वरंधची अजून एक घळ !!
(वरंध घळ)
मान्सून आणि लॉकडाऊन संपल्यावर भटक्यांचे पाय आपोआप सह्याद्रीकडे वळतील. सहा महिने सक्तीची कैद झाल्यामुळे घराबाहेर कुठेही पडणे अगदी मुश्कील झालेले असणार. कधी एकदा आपण आपल्या सखा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडायला बाहेर पडतो आहोत असं होऊन गेलंय. अशा वेळी एखादे नवीन, अनोखे, देखणे ठिकाण मिळाले तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. अशाच एका ठिकाणाला या वेळी भेट द्यायची आहे. ते ठिकाण नवीन तर आहेच पण वेगळे आहे का नाही ? सांगता येत नाही.(वरंध घळ)
समर्थ रामदास या व्यक्तिमत्वाचे गूढ काही केल्या उलगडत नाही. अखंड भ्रमंती, लोकजागर, बलोपासना, दासबोधासारख्या ग्रंथाची रचना अशा समाजोपयोगी निरनिराळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या या अनोख्या व्यक्तीचे वास्तव्य मात्र डोंगरात, कडेकपारी, गुहा, घळी अशा ठिकाणी असायचे.
“दास डोंगरी राहातो, यात्रा देवाची पाहतो |”
या नीतीने समर्थ रामदासांचे वास्तव्य हे गावात, मठात, मंदिरात कधीच नसायचे. त्यांनी वास्तव्य केलेल्या विविध घळी या रामघळी म्हणून प्रसिध्द झाल्या. शिवथरघळीच्या अगदी जवळ अजून एक घळ आहे. या घळीचे नाव स्थानिक लोक सुंदरमठ असे सांगतात. ही घळ आहे वरंध गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरामध्ये. एक रस्ता नेहमीच्या पुणे महाड मार्गावरील वरंध घाटातून शिवथरघळ फाट्यावरून आत जाणे, तिथून पुढे शिवथरघळीकडे न जाता डाव्या बाजूने सरळ रस्ता संपेपर्यंत जाणे. तिथे एक मठ आहे. त्याच्या शेजारून रस्ता घळीपर्यंत जातो.
दुसरा रस्ता म्हणजे वरंध घाट उतरून गेले की वरंध नावाचे गाव येते. याच गावातून काहीसे पुढे महाडच्या दिशेला जायला लागले की रस्त्याच्या उजव्या बाजूला काही दुकाने दिसतात आणि तिथे उजवीकडे आत एक रस्ता जातो. (मुंबईकडून आल्यावर वरंध गावाच्या काहीसे अलीकडे डाव्या हाताला ही जागा येते.) त्या रस्त्यावरून आत गेल्यावर अंदाजे ४ कि.मी. अंतरावर ही घळ आहे. आत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे. आणि पुढे गेल्यावर अंगावरची चढण एक दोन ठिकाणी लागते. दुचाकी वाहने जायला काही त्रास नाही परंतु जीपसारखी चारचाकी वाहनेच तिथे जाऊ शकतात. आणि ऐन पावसाळ्यात तर तिथे पदभ्रमणच करावे लागेल. पण सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे.
पाण्याची एक टाकी आणि एक बांधलेली समाधी अशा ठिकाणी रस्ता संपतो. वाहन तिथेच ठेऊन समोरच्या डोंगराच्या पोटातून गेलेली एक पायवाट घळीपाशी जाते. तिथून दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आपण घळीच्या तोंडाशी येऊन उभे राहतो. पाठीमागे पहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे. त्याचे पाणी पडून खालच्या बाजूला एक डोह तयार झाला आहे आणि तिथून ते पाणी पुढे नदीचे रूप घेऊन पुढे वाहत जाते. दक्षिणाभिमुख असलेली ही घळ आतमध्ये डाव्या बाजूला पूर्व-पश्चिम अशी जवळ जवळ ६० फूट लांबीला आहे. तसेच ती १० ते १२ फूट रुंद आहे. दारातून आत गेल्यावर समोरच्या भिंतीमध्ये दगडात कोरलेली बसण्याची जागा आहे. मूलतः ही नैसर्गिक घळ असणार नंतर मानवाने ती त्याला हवी तशी खोदून काढलेली दिसते. आतमधे जाताना डाव्या बाजूला एक फूट उंचीचा आणि अंदाजे ३ फूट लांबीरुंदीचा एक दगडी चौथरा आहे. तसेच पुढे गेले की खडकामध्ये खोदलेले एक पाण्याचे टाके दिसते. आणि तिथून पुढे किंचित घळ वळते आणि मग दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा मार्ग दिसतो. या ठिकाणाचा उल्लेख हा “मठाचा माळ” असा केलेला आढळतो. याचा अर्थ इथे मठ होता याची यावरून खात्री पटते असे तज्ञ सांगतात.
ऐन सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे अतिशय सुंदर ठिकाण मुद्दाम बघण्याजोगे आहे. इथून दिसणारे निसर्गाचे रूप केवळ लोभसवाणे असते. सह्याद्रीत लपलेल्या या एका अनगड जागेला नक्की भेट द्यावी. इथून दिसणारा रौद्र निसर्ग, भन्नाट वारा, आणि बाजूलाच कोसळणारा धबधबा याचा मनसोक्त अनुभव घेण्यासाठी वरंध इथल्या या अजून एका घळीला भेट देणे अनिवार्य आहे.
आशुतोष बापट.