प्राचीन मंदिर बारव, ब्राम्हणी, ता. राहुरी –
नगर शहरापासून डोंगरगण – वांबोरी घाटमार्गे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले ब्राम्हणी हे सुंदर गाव. अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला तो या ब्राम्हणी गावात. जसा पैस खांब नेवासे येथे आहे तसा एक अमृतानुभव स्तंभ या गावातील बल्लाळी देवीच्या मंदिरासमोर आहे. याच गावाच्या आत मध्ये पुरातत्व खात्याच्या ताब्यात असणारी सुंदर मंदिर वजा बारव असून, या बारवेचा जुन्या काळात पाणी पुरवठ्यासाठी वापर होत असे.
भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात असलेल्या या मध्ययुगीन काळातील मंदिर वजा बारवेचा जीर्णोद्धार केला आहे. या बारवेचे चिरे ढासळले होते. हे संरक्षित स्मारक असल्याने पुरातत्त्व विभागाने दगड नीट रचून हे सुस्थितीत आणले आहे.
सुमारे शंभर फूट लांब-रुंद असलेल्या या बारवेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बारव व शुष्कसांधी प्रकारातील मंदिर एकत्रच आहे. अश्या प्रकारची रचना कमी ठिकाणी पहायला मिळते. मंदिराचे खांब वैशिष्ट्यपूर्ण असून ते चांगल्या अवस्थेत आहे. मंदिरात शिवलिंग असून आतील बाजूस काही मूर्त्या आपल्याला पहायला मिळतात.
Rohan Gadekar