महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,380

छत्रपती राजाराम महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

Views: 3969
4 Min Read

छत्रपती राजाराम महाराजांचे अष्टप्रधान मंडळ –

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर झुल्फिकारखानाने राजधानी रायगडाला वेढा दिला. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराजांनी आपल्या राण्यांसह रायगड सोडला. प्रथय जावळी आणि नंतर ते प्रतापगडाकडे गेले. प्रतापगडावरून प्रथम महाराज साताऱ्याला, तेथून सज्जनगडाला आणि नंतर ३० जूनच्या सुमारास पन्हाळ्यास पोहोचले. राजाराम महाराजांना यानंतर पन्हाळा सोडून जिंजीकडे प्रयाण करावे लागले आणि ते पुढच्या घटनांच्या दृष्टीने योग्यच झाले यात शंका नाही. पण पन्हाळा ते जिंजी हा त्यांचा प्रवास मात्र अत्यंत बिकट परिस्थितीत झाला. त्यांच्या मागावर मोगलांचे सैन्य धावत होते. त्यामुळे अनेक साहसी प्रसंगांना आणि प्राणसंकटांना तोंड देत ते जिंजीला पोहचले.(छत्रपती राजाराम महाराजांचे अष्टप्रधान मंडळ)

अखेर एक महिन्यात साधारण पाचशे मैलांचा प्रवास करून राजाराम महाराज नोव्हेंबर १६८९ मध्ये जिंजीला सुखरूप पोहोचले. त्याचे मुख्य श्रेय बहिर्जी घोरपडे, रुपाजी भोसले, प्रल्हाद निराजी, सेनापती पानसंबळ, खंडो बल्लाळ यांसारख्या निष्ठावंत सेवकांना दिले पाहिजे‌.

राजाराम महाराज जिंजीला पोहोचल्यानंतर मोगलांच्या सैन्याने थोड्याच दिवसानंतर जिंजीला वेढा दिला. या वेढ्यात सतत आठ वर्षे मराठे आणि मोगल यांचा संघर्ष चालू होता. बाहेर धनाचे आणि संतांची यांनी मोगलांना जेरीस आणले होते. त्यामुळे मोगल हा किल्लाला लवकर जिंकू शकले नाहीत.

राजाराम महाराजांनी थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर छत्रपतीपद व‌ राजचिन्हे धारण केली. यथाविधी राज्याभिषेक समारंभ मात्र झाला नाही. यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या आणि जिंजीवर मराठ्यांचे राज्य अस्तित्वात आहे, याची मोगलांना जाणीव करून दिली.

राजाराम महाराजांनी पुढील प्रमाणे नेमणुका केल्या होत्या :

पंतप्रधान (पेशवे) – निळो मोरेश्वर पिंगळे
प्रतिनिधी – प्रल्हाद निराजी
सेनापती – संताजी घोरपडे
अमात्य – जनार्दनपंत हणमंते
हुकूमतपन्हा – रामचंद्रपंत बावडेकर
सचिव – शंकराची मल्हार नरगुंदकर
पंडितराव – श्रीकराचार्य कालगावकर
मंत्री – रामचंद्र त्रिंबक पुंडे
सुमंत – महादजी गदाधर
न्यायाधीश – बाळाजी सोनदेव
(संदर्भ : सरदेसाई, स्थिरबुद्धी राजाराम)

वरील यादीत प्रतिनिधी आणि हुकूमतपन्हा ही दोन अधिकारपदे छत्रपती राजाराम महाराजांनी अष्टप्रधानांत नव्याने सुरू केली. निळोपंत पिंगळे यांना प्रधानपदावर नेमल्यानंतर प्रल्हाद निराजी यांना देण्यायोग्य मोठे पद शिल्लक राहिले नाही तेव्हा त्यांच्यासाठी ‘प्रतिनिधी’ हे नवीन पद योजण्यात आले. हुकूमतपन्हा’ हे अधिकारपदही नव्याने सुरू झाले. अमात्यपद जनार्दनपंत हणमंते यांना दिल्यानंतर रामचंद्रपंत यांना ‘हुकूमतपन्हा’ असे नवे अधिकार पद मिळाले. हे पद दिले तेव्हा रामचंद्रपंत विशाळगडावर होते. म्हणून त्या पदाचा सरंजाम व वस्त्रे जिंजीहून विशाळगडावर पाठविण्यात आली.

सचिवपद शंकराजी मल्हार नरगुंदकर यांना दिले होते; पण ते फार लवकर निधन पावले. त्यांच्या जागी शंकराजी नारायण यांना सचिवपद मिळाले. (संदर्भ : सरदेसाई, स्थिरबुद्धी राजाराम) चिटणीसपद खंडोबल्लाळ यांच्याकडे कायम चालू ठेवले.

याशिवाय आणखी काही मातब्बर व्यक्तींना छत्रपती राजाराममहाराजांनी त्या व्यक्तींच्या कामगिऱ्या पाहून किताब व अधिकारपदे दिली. परसोजी भोसले यांना गोंडवण, वऱ्हाड, नागपूर इत्यादी प्रदेशांचा अंमल दिला‌. तसेच त्यांना ‘सेनासाहेबसुभा’ असे पदही मिळाले. परसोजी भोसले हे नागपूरकर भोसल्यांचे पूर्वज होत. परसोजींप्रमाणेच आणखी एक शूर व कर्ते सरदार सिधोजीरव निंबाळकर यांना गोदावरीच्या काठचा सुभा दिला. गुजरातच्या भागात खंडेराव दाभाडे यांना नेमून ‘सेनाधुरंधर’ हे पद दिले. बुबाजी पवार यांना ‘विश्वासराव’ हा किताब व ‘विश्वासराई’ सरंजाम दिला. त्यांचे बंधू केरोजी पवार यांना ‘सेनाबारासहस्त्री’ किताब देण्यात आला. (संदर्भ : संस्थान देवास, पवार घराण्याचा इतिहास – मा.वि.गुजर)

संदर्भ – स.मा.गर्गे, करवीर रियासत.

Sanket Pagar

Leave a Comment