औंढा किल्ला | Aundha Fort
अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगररांगेच्या पूर्वेला औंढा, पट्टा, आड आणि बितंगगड हे किल्ले वसले आहेत. या सर्व किल्ल्यांत भटकंतीचा थरार अनुभवायला लावणारा किल्ला म्हणजे औंढा किल्ला(Aundha Fort). नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेला हा किल्ला पट्टागडच्या मागील बाजुस आपला सुळका आभाळाला भिडवत दिमाखात उभा आहे. यातील पट्टागड नगर जिल्ह्यात तर औंढा किल्ला हा नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत येतो.
औंढा किल्ला मुंबईहुन घोटीमार्गे १८० कि..मी. पुण्याहुन सिन्नरमार्गे २०० कि.मी. तर नाशिक पासुन ४० कि.मी. अंतरावर आहे. गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. यातील पहिली वाट म्हणजे बरेच भटके औंढा-पट्टा असा ट्रेक करतात. यात पट्टा किल्ल्याच्या एका डोंगर सोंडेवरून उतरणारी वाट आपल्याला एक-दीड तासात औंढा किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जाते. यानंतरची दुसरी वाट औंढावाडी या किल्ल्याच्या तळात असलेल्या गावातून एक तासाचा चढ चढत वर येते. आणि हा सर्व वळसा व आपली दीड तासाची पायपीट वाचवणारी तिसरी वाट स्वतःचे वाहन असल्यास थेट किल्ल्याच्या पायथ्याशी येते. या वाटेने गडावर जाण्यासाठी घोटी- भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे.
टाकेद गावातून म्हैसमाळ घाटमार्गे कोकणवाडी फाटा ९ कि.मी.वर तर कोकणवाडी फाट्यापासून औंढा किल्ला(Aundha Fort) ९ कि.मी.वर आहे. येथे असलेल्या पवनचक्क्यामुळे या डोंगरावर कच्च्या रस्त्यांचे जाळे विणलेले आहे. पट्टागडच्या अलीकडील कोकणवाडीतुन हि वाट पट्टागडला वळसा घालत औंढा किल्ल्याच्या सुळक्या खालील पवनचक्कीकडे येते पण संपूर्ण किल्ला पाहायचा असल्यास तिथपर्यंत न जाता गाडी सुळक्याखालील पठाराच्या अलीकडे खिंडीत उभी करावी व तेथुन गड चढायला सुरवात करावी. खिंडीत एका झाडाखाली शेंदूर फासलेले दगड असुन खिंडीच्या उजव्या बाजुच्या उंचवट्यावर एक घुमटीसमोर वाघाची मुर्ती आहे तर खालच्या बाजूस असणाऱ्या पठारावर एक लहानसे मंदिर दिसुन येते. येथुन डाव्या बाजुच्या वाटेने वर पठाराकडे चढायला सुरवात केल्यावर दोन ठिकाणी आपल्याला खडकात खोदलेल्या १०-१२ पायऱ्या दिसुन येतात. हि वाट चढुन वर आल्यावर पठाराच्या सुरवातीलाच या माचीवर असलेला दरवाजा व त्या शेजारील बुरुज तसेच तटबंदीचे उध्वस्त अवशेष दिसुन येतात.
पठारावर गडाचे इतकेच अवशेष असुन इतर अवशेष या माचीवर असलेल्या दोन पवनचक्या व रस्ता बांधताना नष्ट झाले असावेत. पवनचक्कीसाठी इथवर रस्ता आल्याने गाडी इथपर्यंत येऊ शकते. लहानशी माची व सुळक्यावरील बालेकिल्ला असे या किल्ल्याचे स्वरूप आहे. येथुन समोरच सुळक्याखाली झेंड्यासाठी रोवलेला खांब दिसुन येतो. या खांबाच्या उजव्या बाजुने कडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत गेल्यावर सुळक्याच्या विरुध्द दिशेला वर सुळक्यावर जाण्यासाठी वाट आहे. सुळक्याच्या पायथ्याकडे जाणारी वाट थोडी अवघड असली तरी सुळक्यावर जाणारी वाट मात्र थरारक आहे. याशिवाय पठारावरील गाडी रस्त्याने सुळक्याच्या विरुध्द बाजुस येऊन तेथुन सुळक्याच्या पायथ्याशी येता येते पण हि वाट तीव्र उताराची तसेच मुरमाड व घसाऱ्याची आहे. गाडीपासून इथवर येण्यास एक तास लागतो. इथे सुळक्याच्या दिशेला जाणाऱ्या २०-२५ कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. यातील काही पायऱ्या कोसळलेल्या आहेत. या पायऱ्या चढुन वर आल्यावर आपण थेट सुळक्याला भिडतो.
येथे साधारण ४०-५० फुटाचा कातळटप्पा असुन येथे असलेल्या पायऱ्या इंग्रजांनी सुरुंग लावून तोडल्याचा स्पष्ट खुणा दिसुन येतात. येथुनच वर जाण्यासाठी थरारक चढाई सुरु होते. या कातळटप्प्यावर एक साखळी टांगलेली असुन या साखळीच्या आधारे कपारी व खोबण्यांचा आधार घेत वर चढावे लागते. हा टप्पा पार करून वर आल्यावर दुसरा तीस फुटाचा कातळटप्पा लागतो. या ठिकाणी खाचाखोबण्या नसल्याने साखळी धरून शरीराचा तोल सांभाळतच वर चढावे लागते. हा टप्पा चढुन वर आल्यावर आपला कड्यावरीळ उध्वस्त दरवाजातून थेट गडावर प्रवेश होतो. गडाचा हा दरवाजा पुर्वाभिमुख असुन समुद्रसपाटीपासून ४२७० फुट उंचीवर आहे. साधारण आयताकृती आकार असलेल्या या गडाचे क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमीं आहे. दरवाजाच्या अलीकडे एक ३x३ फुट आकाराचे तोंड असलेले भुयार असुन त्याच्या तोंडावर दगड पडल्याने आत शिरता येत नाही. या भागात थोडीफार तटबंदी असुन समोरच तीन गुहा दिसुन येतात. यातील एक गुहा ढासळलेली असुन दुसऱ्या गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे तर तिसऱ्या गुहेत मातीत बांधलेले लहानसे गोलाकार कुंड दिसुन येते पण त्याचा बोध मात्र होत नाही. या गुहांच्या वरील बाजूस काही ओबडधोबड कोरलेले शेंदुर फसलेले दगड दिसुन येतात.
सुळक्याच्या वरील बाजुस उध्वस्त तटबंदी असुन या तटबंदीच्या आत काही घरांची जोती आहेत. सुळक्यावर आपण आलेल्या माचीच्या दिशेला एक बुरुज असुन या बुरुजाच्या अलीकडे कातळात खोदलेली दोन भलीमोठी कोरडी टाकी आहेत. सुळक्यावर आपण प्रवेश केला त्याच्या विरुध्द दिशेला कातळात कोरलेला दरवाजा व ३०-४० पायऱ्या आहेत. या पायऱ्या म्हणजे गडावर येणारी एखादी जुनी उध्वस्त वाट असावी असे वाटते. या पायऱ्यांच्या शेवटी अजुन एक मोठ्ठे पण कोरडे जोडटाके आहे. या शिवाय गुहांच्या मागील बाजूस देखील खडकात खोदलेले पाण्याचे एक भलेमोठे टाके आहे. औंढा किल्ला म्हणजे सुळकाच असल्याने किल्ल्याचा माथा तसा लहानच आहे. किल्ल्याचा परिसर जरी कमी असला तरी येथे असलेली पाच मोठी टाकी व घराचे विखुरलेले अवशेष पहाता गडावर बऱ्यापैकी वस्ती असावी असे दिसते. गडाचा वापर मुख्यता टेहळणी करता होत असावा.
गडावरुन पट्टागड, बितंगगड, कळसूबाई, अलंग,मदन आणि कुलंग इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. गड पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. संत एकनाथ महाराजांच्या श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात अवंध व पट्टा किल्ल्य़ांच्या उल्लेख येतो. ते म्हणतात रावणाचा छेदिला आंगोठा तेथे झाला औंढापट्टा / त्रिंबकीच्या बिकटघाटा अवंढा-पट्टा प्रसिध्द !! चौदाव्या शतकात बहमनी साम्राज्यात असणारा हा किल्ला इ.स.१४९० मध्ये बहमणी साम्राज्याची शकले झाल्यावर निजामशाहीत आला. इ.स. १६२७ मधे मुगलांनी Aundha Fort किल्ला जिंकला. इ.स.१६७५ मध्ये मोरोपंत पिंगळ्यांनी नाशीक प्रांत काबीज करताना औंढा किल्ला स्वराज्यात आणला. इ.स.१६८८ पर्यंत हा किल्ला मराठ्यांकडे होता. यानंतर १६८८ ते ८९ या कालावधीत मोगलांनी हा किल्ला फितुरीने घेतला व येथे सरदार श्यामसिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. इ.स १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.