पुरातन मंदिरांच गाव – चांडोळ, ता. जि. बुलढाणा
चांडोळ ह्या गावाला पूर्वी चंपावती नगर म्हणूनही ओळखले जायचे हे गाव बुलडाणा शहरापासून ३६ की अंतरावर आहे. ह्या चांडोळ गावाची ओळख पूर्वी मंदिरांचं गाव म्हणून एके काळी होती. चांडोळ गावात हेमाडपंथी शैलीत बांधलेले काळ्या पाषाणातील एकूण ४ मंदिरं आहे.(पुरातन मंदिरांच गाव चांडोळ)
१) नृसिंह मंदिर :
राज्यभर नृसिंह मंदिर बोटावर मोजण्याइतकी आहेत; त्यापैकी बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, जानोरी, उमरद व मेहकर ह्या चार ठिकाणी नृसिंह मंदिर आहेत. नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.
मंदिराच्या दर्शनी भागावर एक अतिशय दुर्मिळ अशे बारा ज्योतिर्लिंगाचे शिल्प कोरलेले असून असे शिल्प कदाचितच एखाद्या मंदिरावर असावे. सभामंडपातील खांबावर काही देखनिय शिल्प कोरलेले आहे. ह्या नरसिंह मंदिरात तीन गर्भगृह असून दोन गर्भगृहात शिवलिंग तर मुख्य गाभाऱ्यात भगवान नरसिंहाची मूर्ती आहे. गाभाऱ्यातील नृसिंहाची मूर्ती प्राचीन सिंहरूपातील हिरण्य कपशुचा वध करतानाची आहे. वेरूळच्या १५ व १६ व्या क्रमांकाच्या लेण्यांत नृसिंह-हिरण्यकश्यपू युद्धाचा प्रसंग दर्शविला आहे. हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत असून मंदिरात आल्यावर आपल्याला अत्यंत शांतता जाणवते.
२) खोलेश्वर किंवा खोल महादेव मंदिर :
ह्या मंदिराचा गाभारा जमिनीत खोलवर असल्यामुळे ह्याला कदाचित खोल महादेव हे नाव पडले असावे मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर काही देवी देवतांची शिल्प आहे. गाभाऱ्यात उतरण्यासाठी पायऱ्या एकदम सरळ असल्यामुळे आपल्याला सावकाशच खाली उतरावे लागते गाभाऱ्यात एक मोठे शिवलिंग असून आतमध्ये आपल्याला गारवा जाणवतो. मंदिराचे बांधकाम बाहेरून अर्धे दगडात तर अर्धे विटात केलेले आहे. मंदिर परिसरात अनेक शिल्प तुटलेल्या अवस्थेत आहेत.
३) गढीतला महादेव मंदिर :
चांडोळ येथे असलेल्या ४ हेमाडपंती मंदिरांपैकी हे एक मंदिर. सध्या खुप दुरावस्था झालेली आहे. स्थानिक सोडले तर इतर लोकांना येथे मंदिर आहे कळणार सुध्दा नाही. एका गढीच्या भिंतीला लागून हे मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला गढीचा महादेव म्हणतात. जवळच एका पत्र्याच्या मंदिरात एक विरगळ आहे.
४) महादेव मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर :
चांडोळ हे एक ऐतिहासिक गाव आहे. येथे एक पुरातन गढी होती. गावाला वेस (दरवाजा) होती. दरवाज्याची एक भिंत अजून उभी आहे. येथे असलेल्या गढीच्या वर दोन भव्य हेमाडपंथी मंदिरे होती. एक महादेवाचे तर दुसरे महालक्ष्मीचे मंदिर होते. आता गढी पुर्णपणे नष्ट झाली आहे आणि त्यावरील पुरातन मंदिरेही उध्वस्त झाली आहेत.
Vidarbha Darshan