या दांड्याचे गोल फिरणारे जाते आले. या जात्यामुळे जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील महिलांचे धान्य दळण्याचे काम सोपे होऊन ताज्या भाकरी, पोळ्या होऊ लागल्या. ” जाते” हा शब्द यंत्रकम् या यंत्रवाचक शब्दापासून बनलेला आहे . यंत्रकम् – यंतम् – जतम् – जत व पुढे ‘जाते’ हा शब्द मराठीत आला.
यज्ञ विधीत कांडणे आणि वाटणे या दोन क्रियांचा उल्लेख आहे . मात्र दळणे या क्रियेचा नाही म्हणून वेदकाळात जाते जास्त प्रचलित नसावे मानवी समाजाच्या पाकक्रियेत झालेल्या सुधारणाचा भाग म्हणून जाते निर्माण झाले असावे. हंड्यासारखा आकार असलेल्या या जात्याचा खालील भाग पातळ पण वरचा भाग खूप उंच वजनदार अशा दगडाचा आहे. जात्याचे हे दोन्ही भाग जात्याची तळी म्हणून ओळखले जातात. खालची तळी स्थिर असून त्या तळीच्या मध्यभागातील छिद्रामध्ये बसवलेल्या लाकडी खुट्या भोवती वरची तळी फिरण्याची व्यवस्था केलेली आहे. वरच्या तळीला जाते फिरवण्यासाठी लाकडी दांडा बसवण्यासाठी समोरा – समोर दोन भोके ( छिद्रे) पाडलेली असतात. वरील बाजूने धान्य टाकण्याची सोय केलेली आहे. दोन महिला समोरा – समोर बसून आडवा दांडा हातात धरून वरती तळी फिरवत असताना मध्यभागी असणाऱ्या पेल्याच्या आकाराच्या छिद्र्यातून धान्य टाकीत. तळ्याच्या घोषणामुळे धान्याचे पीठ होऊन ते दोन तळ्याच्या कडेला असणाऱ्या फुटीतून बाहेर पडत.
सातवाहन काळातील हे आडव्या दांड्याचे जाते रोमन पद्धतीचे असून प्राचीन जुन्नर आणि प्राचीन रोम यांच्या दोन हजार वर्षे जुन्या संबंधाचा पुरावा आहे. अशी जाती तेर , पैठण, कोल्हापूर, नालासोपारा , नेवासे, लोथड, इटलीतील पाँम्पे येथील उत्खननात सापडलेली आहे . प्रचालीत जात्यापेक्षा हे आडव्या दांड्याचे जाते वेगळे असून आपण वापरत असलेली जाती ही मूळ रोमन जात्याच्या प्रभावातून बनविलेली आहे. असे जुन्नर परिसराचे प्राचीन इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे म्हणतात.

जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील प्राचीन अवशेष भाग २ वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

बापूजी ताम्हाणे, गोळेगाव – लेण्याद्री
ता. जुन्नर, जिल्हा. पुणे ( महाराष्ट्र )

संदर्भ :
१) सुरेश वसंत जाधव – जुन्नर परिसरातील संशोधन , पुणे त्रैमासिक ६२: १-४,जुलै १९८३ ते एप्रिल १९८४ पृ. ७२
२) संजय गोडबोले – जुन्नर येथील काही प्राचीन अवशेष, पुणे त्रैमासिक ६९: १-४,जुलै १९९० ते एप्रिल १९९१ पृ. २५
३) शांताराम भालचंद्र देव – पुरातत्वविद्या , पुणे १९७६ पृ. १२९
४) डॉ. सौ. दीपा सावळे – मराठे कालीन दागदागिने आणि अलंकार, प्रकरण पहिले – प्रथमावृत्ती जून २००७

Leave a Comment