श्री अष्टभुजा दुर्गा मंदिर, नारायण पेठ, पुणे –
पुराणकाळात आदिशक्तीने अनेकदा असुरांच्या वधासाठी अवतार घेतले. त्यातीलच एक महिषासुरर्दिनी. महिषासुर राक्षसाच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिन्ही देवानी मिळून अष्टभुजा दूर्गेची निर्मिती केली आणि इतर अनेक देवांनी तिला विविध आयुधानी सुसज्ज केले. या देवीला समर्पित अशी दोन अष्टभुजा देवीची मंदिर पुण्यामध्ये आहेत. एक मंदिर शनिवार पेठेत बाजीराव रोडवर असणाऱ्या दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ आहे तर दुसरे नारायण पेठेत नदीकाठी आहे.श्री अष्टभुजा दुर्गा मंदिर.
नारायण पेठ पोलिस चौकीच्या मागील बाजूस नदीकिनारी असलेले हे मंदिर दोनशे वर्ष जुने आहे. चिंतामणशेट दिवेकर यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिरासाठी दैवज्ञ ब्राह्मण समाजातील श्रीमती पार्वतीबाई महादेव मुरुडकर यांनी आपले बुधवार पेठेतील घर देऊन टाकले. त्यातूनच दैनंदिन पुजा, उत्सव इत्यादीच्या खर्चासाठी काही उत्पन्न मिळते. वर्तमान काळात दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या संस्थेमार्फत अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्टमार्फत मंदिराची व्यवस्था पहिली जाते.
मंदिरात देवीची सुमारे मीटरभर उंचीची संगमरवरी मूर्ती आहे. देवीने पुढच्या दोन्ही हातात धरलेला त्रिशूळ महिषासुर राक्षसाच्या शरीरात खुपासलेला दिसतो. मुर्तीच्या उजवीकडील हातात अनुक्रमे पाश, चक्र, तलवार आहे. तर डावीकडील हातात अनुक्रमे ढाल,पद्म असून उरलेल्या हाताने महिषासुराचे केस पकडलेले आहेत. डावीकडील असलेला हा असुर रेड्याच्या शरीरातून बाहेर आलेला असून देवीचे वाहन असलेला सिंह रेड्याच्या पृष्ठभागाचा चावा घेताना दाखवला आहे. देवीचा उजवा पाय असुराच्या पाठीवर आहे.
गाभाऱ्याबाहेर प्रवेशद्वाराच्या डाव्या उजव्या बाजूच्या कोनाड्यात गणेशमूर्ती आहेत. डाव्या बाजूची संगमरवरातील मूर्ती कमळात बसलेली व डाव्या सोंडेची आहे. तसेच उजवीकडील गणेशमूर्ती चार हातांची व शेंदरी आहे. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर आणि कळसातही गणेशप्रतीमा आहे. १९६१ च्या पानशेतच्या पुरात मंदिराचे खूप नुकसान झाले होते.
संदर्भ –
मुठेकाठचे पुणे : प्र. के. घाणेकर
पत्ता :
https://goo.gl/maps/ruR34f29QKiobPLBA
आठवणी इतिहासाच्या