महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,53,496

सौन्दर्य प्रसाधनांची जुनी पदचिन्हे | Antique Cosmetics

By Discover Maharashtra Views: 3691 7 Min Read

सौन्दर्य प्रसाधनांची जुनी पदचिन्हे | Antique Cosmetics

सर्व प्राण्यांना जे काही नटवायचे ते निसर्गाने स्वतः:च नटविले आहे. पण मनुष्य प्राण्याला मात्र निसर्गाने दिलेले सौंदर्य अपूर्ण वाटते.अनादिकालापासून तो अधिकाधिक सौंदर्य प्रसाधनांच्या शोधात आहे. सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती त्याने हजारो वर्षांपासून चालविली आहे. अगदी मोहेंजोदरो आणि हडप्पा , ईजिप्शियन, ग्रीक अशा पुरातन संस्कृतीतून त्याची बीजे दिसतात. निसर्गाने जे सौंदर्य द्यायचे ते त्याने सर्व प्राण्यांमधील नरांना दिले आहे. सुंदर दिसण्यासाठी त्यांने विविध प्राणी, पक्षी आणि कीटक यांच्यातील नरांना सुंदर रंग,पिसारा,तुरे,आयाळ,आवाज,आकार दिलेले आहेत. पण मनुष्य प्राण्याने मात्र हे असे निसर्गदत्त सुंदर दिसणे नाकारून स्वतः कांही वेगळी परिमाणे निर्माण केली. त्यानुसार तसे सुंदर दिसणे त्याने मुख्यत्वेकरून स्त्रीकडे सोपविले आहे. त्यामुळे साहजिकच सर्व प्रकाशझोत हे स्त्री सौन्दर्य साधनांवर वळतात. आज जागतिक पातळीवर सौन्दर्य साधनांची व्यावसायिक बाजारपेठ अब्जावधी रुपयांच्या पलीकडे आहे. गेल्या पिढीतील अशाच काही परिचित तर काही पूर्ण अपरिचित अशा सौन्दर्य प्रसाधनांची आणि वेगळ्या अशा काही गोष्टींची ही ओळख आणि स्मरणरंजनही !

फणी करंडा पेटी किंवा ऐना पेटी — स्त्री साजशृंगाराची ही महत्वाची ठेव. सागवानी पेटीत झाकणाच्या आतल्या बाजूला आरसा बसविलेला असे आणि त्यातील विविध खणांमध्ये कुंकवाचा करंडा, फणी, काजळाची डबी,( सुरमा डबी), केसात खोवायचे आकडे, कांचेच्या बांगड्या अशा वस्तू असत. कुंकवाचा करंडा हा पितळी किंवा चांदीचा असे. पूर्वी सर्वसाधारणतः स्त्रियांचे केस जाड, लांब, घनदाट असायचे. त्यामुळे कंगव्यापेक्षा फणीचा वापर अधिक होई. ही फणी चांदीची किंवा कडुलिंबाच्या लाकडाची असे. ऐपतीनुसार हस्तिदंती, चांदीच्या मुठीचीही असे. आज आपला देश अन्य प्रगत राष्ट्रांचे उपग्रह लीलया आकाशात सोडण्याइतका प्रगत आहे. पण तेव्हा केसात खोवायचे आकडेसुद्धा ” Made In England ” असत. रोजच्या वापरातील बांगड्यांचा यात एक कप्पा असे. अंबाड्यात खोचायची फुले ( चांदीच्या फुलांच्या लांब आकड्यांना सोन्याचा मुलामा दिलेला असायचा ) एका खणात असत.
एक गंमत म्हणजे अनेक पेट्यांना अंगचेच चांगले कुलूप असे. या पेटीची मालकीण या कुलुपाची किल्ली एखाद्या गोफात किंवा लोकरी धाग्यात घालून गळ्यात घालून ठेवीत असे. अगदी त्या वेळीसुद्धा, आजच्या मालिकांमध्ये दाखवितात तशा एकमेकींच्या वस्तू चोरून वापरल्या जात. मग एकमेकींवर आरोप — खरंखोटं — साक्षीपुरावे असेही होई. म्हणून मग कुलुपाच्या पेट्या सुरक्षित वाटत. त्यावेळी प्रामुख्याने वस्तुविनिमय ( बार्टर सिस्टीम ) चालत असल्याने लोकांकडे रोकड कमी असे. बाईला तर स्वातंत्र्य कमीच असे. मग अशा पेटीत माहेरून मिळालेला एखादा चांदीचा रुपया जपून ठेवलेला असायचा. एखाद्या साधुपुरुषाचा अंगारा असायचा. लहानपणची एखादी आठवण असायची.माझ्या आजीने सांगितलेली सुमारे ८०- ८५ वर्षांपूर्वीची एक आठवण अगदी आठवणीत राहण्यासारखीच आहे. तिच्या एका मैत्रिणीच्या पेटीत मुचकुंदाचे एक वाळलेले फुल होते. शेजारच्या वाड्यातील एका मुलाने तिला ते दिले होते. नंतर या मैत्रिणीचे १० व्या वर्षीच दुसरीकडे लग्न झाले आणि हा फूल देणारा, पुढे सैन्यात भरती झाला. दोघांची पुन्हा भेट झालीच नाही. पण ते मुचकुंदाचे फूल मात्र या पेटीत कायमची आठवण होऊन राहिले होते.
अशी ही फणी – करंडा पेटी आणि आजची व्हॅनिटी बॉक्स म्हणजे आजी आणि नात म्हणावी लागेल पण आज या नातीला अशा भावना चिकटलेल्या असतील का ?

शृंगार डबी– आजच्या ‘मेक अप कॉम्पॅक्ट ‘ ची पूर्वज म्हणजे “शृंगार डबी”.. मधोमध लांब दांडीचा आरसा. त्या आरशाच्या मागेपुढे दांडीवरच बसविलेले आणि सरकवून उघडता येणारे दोन खोलगट गोल. या दोन खोलगट भागात कुंकू आणि काजळ असायचे आणि पाहायला छोटा आरसा.या दोन गोलांच्या बाहेर शृंगाराची द्योतक अशी राघूमैनेची जोडी. सगळ्या भागांवर छान कोरीव काम . सहजपणे कुठेही अडकवायला टोकाशी एक छानसा आकडा ! पूर्वी चेहेऱ्याला लावायला पावडर, क्रीम्स, लोशन्स, लिपस्टिक अशा काही गोष्टी नसल्याने कुंकू, काजळ आणि आरसा या तीन गोष्टीच महत्वाच्या होत्या.

केस वाळवणारे आणि गुंता सोडविणारे आकडे- ( Hair dryer and untangler )-
पूर्वी आपल्या देशात स्त्रियांना पडणारी अंगमेहेनतीची कामे आणि हवामान लक्षात घेता डोक्यावरून स्नानाची पद्धतच होती. दक्षिण भारतात तर स्त्रिया डोक्याला रोज तेल लावून स्नान करीत. नदीत डुबकी मारून स्नान करतांना डोकं भिजणे अनेकदा अपरिहार्य ठरे. मग हे दाट आणि लांबलचक केस वाळवायचे कसे ? कडक उन्हात केस वाळविणे शक्य नसे. नाहताना केसांच्या होणाऱ्या गाठी सोडविणे आणखी त्रासदायक. यासाठीच पूर्वी असे आकडे वापरले जात असत. हे आकडे दणकट आणि पितळेचे किंवा चांदी, तांबे इ. धातूंचे असत.त्यावेळी बहुतांशी स्त्रियांचे केस भरघोस आणि बळकट असल्याने लाकडी किंवा हस्तिदंती आकडे टिकत नसत . २ किंवा ३ काट्यांचे हे आकडे ओल्या केसांतून सतत फिरवत राहिल्याने गुंतलेले केस सुटायला आणि केस वाळायलाही मदत होई. अत्यंत कलात्मकतेने घडविलेल्या या आकड्यांवरील नक्षीकाम आणि त्यांच्या कलात्मक मुठी पाहण्यासारख्या असत. ओलसर तेलकट हाताने वापरताना हा काटा हातातून निसटू नये म्हणून मुठीला खास कंगोरे ठेवलेले असत. काट्यांवर कलाकुसर करता आली नाही तरी मुठींवर मात्र फुले, महिरपी, मोर, पोपट, मोरपीस, अप्सरा,यक्षिणी,नर्तिका इ. कोरलेल्या असत. सोबतच्या आकड्यांवर अप्सरांच्या अत्यंत रेखीव मूर्ती कोरलेल्या दिसतात.

धूप-पळी- – वाळलेल्या केसांना सुगंधित करण्यासाठी केसांना धुरी दिली जाई. धुपाटणे, धूपदाणी, लांब दांडीच्या पळ्या इ.चा वापर केला जाई. यात निखारे ठेऊन वर चंदन, धूप, ऊद, नागरमोथा. गव्हलाकाचरी इत्यादी पदार्थांचे चूर्ण टाकल्यावर धूर निर्माण होई. ह्या धुरावर केस धरले जात. त्यामुळे केस कोरडेही होऊ लागत आणि सुगंधी धुरामुळे केसांनाही सुगंध येई. अशा धुरजनक गोष्टी सौम्य जंतूनाशकही असल्याने केसांसाठी ते वरदानच ठरे. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी आजही केसांना अशा तऱ्हेने धुरी दिली जाते.
सोबतच्या चित्रातील लांब दांडीच्या हलक्या पळीमध्ये अशाच पद्धतीने निखारा आणि धूप, ऊद अशी सुगंधी पूड टाकून केसांना धुरी दिली जाई. ही पळी लांब केसांमध्ये, आतपर्यंत सहज पोचू शकत असे. दांड्याची लांबी आणि त्यावरील नक्षीमधील अनेक छिद्रे यामुळे हा दांडा लवकर तापत नसे. पळीवर खोदून आणि कोरून अशी दोन्ही प्रकारे सुंदर नक्षी काढलेली असून टोकावर पुन्हा छानशी अप्सरा आहेच.

आज आपल्या संस्कृतीतून अशा हजारो कलात्मक वस्तू वेगाने मागे पडून लुप्त होत आहेत. बदलत्या काळाबरोबर असे घडणारच. पण आज कित्येक उत्तमोत्तम आणि सांस्कृतिक ठेवा असलेल्या वस्तू जुन्या बाजारांमार्फत विदेशात जात आहेत. प्रत्येकाने आपल्या घरातील, जुन्या काळी वापरात असलेल्या, आपापल्या घराण्याचे वैभव असलेल्या, कुटुंबासाठी खास असलेल्या किमान ५ / ५ वस्तू तरी जपून पुढच्या पिढीपर्यंत पोचवीत राहिले तर हे सर्व वैभव आपल्या देशातच राहील.

इतिहास आणि फॅशन यांची नेहेमी पुनरावृत्ती होत असते. याही गोष्टी नवनवीन स्वरूपात पुन्हा येत आहेत. पण त्या तशाच्या तशा येणारच नाहीत. त्यामुळे आपल्याला याच वस्तू, एक अमोल सांस्कृतिक ठेवा म्हणून जपाव्या लागतील.
( किस्त्रीम २०१६ च्या दिवाळी अंकातील माझ्या लेखाचा संपादित भाग )




माहिती साभार – Makarand Karandikar | [email protected]

Leave a Comment