मंदिराचे वास्तुशास्त्र भाग १ –
मंदिरांना भेट देणारी व्यक्ती बहुदा सश्रद्ध भाविक असते; तशीच क्वचित् प्रसंगी अभ्यासक असते. अभ्यासकाने सश्रद्ध असता कामा नये,असा काही नियम नाही खरं तर. पण या दोन्ही भूमिकांमधे माणूस सहसा एकाच वेळी नसतो हा अनुभव आहे. मंदिरांच्या विविध अभ्यासकांमुळे आपल्याला मंदिरांचे एक जे वेगळे “शास्त्र” आहे, त्याची माहिती मिळते. मंदिराशी संबंधित असलेल्या शास्त्रीय व धार्मिक अंगांपैकी एक महत्त्वाचे अंग म्हणजे मंदिराचे वास्तुशास्त्र. इतर कोणत्याही वास्तुप्रमाणेच मंदिर या वास्तूच्या उभारणीमागेही शास्त्र आहे, काही नियम आहेत, संकेत आहेत, प्रतीके आहेत.
हिंदू धर्मात अगदी सुरवातीच्या काळात मूर्तीपूजेला वेगळे स्थान नव्हते. ज्याला ‘निर्गम’ किंवा ‘निगम’ काळ म्हणतात, त्या वेदकाळामध्ये विविध देवतांचा उल्लेख आहे. त्यांची स्तुती आहे, प्रार्थना आहे, परंतु ‘मूर्तीपूजा’ नाही. त्या काळी ईश्वरभक्तीचा मार्ग ‘यज्ञ’ हा होता. आपल्या प्रार्थना किंवा आहुती देवापर्यंत यज्ञाद्वारेच पोहोचतात, ही ठाम श्रद्धा होती. त्यामुळे मूर्तीपूजेशी किंवा ‘देऊळ-देवालय’ या कल्पनेशी संबंधित ऋचा वेदांमधे आढळून येणार नाही. यज्ञ कसा करावा, त्याची रचना कशी असावी याविषयी ऋचा अवश्य आढळतील.
आपल्याकडे देवांच्या पार्थिव मूर्ती घडविणे, त्यांची पूजा करणे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘आलय’ म्हणजे देऊळ बांधणे, ही संकल्पना साधारणतः ‘आगम’ काळामध्ये सुरु झाली. आगम काळ हा मंदिरांच्या उभारणीचा काळ आहे. सध्या प्राचीन मंदिरांचे संदर्भ हे सर्वप्रथम गुप्त व कुशाण राजवटींमध्ये आढळून येतात; म्हणजे इसवी सनाच्या दुसर्या शतकापासून.मंदिरे तर त्याच्याही आधीपासून उभारली जात असावीत, पण त्यांचा भौतिक पुरावा अजून आढळलेला नाही. एरव्ही, ग्रंथलेखात- ‘अग्निपुराणा’त मंदिर स्थापत्य हे मानवी शरीररचनेशी सुसंगत कसे हवे, याचा उल्लेख आहे. थोडक्यात, मंदिराच्या वास्तुशास्त्राविषयी माहिती मिळवायची तर आपल्याला ‘आगम ग्रंथांचा’ आधार घ्यावा लागतो.
साधारणत: “गुप्त राजवटीच्या” काळात भारतात ज्या ज्या राजवटी जिथे होत्या, त्यांचा स्वतंत्र प्रभाव त्या त्या भागातील मंदिरांवर पडलेला दिसून येतो. सुरुवातीच्या काळात, मंदिरं अत्यंत साधी, भाजलेल्या विटांची, साधीसुधी चौकोनी, अशी प्रचलित होती. कालांतराने वास्तुशास्त्राचा जसजसा विकास झाला, तसतशी मंदिरे अधिक पक्की, दगडी भव्य आणि सुशोभित होऊ लागली.या विकास प्रक्रियेत साहजिकच मंदिराच्या वास्तुशास्त्राबद्दल काही विशिष्ट नियम आणि संकेत रुढ झाले. भारतातील वेगवेगळ्या भागातील मंदिरांना, त्यांची स्वतःची अशी स्वतंत्र “शैली” मिळाली.
आजमितीला या शैलींचा विचार केला तर भारतातील प्राचीन मंदिरे तीन प्रमुख शैलींमध्ये असल्याचे दिसून येते.
१) साधारणतः विंध्य पर्वताच्या वरील भागात, उत्तर भारतात प्रचलित असलेली शैली ही ‘नागर शैली’ म्हणून ओळखली जाते. या शैलीतील उत्तम अवस्थेत असलेल्या मंदिरांपैकी खजुराहो येथील मंदिर समूह हे ‘नागर शैली’ चे उत्कृष्ट उदाहरण आहे.
२) दक्षिण भारतामध्ये प्रचलित असलेली शैली ‘द्राविड शैली’ म्हणून ओळखली जाते. चोल, चालुक्य यांच्या राजवटीतील किंवा मग विजयनगर साम्राज्यातील मंदिरे, जी ऐहोळे, हम्पी पासून ते थेट रामेश्वर, मदुराई या भागात आढळतात, ती मंदिरे या ‘द्रविड’ शैलीतील मंदिरे आहेत.
३) मध्य भारतामध्ये ‘नागर’ आणि ‘द्राविड’ शैलीतील मंदिरांची काही वैशिष्ट्ये एकत्र करुन जी एक मिश्र शैली विकसित झाली, त्या मंदिर शैलीला ‘वेसर शैली’ असं नाव आहे. याशिवाय;
४) मुळात नागर शैलीतील, पण ज्यांचा तलविन्यास (ग्राउंड प्लॅन) विशिष्ट आकारात असतो अशा मंदिरांना “भूमिज” मंदिरे म्हणतात.
५) नागर, वेसर आणि द्राविड या तिन्ही शैलींमधील मंदिरे एकतर वेगवेगळ्या प्रकारच्या तलविन्यास रचनेमुळे किंवा मग शिखरांमुळे वेगळी दिसतात. विशिष्ट प्रकारच्या चौकोनी शिखरांमुळे( पिरॅमिड प्रमाणे) काही मंदिरे ही “फांसणा” शैलीतील मंदिरे म्हणून ओळखली जातात.
सर्वसामान्यपणे कोणत्याही शैलीतील मंदिर असले, तरी त्या मंदिरात, गर्भगृह किंवा गाभारा, अंतराळ, महामंडप आणि अर्धमंडप हे प्रमुख भाग असतात. गाभारा आणि महामंडप यांना जोडणारी जी छोटी जागा आहे, तिला ‘अंतराळ’ असं म्हणतात.मुख्य गाभार्याच्या वर, सर्वात उंच शिखर असतं; आणि अंतराळ आणि मंडप यावरही काही ठिकाणी छोटी उपशिखरे असतात. मंदिराचे बाकीचे जे बांधकाम असते, त्याच्याही वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी नावं आहेत. उदाहरणार्थ, मंदिराची बाह्यभिंत (शिखरापर्यंतची) म्हणजे “मंडोवर”. या मंडोवराचेच जवळ जवळ १८ वेगवेगळे भाग आहेत. शिखराचे लता किंवा मूलमंजिरी, आमलक,आणि कलश असे मुख्य भाग आहेत. मुख्य शिखर गर्भगृहावर असते. द्राविड शैलीत गर्भगृह आणि त्यावरील शिखर यांना “विमान” म्हणतात. एकाच मंदिरात एका पेक्षा जास्त गर्भगृहेही असू शकतात.( उदा. पंचायतन मंदिर). उत्तर द्राविड शैली मध्ये मुख्य शिखरापेक्षाही बाहेरील ‘गोपुर’ उंच व मोठे असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. हे ‘गोपुर’ म्हणजे द्राविड शैलीचे वैशिष्ट्य आहे. विजयनगर साम्राज्य कालखंडात अशी प्रचंड, भव्य गोपुरे पुरातन मंदिरांच्या द्वारापाशी ठिकठिकाणी उभारली गेली.
क्रमश: मंदिराचे वास्तुशास्त्र भाग १.
– ॲड्. सुशील अत्रे.