मंदिराचे वास्तुशास्त्र भाग २ –
महाराष्ट्रातील बहुतेक प्राचीन प्रसिद्ध मंदिरे “भूमिज” शैलीतील आहेत. आजमितीला या शैलीतील महाराष्ट्रातील सगळ्यात प्राचीन मंदिर म्हणून ‘अंबरनाथचे शिवालय’ ओळखले जाते. (“आम्रनाथ”- इ.स. १०६०) आधी म्हटल्याप्रमाणे,भूमिज मंदिराचा ‘ग्राउंड प्लॅन’ काहीसा वेगळा असतो. सध्या बर्यापैकी सुस्थितीत असलेले नाशिकजवळील सिन्नरचे गोन्देश्वराचे मंदिर संकुल, हे ही या भूमिज शैलीतीलच आहे.(मंदिराचे वास्तुशास्त्र भाग २)
आपल्याकडे अशा प्रकारच्या मंदिरांना सरसकट ‘हेमाडपंती’ मंदिरे म्हटले जाते. खरे तर ‘हेमाडपंती’ अथवा ‘हेमाडपंथी’ अशी मंदिरांची कोणतीही स्वतंत्र शैली नाही. या प्रकारातील मंदिरे ही ‘शुष्कसांधी’ मंदिरे म्हणून ओळखली जातात. शुष्कसांधी रचनेत दगडी शिळांमध्ये चुना अथवा माती असे काही न वापरता केवळ एकावर एक शिळा काटेकोरपणे रचलेल्या असतात. याच मंदिरांना ‘हेमाडपंती’ म्हणण्याचा प्रघात पडला आहे. ‘हेमाडपंत’ किंवा ‘हेमाद्रीपंत’ हा १३ व्या शतकाच्या अखेरच्या काळात यादव राजवटीतील एक सुप्रसिद्ध प्रधानमंत्री होता. त्याने त्याच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मंदिरे बांधली, आणि काही जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्याने बहुश: या ‘शुष्कसांधी’ पद्धतीने मंदिरे उभारली. त्यामुळे अशा प्रकारच्या मंदिरांना त्याचे नाव मिळाले असावे. आज गमतीचा भाग असा, की कोणतेही जुने दगडी मंदिर दिसले, की लोक त्याला ‘हेमाडपंती मंदिर’ म्हणून मोकळे होतात. ते आता “ब्रँड नेम” असल्याप्रमाणे वापरले जाते.
आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे जुन्या मंदिरांमध्ये देवता म्हणून जास्त करुन शंकराची पिंड आढळून येते. त्यामुळे प्राचीन मंदिर, म्हणजे “शिवमंदिर” हे समीकरण जवळजवळ निश्चित आहे. याचे कारण असे की, मूर्तीपूजेच्या प्राथमिक टप्प्यात असतांना शैव आगम काळात ‘शंकर’ हे लोकदैवत होते, व सर्वत्र प्रचलित होते. तसेच प्रतीक या दृष्टीने शंकराची पिंड घडविण्यासाठी किंवा कोरण्यासाठी तुलनेते सोपी होती. त्यामुळेच अनेकदा पाषाणाच्या मूळ स्वरुपात या पिंडीच्या आकाराचा सहज भास होऊ शकतो. कदाचित म्हणूनच ठिकठिकाणी ‘स्वयंभू पिंड’ असल्याचे दिसून येते. एरव्ही,सावयव देवतांच्या मूर्ती कुशल हातांनीच घडविणे शक्य होते.
मंदिराच्या स्थापत्याविषयी जसे अग्निपुराणात लिहिले आहे, तसेच या विषयावरती ‘शिल्परत्न’ हा ही ग्रंथ आहे. खास ‘नागर’ शैलीवरती असलेला “समरांगणसूत्रधार” हा महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. तो माळव्याचा राजा भोज याने लिहिला, म्हणतात. द्राविड शैलीवरती “ईशानशिवगुरुदेवपद्धति” हा ग्रंथ आहे.
आपल्या मंदिरांच्या वास्तुशास्त्राबद्दल अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिलेत हेन्री कझिन्स (मीडिव्हल टेंपल्स ऑफ दि डेक्कन ) आणि स्टेला क्रॅमरिश ( दि हिंदू टेंपल) यांनी. मी या लेखासाठी संदर्भ म्हणून महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर – स्थापत्य व कला- ले. डॉ.अ.प्र. जामखेडकर ; ‘मंदिर कसे बघावे’ – डॉ.गो.बं. देगलूरकर आणि ‘अंबरनाथ शिवालय’ – डॉ.सौ.कुमुद कानिटकर हे ग्रंथ वापरलेत. योगायोगाने या तीन्ही ग्रंथांशी मा. डॉ. जामखेडकर संबंधित आहेत. ते माझे मावसे असल्याने त्यांनी स्वत:च मला ही पुस्तके भेट दिलेली आहेत. माझं सुदैव की, या विषयावर ते माझ्यासारख्या हौशा-नवशाशी बोलले पण आहेत… हा अर्थात् त्यांचा मोठेपणा आहे! मी त्यांचा उल्लेख केवळ “संदर्भ” म्हणून करणे औद्धत्याचे ठरेल.
समाप्त.
– © ॲड्. सुशील अत्रे.