महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,636

कुलुपांच्या विश्वाचा ताळेबंद ! Antique Locks

By Discover Maharashtra Views: 3778 8 Min Read

कुलुपांच्या विश्वाचा ताळेबंद !

Antique Locks

गुहेत राहणाऱ्या मनुष्य प्राण्याला जेव्हा प्रथम हिंस्र पशूंपासून संरक्षणाची गरज निर्माण झाली तेव्हा त्याने प्रथम झाकण किंवा दरवाज्याचा शोध लावला असावा. ज्या क्षणी माणूस आपल्या गरजेपेक्षा अधिक काही मिळवून संचय करायला लागला त्याक्षणी त्याला कुलुपाची गरज वाटू लागली असावी.
अनेक कुलुपांचा आकार हा काहीसा हृदयाच्या आकारासारखा असल्याने कुलूप आणि किल्ली या जोडीला जगभरच्या वाङ्मयात वेगळेच स्थान प्राप्त झाले. अनेक ठिकाणी ही उपमा अगदी चपखल आणि सुयोग्य ठरली आहे. जगभरातील अनेक भाषांमध्ये कुलूप आणि किल्ली या जोडीवर आधारित अनेक उद्धरणे / अवतरणे उपलब्ध आहेत. सुंदर शेरोशायरी आहे. ग.दि.माडगूळकरांसारख्या सव्यसाची कवीने एका लावणीचा, ” नाकात वाकडा नथीचा आकडा, मोत्याचे कुलूप ओठाच्या कवाडात, बंदोबस्त का ग केला एवढा ? ” असा सुंदर मुखडा लिहिला आहे. जगात अनेक ठिकाणी प्रेमाची आगळीवेगळी स्मारके कुलूप आणि किल्ली या प्रतिकांवर आधारलेली आहेत. अशा ठिकाणी एखाद्या विशिष्ट जागेत एक कुलूप लावून त्याची किल्ली जवळच्या जलाशयात फेकून द्यायची. त्यामुळे आपली प्रेमी जोडी अखंड एकत्र राहते अशी श्रद्धा आहे. दरवर्षी हजारो प्रेमी अशा स्मारकांना, कुलुपे लावून त्याची किल्ली फेकून देण्यासाठी आवर्जून भेट देतात.

जगभर कुलूप आणि किल्ली या जोडीचा इतिहास, संचार आणि प्रसार खूप रंजक आहे. अवाढव्य विस्ताराची सूत्रे छोट्याशा चावीच्या रूपाने आपल्या खिशात हवीत हा विचार, कुलूप आणि किल्ली यांच्यात सतत होत गेलेल्या प्रगतीला कारणीभूत असावा. इजिप्तमध्ये एका राजप्रासादाच्या उत्खननात सुमारे २७०० वर्षांपूर्वीच्या लाकडी कुलुपाचे अवशेष सापडले आहेत. रोमन लोक आपले मौल्यवान सामान पेटाऱ्यामध्ये ठेवत असत आणि या पेटाऱ्याची किल्ली ते आपल्या बोटात अंगठीसारखी वापरत असत.

अगदी आजसुद्धा वापरले जाणारे लिव्हर्सवर आधारित कुलुप हे १७७८ मध्ये रॉबर्ट बॅरोन याने शोधून काढले.१८१८ साली पोर्ट्समाऊथ डॉकयार्डमध्ये मोठी चोरी झाल्यावर, खुद्द ब्रिटिश सरकारनेच सुरक्षित कुलूप शोधून काढण्याची अभिनव स्पर्धा आयोजित केली. यात जेरेमी छब याने शोधलेल्या कुलुपाला सुरक्षित कुलुपाचे १०० पौंडाचे पारितोषिक मिळाले. नंतर त्याने आपला भाऊ चार्ल्स याच्या मदतीने या कुलुपांमध्ये वारंवार सुधारणा केल्या, त्यांचे उत्पादनही सुरु केले. अनेक राष्ट्रांमध्ये कुलूप आणि किल्ली यांच्या पेटंट्सची नोंदणी होऊ लागली. १७८४ मध्ये जोसेफ ब्राह्मा याने शोधलेल्या नळकांड्यासारख्या कुलुपाचे त्याला पेटंट मिळाले. १८४८ मध्ये लिनस येल यांनी सपाट आणि खोचून घालायच्या किल्लीचे पॅडलॉक शोधून काढले.

भारतामध्ये रामराज्यच होते. शनी शिंगणापूरसारख्या गावात घरांना कड्याकुलुपे तर सोडाच पण साधे दरवाजेही नाहीत. पण तरीही येथे कड्याकुलुपांची गरज होतीच. मृच्छकटिक नाटकातील शर्विलक तर मोठेच तत्वज्ञान सांगतो. अगदी सुरुवातीला एखादी साधी लोखंडी कडी किंवा लाकडी पट्टीसुद्धा चालत होती. मोठमोठ्या घरांना, वाड्यांना, गडकिल्ल्यांना आतून मोठाले अडसर घातले जात असत. दरवाजा बंद केल्यावर आतून एक मोठे लाकूड आडवे घातले जात असे. एरवी ते पूर्णपणे भिंतीतच आत सरकवून ठेवले जाई. या अडसरामुळे जर दरवाजा बाहेरून कुणी धक्के मारून उघडायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होत नसे. भिंतीतील कपाटांमध्ये मौल्यवान ऐवज दडविण्यासाठी, विविध कल्पना लढवून चोरकप्पे ठेवले जात असत. बाहेर जातांना हळूहळू लोखंडी कड्या आणि कुलुपांची गरज भासू लागली.

आपल्याकडील हुशार आणि कसबी लोहार मंडळी, सहजासहजी तोडता येणार नाहीत अशी जाडजूड लोखंडी कुलुपे बनवू लागले. राजे आणि श्रीमंत मंडळी यांच्याकडून प्रोत्साहन मिळू लागल्यावर यातही वेगाने विविध सुधारणा दिसू लागल्या.

माझ्या संग्रहात अशी अनेक कुलुपे आहेत ज्यांची खरी किल्ली जरी मिळाली तरी त्या किल्लीने ते कुलूप, जर विशिष्ट क्लृप्ती माहिती नसेल तर उघडताच येणार नाही. न्यू साऊथ वेल्स रेल्वेने वापरलेल्या खेकड्यासारखे उघडणाऱ्या कुलुपाचे पेटंट नोंदणीचे १८४० हे वर्ष त्यावर नोंदलेले आहे. काही कुलुपांमध्ये किल्ली घालायला जागाच नाही. एका की होलवरील पट्टी सरकविली तर त्याखाली दुसरेच की होल सापडते. एका कुलुपावर चक्क पहारेकऱ्याची मूर्ती असून तिच्या पोटात किल्ली घालून ते उघडावे लागते. कुलुपावरच पहारेकरी …. काय कल्पना आहे ! दुसऱ्या एका कुलुपावर काही क्रमांक असलेली चकती आहे. या चकतीवरील काही क्रमांक जुळविल्यावर तुम्हाला त्याखाली असलेले की होल उघडता येते आणि नंतर किल्लीने कुलूप उघडता येते. हल्ली आपण किल्लीच नसलेले आणि केवळ कांही क्रमांक जुळवून उघडले जाणारे कुलूप पाहतो. याचा पूर्वज माझ्या संग्रहात आहे. त्यावरील L O V E ( लव्ह ही इंग्रजी अक्षरे ) ही चार अक्षरे जुळविली की ते कुलूप उघडते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींवर लोकांचे वेगळेच प्रेम पाहायला मिळते. माझ्याकडील १९४८ च्या एका कुलुपावर गांधीजींची स्मृती म्हणून त्यांची छबी आणि ‘ बापू ‘ ही हिंदी व इंग्रजी अक्षरे पाहायला मिळतात. घराच्या पहाऱ्यावर खुद्द बापूजींनाच बसवायचे म्हणजे, काय म्हणावे ? … आणखी एका कुलुपामध्ये तंत्रज्ञानाचा आधुनिक आविष्कार पाहायला मिळतो. या कुलुपाला ३ किल्ल्या आहेत. वेगवेगळ्या स्तरावर एकेक किल्ली लावून चौथ्या स्तरावर हे कुलूप उघडते. हे कुलूप उघडणे म्हणजे एक मोठे कोडे सोडविण्यासारखे आहे. कसे उघडायचे हे माहिती नसेल तर सगळ्या किल्ल्या हातात असूनही कुलूप उघडणे अशक्य होते. युट्यूब किंवा अन्य माध्यमांवर हे कुलूप चक्क शिवकालीन असल्याचे ठोकून सांगितले जाते. पण ते खरे नाही. डॅम अँड लॅडविग या जर्मन कंपनीचे कुलूप १९०० सालचे आहे. आणखी एका कुलुपामध्ये आपण किल्ली घालून कितीही फिरविली तरी या कुलुपाच्या मागील बाजूला असलेली आणि पटकन लक्षात न येणारी कळ दाबल्यावाचून हे कुलूप उघडत नाही. हंस, मासा, सिंह, कासव, हत्ती अशा अनेक प्राण्यांच्या आकारातील कुलुपेही किल्लीबरोबरच एखादी कळ दाबल्याशिवाय उघडत नाहीत. एक आडवे पितळी कुलूपही असेच खास आहे. वस्तऱ्याच्या पात्यासारखी बंद होणारी पट्टी हीच या कुलुपाची किल्ली आहे एका कुलुपाची किल्ली तर दारूच्या बाटलीचा कॉर्क ओपनर असतो तशी आहे. शांती या कंपनीचे एक पितळी कुलूप ६ लिव्हर्सचे आहे. या कुलुपाच्या दर्शनी भागावर ६ हा इंग्रजी अंक तीन ठिकाणी कोरलेला आहे. किल्ली फिरविताना या तीनपैकी एका विशिष्ट ६ अंकाच्या पोटातील सूक्ष्म गोल दाबल्याशिवाय कुलूप उघडणारच नाही. अशी सर्व जुनी कुलुपे ही वजनदार, फोडायला कठीण, कापायला फारच कठीण असायची.

भारतात कुलुपांचा इतिहास हा अलिगढ आणि गोदरेज या दोन नावांशिवाय अपूर्णच आहे. अलिगढमध्ये अगदी मोगल काळापासून कुलुपांची निर्मिती केली जाते असे म्हणतात. या कुलपांमध्ये सफाईदारपणा नव्हता पण ती इथली गरज भागविणारी होती. १८७० मध्ये येथे एका ब्रिटिशाने ‘ जॉन्सन अँड कंपनी ‘ स्थापन करून इंग्लंडमधील कुलुपे येथे आणून विकायला सुरुवात केली. तरीही हा व्यवसाय तगून होता. पण आता चीन, कोरिया, तैवान येथून स्वस्त कुलुपे आयात होऊ लागली आणि या व्यवसायाला इथे घरघर लागली आहे. गोदरेज कंपनीने मात्र या कुलूपविश्वाची किल्ली अजूनही आपल्याच खिशात ठेवली आहे. खूप जाडजूड लोखंडी कुलुपांपासून ते सुप्रसिद्ध असे नवताल, अत्यंत सुरक्षित तिजोऱ्या, क्रमांकांवर आधारित कुलुपे, कार्ड स्वाईप करून उघडायची कुलुपे, ज्याची दुसरी किल्ली बनविताच येणार नाही अशी कुलुपे, असा प्रवास करीत करीत आता केवळ बोटांचे ठसे जुळल्यावर उघडणारी स्मार्ट लॉक्स आली आहेत. आधी माणूस निरक्षर होता. सहीऐवजी अंगठा वापरत होता. नंतर तो लेखन शिकला. आता बोटांच्या ठशांवर आधारित कुलुपे म्हणजे माणसाचा उलटा प्रवास म्हणायचा !

जेव्हांपासून कुलूप आणि किल्लीची संकल्पना अस्तित्वात आली तेव्हांपासून अगदी आजतागायत त्याची गरज जरादेखील कमी झालेली नाही. उलट त्याचा आवाका वाढला. क्षेत्र बदलले. स्वरूप बदलले. मोबाईलपासून ते कॉम्पुटरपर्यंत सर्वांना पासवर्ड आले. म्हणजेच आभासी कुलूप आणि आभासी किल्लीच नाही का ? मनुष्य प्राण्याचा स्वभाव लक्षात घेता कुलूप किल्लीची गरज जगाच्या अंतापर्यंत राहणारच !

( पूर्वप्रसिद्धी ” किस्त्रीम ” दिवाळी अंक २०१८ मधील माझ्या लेखाचा संपादित भाग )





माहिती साभार – Makarand Karandikar

Leave a Comment