अशोक वनात हनुमान –
घोटणच्या मल्लिकार्जूनेश्वर मंदिरात (ता. शेवगांव जि. नगर) पशुपक्ष्यांची शिल्पे लक्षणीय आहेत हे मी आधी सांगितले होतेच. या शिल्पात सीतेच्या शोधातील हनुमान दाखवला आहे. शिल्पाची झीज झाली शिवाय मोडतोड झाल्याने आधी लक्ष्यात नाही आले. तेथील पुजार्याने सांगितल्यावर नीट लक्ष्य देवून बघितले. मग हनुमानाने पुढे केलेले बोट म्हणजे तो सीतेला अंगठी दाखवतोय हे लक्ष्यात आले. बाजूला दोन बलदंड स्त्रीया म्हणजेच राक्षसी आहेत. अंगठी दिसताच सीतेने मान वरती केली, अंगठीसाठी हाताची ओंजळ पुढे केली. एरव्ही सीता खाली मान घातलेली दाखवली जाते. पण रामाची अंगठी दिसताच ती आनंदली. या शिल्पकाराने नेमका हा क्षण टिपला आहे.
मागची अशोकाचे खोड सरळ न दाखवता कलात्मक असे त्रिभंग मुद्रेत उभ्या असलेल्या सुरसुंदरी सारखे दाखवले आहे. हनुमान हा आकाराने लहान होवून सीते समोर उभा राहिला असे वर्णन रामायणात आहे. इथे शिल्पकाराने त्याचाही विचार केलाय हे विशेष. बसलेल्या सीतेइतकीच हनुमानाची उंची आहे.
जेंव्हा हे शिल्प संपूर्ण चांगल्या स्थितीत असेल तेंव्हा त्याचे सौंदर्य काय आणि किती असेल. आज केवळ अवशेषांवरून अंदाज लावला तर त्याचे सौंदर्य जाणवते. मंदिरावरची छोटी शिल्पे आकारामुळे दूर्लक्षीत राहतात पण त्यांच्यातही मोठा अर्थ दडलेला असतो.
छायाचित्र – Travel Baba
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद