महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,35,448

अंधकासुर गजासुर संहार मूर्ति

By Discover Maharashtra Views: 1399 3 Min Read

अंधकासुर गजासुर संहार मूर्ति –

धकासुर गजासुर संहार मूर्ति या एकाच शिल्पात 3 गोष्टी आहेत.. विश्वास नाही ना बसत? मुळात आपण मंदिरे पाहतो कशाला? लेण्यात काय आणि जुन्या मंदिरात काय.. त्याच त्याच मूर्ति आणि वटवाघूळ.. दुसरं काय असतंय तिथे?पण एक खरं सांगतो, आपले पूर्वज सगळ्यात भारी Storyteller होते.. त्यांच्याकडून जर तुम्हाला गोष्टी ऐकायला मिळाल्या, तर लगेच या लेण्यांचे, या मंदिराचे कोडे सुटेल..

हेच शिल्प पहा ना.. ही आहे ‘अंधकासुर गजासुर संहार मूर्ति’. कूर्मपुराणात आलेल्या कथेप्रमाणे, वाराणसी (काशी) च्या कृत्तिवासेश्वर लिंगाची पूजा सुरू असताना त्या साधूंना एका असुराने त्रास देण्यास सुरुवात केली. हत्तीचे रूप धारण केलेल्या त्या असुराचे नाव होते ‘गजासुर‘.. शिवाने त्याचा संहार केला आणि त्याचे कातडे अंगाभोवती पांघरले.

कूर्म, वराह आणि वामन पुराणामध्ये अशीच एका राक्षसाची गोष्ट येते. या असुराला ब्रम्हदेवाचा वर होता. त्याच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक असुरांची निर्मिती होत असे. याने देवांना अतिशय त्रास देण्यास सुरुवात केली.. सगळे देव या असुरामुळे त्रस्त झाले. याचे नाव ‘अंधकासुर‘.

या दोन्ही असुरांना शिवाने संपवले. जेव्हा अंधकासुरला शिवाने मारले तेव्हा त्याचे रक्त जमिनीवर सांडून अनेक असुर निर्माण होत होते. तेव्हा शिवाने आपल्या डोळ्यांमधून एक शक्ती निर्माण केली, तिचे नाव योगेश्वरी.. अंधकासुरचे रक्त पिऊन टाकणे, हे तीचे काम.

आता आपण जाऊया वेरूळमध्ये.. लेणी क्र. 29 मधील ही मूर्ति पहा.

आठ हातांचा रुद्रावतारात उभा असलेला शिव आपल्याला दिसून येतोय.

मूर्तिच्या डाव्या बाजूस अंधकासुरला शिवाने आपल्या त्रिशूळाने मारले आणि उंच आकाशात उचलले असल्याचे चित्र रंगवले आहे. अंधकासुरला अवकाशात भिरकावले, हे दाखवण्यासाठी त्याच्या मागील बाजूस गोल-गोल आकारात ‘आकाश’ सुद्धा दाखवले आहे.

वरच्या दोन्ही हातांमध्ये शिवाने हत्तीचे कातडे पकडले आहे. उजव्या हाताच्या तलवारीमागे गजासुराचे हत्तीच्या रूपातील तोंड दिसते तर डाव्या बाजूस त्याची शेपटी.. बटबटीत डोळे, चेहऱ्यावरील उग्र हावभाव आणि आक्रमक स्थितीमध्ये उभारलेला शिव एका बाजूला आणि सर्वात खालच्या डाव्या हाताने आपल्या पत्नीला, पार्वतीला समजावणारा शिव दुसऱ्या बाजूला.. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या मानवी भावनांचे मिश्रण किती सुंदरपणे दाखवले आहे.

शिवाने आपल्या हातात अंधकासुराच्या खाली वाडगे धरले आहे. अजून ‘योगेश्वरी’ ने इथे अवतार घेतलेला नाही पण पुढच्या लेणीमध्ये अंधकासुराचे रक्त पिणारी ‘योगेश्वरी’ दिसते.. वराहपुराणात अजून एक गोष्ट सांगितली जाते, जेव्हा अंधकासुर आणि शिवाचे युद्ध पेटले तेव्हा नील नावाचा एक राक्षस हत्तीचे रूप घेऊन शिवावर चालून आला. तेव्हा वीरभद्रने आपल्या ‘तलवारीने’ नील राक्षसाला मारले आणि त्याचे कातडे शंकराकडे दिले. त्या युद्धानंतर शिव अतिशय रागामध्ये एक कोसभर धावत होता.. त्रिशूळाला अंधकासुर तसाच ठेवून आणि दोन्ही हातामध्ये त्या हत्तीचे कातडे धरून.. कितीतरी वेळ त्याने तांडव केले आणि मगच तो शांत झाला. एखाद्या असुराचा संहार करणाऱ्या शिवाच्या मूर्तिला ‘संहारमूर्ति‘ म्हणतात.

अशी ही गोष्ट.. ही जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा शिल्प पाहायला, ते वाचायला मजा येईल. त्यामागची गोष्ट समजल्यामुळे ते शिल्प तिथेच का कोरले, हे सुद्धा समजून येईल.. मग आपोआप लेणी वाचता येते.. मंदिर वाचता येतं…

आता जुनी लोकं गोष्टी सांगण्यात भारीच होती.. पण आता आपण त्या गोष्टी सांगायला हव्यात..आपणसुद्धा Storyteller व्हायला हवं..

केतन पुरी.

Leave a Comment