अंतुर
अंतुर | Antur Fort – औरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या पूर्व-पश्चिम पसरलेल्या सातमाळ डोंगररांगेत अनेक परीचीत अपरीचीत किल्ले आहेत. महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे काही महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे कोणी फिरकत नाही. कन्नड तालुक्यात अंतुर किल्ला हा असाच एक तटबंदी, बुरुज,दरवाजे,कोठारे, पाण्याची टाकी यासारखे अनेक वास्तुअवशेष आपल्या अंगाखांद्यावर बाळगणारा एक सुंदर किल्ला. तीन बाजुला खोल दरी व एका बाजुला मुख्य डोंगररांगेशी जोडलेला हा किल्ला भूदुर्ग व गिरीदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो. नागापूर-खोलापूर रस्त्याने गेल्यास आपला थेट किल्ल्यात प्रवेश होतो तर नागद-बेलखेडा-गोपेवाडी या वाटेने अंतूरचा माथा गाठण्यासाठी अडीच तासांची चढाई करावी लागते.
अंतुर किल्ल्यास थेट जमीनीवरून भेट देण्यासाठी आपल्याला नागापूर हे किल्ल्याजवळील गाव गाठावे लागते. येथील रस्त्यांची भयानक अवस्था पहाता मुंबई-पुण्याहुन येथे जाताना चाळीसगावमार्गे जाणे हा बऱ्यापैकी पर्याय आहे. चाळीसगाव नागापूर हे अंतर ४२ कि.मी.असुन चाळीसगाव-नागापूर- खोलापुर या मार्गाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. औरंगाबादहुन आल्यास हे अंतर ९२ कि.मी.असुन औरंगाबाद-वेरूळ-कन्नड मार्गे नागापूर येथे येण्यास २.५ तास लागतात. वाहनांची सोय केवळ नागापूरपर्यंत असल्याने व पुढील किल्ल्याच्या पायथ्याचा रस्ता कच्चा असल्याने स्वतःचे वाहन नसल्यास नागापूर-खोलापुर ते अंतुर किल्ला हे ६ कि.मी.अंतर पायी कापावे लागते पण किल्ला चढण्याचे श्रम वाचुन कमी वेळात गडावर जाता येते. या वाटेने किल्ल्याच्या अगदी जवळ जाईपर्यंत किल्ला आपल्याला दिसत नाही. खोलापूरकडून गडावर जाताना वाटेत एका ठिकाणी ६ फुट उंच चार शहरांच्या दिशा व अंतर दर्शविणारा पर्शियन भाषेत कोरलेला मैलाचा चौकोनी स्तंभ दिसुन येतो. हा स्तंभ इ.स.१६०८ मध्ये बसविल्याचा त्यावर उल्लेख आहे.
भारतात अस्तित्वात असणाऱ्या मैलाच्या दगडांतील हा एक प्राचीन ठेवा आहे त्याचे जतन व्हायला हवे. रस्त्याच्या पुढील भागात एका चढावर उजव्या बाजूला उघड्यावर ठेवलेली मारूतीची मुर्ती पहायला मिळते. या वाटेने जाताना शांतता बाळगल्यास वन्यप्राणी आपल्याला दर्शन देऊन जातात. वाटेत वनखात्याने काही ठिकाणी सिमेंटचे निवारे बांधलेले असुन रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यात ३ खोल्या बांधल्या आहेत पण तेथे पाण्याची व इतर सोय नसल्याने त्या निरुपयोगी आहेत. येथुन आपल्याला अंतुर किल्ल्याचे पहिले दर्शन होते. वाटेच्या डाव्या बाजुला असलेल्या टेकडीवर एक गोल घुमट असलेली पुरातन वास्तु दिसते. येथुन काही अंतरावर किल्ल्याकडे जाणारा रस्ता संपतो व पायवाटेला सुरवात होते. किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने गडावर खुप मोठया प्रमाणात संवर्धनाचे काम झालेले असुन गडावर जाणारी पायवाट दगडांनी बांधुन काढली आहे. वाटेच्या सुरवातीलाच डाव्या बाजुला आपल्याला किल्ल्याचा भव्य चिलखती बुरुज दिसतो.
किल्ल्याचा जमिनीशी जोडलेला हा भाग संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यापासून वेगळा करण्यासाठी या बुरुजासमोर डोंगर उतारावरचा कातळ खोदून १५०x५०x२५ फूट लांबीरुंदीचा खंदक खोदलेला आहे. खंदकाच्या या भागात एक पाण्याचे टाके व चौकीचे अवशेष दिसुन येतात. खंदकाच्या किल्ल्याकडील भागात ५०-६० फुट उंचीच्या कातळावर बुरुज बांधण्यात आलेला असुन खंदकातून बुरुजावर व तेथुन किल्ल्यावर जाण्यासाठी २.५ ते ३ फूट रुंदीचा चिंचोळा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. या मार्गाच्या वरील बाजुस कातळात पडलेलं भगदाड भिंत बांधून बुजवुन या भिंतीत जंग्या ठेवल्या आहेत. भुयारातुन आत शिरल्यावर वरील बाजुस ५-६ माणसे मावतील इतक्या आकाराची गुहा आहे. गुहेच्या आतुन बुरुजाकडे जाणाऱ्या पायऱ्या असुन त्यावर दगड कोसळुन हि वाट बंद झालेली आहे.
भुयारी मार्ग पाहुन मागे फिरल्यावर पायवाटेने किल्ल्याच्या दिशेने जाताना वाटेच्या डाव्या बाजूस एक सराई व किल्ल्याच्या तटबंदीतील बुरुज दिसतात. या वाटेने काही अंतरावर किल्ल्याच्या पुर्व बाजूस कड्याला लागुन असलेला किल्ल्याचा पहिला दक्षिणाभिमुख महादरवाजा लागतो. सध्या पुरातत्व खात्याने या दरवाजाला नव्याने लाकडी दारे लावलेली आहेत. दरवाजाबाहेर पहारेकऱ्यांच्या जागा असुन कमानीच्या वरील बाजूस असलेल्या दोन कोनाड्यापैकी एका कोनाड्यात तुटलेले शरभशिल्प आहे. दरवाजाच्या वरील बाजुस कमानीत शत्रूवर मारा करण्यासाठी खाचा बांधलेल्या असुन आतील बाजूस किल्ल्याच्या आधीच्या बांधकामातील दरवाजाच्या खुणा दिसुन येतात. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन येथुन पुढे जाणारी वाट तटबंदीने बंदिस्त केलेली आहे. या तटबंदीत ओवऱ्या असुन तट व दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. वाटेच्या शेवटी पहिल्या दरवाजाच्या काटकोनात बांधलेला गडाचा दुसरा मोठा पुर्वाभिमुख दरवाजा असुन या दरवाजाची व महादरवाजाची बाहेरील रचना जवळपास एकसारखी आहे. दरवाजाशेजारील दोन्ही बाजूचे बुरुज मात्र चौकोनी आकाराचे आहेत. या दरवाजाच्या आतील बाजुस असणाऱ्या देवड्याचा आकार, त्यातील घुमट, कमानी व इतर कोरीव काम पहाता या पहारेकऱ्याच्या देवड्या नसुन या ठिकाणी गडाची कचेरी असावी असे वाटते.
दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर सजावटीसाठी कोरीव शिल्प व कमळपुष्पे वापरली असुन या शिल्पाबरोबर तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारची सजावट कोठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. कदाचित हे तोफगोळे आतील बाजुने फुटलेले असावेत. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर दुसऱ्या दरवाजाच्या काटकोनात बांधलेला गडाचा तिसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाच्या कमानी वरील भागात ५x२ फुट आकारातील बुऱ्हाण निजामशहा याच्या काळातील मलीकअंबर याचा या बांधकामा संदर्भातील पर्शियन भाषेतील शिलालेख आहे. दुसऱ्या व तिसऱ्या दरवाजामधील भागात रणमंडळाची रचना असुन हा भाग चारही बाजुने बंदिस्त आहे. एकमेकांशी काटकोन साधत बांधलेले तीन दरवाजे व त्यातुन जाणारा वळणदर मार्ग किल्ल्याच्या संरक्षण रचनेचा भाग आहेत. तिसऱ्या दरवाजातून आत शिरल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. समुद्रसपाटीपासून २६५१ फुट उंचीवर असलेला साधारण अंडाकृती आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर ३२ एकर परिसरावर पसरलेला असून सर्व बाजुंनी तटबंदीने वेढला आहे. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे एक उध्वस्त वास्तु असुन यात काही कोरीव दगड पडले आहेत. या वास्तूत दुसऱ्या दरवाजाच्या दिशेने एक तळघर असुन तिसऱ्या दरवाजाच्या वरील भागात जायला पायऱ्या आहेत. येथुन ऊजव्या बाजूच्या वाटेने गडाचे बुरुज व आसपासचा परिसर पहात आपण गडाच्या वरील भागात येतो. वाटेच्या वरील भागात उजव्या बाजुला काही घरांची जोती पहायला मिळतात. येथुन गडमाथ्यावर पसरलेल्या अनेक वास्तू दिसतात.
उजवीकडे एक टेकडी असून टेकडीच्या डाव्या बाजुला हिरव्या पाण्याने भरलेला भलामोठा तलाव आहे. तलावाच्या एका बाजूस भिंत घालुन पाणी अडविण्यात आले आहे. या भिंतीचा एकुण आकार व बांधकाम पहाता या भिंतीवर गडाची सदर असावी. तलावाच्या डाव्या बाजूला काही इमारतींचे अवशेष व एक दरवाजा दिसतो तर उजव्या बाजूला मस्जिद आहे. टेकडीच्या उतारावर तीन भव्य इमारतींचे संकुल असुन या इमारतींच्या आवारात जाण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे. यातील दोन इमारती एकमेकाशी जोडलेल्या असुन एक इमारत मात्र वेगळी आहे. या इमारतीचे छप्पर मोठया प्रमाणात ढासळलेले असुन इमारतीच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या इमारती म्हणजे गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्याचे कोठार व शस्त्रागार असावे. या इमारतीत मोठमोठी दालनं असुन अनेक कमानी व झरोके आहेत. टेकडीच्या सर्वोच्च माथ्यावर टेहळणीसाठी एक भलामोठा चौकोनी बुरुज बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी मागील बाजुने पायऱ्या आहेत. या बुरुजाच्या चारही बाजूने सुंदर कोनाडे काढलेले असुन वरील बाजूस तोफा ठेवण्यासाठी दोन गोलाकार कठडे बांधलेले आहेत. या बुरूजावरुन संपूर्ण गडावर लक्ष ठेवता येते व अंजठा-सातमाळा रांगेतील खुप लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो. या बुरुजाच्या खालील बाजूस टेकडीच्या उतारावर एक कोरीव काम केलेली दर्ग्यासारखी वास्तु दिसुन येते. या वास्तुच्या मागील बाजूस एक भलामोठा चौथरा असुन या चौथऱ्यावर सात-आठ थडगी दिसुन येतात तर खालील बाजूस तलावाच्या काठावर बुऱ्हाण निजामशहा याच्या काळात बांधलेली मशीद असुन या मशिदीच्या भिंतीवर दोन कुराणातील आयत कोरलेले शिलालेख आहेत.
मशिदीच्या मागील बाजूस एक लहानसे तळघर असुन या भागात पावसाचे पाणी तलावात येण्यासाठी बांधलेल्या भूमिगत दगडी नाली दिसुन येतात. मशिदीसमोर तलावाच्या बाजुला एक कमानीदार भव्य दरवाजा असुन या दरवाजाच्या मागील बाजूस पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. दरवाजाच्या वरील बाजूस तलावातील पाणी वर खेचण्याची सोय असुन तेथुन खापरी नळाच्या सहाय्याने हे पाणी येथील वाड्यात फिरवले आहे. हे पाहुन पुढे जाताना वाटेत जमिनीलगत एक दरवाजा दिसतो. हा दरवाजा म्हणजे वाड्यात असलेले भूमिगत तळघर असुन वाडा कोसळल्याने ते उघडयावर पडले आहे. तळघराच्या पुढील भागात असणारी वास्तु गोदी दर्गा म्हणुन ओळखली जाते. या वास्तुच्या मागील बाजूस एक कोरडा बांधीव तलाव आहे. तलाव पाहुन पुढे आल्यावर एका मोठया बुरुजावरून एक पायऱ्याची वाट खाली उतरताना दिसते. या वाटेने संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. वाटेच्या सुरवातीला खडकात खोदलेली एकुण सहा पाण्याची टाकी दिसुन येतात. यातील दोन टाकी बुजलेली असुन चार टाक्यात पाणी आहे पण केवळ एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या तटबंदीच्या कडेने संपुर्ण गडाला फेरी मारल्यास तटबंदीमधील २२ बुरुज मोजता येतात. यातील एका बुरुजाच्या माथ्यावर घुमटी बांधलेली आहे तर एका बुरुजात पहारेकऱ्यासाठी देवड्या बांधल्या आहेत. या तटबंदीत एका ठिकाणी चोर दरवाजा असुन तेथुन दोरी लाऊन खाली उतरता येते.
काही ठिकाणी तटबंदीच्या खालील बाजूस खंदक खोदलेला असुन तेथुन वर चढणारी वाट बंद करण्यात आली आहे तसेच या खंदकात जमा होणारे पाणी वर खेचून घेण्याची सोय करण्यात आली आहे. हे सर्व किल्ल्याला फेरी मारल्यास पहायला मिळते अन्यथा पाण्याची टाकी पाहुन मागे फिरावे व दक्षिण दिशेच्या चिलखती बुरुजाकडे निघावे. गडाचा दक्षिण भाग एखाद्या बालेकिल्ल्याप्रमाणे मुख्य गडापासून तटबंदीने वेगळा केलेला आहे. या तटबंदीमध्ये तीन दरवाजे असुन मध्यभागी असलेल्या मोठया दरवाजाच्या बाहेरील बाजुने तटावर जाण्यासाठी जिने आहेत तर आतील बाजुने दोन मोठे बुरूज आहेत. गडाचा हा भाग डोंगररांगेशी जोडला गेला असल्यामुळे आपण सुरवातीला पाहिलेला मोठा खंदक येथेच कोरलेला आहे. या बाजूला खंदकाच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिलखती बांधणी आहे. बुरुजाखाली असलेल्या या चिलखती भागात उतरण्यासाठी बुरुजाच्या दोन्ही बाजूस दोन दरवाजे आहेत. बुरुजाखाली असलेल्या एका खोलीतुन किल्ल्याबाहेर जाण्यासाठी चोर दरवाजा आहे पण त्याचे खालील बाजूचे बांधकाम कोसळलेले आहे जे आपल्याला बाहेरून आत शिरले असता पहायला मिळते.
बुरुजाच्या खालील बाजूस सैनिकांची निवासस्थाने आहेत.बुरुज चारही बाजुने बंदिस्त असुन समोरील बाजुने बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या व दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या असुन बुरुजावर गैबनशहा या सुफी संताची कबर आहे. बुरुजावरुन समोरचे पठार व दूरवरचा भूभाग नजरेस पडतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. अंतुर किल्ल्यावर मोठया प्रमाणात अवशेष असल्याने संपूर्ण किल्ला व्यवस्थित पहायला चार तास लागतात. किल्ल्याचा इतिहास पहाता हा किल्ला १५ व्या शतकात यादवकाळात बांधला गेला असावा. यादव काळात कान्हा नावाचा सरदार अंतुर किल्ल्याचा किल्लेदार असता अल्लाउद्दीन खिलजीचे किल्ल्यावर आक्रमण झाले. या आक्रमणात किल्लेदार त्याच्या कुटुंबासहित मारला गेला. त्यांच्या या बलिदानामुळे या गावाला कन्नड नाव पडले असावे असे इतिहासकारांचे मत आहे. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. सोळाव्या शतकात आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीला निजामशाही वजीर मलीक अंबरच्या काळात किल्ल्यावर मोठया प्रमाणात बांधकामे झाली. नागापूरहून येताना वाटेत असलेला दगडी खांबावरील दिशादर्शक पर्शियन शिलालेख, किल्ल्याच्या दरवाजावरील आणि मशिदीवरील शिलालेख या बांधकामाचा काळ दर्शवितात. अंतुरजवळ मराठे आणि मोगल सरदार दिलेरखान ह्यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेख आढळतात. इ.स.१८८४ मधील औरंगाबाद जिल्हा गॅझेटीयरमधील नोंदीनुसार १८१८ च्या सुमारास इंग्रज-निजाम संयुक्त सैन्यापुढे अंतुर किल्ल्याचा पाडाव झाला व हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
@सुरेश निंबाळकर