महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,449

जुन्या स्वयंपाकघरातले अजब सोबती

By Discover Maharashtra Views: 3652 3 Min Read

जुन्या स्वयंपाकघरातले अजब सोबती !

Antique Kitchen Assistants

पूर्वीच्या काळी घराघरांतून आढळणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये एखादे वेगळेपण हमखास आढळत असे. त्या त्या गावातील अशा वस्तू बनविणारे, हे केवळ सुतार, कासार, विणकर नव्हते तर ते खूप उच्च दर्जाचे कलाकार होते. छोट्या छोट्या गोष्टीतही ते आपला जीव ओतून काहीतरी वेगळे आणि चांगले देत असत. काळाच्या ओघात लोकांच्या गरजा बदलल्या, वाढल्या, गती वाढली. यंत्रे आली. गरज वाढली तशी उत्पादनांची संख्या वाढली. कलात्मकतेपेक्षा उपयुक्तता आणि किंमत महत्वाची ठरू लागली. हळूहळू या कलाकारांच्या कलेची किंमत कमी होऊ लागली. कालौघात अनेक वस्तू आणि कला लुप्त झाल्या. पण अशा काळाची साक्ष देणाऱ्या काही वस्तू अनेक घरात अजूनही आढळतात.

माझ्या संग्रहातील अशाच काही वस्तूंपैकी या कांही खास वस्तू —
१) छोटी विळी — ही पितळी विळी ५ इंचांची असून पाते पोलादी आहे. या वर १९३० हे पेटंट नोंदणीचे वर्ष म्हणून कोरले आहे. पूर्वी भाज्या – फळे अशा वस्तू चिरल्या जात असत. यासाठी आजच्या इतका सुरीचा वापर होत नसे. लिंबू चिरले जात असे. ‘ लिंबू कापणे ‘ याचा अर्थच वेगळा घेतला जाई. अशा छोट्या चिरण्यासाठी वापरायची ही विळी आजही उत्तम स्थितीत आहे.

२) पितळी सूप — ४ इंच लांबीरुंदीचे हे सूप ओतीव पितळी असून त्याचे वजन सुमारे ४०० ग्रॅम आहे. त्यावर जरी पट्ट्यांचे विणकाम दिसत असले तरी ते एकसंध आहे. यामध्ये वेलदोडे, केशर, जायफळाची पूड ( पूर्वी पावडरला हा शब्द सहज आणि सरसकट वापरला जात असे ) अशा मातब्बर वस्तूंसाठी ते वापरात होते.

३) छोटी हात खवणी — पूर्वी पिकनिकला वगैरे जायची पद्धत नव्हती. त्यामुळे ही वस्तू Portable Scrapper म्हणून वापरण्याचा प्रश्नच नव्हता. शहाळ्याचे कोवळे खोबरे खवण्यासाठी, ही सुमारे ८० वर्षे जुनी खवणी वापरात होती.

४) अक्रोडतोड्या ( व बदाम ) — एक गंमत सर्वांनी अनुभवली असेल की अक्रोड, अख्खा बदाम किंवा जर्दाळूची बी अशा गोष्टी फोडतांना, बत्ता किंवा वरवंट्याखालून ही बी एकदा तरी निसटतेच ! मग आपण जरा रागाने ठोकतो आणि त्या बी चा पूर्णच चुराडा होतो. त्याच्या कठीण कवचाचे सगळीकडे उडालेले तुकडे कितीही काळजीपूर्वक गोळा केले तरी नंतर एखादा तुकडा तरी आपल्या पायाला कडकडून टोचतो. पण हा जुना अक्रोडतोड्या इमानदार आहे. त्यात विशिष्ट जागी अक्रोड किंवा बदाम ठेऊन तो थोडा दाब देऊन बंद केला आतला पूर्ण गर आणि कवचाचे तुकडे बाजूबाजूला होतात. कवचाचे कडक तुकडे योग्यपणे कचऱ्यात टाकता येतात. या अक्रोडतोड्याचा आकार अगदी बदामाच्या बी सारखा आहे.
जुन्या स्वयंपाकघरातले हे सहाय्यक छोटे असले तरी त्यात उपयुक्तता आणि कला यांचा मिलाफ आहे.
पहा तुमच्या घरातही असे काही आढळते का ?




माहिती साभार – Makarand Karandikar

Leave a Comment