अंकाई-टंकाई लेणी, अंकाई, ता. येवला –
अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो. या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मध्ये प्रसिद्ध अंकाई-टंकाई चे जोडकिल्ले उठावलेले आहेत. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. किल्ल्यावर असणाऱ्या लेणीतील अंकाई देवीमुळे गावाला हे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. टंकाई हा अंकाई किल्याचाच एक भाग असून टंकाई हे नाव टुकाई देवीच्या नावावरून पडल्याचे ग्रामस्थ सांगतात.(अंकाई टंकाई लेणी)
अंकाई गावातून गड चढाईला प्रारंभ केल्यानंतर पुरातत्त्व विभागाने बांधलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून थोड्या चढाईनंतर टंकाई किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेला जैन लेणी समूह आपल्याला दिसतो. या ठिकाणी वरच्या रांगेत एकूण आठ व त्याखालील रांगेत दोन अशा दहा लेण्या आढळतात. लेणी परिसरात पाण्याचे चार टाके आहेत. या लेणी दहाव्या ते अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात. येथे लेणी क्रमांक ३ वर एक शिलालेखही आहे. मात्र तो पुसट झाल्याने त्याचे वाचन करता येत नाही. लेणी क्रमांक दोन मध्ये अनकाई देवी आहे. इतर लेण्यांमध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती, यक्ष प्रतिमा व द्वारशिल्पे पहायला मिळतात. जैन लेणी केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे सुरक्षित वास्तू घोषित करण्यात आली आहे.
जैन लेणी पाहून पुढे गेल्यानंतर गडाच्या दुसऱ्या दरवाज्या जवळ उजवीकडे कातळात प्राचीन हिंदू लेणी आपल्याला दिसून येतात. यांतील मुख्य लेण्यात व्हरांडा आणि एक गर्भगृह आहे. हे शैव लेणे असून गर्भगृहाच्या बाजूच्या भिंतीवर शिवाचे द्वारपाल कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेरील बाजूस खांबांवर स्त्रीशिल्पे असून यांपैकी एक शिल्प हे गंगेचे आहे. गाभाऱ्यामध्ये घारापूरी येथे असलेल्या त्रिमूर्तीसदृश सदाशिवाचे शिल्प आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मते, या लेण्याचा कालखंड हा इ. स. नववे ते दहावे शतक असा आहे.
Rohan Gadekar