महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,922

जुनी एकसंध इस्त्री, धुरांड्याची इस्त्री | Antique Iron

Views: 3692
4 Min Read

जुनी एकसंध इस्त्री, धुरांड्याची इस्त्री | Antique Iron

उत्तरीय आणि अधरवस्त्रांच्या वापरामधून माणूस बाहेर पडला आणि एक अफाट मोठे वस्त्रदालन खुले झाले. विविध ठिकाणाची भौगोलिक परिस्थिती आणि तेथील वातावरण लक्षात घेऊन वस्त्रनिर्मिती होऊ लागली. अतिउष्ण प्रदेशातील लंगोटीपासून अतिथंड प्रदेशातील थ्रीपीस सूट – त्यावर लोकरीचे ओव्हरकोट अस्तित्वात आले. गरजेनुसार स्विमसूट, स्पेससूट, फायरप्रूफ सूट निर्माण झाले. आणि मग सुरु झाला, अशा विविध कपड्यांच्या बडदास्तीचा एक वेगळा अध्याय !
टेरीन, टेरिलिन, शार्कस्किन, टेरीकॉट अशा कापडांपासून तयार झालेल्या कपड्यांची सुरुवातीला ” Wash and Wear ” अशी प्रसिद्धी झाली. वुलन तसेच प्राण्यांच्या चामड्यापासून तयार केलेले कपडे वापरल्यावर तसेच टांगून ठेवले जात असत. पण त्याआधी सुती वस्त्रांचा एक मोठा कालखंड व्यापून राहिलेला होता.

आपल्या देशात सुती कपडे धुतल्यावर ते झटकून पूर्ण पसरून वाळत टाकले जात असत.वाळल्यावर कपड्याला पडणाऱ्या सुरकुत्या या सगळ्यांच्याच कपड्यांना असल्याने फारसे बिघडत नव्हते. धुतल्यावरही ते मळकट – मातकट दिसत असत. नंतर भारतात आलेल्या मोगल आक्रमकांचे कपडे तर सैल घोळदारच असत. सुरुवातीच्या बहुतांशी ब्रिटिश शासकांचे कपडे हे सैनिकी धाटणीचे असत. पण नंतरच्या उच्च प्रशासकांच्या आगमनाबरोबर, घड्या आणि चुण्याविरहित कपड्यांचा दिमाख जाणवू लागला.

मग इथल्या कपड्यांचीही प्रगती सुरु झाली. कपडे स्वच्छ दिसणे गरजेचे वाटू लागले. कपड्यांसाठी साबण आले. साबणाचा चुरा – पावडर आली. स्टार्च आले, नीळ आली. टिनोपॉल आले. चुण्याविरहित दिसण्यासाठी सुरुवातीला, कपड्यांच्या घड्या ह्या पलंगाखाली ठेवल्या जात असत. भारतात ब्रिटिशांनी इस्त्री आणली असावी. त्याचे केवळ वर्णनच माहिती होते. ते ऐकून आपल्याकडेही, पिण्याच्या पाण्याच्या पितळी तांब्यामध्ये निखारे घालून त्याने ( तो तांब्या सांडशीत धरून ) कपड्यांना इस्त्री करण्याचे प्रयोग सुरु झाले. पण तापमानाचा अंदाज न आल्याने कपडे जळत असत. अति गरम झालेल्या तांब्यावर सांडशीचे ठसे कायमचे उमटत असत.

चीनमध्ये इ.स.पूर्व पहिल्या शतकात धातूच्या पत्र्यावर निखारे ठेऊन कपड्याच्या चुण्या काढायला पहिल्यांदा सुरुवात झाली. १७ व्या शतकात विविध इस्त्री प्रयोगांना सुरुवात झाली. हॅण्डल असलेला पसरट एकसंध त्रिकोणी लोखंडी तुकडा थेट चुलीवर तापवून कपड्यावर फिरविला जाऊ लागला. खालील चित्रात आपल्याला अशी इस्त्री पाहायला मिळते. मग एका लोखंडी त्रिकोणी डब्यात कोळसे ठेऊन त्याची इस्त्री बनविण्यात आली. त्यांनतर इस्त्री ही अगदी रॉकेल, इथेनॉल, व्हेल माशाचे तेल, नैसर्गिक वायू, कार्बाइड वायू यावरसुद्धा तापविण्याचे प्रयत्न झाले. पण त्यातल्यात्यात कोळश्यावर चालणारी इस्त्री अधिक सोयीस्कर वाटू लागली. केरळमध्ये तर कोळश्यांऐवजी करवंट्या वापरण्यात आल्या. अशा प्रकारांच्या इस्त्रीला आगबोटीसारखे, वायुविजनासाठी वर धुरांडे ठेवले जात असे. ही इस्त्री घेऊन कपड्यावर फिरविणाऱ्याच्या नाकातोंडात धूर जाऊ नये म्हणून, या धुरांड्याचे तोंड बाजूला वळवलेले असे. खालील छायाचित्रात अशी धुरांडेधारी इस्त्री आपल्याला पाहायला मिळते. इस्त्री फिरवितांना ती वारंवार उचलावी लागली तर श्रम अधिक होतात. गरम इस्त्री बाजूला नुसतीच पण ठेवता येत नाही म्हणून मग त्यासाठी बिडाचे इस्त्रीस्टॅन्ड आले.

आपल्याकडेही कोळश्यावर चालणारी इस्त्री अधिक लोकप्रिय झाली. मग आयते इस्त्री करून देणारे इस्त्रीवाले अवतरले. नाक्यानाक्यावर ” ईस्त्री चालु आहे ” असे फलक ( यातील ई हा दीर्घच असायचा !) झळकू लागले. सुती कपड्यांना इस्त्री करण्याआधी त्यावर पाण्याचा हबका म्हणजे नम मारून ठेवत असत. स्टार्चच्या कपड्याला इस्त्री करणे अधिक श्रमाचे असल्याने त्याला अधिक दर लावला जात असे. आज या खूप श्रमाच्या आणि एकसुरी कामाच्या धंद्यामध्ये, केवळ मुंबईमध्येच लाखो भैय्ये रोजगार कमवीत आहेत.

१८८२ मध्ये न्यूयॉर्कमधील हेनरी सीले याने इलेकट्रीकवर चालणाऱ्या इस्त्रीचा शोध लावला. तशाच वजनाला हलक्या, वाफ निर्माण करून कपड्याच्या चुण्या काढणाऱ्या, प्रवासात वापरायच्या अशा विविध प्रकारच्या इस्त्री वापरात आल्या. युक्रेनमधील रॅडोमिल कॅसल येथे १५० इस्त्र्यांचा संग्रह जतन करण्यात आला आहे. जर्मनीतील कार्लसृहे नजीकच्या कॉकसाइम कॅसलमधिल एका संग्रहालयात तर विविध काळातील विविध प्रकारच्या तब्बल १३०० इस्त्री ठेवलेल्या आहेत. आपणही अगदीच मागे नाही. पुण्यातील पेंडसे सायकल म्युझियममध्ये देखील अत्यंत वैचित्र्यपूर्ण इस्त्र्यांचा संग्रह पाहायला मिळतो.
तूर्त माझ्या संग्रहातील या अगदी जुन्या इस्त्र्या आणि स्टॅन्ड पाहा आणि या परीटघडीची माहिती कशी वाटली ते कळवा.
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा ).



माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]

Leave a Comment