मावळचे प्राचीन टाके, टाकवे खुर्द –
मावळ घाटमाथ्यावरच महत्वाचा प्रांत. या घाटमाथ्यावरून खाली उतरल की कोकण. घाट व कोकण यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे बोरघाट. आनेक घाटमार्गांचा वापर प्रवासी व व्यापार साठी केला गेला. या मार्गावर आनेक कालखंडात लेणीसुध्दा खोदल्या गेल्या तर घाटांच्या सुरक्षततेसाठी गड किल्ले बांधले गेले.(मावळचे प्राचीन टाके)
सातवाहन काळात व्यापार भरभराटीला आला यात जुन्नर नाशिक तेर ,पैठण ही महत्वाची शहरे भरभराटीला आली. कल्याण सोपारा चौल या महत्वाच्या बंदरातून व्यापार होऊ लागला हा सर्व माल घाटातून वर येऊ लागला.यात नाणेघाट जेवढा महत्वाचा होता तेवढाच महत्वाचा घाट म्हणजे तेरला जोडणारा बोरघाट. या सर्व प्रवासात महत्वाचा घटक म्हणजे पाणी.
सातवाहन काळात किवा मध्ययुगीन कालखंडात आनेक व्यापारी मार्गावर पाणपोई किवा टाक खोदल गेल्या तर काही प्रमाणात सराई बांधण्यात आल्या. यात सर्वात जुने म्हणजे टाकवे खुर्द मधील पाण्याच टाक. खंडाळा ,लोणावळा सोडल की लागत इंद्रायणी खोर. या खो-यातील एक गाव टाकवे खुर्द
बोरघाट चढून वर आलो की विसाव्या साठी व पाण्यासाठी थांबव लागे या साठी काताळात टाक खोदल गेल. हे टाक म्हणजे वाटसरूंना ,प्राण्यांना थांबायच हक्काच ठिकाण. सदर पाण्याच टाक मुंबई पुणे हायवेला लागून काही फुटावरच टाकवे खुर्द गावात आहेत.
मोठ्या अखंड काताळात हे टाक खोदल गेल आहे. पाणी काढण्यासाठी याला चार चौकोनी आकाराच्या झरोके केले आहेत तर पाचव्या झरोक्यातून आत ऊतरायला दोन पाय-या बांधल्या आहेत. या टाक्यावर शिलालेख असल्याची नोंद आहे पण आता तो दिसेनसा झाला आहे.
एका नोंदीनुसार याची लांबी६.७ मी व रुंदी ८.५ मी. आहे. व पाण्याची क्षमता १लाख लिटरच्या वर आहे. आज सुध्दा हे टाक पाण्याने पुर्णपणे भरले आहे. पाणी स्वच्छ नितळ आहे. हे टाक म्हणजे स्थापत्याचा अविष्कार आहे. हजार वर्षाच्या वर झाले तरी या टाक्याच्या दगडाला तडा सुध्दा गेला नाही किवा पाणी गळती झाली नाही किवा गाळ साचला नाही. हे पाण्याच टाक म्हणजे ‘उदक राखीले युक्तीने’ असे म्हणावे लागेल.
इतिहासाच्या दृष्टीने हजारोवर्षाचा आपल्याला लाभलेला हा वारसा आहे . त्याच जतन ,संर्वधन होण गरजेच आहे. ‘टाक’वे खुर्द हे नाव या प्राचीन टाक्या मुळे पडले असेल असा तर्क लावता येतो. याला लिखीत संर्दभ नाही.
संतोष मुरलीधर चंदने, चिंचवड, पुणे.