महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,518

अक्कलकोट संस्थांनचे शस्त्रगार | आशिया खंडातील सर्वात मोठं शस्त्रागार

Views: 886
9 Min Read

अक्कलकोट संस्थांनचे शस्त्रगार | आशिया खंडातील सर्वात मोठं शस्त्रागार –

श्री क्षेत्र अक्कलकोट म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आराध्य श्री.स्वामी समर्थ यांची कर्मभूमी.अतिशय सुंदर असा हा परिसर.महाराष्ट्रसह कर्नाटक,तामिळनाडू,आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने जनसमूह या ठिकाणी येतो. स्वामींच्या दर्शनाने प्रफुल्लित होतो. तस पाहता अक्कलकोट हे फक्त श्री स्वामी समर्थ यांची कर्मभूमी नसून या अक्कलकोट च्या मातीला खूप मोठा इतिहास आहे.स्वराज्य रक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचे चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे ४२ वर्ष छत्रपती असलेले श्रीमंत थोरले शाहू महाराज यांचे मानसपुत्र श्रीमंत फतेहसिंहराजे भोसले यांचे हे संस्थान.अक्कलकोट संस्थांनचे शस्त्रगार.

छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मासाठीच्या बलिदान नंतर श्रीमान रायगडाला वेढा बसला आणि रायगड मुघलांच्या ताब्यात गेला.महाराणी येसूबाई आणि संभाजी राजांचे युवराज शिवाजी राजे हे मुघलांच्या कैदेत सापडले.पुढं औरंग्याला शिवाजी नावाची चीड असल्याने त्याने संभाजी राजांच्या मुलाचे नाव शाहुराजे ठेवले.तब्बत १७ वर्ष कैदे भोगल्या नंतर संभाजी पुत्र शाहूराजे औरंग्याच्या मृत्यूनंतर सुटून महाराष्ट्रात परत आले.शाहू राजे महाराष्ट्रात येत असताना मध्ये पारध गावच्या लोखंडे पाटलांनी त्यांच्या वर हल्ला केला यात शाहू राजांच्या सैन्याने लोखंडे पाटलांचा पराभव केला त्यात लोखंडे पाटील मारले गेले तेव्हा त्यांच्या बायकोने त्यांचं लहान मुल शाहू राजांच्या पायावर ठेवले आणि त्यांचा सांभाळ करायचं सांगुन त्या सती गेल्या.शाहू राजांच्या राणीवश्यातील विरुबाई यांनी या लहान मुलाची जबाबदारी घेतली.शाहू राजांचा हा पहिलाच विजय असल्याने त्यांनी या मुलाचं नाव फतेहसिंहराजे ठेवले आणि लोखंडे पाटलांचा तो लहान मुलगा शाहू राजांचा मानसपुत्र फतेहसिंहराजे भोसले नावाने नाव गाजवू लागला.

फतेहसिंहराजे भोसले –
हे नाव इतिहासात खूप कमी लोकांना माहित आहे. प्रचंड पराक्रमी,धोरणी, मुत्सुद्धी आणि तितकच दयावान म्हणून प्रसिद्ध आहे.शंभू पुत्र शाहू राजांनी कैदेतून सुटून आल्यावर अवघ्या काही महिन्यात सातारा येते आपली राजगादी स्थापन केली. ईसवी सण १७०९ ते १७४९ पर्यंत ४२ वर्ष शाहू महाराज यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार अगदी दिल्ली पर्यंत केला.१७१९ मध्ये दिल्लीवर भगवा फडकवला आणि आपल्या मातोश्री महाराणी येसुराणी यांची सुटका करून आणली.

थोरले शाहू राजांच्या मंत्री मंडळात फतेहसिंहराजे यांचा मान मोठा होता. एकदाही लढाई न हरलेला सेनानी म्हणून त्यांचा बहुमान कोणीही हिरावू शकत नाही.फतेहसिंहराजे मोहिमेला जायचे तेव्हा त्यांच्या सोबत मुख्य प्रधान म्हणजे पेशवा आणि पंत प्रतिनिधी यांना सोबत जायची सक्त ताकीद होती.फतेहसिंहराजे च्या पावला पावलाची खबर शाहू राजांना पोहचवायचे काम फडावरच्या लोकांचं होत.शाहू राजांच्या हुजराती सैन्याचे ते प्रमुख होते.वयाच्या अठराव्या वर्षी कर्नाटक मोहीम यशस्वी करत फतेहसिंहराजे नी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा कर्नाटक,तामिळनाडू राज्यात फडकवला.छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांच्या परिवाराशी चांगले संबंध प्रस्थापित करत फतेहशिह राजे यांनी दक्षिणेत मराठा साम्राज्य वाढवलं.पुढं जाऊन मराठ्यांनी राजधानी असलेला मुघलांनी ताब्यात घेतलेला रायगड किल्ला सुद्धा फतेहसिंहराजे यांनी जिंकून घेतला.अक्कलकोट ही फतेहसिंहराजे यांची जहागिरी होती.तिथं त्यांनी एक राजवाडा बांधला होता.स्वामी समर्थांच्या वटवृक्ष समाधी पासून मुख्य समाधी कडे जाताना रोडच्या डाव्या बाजूलाच तो राजवाडा दिसून येतो.

फतेहसिंहराजे यांना थोरले शाहू महाराज यांचे मानसपुत्र या नात्याने शाहू राजानंतर गादीवर बसण्याचा मान होता परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही आपली जहागिरी अक्कलकोट ला येऊन त्यांनी १८ व्या शतकात आपलं अक्कलकोट संस्थान नावारूपाला आणल.अक्कलकोट संस्थांन हे राजे भोसले यांच्या खाजगितील मानाचे संस्थान मानल जात.पुढं.फतेहसिंहराजे यांच्या पुढील पिढ्यांनी संस्थांनाचा कारभार चालवला.
१८१८ मध्ये इंगर्जांनी भारतात पाय रोवले.होळकर,पवार,शिंदे,गायकवाड यांची सस्थाने मोडित काढली फक्त कोल्हापूर येथील छत्रपती घराणे म्हणजेच मराठा संस्थान इंगर्जांना नेस्तनाबूत करता आल नाही आणि ह्या कोल्हापूच्या छत्रपतींच्या सेकंड लेफ्टनंट पदी अक्कलकोट चे तिसरे फतेहशिह यांची नेमणूक केली होती त्यामुळे अक्कलकोट संस्थान गोऱ्यांना मोडीत काढता आले नाही.परंतु इंग्रज पाहिजे तेव्हा ह्या संस्थानिकांना युद्धात न्यायचे.

अक्कलकोट संस्थांनच्या मार्फत रस्त्यांची बांधणी,शेती पूरक व्यवसाय ,शेती या गोष्टीवर तिसरे फतेहसिंहराजे यांनी विशेष भर दिला.तिसऱ्या फतेहसिंह राजांनी आपली स्वतंत्र सेना उभी केली होती.कमी वेळेत चांगली कामं करून कर्तुत्वाला आलेल्या तिसऱ्या फतेहसिंह राजांवर प्रजेच सुद्धा खूप प्रेम होत.दिल्ली दरबारी सुद्धा अक्कलकोट चां राज्यकर्ता म्हणून त्यांची चांगली ओळख होती.
जेव्हा जर्मनी विरुद्ध इंग्लंड यांच्या पहिल्या महायुध्दाला तोंड फुटल तेव्हा भारतातून काही प्रमुख संस्थानचे राजे इंग्लंड च्या बाजूने लढण्यासाठी गेले त्यात फतेहशिह राजेंचा समावेश होता.ब्रिटिश रॉयल च्या ९व्यां रेजिमेंट ची जबाबदारी फतेहसिंहराजांवर देण्यात आली.

इंग्रजांचा डाव –
इंग्रजांच्या वतीने तिसरे फतेहसिंहराजे फ्रान्स च्या रणभूमीवर चांगला पराक्रम गाजवू लागले.भारतातून गेलेल्या राज्यांपैकी ते सर्वात तरुण राजे होते.वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी रणांगणात रक्त सांडवत अक्कलकोट भोसले घराण्याचा पराक्रमाचा वारसा दाखवून दिला.पुढं दोन महिने ते युद्धभूमीवर लढले तब्येत बिघडल्याने ते भारतात परत आले.परंतु युद्धात केलेल्या चांगल्या कामगिरी मुळे इंग्रजांनी त्यांचा सन्मान केला तेव्हा त्यांनी इंग्रजांना विनंती केली की आमच्या सैन्याने युद्धात वापरलेली शत्रे बंदुका आम्हाला आमच्या देशात अभिमानाने यायच्या आहेत.इंग्रजांनी सुद्धा परवानगी दिली आणि तुम्ही पुढं व्हा ही बंदुका बोटीने पाठवून देऊ म्हणून सांगितले.इकडे महाराज अक्कलकोट ला आले.त्यावेळी फतेहसिंहराजे यांनी नवीन राजवाड्याची बांधणी केली सोबतच एक शस्त्रागार बनवण्याच ठरवले.अक्कलकोट राज घराण्यात लक्षावधी पुरातन हत्यारे होती.त्यांच्यात तलवारी, भाले,कट्यारी, दांडपट्ठे अशी वेगवेगळी हजारो हत्यारे होती.ती एका दालनात व्यवस्थित संग्रहित करून ठेवावीत असा फतेहसिंहराजे यांचा विचार होता.शिवाय इंग्रज सुद्धा त्यांना त्यांनी पहिल्या महायुद्धात वापरलेल्या बंदुका देणार होते.इंग्रजांनी बंदुका सुद्धा पाठवल्या.पाहता पाहता इंग्रजांच्या बंदुकांचे पेटारे अक्कलकोट मध्ये आले पेटारे खोलेले….फतेहसिंहराजे यांनी पेटारे पाहिले आणि त्यांचा रागाचा पारा चढला शेवटी इंग्रजांनी त्यांची लायकी दाखवून दिली.

इंग्रज अधिकाऱ्यांनी राजांच्या मागणीनुसार बंदुका पाठवून दिल्या होत्या परंतु इंग्रज मूळचे धूर्त त्यांनी विचार केला की कार्य,कर्तुत्व आणि पराक्रम भरपूर असलेल्या फतेहसिंहराजे यांनी पुढं जाऊन इंग्रजां विरुद्ध बंड केलं तर आपल्याच बंदुकांचे वापर इंग्रज अधिकाऱ्यांवर करू नये म्हणून इंग्रजांनी राजांना पाठवलेल्या बंदुका निकामी करून पाठवल्या, बंदुकांचे चाप , तोडून, नळ्या फोडून पाठवल्या ज्यानेकरून ह्या बंदुका फक्त दाखवण्यासाठी ठेवता येतील त्यांच्या युद्धात परत वापर होणार नाही.

आशिया खंडातील सर्वात मोठं शस्त्रागार…
राजांनी आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या सर्व हत्यारांची यादी बनवून घेतली आणि आपल्या शस्त्रगारा मध्ये ही शस्त्रे अतिशय सुंदर पद्धतीने मांडून घेतली.भिंतीवर मावळत्या सुयांच्या आकारात,उगवत्या सूर्याच्या आकारात,त्रिकोणी आकारात अशा अनेक प्रकारे सर्व शस्त्रे एका भल्या मोठ्या दालनात भिंतीवर लावायच ठरवलं त्यासाठी एक इमारत बांधली.अतिशय देखणी अशी ही इमारत उभी राहिली.गोलाकार लोखंडी जिन्याने सहज वर जाता येईल अशी ही इमारत आज रोजी १०० वर्षाहून जुनी झाली आहे.या शस्त्रगारा मध्ये हजारो छोटया मोठया तलवारी,समशेरी,भाले,कुऱ्हाडी,कट्यारी,बंदुका, बाण अश्या कितीतरी प्रकारचे शस्त्र संवर्धित करून ठेवलेली आहेत.शिवाय राजांच्या काळात त्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी, या मध्ये, वाघ,मगर,अस्वल या च्या प्रतिकृती तसेच वेगवेगळ्या प्रकारची भांडी,त्या काळातील नाणी,मौल्यवान दगड,हस्तिदंत,लहान लहान खेळणी तसच इंग्लंड वरून आणलेल्या लहान गाड्या,खेळणी अशा अनेक वस्तूंचा संग्रह शस्त्र गार मध्ये पाहायला मिळतो.

गजासान….
महाराज फतेहशिह राजे यांनी वापरलेलं गजासान आपल्याला पाहायला मिळत.गजासन म्हणजे राजाचं हत्तीच्या पायापासून बनवलेले आसन.या आसनाला लाकडी पाय नसतात तर लाकडी पाया एवजी हत्तीचे अस्सल पाय बसवलेले असतात.अस हे गजासन आजही आपल्याला अक्कलकोट मध्ये पाहायला मिळत.शिवाय राजांची कपडे,चिलखत,जिरेटोप अशी रोजच्या वापरातील वस्तू सुद्धा पाहायला मिळतात. अक्कलकोट संस्थानचे सध्याचे महाराज श्रीमंत मालोजीराजे छत्रपती हे असून संस्थानच कामकाज पाहतात.प्रचंड शिस्त प्रिय आणि तितकेच प्रेमळ असलेले चिरतरुण मालोजीराजे आपल्या पूर्वजांचा वारसा अतिशय जबाबदारीने सांभाळत आहेत.

जायचे मार्ग…
अक्कलकोट शहराच्या मध्य भागातच हे शस्त्र गार असल्याने शहरातून कुठूनही तुम्ही १५-२० रुपयात रिक्षाने जाऊ शकता.प्रवेश द्वारा जवळच १५ रुपयाचं तिकीट काढून आत प्रवेश केला की मोठ्या मैदानात आपल्याला शस्त्रगाराची इमारत दिसते.इमारतीच्या आजूबाजूला लहान मोठ्या तोफा ठेवलेल्या दिसतात.इमारतीत वरच्या मजल्यावर हे शस्त्रगार आहे.शंभर वर्षापूर्वी बॉम्बे वरून आणलेला गोलाकार जिना आपल्याला शस्त्र गारा जवळ घेऊन जातो.तिथं माहिती सांगण्यासाठी दोन कर्मचारी नेमलेले आहेत.सवईप्रमाणे आपले काम २०-३०रुपय लाच घेऊन ते आपल्याला आतमधील शस्त्र व इतर माहिती सांगतात.फुकट सांगत नाहीत कारण ते सरकारी कर्मचारी आहेत.शस्त्रागार पाहून झाल्यावर आपण आजूबाजूचा मुलुख पाहू शकतो.
(टीप – शस्त्रागार मध्ये फोटोग्राफी ला बंदी असल्याने आतील जास्त फोटो उपलब्ध नाहीयेत,आहे त्या फोटोवरून अंदाज घ्यावा)

शब्दांकन: #मंगेश_गावडे_पाटील

Leave a Comment