महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,647

अपरिचित क्रांतीपर्व महाराज चीमासाहेब

Views: 3806
6 Min Read

अपरिचित क्रांतीपर्व महाराज चीमासाहेब…

भाऊबंदकी आम्हाला कधी सुटली नाही, आणि या गोष्टीला इतिहास देखील आहे, ही गोष्ट वेगळी, पण तरीही स्वातंत्रतेचा बाणा मनाशी बाळगून असणाऱ्यांनी कधीही या गोष्टीचा तसूभरही आपल्या ध्येयावर प्रभाव पडून दिला नाही ही देखील महत्वाची बाब.

कंपनी सरकारची कोल्हापूर राज्याच्या कारभारातील अवाजवजी  लुडबुड आता सहन होण्यासारखी नव्हती, पण पर्याय नव्हता, आपल्या बंधूचे कंपनी सरकारकडे कललेले मत चिमासाहेबांना डाचत असे आणि या गोष्टी त्यांनी उघड उघड बोलूनही दाखवल्या होत्या. त्यामुळे दोन भावंडांमध्ये असणाऱ्या या वैचारिक भिन्नातेतून ते दोन्ही ध्रुव एकमेकांपासून दुरावू लागले. चिमासाहेबांचा प्रस्थापितांच्या विरोधातील आवाजावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, पण “हातावर तुरी देणे” हा वाक्प्रचारचं जणू या घराण्याने मराठी भाषेला दिला असावा अशीच करामत घडत असत. इंग्रजी रेसिडेंटला – त्यांच्या बंधूंना अपयश येत असे. हे वारे  काहीतरी वेगळ्या दिशेने वाहणारे आहे,या गोष्टीची मात्र त्यांना निश्चित कल्पना आली होती.

चिमासाहेब शूर, सशक्त, व  देखणे, त्यात त्यांना जात्याचा शिकारीचा नाद, भालाफेक देखील अचूकच असे. शिकारीमुळे बरीच रानं – वनं तुडविल्यामुळे करवीर नगराचा संपूर्ण भूगोल त्यांना माहिती होता.
“चिमासाहेबांची वागणूक स्वैर, ते नेहमी स्वच्छंदीपणाने वागतात. शिकारीचा छंद अनिवार आहे, कंपनी सरकारविरुद्ध सतत टीका करीत असतात. त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, अशी तक्रार थोरल्या युवराजांच्या मातोश्री ताराबाई यांच्याकडे होत.” यावर उपाय म्हणून चिमासाहेबांचे लग्न करण्याचे पक्के झाले, व नेसरीकर शिंदे – नरसिंगराव यांच्या कन्येशी चिमासाहेब यांचा विवाहसोहळा पार पडला. हा काळ १८४७चा होता. पण उरात एकदा क्रांतीची मशाल पेटलेली असता, तिला कुठलीच गोष्ट शमवू शकत नाही ही गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही.

याचवेळी सामानगडाच्या गडकऱ्यांच्या उठावात असणाऱ्या  रामसिंगनामक राजपूत व्यक्तीशी चिमासाहेबांचा सबंध आला, अज्ञानवासात असताना रामसिंग याने नेसारीकर शिंद्यांकडेच काही दिवस काढले होते,  हे लागेबांधे वेगळेच. हा रामसिंग मुळात इंग्रजद्वेष्टा त्यामुळे रामसिंगाचे भेटणे म्हणजे चिमासाहेबांच्या मनात असणाऱ्या क्रांतीला उत्तेजन मिळण्यासारखेच ठरले. आणि तश्या गुप्त हालचाली सुरु झाल्या. यावेळी इंग्रजांशी सुत जुळलेले असलेल्या नाना आत्माराम यांची चिमासाहेबांचा शिक्षक म्हणून वर्णी लागली,आणि चिमासाहेबांच्या विरोधात कटकारस्थानाला वाड्यातच जोर चढला, राहत्या वाड्यातही चिमासाहेबांच्या आसपास हेर फिरू लागले. यातचं बेळगावहून चिमासाहेबांना अटक करण्याचे फर्मान असलेला लखोटा स्वतः त्यांच्याच हाती पडला आणि मग उघड उघड बंडालाच सुरवात झाली.

इंग्रज रेसिडेंटने छत्रपतींचे निष्ठावान म्हणून कार्यरत असणाऱ्या सर्वांना निरोपाचे विडे देत, त्याजागी आपली माणसे पेरली होती, आता तिथे उघडउघड पुन्हा आपल्या जुन्याजाणत्या लोकांना जवळ करण्याचे सत्र सुरु झाले, एवढं सगळं झाल्यावर कंपनीसरकार स्वस्थ बसणार नाही आणि म्हणूनच त्या दिशेने ठोस पावलं उचलावी लागणार हे जाणून युवराज व त्यांच्या शिबंदीने वाड्याबाहेर तंबू ठोकले व लष्करभरती सुरु झाली. आणि दहा – बारा हजार लष्कर जमा देखील झाले. जुन्या जाणत्या लोक – सरदारांकडून आर्थिक स्वरूपाच्या सहाय्याची जमवाजमव झाली. हिंदुस्थानशी संपर्कात राहून ५७ साली उठणाऱ्या बंडात आपणही कारकीर्द गाजविण्याचे चीमासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांसह नक्की केले होते.

इंग्रजांनी कोल्हापूरमध्ये ठेवलेल्या सत्ताविसाव्या नेटिव्ह इंफंट्रीतील २०० सैनिकांनी रामजी शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पुकारले. ३१ जुलै रोजी त्यांनी सरकारी खजिना लुटत एल्गार केला. पराक्रमाची शर्थ करत प्रत्येकजण लढला पण म्हणावे ऐसे यश संपादित जाहले नाही आणि कोल्हापूरचा आवाज दाबण्यात आला. या उठवाची पाळमुळे खोदून काढण्यासाठी आलेल्या मेजर जनरल जेकबने धरपकडीचा सपाटाच लावला होता, लोकांना तोफेच्या तोंडी द्या, रस्त्यात गोळ्या घाला असे नानाविध प्रकार करून लोकांवर दहशत बसविण्यात येत होती पण याही अवस्थेत पुन्हा एकदा बंड घडले आणि ते देखील इंग्रजांनी तात्काळ हाणून पाडले. यावेळी चीमासाहेबांच्या हालचालींचा वेग इंग्रज रेसिडेंटला कळत होता, आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी इथून पुढे चीमासाहेबांवर बंदिवास चालू झाला. संपूर्ण वाद्याला असेलेले इंग्रजांचे वेढे यावेळी कुणी भेदू शकले नाहीत. ५ डिसेंबर १८५७पासून नजरकैदेत असलेल्या चीमासाहेबांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी सरकारचे जंग जंग पछाडणे सुरुच होते. ही चौकशी मार्च १८५८ रोजी जाऊन थांबली.

३१ मार्च १८५८ रोजी पोलीटिकल सुपरिटेंडंट याने सायंकाळी चिमासाहेब यांना वरिष्ठांचा हुकुम देण्यासाठी बोलावले असा निरोप पाठवला व ताबडतोब रेसिडेन्सीत येण्याचा हुकुम केला. चीमासाहेब रेसिडेन्सीत गेल्यावर त्यांची अंगावरील राजवस्त्रे काढून घेऊन साधा पोशाख देण्यात आला. व तिथेच तयार असलेल्या मेण्यात बसवून ऐनमध्य रात्री मेणा राधानगरी, फोंडा मार्गे वाघोटणे बंदरात न्हेण्यात आला. तेथून चीमासाहेबांची रवानगी कराचीला करण्यात आली.

कराचीत चिमासाहेबांना पॉईंट मनोरा येथे ठेवण्यात आले. नंतर १८५९ मध्ये त्यांच्यासाठी खास बंगला बांधून देण्यात आला. तिथेचं ही क्रांतीची लवलवती ज्वाळा आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वातंत्र्याचे मनसुबे रचत रचत शांत जाहिली. कराचीत असणाऱ्या ल्यारी नदीच्या किनारी चीमासाहेबांची समाधी असण्याचे आज पर्यंत सांगण्यात आले पण अभ्यासकांचा एक वर्ग ही समाधी आज कराची येथील किरथर नॅशनल पार्क येथे असण्याचेही सांगण्यात येते. याच समाधीचे जीर्णोद्धार करण्याचे मसनुबे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे देखील होते, स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत (१९४७)  चीमासाहेबांचा स्मृतीदिवसाचा कार्यक्रम कोल्हापूरकर मंडळी न चुकता पार पाडत या वेळचा मानाचा नैवेद्य कोल्हापूरहून लोकं जाऊन करत असत.

“शाहू” हे नाव असलेले हिंदुपती शाहू यांच्यानंतर भोसले कुळात हे नाव दुसऱ्यांदा आलं ते म्हणजे चीमासाहेब महाराज यांना. आणि या नावाचा लौकिक तिथून पुढल्या पिढीतही तसाच सुरु राहिला हे विशेष.

#क्रांतीपर्व
#आम्हीच_ते_वेडे

(सन्माननीय खासदार युवराज संभाजी राजांनी, आपल्या स्तरावर काहीतरी तजवीज करून पाकिस्तानमधील (जर अद्याप अस्तित्वात असेल तर) चीमासाहेबांचे समाधीस्थळ आम्हा हौश्या – नौश्यांसमोर आणलं तर ती इतिहासासाठी खूप मोठी देण ठरेल. कुणीतरी आमची विनंती महाराजसाहेबां पर्यंत पोहचवावी _/’\_ )

© अभिषेक कुंभार
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Original Blog – http://abhishekkumbhar.blogspot.com/2018/03/blog-post.html

Leave a Comment