प्राचीन मंदिर बारव, खांबपिंपरी, ता. शेवगाव –
महाराष्ट्र देशी हिंडताना अकस्मात कुठलातरी खजिना आपल्या समोर येतो आणि आपले पाय तिथेच थबकतात. आनंदाला पारावार राहत नाही. नगर जिल्ह्यातल्या शेवगाव परिसरात भटकत असताना असाच एक शिल्पकलेचा उत्तम नमुना उपेक्षित स्थितीत आढळून आला. शेवगाव पासून अवघ्या २३ किमी अंतरावर काटकडी नदीच्या काठी वसलेलं खांबपिंपरी हे गाव आणि तिथे असलेली बारव, चौसष्ट योगिनींचे शिल्पे व प्राचीन मंदिर पाहून थक्क व्हायला होतं. गावात प्रवेश करताच उजव्या बाजूस सुमारे साडे आठ फूट उंचीचा, सेंदूराने माखलेला दगडी खांब झुकलेल्या अवस्थेत पहावयास मिळतो. याच खांबावरुन ‘पिंपरी’ या गावाचे खांबपिंपरी असे नाव पडले आहे.(प्राचीन मंदिर बारव)
गावातील तो खांब म्हणजे एका प्राचीन मंदिराच्या बहुधा सभामंडपाचा खांब असावा. ज्या अर्थी हा खांब इथे आहे, त्याअर्थी इथे एखादं मोठं मंदिर अस्तित्वात असणार. पण त्याचं काहीही अस्तित्व आज इथे दिसत नाही. नाही म्हणायला काही मूर्तीचे अवशेष इतस्तत: विखुरलेले आहेत. याच खांबाच्या समोरील बाजूस एक मोठी बारव बुजलेल्या अवस्थेत पहावयास मिळते. बारवेत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बारवेत खाली उतरल्यावर चारही बाजूस अतिशय बारीक, सुंदर कोरीवकाम केलेल्या, योग साधनेतील ४९ चौशष्ट योगिनीचे शिल्प आढळून येतात. तसेच प्रत्येक योगिनीच्या हातामध्ये जपमाळ व इतर आयुधे दिसतात. या ठिकाणी काळभैरवाचे दुर्मिळ असे शिल्पं देखील आहे. जवळच एक शिवमंदिर असून गाभाऱ्यात शिवपिंड आहे. सभागृहात नंदी विराजमान असून मंदिराचे शिखर नव्याने बांधण्यात आले आहे.
भारतात मध्यप्रदेश, राजस्थान ओडिसा या ठिकाणी चौशष्ट योगिनीचे मंदिर आहेत. मात्र, बारवेतील चौशष्ट योगिनींचे साधना करतांनाचे हे शिल्प अदभूत व दुर्मिळ असून राज्यातील एकमेव असे आहे. एवढा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे. त्या पाठीमागचा सांस्कृतिक इतिहास समोर आला पाहिजे. घोटण इथले मल्लिकार्जुनाचे प्राचीन मंदिर हेसुद्धा याच परिसरात वसलेले आहेत. शेवगाव तालुक्यातील भटकंतीत चुकवू नये असे हे ठिकाण आहे.
Rohan Gadekar