असावागड | Asava Fort
मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. उत्तर कोकणातील पुर्वीच्या ठाणे जिल्ह्यात व आता नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यात गर्द झाडीने वेढलेला असावागड हा टेहळणीचा किल्ला आपले दुर्गपणाचे अवशेष संभाळत आजही ताठ मानेने उभा आहे. असावा किल्ल्यास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे बोईसर तर मुंबई अहमदाबाद मार्गावरील चिल्हार हे जवळचे ठिकाण आहे.
किल्ल्यावर जाण्यासाठी बोईसर चिल्हार मार्गावरील वारगंडे गावातील बारीपाडा हे पायथ्याचे ठिकाण बोईसर रेल्वे स्थानकापासुन ७ कि.मी. वर तर मुंबई- अहमदाबाद मार्गावरील चिल्हार पासून १४ कि.मी. वर आहे. वारगंडे गावातील विराज प्रोफाईल या कारखान्याच्या भिंतीला लागुनच एक रस्ता १ कि.मी.वरील बारीपाडा गावात जातो. गाव सुरू होताना उजवीकडे एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जाताना दिसतो. या वाटेच्या सुरवातीला एक लहानसा ओढा पार करून ५ मिनिटे चालल्यावर पाण्याचा कोरडा पडलेला सुर्या नदीचा कालवा आडवा येतो. आपण वाटेने कालव्याकडे जेथे पोहोचतो तेथील पुलावरून एक ठळक वाट किल्ल्याच्या डोंगराकडे जाताना दिसते पण हि किल्ल्यावर जाणारी वाट नसुन पुढील घराकडे जाणारी मळलेली वाट आहे. आलेल्या रस्त्याने पुल न ओलांडता उजवीकडे वळुन दुसरा पुल सोडुन तिसऱ्या पुलापर्यंत जावे. हा पुल पार करून समोरील टेकाड चढण्यास सुरवात करावी.
किल्ल्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला वळसा घालून ही वाट हळूहळू दोन छोट्या टेकड्या चढत किल्ल्याच्या डोंगरावर जाते. हि वाट दाट झाडीतून जात असल्याने थकवा जाणवत नाही. किल्ल्याच्या डोंगरावर आल्यावर मात्र वाट खड्या चढणीची आहे. किल्ल्यावर जाणारा हा राजमार्ग असुन हि ठळक वाट आपल्यला न चुकवता किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जाते. साधारण १ तासात गडाच्या उध्वस्त तटबंदी वरून आपला गडावर प्रवेश होतो. गडाची हि तटबंदी माचीच्या खालील भागाला बांधलेली असुन आपण गडावर जेथुन प्रवेश करतो तिथे डाव्या बाजुला एक उध्वस्त बुरुज दिसतो. गडाची हि तटबंदी माचीच्या बऱ्याच भागात असावी पण माचीवर वाढलेल्या झाडीमुळे या भागात फिरता येत नाही. या पुढील वाटेने उभा चढ चढत आपण बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो. बालेकिल्ल्यावर प्रवेश करताना वाटेच्या डाव्या बाजुला एक चौकोनी बुरुज व केवळ दगड एकमेकांवर रचून बनवलेली गडाची तटबंदी दिसते. हे बांधकाम जोडण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले दिसुन येत नाही. गडाचा माथा दक्षिणोत्तर अडीच एकरवर पसरलेला असुन गडाची समुद्रसपाटीपासून उंची ९७० फुट आहे.
माथ्यावर पोहोचल्यावर मधील उंचवट्याला वळसा घालत डाव्या बाजुने गड फिरण्यास सुरवात करावी. वाटेच्या सुरवातीला कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी दिसुन येतात. यातील मोठ्या टाक्यातील पाणी गाळुन पिण्यायोग्य आहे. या टाक्याच्या बाजुला बांबु रोवण्यासाठी काही खळगे दिसुन येतात. टाकी उघडयावर असल्याने पाण्यात कचरा जाऊ नये व पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी त्यावर बांबु रोवुन त्यावर गवताचे छप्पर टाकले जात असे. टाक्याशेजारी असलेल्या गवतात एक दगडी उखळ व ढोणी पहायला मिळते. येथुन पुढे किल्ल्याच्या दक्षिण टोकाला गेल्यावर एक ५० x २० फूट लांबीरुंदीचे व २० फूट खोल बांधीव टाके पहायला मिळते. टाक्याच्या एका बाजुला कातळ असुन उर्वरीत तीन भिंती घडीव दगडांनी बांधलेल्या आहेत. यातील एक भिंत कड्याच्या टोकावर असल्याने तिथे वेगळी तटबंदी बांधण्याची गरज उरली नाही. तटबंदीचे काम करणाऱ्या या भिंतीवरून टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या भिंतीचा तळातील भाग काही प्रमाणात ढासळल्याने त्यात पाणी साठत नाही.
टाक्यात पाणी जमा करण्यासाठी कातळाच्या वरील बाजुस टाक्याच्या दिशेने चर खोदले आहेत. या कातळावर काही रांजणखळगे व खडक फोडण्यासाठी सुरुंग ठासायला केलेले खड्डे दिसुन येतात. टाके पाहुन पुढे गेल्यावर डाव्या बाजुला बालेकिल्ल्याचे उध्वस्त पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार दिसुन येते. दरवाजाच्या आतील बाजुस उध्वस्त देवड्या असुन शेजारील चौकोनी बुरुज पोर्तुगीज बांधकामाची साक्ष देतात. या दरवाजातुन एक वाट खाली उतरताना दिसते पण तिथे न जाता आधी किल्ल्याचा उत्तर भाग पाहुन घ्यावा. दरवाजाच्या वरील भागात आपण आधी पाहीलेल्या मोठया टाक्याची लहान प्रतिकृती पहायला मिळते पण हे टाके पुर्णपणे मातीने भरून गेले आहे. टाक्याखालुन सरळ जाणारी वाट उत्तरेकडील बुरुजावर जाते. चौकोनी आकाराच्या या बुरुजावर बांधकामाचे अवशेष दिसुन येतात. गडाच्या या भागात आजही शिल्लक असलेली ८०-९० फुट तटबंदी दिसुन येते. तटबंदी पाहुन गडाच्या मधील उंचवट्यावर यावे. या उंचवट्याला दोन बाजुंनी काही प्रमाणात तटबंदी बांधलेली असुन येथे काही वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात.
बालेकिल्ल्यावरून अशेरी, काळदुर्ग हे किल्ले व डहाणू- बोईसर पालघरपर्यंतचा परीसर नजरेस पडतो. गडाचा माथा छोटा असल्याने अर्ध्या तासात आपली गडफेरी आटोपते पण गडदर्शन संपलेले नसते. गडाच्या पुर्व भागात बारीपाडा गावाच्या दिशेने दोन मोठया गुहा आहेत. त्या पहाण्यासाठी बालेकिल्ल्याच्या दरवाजातून अर्धा डोंगर उतरून खाली जावे लागते. आधी पाहिलेल्या उध्वस्त दरवाजाच्या वाटेने खाली उतरायला सुरवात केल्यावर वाटेवर खडकात खोदलेल्या पायऱ्या व मागे वळुन पाहील्यास दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेली तटबंदी दिसुन येते. या वाटेने थोडे उतरल्यावर एक वाट उजवीकडे पठारावर जाते तर सरळ जाणारी वाट खाली उतरत जाते. उजवीकडील वाटेने काही अंतर पार केल्यावर जमिनीवर पडलेली झिज झालेली सहा फुट उंच भग्न हनुमान मुर्ती पहायला मिळते. नेहमी दिसणाऱ्या हनुमान मूर्तीपेक्षा हि मुर्ती थोडी वेगळी आहे. मुर्ती पाहुन दरवाजाखालील मूळ वाटेवर येऊन गड उतरायला सुरवात करावी. या वाटेने खाली उतरताना माचीच्या या भागात असलेल्या तटबंदीचे अवशेष काही ठिकाणी पहायला मिळतात.
गुहेकडे जाण्याच्या मार्ग बाणाने दर्शवीला असल्याने चुकण्याची शक्यता फारच कमी आहे. या वाटेवर मोठया प्रमाणात पायऱ्या कोरलेल्या असुन अर्धा तास डोंगर उतरल्यावर आपण गुहेसमोर पोहोचतो. या ठिकाणी एकुण तीन गुहा असुन पहिली गुहा पुर्णपणे नैसर्गिक तर उरलेल्या दोन गुहा नैसर्गीक असल्या तरी बांधीव आहेत. दुसरी गुहा ७० x ५० फुट लांबरुंद असुन उंचीने ८-१० फुट आहे. या गुहेत पाणी साठलेले असुन त्यावर राखाडी रंगाचा तवंग आलेला आहे. तवंग बाजुला केल्यावर पाण्याचा तळ स्पष्ट दिसुन येतो. या मोठ्या गुहेला लागुन शेजारी दुसरी लहान गुहा आहे. गरज पडल्यास या गुहेत ५-६ जणांना मुक्काम करता येईल. या दोन्ही गुहांचा दर्शनी भाग घडीव दगडांनी बांधलेला असुन सध्या काही प्रमाणात ढासळलेला आहे. गुहा पाहील्यावर आपली गडफेरी संपते. गुहेजवळून खाली उतरण्यासाठी पायवाट आहे पण ती फारशी वापरात नसल्याने वाटाड्या असेल तरच या वाटेने उतरावे अन्यथा आल्यामार्गे परत जावे हे उत्तम. इतिहासात आसावा किल्ला असावा, विसावागड विसामा आसावागड आसावा दुर्ग अशा अनेक नावानी ओळखला जातो. गडावर खुप मोठा काळ पोर्तुगीज सत्ता असल्याने गडातील वास्तुंवर पोर्तुगीज बांधकामाचा प्रभाव जाणवतो.
प्राचीनकाळी सोपारा, डहाणू, तारापूर, कल्याण इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार चालत असे. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी घाटावर जात असे. डहाणू व तारापूर बंदरांना घाटाशी जोडणाऱ्या मार्गांच्या रक्षणासाठी महिकावतीच्या बिंब राजाने आसावा गडाची निर्मीति केली असे मानले जाते पण नंतरच्या काळात या गडाचा ताबा गुजरातच्या सुलतानाकडे व त्यानंतर पोर्तुगीजांकडे गेला. शिवकाळात या किल्ल्यावर पोर्तुगीजांचा ताबा होता. इ.स. १६८३ मधे संभाजी महाराजांच्या काळात मराठयांनी या किल्ल्याचा ताबा घेतला पण तो फार काळ टिकला नाही. पोर्तुगीजानी लगेचच त्याचा ताबा मिळविला. त्यानंतर १७२७ च्या वसई मोहिमेत चिमाजी अप्पानी हा किल्ला घेउन या भागातुन पोर्तुगीजांचे बस्तान कायमचे उठवले. १८१८ मधे कॅप्टन डिकीन्सनने या किल्ल्याचा ताबा घेतला व महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.