अशेरीगड
अशेरीगड | Asherigad Fort – मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. दक्षिण कोकणात रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्हे येतात तर उत्तर कोकणात ठाणे पालघर जिल्हे येतात. पालघर जिल्ह्यातुन जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद या महामार्गाला लागुन पालघर तालुक्यात गर्द झाडीने वेढलेला अशेरीगड उभा आहे. मुंबईहुन ट्रेनने अथवा स्वतःच्या वाहनाने अशेरीगडाची भटकंती एका दिवसात करता येते. अशेरीगडास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या ट्रेनने डहाणु स्थानक गाठावे लागते. खोडकोना हे गडाच्या पायथ्याशी असलेले गाव डहाणु रेल्वे स्थानकापासून चिल्हार फाट्यामार्गे २४ कि.मी.वर तर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील मनोर नाक्यापासून ११ कि.मी. अंतरावर आहे. चिल्हार फाटा ते खोडकोना गाव हे अंतर ५ कि.मी.आहे. खोडकोना गाव महामार्गापासुन आतील बाजुस असुन मुंबईहुन अहमदाबादकडे जाताना चारोटीपासुन १० कि.मी अंतरावर महामार्गाच्या डावीकडे खोडकोना गावात जाणाऱ्या फाट्यावर वनखात्याने अशेरीगडचा फलक लावलेला आहे. स्वतःचे वाहन नसल्यास या फाट्यापासुन १ कि.मी.आत खोडकोना गावापर्यंत चालत जावे लागते.
गावाच्या वेशीवर वाघदेवाचे लहान मंदिर असुन या मंदिरात लाकडावर कोरलेले वाघाचे शिल्प तसेच काही शेंदूर फासलेले तांदळा ठेवले आहेत. खोडकोना गावात आल्यावर समोरच अशेरीगडचे दर्शन होते. अशेरी गडावर जाण्यासाठी असलेली एकमेव वाट खोडकोना गावातुनच वर जाते. गावाच्या टोकाशी असलेल्या जंगलातुन सुरु होणारी वाट गडाच्या डाव्या बाजुने गड व त्याशेजारी असलेला डोंगर यामधील खिंडीत चढते. वाटेत पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावातील विहीरीतुन पुरेसे पाणी घेऊन गड चढण्यास सुरवात करावी. गडाच्या पायथ्याशी वाटेच्या सुरवातीला एका वास्तुचे किंवा मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. गडावर जाणाऱ्या वाटेवर मोठया प्रमाणात जंगल असले तरी येथील दमट वातावरणाने गड चढताना चांगलीच दमछाक होते. या मळलेल्या वाटेने गावातुन साधारण १.३० तासात आपण गडाखाली असलेल्या खिंडीत येऊन पोहोचतो. खिंडीतुन उजवीकडे १५ मिनिटांच्या चढाईनंतर उघड्यावर लाकडात कोरलेले वाघाचे शिल्प व चंद्रसुर्य दिसुन येतात. इथुन वर चढल्यावर कातळात खोदलेला पायरीमार्ग असुन त्याशेजारी एका लहान गुहेचे तोंड दिसते. या गुहेची लांबी साधारण १२ फुट असुन गुहेचा आकार एका वेळी केवळ एकच माणुस आत रांगत जाऊ शकेल इतका आहे.
गुहेवरील कातळटप्पा म्हणजे एक बुरुज असुन या बुरुजाची रचना या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी केलेली आहे. गुहेवरील पायऱ्यांनी या गोलाकार कातळटप्प्याला वळसा घालत आपण दोन डोंगरामधील घळीत असलेल्या उध्वस्त दरवाजाच्या खालील भागात पोहोचतो. कधीकाळी या घळीच्या तोंडाशी असलेला दरवाजा इंग्रजांनी सुरुंग लावुन उध्वस्त केल्याने या दरवाजावर असलेल्या दगडी खांबावर कोरलेली गणेशपट्टी खाली कोसळलेल्या दगडात पहायला मिळते. पुर्वी येथुन प्रस्तरारोहण करूनच गडावर जावे लागत असे पण सध्या या वाटेवर वनखात्याने लोखंडी शिडी लावली असल्याने हा भाग चढाईसाठी सोपा झाला आहे. शिडी चढुन वर आल्यावर खिंडीत आजही शिल्लक असलेल्या गडाच्या काही पायऱ्या चढुन आपला गडावर प्रवेश होतो. दरवाजाच्या डाव्या बाजूस किल्ल्याचा बुरुज असुन उजव्या बाजुस कड्यावर तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. या बुरुजावर पोर्तुगीज राजसत्तेचे प्रतिक असलेला मुकुट दगडावर कोरलेले शिल्प पहायला मिळते. बुरुजावरून समोरच गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन या पायऱ्यांच्या डाव्या बाजूस हिरवेगार पाणी असलेले कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. पायऱ्या चढुन वर आल्यावर समोरच गडाचे पुर्वाभिमुख उध्वस्त प्रवेशद्वार दिसते. या दरवाजाची केवळ दगडी चौकट शिल्लक असुन वरील कमान पुर्णपणे नष्ट झाली आहे.
दरवाजाच्या दर्शनी भागात खालील बाजुस काही कोरीवकाम केलेले दिसुन येते. दरवाजाच्या वरील बाजुस कातळाला समांतर असा लांबलचक चर असुन डोंगरउतारावर तटबंदीचा पाया म्हणून खणलेला हा चर तटबंदी न बांधल्याने तसाच राहिला आहे. कातळ चढुन वर आल्यावर कमरेपर्यंत वाढलेल्या झाडीतुन किल्ल्याच्या मध्यावर जाण्यास वाट आहे. या वाटेने जाताना वाटेच्या डाव्या बाजूस कोरडा पडलेला साचपाण्याचा तलाव तर पुढील भागात एका वास्तुचे अवशेष दिसुन येतात. तलाव डावीकडे असताना एक एक लहानशी वाट उजवीकडे जाताना दिसते. या वाटेने साधारण ५ मिनिटे चालल्यावर डोंगर उतारावर खडकात खोदलेली दोन टाकी व एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. हे पाहुन मूळ वाटेवर परत यावे. या वाटेने पुढे आल्यावर एक वाट उजवीकडे खाली घळीत उतरताना दिसते. या घळीत काही पाण्याची टाकीही दिसतात पण तिथे न जाता आधी गडमाथा फिरून घ्यावा.
पायवाटेने पुढे आल्यावर आपल्याला एक पायवाटेवरील चौक दिसुन येतो. या चौकातून उजवीकडे जाणारी वाट सदरेवर अथवा किल्लेदाराच्या वाड्यावर जाते तर डावीकडील वाट मधील घळीत उतरत पाण्याच्या टाक्याकडे जाते तर सरळ जाणारी वाट गडाच्या मध्यावर जाते. सर्वप्रथम उजवीकडे वळुन गडाची सदर अथवा किल्लेदाराचा वाडा पाहुन घ्यावा. या वास्तुच्या चारही बाजुला असलेल्या भिंती आजही शिल्लक असुन उध्वस्त दरवाजातुन या वास्तुत प्रवेश केल्यावर समोरच काही घडीव व कोरीव दगड सिंहासनाप्रमाणे रचलेले दिसतात. आत मोठया प्रमाणात झाडी वाढली असुन इतरत्र फिरता येत नाही. या झाडीत मोठया प्रमाणात अवशेष विखुरले आहेत. आपण प्रवेश केला त्या ठिकाणाच्या उजव्या बाजुस एक भलामोठा पावसाळी तलाव असुन या तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे. हा तलाव पार करून पुढे गेल्यावर समोरच सपाटीवर कातळात खोदलेली दोन टाकी व एका वास्तुचा चौथरा दिसुन येतो. हे अवशेष पाहुन आपण आलेल्या पायवाटेच्या चौकावर परत यावे व समोरची वाट धरावी.या वाटेवर सर्वप्रथम डावीकडे आपल्याला एका घराचा चौथरा व त्याच्या आजुबाजुला दगडात कोरलेले खळगे व चर दिसुन येतो. हे खळगे म्हणजे घराच्या आवारात बांबू रोवण्यासाठी कोरलेले तळखडे असुन दगडावरील हा चर भिंतीचा पाया घालण्यासाठी कोरलेला आहे.
वाटेच्या पुढील भागात खडकात अर्धवट खोदलेली गुहा असुन या गुहेच्या आवारात तीन मध्यम आकाराच्या तोफा इतस्तत पडलेल्या आहेत. डॉ. श्रीदत्त राउत यांच्या वसई मोहीम परीवार या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेने गडावर तळ्यात व झाडीझुडपात पडलेल्या या तोफा मोठया मेहनतीने या ठिकाणी आणुन निट मांडुन ठेवल्या होत्या पण गडावर आलेल्या काही महाभागांनी स्वतःची लायकी दाखवल्याने त्या विखुरल्या आहेत. गुहेचा बाहेरील भाग अलीकडील काळात तैलरंगात रंगवला असुन मध्यम आकाराची हि गुहा दोन दालनात खोदलेली आहे. गुहा खोदण्याचे काम अर्धवट राहिल्याने गुहेचा आतील भाग असमान पातळीत व खडबडीत आहे. गुहेच्या आतील कातळाला शेंदुर फासुन देवता रूप देण्यात आले आहे. पावसाळा वगळता या गुहेत ५-६ जण सहज राहु शकतात. खोडकोना गावापासून या गुहेपर्यंत येण्यास साधारण ३ तास लागतात. गुहेच्या वरील भागात गडाचे प्रशस्त पठार असुन पठारावरून येणारे पाणी गुहेच्या तोंडावर पडू नये यासाठी गुहेच्या वरील भागात लहानशी दगडी भिंत बांधली आहे.
गुहेकडील वाटेने पठारावर उजवीकडे गेले असता पठारावरील कड्याला पडलेली लांबलचक भेग दिसुन येते. भेगेच्या उजव्या बाजुस अशेरीगडाच्या दोन डोंगर सोंडेमधील घळ असुन या घळीच्या तोंडावर तटबंदी बांधली आहे. येथे गडाचा दुसरा दरवाजा असण्याची शक्यता आहे कारण या घळीतुन उतरणारी वाट आपल्याला मुंबई-अहमदाबाद मार्गावर तसेच खोडकोना गावात सोडते. या वाटेचा वापर फारसे कुणी करत नसल्याने वाट धोकादायक झाली आहे. अशेरीगडाची पठारावरील उंची समुद्रसपाटीपासुन १६६० फुट असुन संपुर्ण गडाचा परीसर ५० एकरपेक्षा जास्त भुभागावर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. गडाच्या माथ्यावर मोठया प्रमाणात जंगल वाढल्याने बरेचसे अवशेष झाडीत लपले आहेत. गडाच्या प्रशस्त पठारावरून फेरी मारताना मोठया प्रमाणात वास्तु अवशेष व घरांचे चौथरे दिसुन येतात. पठारावर एकुण तीन मोठे तलाव असुन यातील दोन तलाव बांधीव तर एक तलाव साचपाण्याचा पण सद्यस्थितीत कोरडा पडलेला आहे. उर्वरित दोन बांधीव तलावात मोठया प्रमाणात पाणीसाठा असुन एक तलाव खडकात कोरलेला तर दुसरा तलाव खडकात कोरून घडीव दगडांनी बांधला आहे. या तलावांचे पाणी पिण्यायोग्य असुन तलावात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. तलावाकडील टेकाड हे गडावरील हे सर्वात उंच ठिकाण असुन येथुन गडाचे संपुर्ण पठार नजरेस पडते.
पठाराभोवती असलेल्या नैसर्गीक कातळकड्यामुळे गडावर फारशी तटबंदी दिसुन येत नाही. पठारावरील फेरी पूर्ण झाल्यावर मुळ वाटेवर येऊन पुन्हा पायवाटेच्या चौकात यावे. येथुन उजवीकडील वाटेने (पठाराकडे तोंड केल्यास डावीकडे) घळीच्या दिशेने उतरल्यास दरीच्या काठावर खडकात खोदलेली पाण्याची पाच टाकी आहेत. टाक्याकडे जाणारी वाट निमुळती व दरीच्या काठाने जात असल्याने थोडे सांभाळूनच उतरावे लागते. यातील दोन टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असुन गडावर येणारे बहुतेकजण पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात. या टाक्याकडून दरीच्या काठाने थोडे पुढे गेल्यावर वनखात्याने बांधलेला सरंक्षक लोखंडी कठडा दिसतो. या कठड्याच्या पुढील भागात अजुन दोन खडकात खोदलेली टाकी पहायला मिळतात. टाकी पाहुन पायवाटे वरील चौकात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड व्यवस्थित पहाण्यासाठी तीन तास लागतात.
गडाच्या पठारावरून महालक्ष्मी सुळका,सेगवाह,गंभीरगड,कोहोज, टकमक, काळदुर्ग, अडसुळ हे किल्ले तसेच सूर्या,पिंजाळ व वैतरणा नदीचे पात्र इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. उत्तर कोकणात शिलाहारांचे वर्चस्व असताना १२ व्या शतकात दुसरा भोज राजा याने हा किल्ला बांधल्याचे मानले जाते. महिकावती बखरीतील नोंदीप्रमाणे सुरवातीचच्या काळात प्रतापबिंब राजाच्या ताब्यात असलेला हा प्रदेश १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेला. इ.स.१५५६ मधे पोर्तुगीजांनी वसई ताब्यात घेतल्यावर पोर्तुगीज व गुजरात सुलतान यांच्यात झालेल्या तहानुसार हा गड सहा परगणे व त्यातील अडतीस गावे यावर पोर्तुगीजांचा ताबा आला. किल्ला ताब्यात आल्यावर पोर्तुगीजांनी किल्ल्याची पुनर्बांधणी करून नवीन इमारती बांधल्या. पोर्तुगीज कागदपत्रानुसार त्याकाळात गडावर सैनिक, स्त्री, पुरुष, मुले व कैदी असे एकुण आठशे लोकांचे वास्तव्य असल्याची नोंद आढळते.
पोर्तुगीज हि मुळातच दर्यावर्दी जमात. ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्याच्या परिसरात जहाज बांधणीसाठी लागणाऱ्या सागाच्या झाडांचे जंगल मोठया प्रमाणात असल्याने पोर्तुगीज काळात या किल्ल्याचे महत्व वाढीस लागले. इ.स.१५५६ ते इ.स.१६८३ अशी तब्बल १३० वर्षे हा गड पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. शिवकाळात इ.स.१६५७ मधे मराठयांच्या कल्याण भिवंडी स्वारीनंतर १६५८ मध्ये पोर्तुगीज व्हाईसराय आपल्या राजाला पाठविलेल्या पत्रात शिवाजीने आमच्या उत्तर विभागातल्या मुलुखाला उपद्रव दिल्याचे कळवतो.काही पोर्तुगीज कागदपत्रानुसार १६७१ मधे अशेरीगड पोर्तुगीजाच्या ताब्यात असल्याचे दिसुन येते. पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इ.स.१६८३ साली मराठयांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील तारापूरवर हल्ला करून ते बेचिराख केले. याचवेळी मराठयांनी अशेरीगडही जिंकला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी परत घेतला. पुढे चिमाजीअप्पा यांच्या वसई मोहिमेत मराठ्यानी गडाला वेढा घालून पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३८ रोजी अशेरीगड जिंकून घेतला. इ.स. १८१८ मधे इंग्रज अधिकारी कॅप्टन डिकीन्सनने हा किल्ला ताब्यात घेतला. ठाणे जिल्हा ग्याझेटमधील उल्लेखाप्रमाणे १८८१च्या सुमारास किल्ल्याचा दरवाजा उध्वस्त स्थितीत होता.
@सुरेश निंबाळकर