महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,834

कोकणातील अष्टविनायक

Views: 3276
11 Min Read

कोकणातील अष्टविनायक –

गेल्या काही वर्षापासून कोकणात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. कोकणातील धार्मिक वातावरण जवळून अभ्यासले असता आपणास आजही तुलनेने फारशी व्यापारी मानसिकता जाणवत नाही. कोकणातील एकूणच सर्व धार्मिक परंपरा आपले अस्तित्व आजही संभाळून आहेत. जगभरातील धर्मप्रेमि म्हणूनच आजही कोकणात दर्शनाला येतातच… कोकणातील गणेश मंदिरे अतिशय स्वच्छ, सुंदर व निटनेटकी आहेत. आजूबाजूचा परिसर न्याहळताना कधी एकदा आपण गणपती मंदिराकडे पोहोचतो हे कळतच नाही. या सार्‍या पार्श्वभूमीवर कोकणातील महत्वपूर्ण आठ श्री गणेश स्थानाना अष्टविनायक स्वरुपात भाविक्ांसमोर ठेवीत आहोत. प्रस्तुत लेखनातील स्थान निवडित काही वेगळे विचार असु शकतात, परंतु अशा स्वरुपातील मांडणी कोकण पर्यटन विकासास पूरक ठरू शकते. म्हणूनचा हा प्राथमिक व  प्रामाणिक लेखन प्रपंच !(कोकणातील अष्टविनायक)

श्री क्षेत्र गणपतीपुळे ( रत्नागिरी )

मुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे होय. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते. हिंदुस्थानच्या आठ दिशांनी आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी श्री क्षेत्र गणपतीपुळे ही पश्र्चिमद्वार देवता होय. समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला “पुळ्याचा गणपती” असेही म्हणतात. येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती , त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र  ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे.  समोर पसरलेला निळाशार समुद्र आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असलेले हे सुंदर गुलाबी मंदिर पर्यटनाबरोबर तीर्थाटनाचाही आनंद देते. रत्नागिरीहून साधारण २५ किमी अंतरावर असणारे ‘गणेशगुळे’ हे स्थान फारच कमी लोकांना माहित आहे. अगदी साधे गाव, साधे मंदिर आणि बहुतालचा सुंदर, परिसर बघण्यासारखा आहे. ज्यांना वेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला आवडते, अशा लोकांना गणेशगुळे येथे जायलाच हवे.

 

कड्यावरचा गणपती मंदिर, आंजर्ले  ( रत्नागिरी )

एका बाजूला अथांग समुद्र, एका बाजूला जोग नदी व खाडी असलेले हे कोकणातील खूप निसर्गरम्य, शांत गाव. कड्यावरचा गणपती हे एक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले ह्या गावाचे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे. हे गणपती मंदिर समुद्रालगतच्या टेकडीवर आहे. दाट हिरवाळीत हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गाभा-यातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. ती उजव्या सोंडेची असून ५ फूट सिंहासनाधिष्ठीत आहे. मूर्ती बेसॉल्ट रॉकपासून बनविलेली आहे. ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धिसिद्धिच्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारातच काळ्या पाषाणाचे शिवमंदिर आणि अष्टकोनी तळे आहे. मंदिराच्या चारही कोप-यावर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रांच्या म्हणण्यानुसार ते सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. येथे माघी उत्सव जोरात होतो.

दशभुजा गणेश हेदवी ( रत्नागिरी )

निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातेल हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन मंदिर टेकडीवर वसले आहे. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर हेदवी गाव वसले आहे ह. दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे. मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते, असे म्हटले जाते.

जय गणेश मंदिर, मालवण  (सिंधुदुर्ग)

मूळचे मालवणचे कालनिर्णयकर्ते ज्योतिभास्कर जयंतराव साळंगावकर त्यांनी आपल्या राहत्या घराच्या जागी लाखो रुपये खर्चून सर्वांगसुंदर असे गणेश मंदिर उभारले आहे. शास्त्रोक्त पद्घतीने बांधलेले हे मंदिर पाहताचक्षणीच मन प्रसन्न होते. उत्तम शिल्पकला आणि भडक ऑइलपेंट टाळून केलेली सुखद रंगसंगती आणि कमालीची स्वच्छता आहे. गाभार्‍यामधली सुवर्णगणेश मूर्ती अतिशय चित्ताकर्षक आहे. मंद तेवणार्‍या नंददीपांच्या प्रकाशात सुवर्ण चौरंगावर विराजमान झालेले श्री गजानन, दोन्ही बाजूस ऋध्दी-सिध्दी आणि चवर्‍या ढाळणारे मूषक डोळे भरुन पाहताना ’दर्शनमात्रे मनः कामनापूर्ती’ असा अनुभव येतो. आदिदेवता श्री गणेशाच्या भक्तांना त्याच्या कृपेने सर्व क्षेत्रात जय मिळावा म्हणून या मंदिराचे नाव ’जय गणेश’ मंदिर ठेवण्यात आले आहे. मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. या जागी उभे राहून श्रध्देने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

रेडीचा  श्रीगणेश  मंदिर (सिंधुदुर्ग)

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रेडी बंदर किनार्‍याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मुर्ती दृष्टांत प्रकट झाली. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती व मूर्ती जांभ्या दगडाचीच होती. सुमारे सव्वा महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणपतीच्या त्या मुर्तीला प्लास्टरिंग व रंगरंगोटी करुन सजविण्यात आले. श्रीगणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी व सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस व श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचेच स्वरुप असते. जलमार्गातील बंदर म्हणून रेडी सर्वज्ञात आहे. या गावाची महती द्विभुज गणेशामुळे सातासमुद्रपार पोहोचली. रेडीत दोन ठिकाणी द्विभुज गणेश आहेत. एक समुद्रकिनारी आणि दुसरा यशवंत गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ! रेडी हे ठिकाण वेंगुल्र्यापासून ३० कि.मी. अंतरावर आहे.

दिवेआगर गणेश (रायगड)

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव आहे. निळाशार अथांग समुद्र , गर्द माडाची बने आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लपलेली ती सुंदर कौलारू घरे, निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभला आहे. येथील द्रौपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सुमारे १००० वर्षापूर्वीची सोन्याची १.३२ कि वजनाची सोन्याची मूर्ती सापडली होती. आजमितीस सोन्याच्या गणपतीचे दिवेआगर ही ओळख मुर्तीच्या चोरीमूळे मागे पडली असली तरी मूळ मंदिरास भेट देणार्‍या पर्यटकांत दिवेआगरचे महत्व कायम आहे. या निसर्गरम्य गावाला अरबी सागाराचा ५ किमि. चा अतिशय सुंदर, स्वच्छ आंणि सुरक्षित किनारा लाभला आहे. या किनार्‍यावर केवड्याची बने आहेत. या गावात एकुण पाच ताम्रपट व एक शिलालेख सापडला आहे. गावाचे प्रथम दैवत म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर महत्त्वाचे आहे. शिलाहारांचे ते दैवत होते असे संदर्भ सापडतात. येथे श्री गजाननाची पाषाणमूर्ती आहे. शेजारी अन्नपूर्णा देवीची पितळी मूर्ती आहे. मराठी भाषेतील अतिशय प्राचीन असा (भाषेच्या अगदी सुरूवातीच्या अवस्थेतला) ताम्रपट येथे सापडला. हा इ.स. १०६० मधील ताम्रपट असल्याने मराठी भाषेच्या दृष्टीनेही दिवेआगर हे महत्त्वाचे स्थान आहे. येथील सुपारी सर्वोत्तम सुपारी मानली जाते . येथे विविध प्रकाराची फुलझाडे आहेत. अनेक रंगांच्या जास्वंदीची फूले व पपनसाची फळे पहावयास मिळतात. श्रीवर्धनमार्गे पुणे ते दिवेआगर हे अंतर १७१ कि. मी. आहे, म्हसळामार्गे ते १५६ कि. मी. आहे.

नांदगाव सिध्दिविनायकाचे मंदिर   (रायगड)

अलिबागहून मुरुडकडं जाताना अवघ्या सात किलोमीटरवर नांदगाव सिध्दिविनायकाचे मंदिर आहे. मुरुड-जंजिरा तसंच श्रीवर्धन, हरिहरेश्वरला अलिबागहून जाणारा पर्यटक किंवा स्थानिकही या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. नारळी पोफळीच्या बागा आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमूना असलेल्या या मंदिरातील गणपतीचं दर्शन घेतलेल्या भाविक या मार्गावरून पुन्हा जाताना आपोआपच मंदिराकडं वळतो, असा अनुभव आहे. माघ शुद्ध चतुथीर्ला इथं सिद्धीविनायकाची मोठी यात्रा भरते. साळाव-मुरुड मार्गावर मुरुड गावाच्या आधी नांदगाव आहे. अलिबाग-मुरुड रस्त्यावर रेवदंडा गावापुढील असणार्‍या खाडीवरील पूल ओलांडल्यावर डावीकडे साळाव गाव आहे. या ठिकाणी संपूर्ण संगमरवरावर वापरून बांधलेले अतिशय सुंदर ‘बिर्ला गणेश’ मंदिर आहे. येथील गणपतीची मूर्ती देखील संगमरवरी असून त्याला विविध प्रकारचे दागदाि गने घातले आहेत. या मंदिराच्या परिसरात मोठा बगीचा देखील आहे.

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा ( ठाणे )

महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातलं टिटवाळा हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध आहे. कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. याच परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथेच वाढली. त्यामुळे या ठिकाणाला  प्राचीन महत्त्व आहे. टिटवाळा मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते. रेखीव चेहरा, पुढे आलेली सोंड यामुळे मूर्तीला एक ठसठसीतपणा आला आहे. सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील ह्या मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. मूर्तीला रोज नेटकेपणाने पितांबर नेसवला जातो. डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मुर्तीवर चांदीचेच छत्र आहे. इथे फुलांची सुरेख आरस केलेली असते. जेथे गणपतीची मूर्ती आहे तो संपूर्ण देवारा चांदीचा बारीक कलाकुसर केलेला आहे. चांदीच्या देवार्‍यात असलेली केशरी मूर्ती आणि हिरव्या दुर्वा, पांढरी मोगर्‍याची व जास्वंदाची फुले यामुळे सुरेख रंगसंगती साधली जाते आणि बघणार्‍याची नजर फिरवून ठेवते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून ते सभा मंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे सतत दर्शन आपल्याला होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दिपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. हा एकंदर परिसरच खूप रमणीय आहे.

वास्तविकत: भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही गणेश ही देवता ओळखली जाते. भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्म दिन होय. या देवतेस हिंदू धर्म शास्त्रात अग्रपूजेचा मान आहे. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे. अशा या गणेशाची कोकणातील काही स्थानांची भटकंती आपणाला नक्कीच आनंद देईल.

– धीरज वाटेकर

(कोकणातील अष्टविनायक,कोकणातील अष्टविनायक,कोकणातील अष्टविनायक)

Leave a Comment