महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,587

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक २

Views: 1394
11 Min Read

आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक २

आर्य शब्दाचा नेमका अर्थ आणि उत्पत्ती काय?

संस्कृतमध्ये अरि म्हणजे जो आपल्या पुढे असतो (एकतर राजा किंवा शत्रू पण इथे अपेक्षित राजा). तेव्हा त्या अरिचे/राजाचे परिजन अर्थात् सन्मानित लोकजन म्हणून अरि या शब्दाचा साधित शब्द आर्य. आर्यचा मूळ अर्थ आपले चांगले लोक असा होतो. पण जसजशी आपल्या लोकांची परिभाषा बदलत गेली तसतसे आणखीन लोकांचा समावेश होऊ लागला. हळूहळू त्याची व्याख्या अधिकाधिक व्यापक होत गेली आणि आर्यांनी व्यापलेला जो प्रदेश तो आर्यावर्त सुद्धा तसा वाढत गेला.(आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक २)

ऋग्वेदात स्वतःस आर्य म्हणविणारे भरतवंशी पुरु लोक त्यांच्या शत्रूंना मृध्वाच् म्हणत. आजच्या इराणमध्ये त्याकाळी असलेले लोक स्वतःस आरिय आणि शत्रूंस तुरिय म्हणत. रामायणात युद्धकांडाच्या १६ व्या सर्गात रावण रागवल्यावर विभीषणाला अनार्य म्हणतो, म्हणजे असभ्य. थोडक्यात, असंस्कृत व्यक्तीस अनार्य म्हटले जाते. उदाहरणार्थ, यथा पुष्करपत्रेषु पतितास्तोयबिन्दवः l न श्लेषमभिगच्छन्ति तथानार्येषु सौहृदम् ll, वाल्मिकी रामायण, ६-१६-११ (म्हणजे कमळाच्या पानांवर पडणाऱ्या पाण्याचे थेंब त्या पानांना चिकटत नाही, म्हणूनच मैत्री अनार्य लोकांना चिकटत नाही.) आज आर्य म्हणजे एखादी क्रूर, आक्रमक जमात असल्याचे आपल्यावर बिंबवणे सुरू आहे जे असंयुक्तिक आहे.

ऋग्वेदात आंगिरस, भार्गव, वासिष्ठ, वैश्वामित्र अशा अनेक ऋषींची कुळे आणि नानाविध जमातींची नावे येतात ज्यात तृक्षि (इक्ष्वाकु) सारख्या सूर्यवंशी तर यदु, तुर्वसु, दृह्यू, अनु, पुरु इत्यादि चंद्रवंशी म्हणविणाऱ्या जमातींचा अंतर्भाव होता. यापैकी ऋग्वेदात ३ ऋषीकुळे भरत नामक पुरूंशी संबंधित आहेत जी आंगिरस, वासिष्ठ, वैश्वामित्र अशी. ऋग्वेदात या तीन ऋषीकुळांनी आणि भरत लोकांनी मिळून एकूण ३१ वेळा आर्य शब्द वापरला आहे.

आज जगात १९ भाषाकुळं आहेत ज्यापैकी भारतात ६ भाषाकुळांचे अस्तित्व आढळते ते खालीलप्रमाणे

१) इंडो-युरोपियन (मराठी, हिंदी, गुजराती, नेपाळी, सिंहली, पंजाबी, बंगाली, राजस्थानी, बंगणी इत्यादि)
२) आ᳴स्ट्रो-एशियाटिक (मुंडारी, कोलमुंडा, खासी, संथाली, निकोबारी इत्यादि)
३) सिनो-तिबेटीयन (ईशान्य भारतीय, लडाखी, नागा इत्यादि)
४) द्राविड (तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, तुळू, गोंड, ब्राहुई इत्यादि)
५) बुरुषास्की (गिलगिट, बाल्टिस्तानातील स्थानिक भाषा)
६) अंदमानी (अंदमानातील वनवासीयांची भाषा)

यातील इंडो-युरोपियन, आ᳴स्ट्रो-एशियाटिक, सिनो-तिबेटीयन ही ३ भाषाकुळे जगात इतरत्रही आहेत आणि उर्वरित ३ जी द्राविड, बुरुषास्की, अंदमानी ही केवळ भारतीय उपखंडातच आढळतात.

आता जगात सर्वत्र पसरलेल्या इंडो-युरोपियन भाषाकुळाच्या १२ प्रमुख शाखा आहेत ज्या पुढीलप्रमाणे

१) इंडो-आर्यन
२) इराणीयन
३) अल्बानियन
४) आर्मेनियन
५) ग्रीक
६) बाल्टिक
७) स्लाव्हिक
८) इटॅलीक
९) जर्मनिक
१०) केल्टिक
११) तोखारीयन (आज अस्तित्वात नाही)
१२) ऍनातोलियन/हिटाईक (आज अस्तित्वात नाही)

या १२ शाखा सॅटम, केंटूम या दोन भागात विभागल्या आहेत. उपरोल्लेखित भाषांमध्ये भारतीय भाषा या इंडो-आर्यन कुळातील आहेत ज्यांचे इराणीयन भाषांशी साम्य अधिक असल्याने त्यांस एकत्रितपणे इंडो-इराणीयन म्हणतात.

ऋग्वेद हा आज उपलब्ध इंडो-इराणीयन भाषाकुळातील सर्वात प्राचीन ग्रंथ असून तो वैदिक संस्कृत भाषेत याच भारतभूवर रचला आहे. ऋग्वेदावरून आर्य एतद्देशीय असल्याचे सिद्ध करायला आपल्याला असे म्हणता येईल की

१) आजमितीला असा कोणताही लेखी, पुरातत्वीय पुरावा उपलब्ध नाही जो भारताबाहेर वैदिक अस्तित्व दर्शवेल.
२) ऋग्वेदात सर्व इंडो-युरोपियन शब्दच आहेत, त्यामुळे त्यांचा संबंध द्राविडी लोकांशी आला नाही हे लक्षात येते आणि जर संबंध येत नाही तर AIT/AMT म्हणते तसे आर्यांनी द्राविडी लोकांना दक्षिणेकडे ढकलण्याचा विषयच उद्भवत नाही.
३) ऋग्वेदात येणारी नद्यांची नावे अजूनही तीच आहेत, जर ते बाहेरील असते तर जुनी, स्थानिक भाषांतील नावे का नाहीत ?
४) आर्य बाहेरून आले असते तर त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वीच्या संस्कृती, जीवन, प्रदेशाच्या जुन्या स्मृती का नाहीत ?

आता AIT/AMT च्या तत्वांचे खंडन करणे क्रमप्राप्त ठरते.

१) AIT/AMT समर्थक म्हणतात की

१. इंडो-युरोपियन भाषांचे मूळ भारतात नाही.
२. ऋग्वेदात आर्य आगमनाचे पुरावे आहेत.

ऋग्वेदात शत्रूसाठी फक्त एकदाच अनास (अन् + आस) असा शब्द आला आहे ज्याचा वास्तविक अर्थ अस्पष्ट बोलणारा असा आहे. पण आर्य बाहेरून आले हे सिद्ध करताना AIT/AMT समर्थक म्हणतात की अनास म्हणजे चपट्या नाकाचे लोक जे येथील मूलनिवासी असून लांब नाकाच्या (युरोपीय लोकांसारखे) आर्यांनी त्यांना हाकलले.

२) वैदिक संस्कृत भाषा ही प्रोटो-इंडो-युरोपियन भाषेस सर्वात जवळची आहे. चाईल्डने ७२ प्रोटो-इंडो-युरोपियन शब्दांची सूची दिली आहे ज्यांपैकी इंडो-युरोपियन भाषांमध्ये पुढीलप्रमाणे शब्द आढळले.

संस्कृत – ७०
ग्रीक – ४८
जर्मनिक – ४६
लॅटिन – ४०
बाल्टिक – २५
स्लाव्हिक – २३
आर्मेनियन – १६
तोखारीयन – ८

जर प्रोटो-इंडो-युरोपियनचे मूळ दक्षिण रशिया असते तर तेथील स्लाव्हिक भाषाकुळामध्ये सर्वाधिक शब्द समान असायला हवे होते पण त्याउलट संस्कृतमध्ये सर्वाधिक साम्य दिसते.
वैदिक संस्कृत, ग्रीक भाषांमध्ये शब्दांस विशिष्ट लय आहे जो पाणिनीय संस्कृतमध्ये बरेचदा जाणवत नाही.

तसेच वैदिक, ग्रीक, जर्मन, हिटाईट देवतांमध्ये साम्य आहे. (जर्मन आणि ग्रीकमध्ये परस्पर साम्य क्वचितच दिसते हेही महत्वाचे), तर इराणीयनचे साम्य वैदिकशीच आहे. इराणीयन आणि इंडो-आर्यन लोकांनी दक्षिण रशिया सोबत सोडले असे AIT/AMT म्हणते पण तसे असल्यास जे साम्य वैदिक संस्कृतीचे इतरांशी आहे तसेच इराणीयनचे असायलाच हवे होते. वेदांत जौस पितर ही देवता आहे, ग्रीकमध्ये झुस पातेर तर रोमनमध्ये ज्युपिटर बनते. यापैकी ग्रीक, रोमन या देवता असून वैदिक देवतेचाच निसर्गाशी सर्वात जवळचा अगदीच प्राथमिक संबंध आहे.

म्हणजे मूळस्थान इंडो-आर्यन भाषेला जवळच असणार. कारण मूळस्थान दक्षिण रशियात असते तर तिथून भारतात येईपर्यंत स्थानिक लोकांशी सांस्कृतिक संबंध येऊन त्यांची संस्कृती स्वीकारत इंडो-आर्यन लोकांमध्ये अनेक बदल व्हायला हवे होते जे दिसत नाहीत.

३) AIT/AMT विरुद्ध दुसरा मतप्रवाह म्हणजे Out of India Theory (OIT) ज्यांचे म्हणणे की मूळस्थान भारत असून इथूनच इंडो-युरोपियन भाषा बाहेर पडल्या. पण बाहेर जाताना त्या कोणत्या स्वरूपात होत्या यावरून या मताचे २ प्रकार आहेत

१. संस्कृत भारताबाहेर गेली असे मानणारे :
अर्थात संस्कृतचे भारताबाहेरील नगण्य अस्तित्व बघूनच याचे खंडन होते.

२. प्रोटो-इंडो-युरोपियन भारताबाहेर गेली असे मानणारे :
यावर विरोध दर्शविताना AIT/AMT समर्थक म्हणतात जर प्रोटो-इंडो-युरोपियन मूळची भारतात होती तर १२ इंडो-युरोपियन भाषाकुळांपैकी १ संस्कृतच इथे शिल्लक राहून ११ भाषाकुळं बाहेर जाणे शक्य नाही. पण जर दक्षिण रशिया मूळस्थान मानले तरी हेच म्हणावे लागेल की तिथे एक भाषाकुळ राहून इतर ११ बाहेर गेले त्यामुळे विरोध करायचा प्रश्न नाही.

अल्बानियन, आर्मेनियन, इराणीयन, इंडो-आर्यन, ग्रीक या भाषाकुळांतील संबंध बघून कळते की या भाषा सर्वात शेवटी मूळस्थान सोडून गेल्या जे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. म्हणजे आता मूळस्थान यांच्याच जवळ कुठेतरी असणार. जर दक्षिण रशिया मूळ असते तर स्लाव्हिक भाषाकुळ जे तिथे आज आहे ते हा भाग सोडून जाऊन परत तिथे आले म्हणावे लागेल जे शक्य नाही.

इंडो-युरोपियन भाषांचे सॅटम आणि केंटूम हे दोन प्रकार आहेत. आज सर्व इंडो-आर्यन भाषा सॅटम आहेत आणि युरोपात मात्र दोन्ही प्रकार आहेत. त्यामुळे असे मत होते की मूळस्थान युरोपात असेल पण या मतास तडा तेव्हा गेला जेव्हा बंगणी भाषा (उत्तराखंड) आणि मध्य आशियात लुप्त झालेले तोखारीयन हे भाषाकुळ केंटूम आहे असे सिद्ध झाले.

AIT/AMT समर्थक म्हणतात की भारतात द्राविड, आ᳴स्ट्रो-एशियाटिक भाषा असताना मूळस्थान भारत कसे असणार ? पण जसे इंग्लिश ही मूळची इंग्लंडची भाषा जी आज अमेरिका, ऑस्ट्रेलियातही बोलली जाते आणि मूळच्या इंग्लंडमध्ये मात्र आजही आयरिश, वेल्स, स्कॉटीश वगैरे भाषा आहेत जे उपरोक्त तर्क चूक ठरवते. तसेच दक्षिण रशियातही इंडो-युरोपियन नसलेल्या युरालिक, अल्टाईक, कॉकसीन वगैरे भाषा आहेतच.

द्राविडी भाषक येथील मूळनिवासी होते हे दाखवताना AIT/AMT समर्थक म्हणतात की बलुचिस्तानात अजूनही द्राविडी कुळातील ब्राहुई लोक आहेत जे आर्यांनी हाकलूनही गेले नाहीत पण आज हेही सर्वमान्य आहे की ब्राहुई दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले आहेत. त्यामुळे AIT/AMT चा हा तर्कही फोल ठरतो.

४) अजूनही उत्तर भारत, पाकिस्तानच्या भागात जिथे आर्यांनी आक्रमण केले म्हणतात तिथे भौगोलिक घटकांची नावे संस्कृतच आहेत, जसे अमेरिकेत मिसिसिपी, शिकागो ही रेड इंडियन नावे आहेत किंवा लंडन वगैरे जसे इंग्लिश पूर्व काळापासून आहेत तसेच. किंबहुना युरोपीय नद्यांची नावे इंडो-युरोपियन पूर्वीची आहेत पण ऋग्वेदात येणारी नद्यांची नावे अजूनही तीच आहेत, जर इंडो-आर्यन बाहेरील असते तर जुनी, स्थानिक भाषांतील नावे उपलब्ध का नाहीत ?

५) पूर्व युरोपातील युरालिक भाषा (ज्या इंडो-युरोपियन नाहीत) जशा फिनिक, हंगेरीयन आदींमध्ये इंडो-इराणीयन शब्द विपुल आहेत ज्यावरून इंडो-इराणीयन तिथून आल्याचा तर्क लावला गेला. हे खोटे यावरून सिद्ध होते की इंडो-इराणीयनमध्ये युरालिक शब्द नाहीत म्हणजेच हे लोक तिथून आलेले नाहीत. उलट इराणीयन लोकांचे समूह पूर्व युरोपात गेले ज्यांच्याकडून या युरालिक भाषांनी शब्द घेतले. इंग्रजांनी जगभरात जाऊन इंग्लिश शब्द इतर भाषांना दिले आणि त्यांचे आपल्या भाषेत घेतले पण कायमस्वरूपी बाहेर स्थायिक न होता त्यांनी स्वदेशी जाऊन ते शब्द आपल्या भाषेत आधी रूढ केले म्हणून इंग्लिशमध्ये इतर भाषांचे आणि इतर भाषांमध्ये इंग्लिश शब्द आढळतात. याविरुद्ध दोन शतकांपूर्वी भारतातून फिजी, मॉरिशस तर पूर्वी आग्नेय आशियात गेलेल्या लोकांनी अशी देवाणघेवाण केली पण तिकडील स्थानिक शब्द आपल्या मायदेशी परत येऊन मूळ भाषेत मिसळले नाहीत कारण ते विदेशातच स्थायिक झाले. तसेच इथेही युरालिक लोकांचे झाले की इंडो-इराणीयन शब्द युरालिक भाषांमध्ये आहेत पण युरालिक भाषांचे या इंडो-इराणीयनमध्ये नाहीत. मध्य आशियातील आणि भारतीय पशूंची नावेही युरालिक भाषांमध्ये आहेत जरी तिथे ते पशु नसले तरी. ही नावे इतर युरोपीय भाषांमध्ये दिसत नाहीत.

६) AIT/AMT समर्थक म्हणतात की जर भारतातुन आर्य युरोपात गेले तर भारतीय वाघ, सिंह, झाडांची नावे युरोपियन भाषांमध्ये का नाहीत ? पण हे असत्य ठरवायला जिप्सी भाषा पुरेशी आहेत. या लोकांनी ख्रिस्तपूर्व ३०० च्या सुमारास भारत सोडूनही आज त्यांच्यात इंडो-आर्यन नावे नाहीत.

यावरून सिद्ध होते की भाषाशास्त्रानुसार आर्य भरताबाहेरून आलेले आक्रमक नसून एतद्देशीय रहिवासी होते.

स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence

– शुभम् जयंत सरनाईक©

Leave a Comment