महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,08,836

शिवछत्रपतींचे आरमार

Views: 3923
4 Min Read

शिवछत्रपतींचे आरमार!

पुस्तक लेखमाला क्रमांक – २०.

शिवरायांनी १६५६ ला जावळी काबीज करून स्वराज्याची सीमा कोकणापर्यंत वाढविली.स्वराज्यातील कोकण किनाऱ्यावरील शत्रू म्हणजे समुद्रातील जंजिऱ्याचा सिद्दी.त्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीशी मराठ्यांच्या झटापटी अर्थातच वाढल्या. घरातील उंदीर अथवा शेतातील घुशी ज्याप्रमाणे घर/शेतीला नुकसान करू शकतात त्याचप्रमाणे हा सिद्दी हा स्वराज्यास धोका निर्माण करू शकतो हे शिवरायांनी जाणले होते. त्यामुळेच सिद्दी ला हरविणे खूपच गरजेचे होते. सिद्दी हा मुखत्वे समुद्रावर सत्ता गाजवून प्रबळ होता.त्यामुळे त्याला हरविण्यासाठी नौदल उभारणी करणे अर्थातच गरजेचे होते. त्यातूनच मग स्वतःचे नौदल आणि आरमार असावे असे शिवप्रभूंनी मनात आणिले.त्यानुसारच मग अगदी योग्य योजना करून त्यांनी कल्याण हे शहर आरमार उभारणी साठी निवडले.(शिवछत्रपतींचे आरमार)

शिवरायांनी ३६३ वर्षांपूर्वी  आश्विन_कृष्ण_द्वादशी या दिवशी म्हणजे आजच्याच २४ ऑक्टोबर १६५७ ला वसुबारसेच्या मुहूर्तावर कल्याण इथे किल्ले दुर्गाडी आणि कल्याण-भिवंडी  ही ऐतिहासिक शहरे एकाच दिवशी हिंदवी स्वराज्यात आणली.कल्याण-भिवंडीवर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकला. श्री शिवछत्रपतींची पुण्यवान पाऊले या पावन भूमीला लागली. त्यांची चरणधुळ मस्तकी लेऊन ही भूमी पुण्यवंत झाली! कृतकृत्य झाली!!! पुढे जाऊन याच कल्याण खाडीच्या किनाऱ्यावर महाराजांनी “ज्याचे आरमार त्याचाच समुद्र” ही उक्ती डोक्यात ठेवून हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. त्यामुळे आजचा हा सोन्याचा दिवस  “मराठा आरमार दिन” म्हणून साजरा केला जातो.

१६ व्या शतकात जे मुघल सम्राट आलमगीर औरंगझेबला ही जमले नाही. ते छत्रपती शिवरायांनी दक्खन मध्ये करून ठेवले.त्या काळात स्वतःचे आरमार स्थापन करणे खूपच अवघड गोष्ट होती. कारण मराठ्यांकडे युद्धाची परंपरा असली तरीही समुद्र आणि नौदल यावरील युद्ध हा एक नवीनच पैलू होता. अखंड भारताच्या इतिहासात छत्रपती शिवराय हे कदाचित एकमेव राजे होते ज्यांनी दूरदृष्टी वापरून नौदलाची स्थापना राजकीयदृष्ट्या केली.यात मग नंतर स्वतंत्र आरमार सोबतच जहाजे,गुराबे असे मराठ्यांनी स्वतःच बांधले.

आज्ञापत्र मध्ये यासाठी ही खालील नोंद केलेली आहे.

“आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच आहे.ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे,तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र.याकरिता आरमार अवश्यमेव करावे.”

या छत्रपतींचा अर्थातच मराठेशाहीच्या आरमार या विषयावर अभ्यास करण्यासाठी दोन संदर्भ ग्रंथ खूपच महत्वाचे आहेत.

पहिला ग्रंथ म्हणजेच श्री गजानन मेहंदळे सर आणि संतोष शिंत्रे यांनी लिहिलेला “शिवछत्रपतींचे आरमार” ! या ग्रंथात यूरोपीय आक्रमण त्यातून आरमाराची गरज आणि शिवछत्रपतींच्या संकल्पना मधून साकारलेले मराठा आरमार याची त्यांनी सविस्तर विवेचन केलेले आहे. हा शास्त्रशुद्ध ग्रंथ आहे.ज्यामध्ये आपणास शिवरायांचे जलदुर्ग, नौसेनानी,युद्धनौका यासोबतच पश्चिम किनाऱ्यावर असलेली बंदरे, जंजिरा ,पदमदुर्ग, खांदेरीची मोहीम याविषयी सखोल माहिती मिळते.

दुसरा महत्वाचा ग्रंथ आहे तो डॉ.सचिन पेंडसे यांनी लिहिलेला “मराठा आरमार-एक अनोखे पर्व”.यात त्यांनी १६५७ पासून स्थापित झालेल्या मराठा आरमाराची ते तब्बल १०० वर्षे मराठयांनी समुद्रात केलेल्या लढाया तसेच आंगरेकलीन साम्राज्यविस्तार याची अतिशय सखोल माहिती दिलेली आहे.मराठा आरमाराचा  शेवट १७५६ मध्ये झाल्यानंतर भारताच्या इतिहासाला एक वेगळीच कलाटणी मिळाल्याचे त्यांनी या ग्रंथात नमूद केलेले आहे.या ग्रंथाला श्री मनोहर अवटी सर यांनी दिलेली प्रस्तावना तर अलौकिक अशी आहे.तसेच या ग्रंथात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री रघुजीराजे आंग्रे यांनी ही प्रस्थावित केलेले आहे

“आरमार” हा विषय इतका सखोल आहे की त्याच्यावर कित्येक प्रबंध लिहिले जाऊ शकतात. मी मात्र आपणास या विषयावर मला सुचलेले संक्षिप्त स्वरूप या लेखाद्वारे देतो आहे.

पुढील लेखमालेत आपण शिवछत्रपतींच्या दक्षिण दिगविजयासंदर्भात असलेल्या महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या लेखामागील एकमेव उद्देश!!

बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.

– किरण शेलार.

Leave a Comment