महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,255

धर्मवेडा औरंगजेब

Views: 1520
11 Min Read

धर्मवेडा औरंगजेब –

“The Great Mogol is a foreigner in Hindoustan. To maintain himself in such a country he is under the necessity of keeping up numerous armies, even in the time of peace.”(धर्मवेडा औरंगजेब)

“मोगोल हा हिंदुस्थानातील परदेशी आहे. अशा देशात स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अनेक सैन्ये ठेवण्याची गरज आहे, अगदी शांततेच्या काळातही.”

– Francois Bernier

नुकतेच एका नेत्याने “औरंगजेब या मातीतले नाहीत काय?” असा सवाल प्रसारमध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला. मला त्यांच्यावर व्यक्तिशः त्यांच्यावर कोणतीही टीका करायची नाही. परंतु आपल्या समाजात औरंगजेबाबद्दल किती गैरसमज – अज्ञान हे थोड्या फार प्रमाणात दूर करण्यासाठी हा लेखप्रपंच. सदर लेखात समकालीन पुरावे व नोंदी दिलेल्या आहेत जेणेकरून जिज्ञासू व सामान्य वाचक अभ्यासकांना दिलेली माहिती ही खरी आहे की नाही हे पडताळून पाहता येईल.

औरंगजेबाकडे वळण्यापूर्वी आपण मुघलांनी कसा हिंदुस्थानात हैदोस घातलेला हे जाणून घेऊ.

१) १३९८-९९च्या सुमारास तैमुरलंगाने महंमूदशहा तुघ्लकचा पराभव केला. यात त्याला दिल्ली शहर व प्रांत मिळाला. पुढील पाच दिवस दिल्ली परिसरात तैमुरच्या आदेशावरून लूट सुरू होती व या दरम्यान ज्यांनी विरोध केला त्यांचे फक्त प्रेत राहिले. संपूर्ण दिल्लीच्या रस्त्यावर प्रेतांच्या राशी लागल्या. पुढे तो हिरद्वारला गेला. गोमुखातून गंगा पडते हे ऐकून त्याच पित्त खवळले आणि लक्षावधी लोकांना त्याने कंठस्नान घातले. या वेळी त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली की, ‘दोन कामांसाठी मी येथे आलो. एक म्हणजे काफर लोकांना लुटून परलोकसाधन करावे व दुसरे म्हणजे त्यांची संपत्ती लुटून इहलोक साधावा’ (मुसल. रिया भा. १ पृ १७७-७८).

२) बाबराने सरहिंद नजीक असलेल्या समाना गावाच्या मोहन मुनधार या विरूद्ध जवळ पास ६३०० सैनिक, घोडे, हत्ती पाठवले. या मध्ये १००० पुरूष, स्त्रीया, व मुले कैद झाली व त्या सर्वांच्या मुंडक्यांचे मिनार रचन्यात आले. (बाबरनामा पृ. ७००-०१).

३) अकबराने १५६८ मध्ये चितोडचा किल्ला काबीज केला. किल्ल्यात आठ हजार लढवय्ये राजपूत होते आणि चाळीस हजारांपेक्षा जास्त शेतकरी होते. अकबराचा दरबारी इतिहासकार अबूल फझ्ल सांगतो की विजय झाल्यावर रयतेच्या सबबींचा काही उपयोग झाला नाही, ‘कत्ले आम’चा हुकूम झाला आणि जवळपास तीस हजार माणसे त्या सार्वत्रीक कत्तलीत मारली गेली. यामुळे अकबराला गाझीपद (धर्मयोद्धे) प्राप्त झाले (छ. शिवाजी महाराज झाले नसते तर पृ २०, The religious policy of the Mughal Emp. Pg.16).

४) शाहजहान ने आपल्या कारकिर्दीमध्ये जुन्या मंदिरांचे जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माण बंद करण्यात आले. गुजरात सुभ्यातील ३, बनासर मधील ७२, अल्ल्हाबाद परिसरातील ४ मंदिरे तर काश्मिर मधील काही मंदिर पाडण्यात आली. तर त्याच्याच काळात पटीर मंडी या प्रवास्याने नोंदवून ठेवले आहे की, ८० किलोमीटर्स अंतरात दोनशेहून अधिक मुंडक्यांचे मिनार पाहिले आहेत. प्रत्येक मिनार साधारण दहाबारा फूट उंच, बुरुजासारखा वाटोळा आणि त्याच्याबाहेर केलेल्या कोनाड्यांमध्ये मुंडकी लावलेली, प्रत्येक मिनारात तीस ते चाळीस मुंडकी. या हिशोबाने आठ हजार मुंडकी होतात (The religious policy of the Mughal Emp. Pg. 103, छ. शिवाजी महाराज झाले नसते तर पृ२०-२१). आता औरंगजेबचे उल्लेख पाहू. औरंगजेब हा सुन्नी पंथाचा होता. अकबरासारखा उदारमतवादी अजिबात नव्हता. तो धर्माभिमानी आणि धर्मवेडा होता.धर्माचे राजकीय वर्चस्व काफीरांवर असले पाहिजे हे त्याचे मुख्य ध्येय. पीर, फकीर यांचा सहवास त्याला आवडे. औरंगजेबाने दारा शिकोहचे शीराची विटंबना केली ही गोष्ट आता प्रसिद्ध आहे.

या शिवाय २८/०३/१६८३ रोजी संभाजी महाराजांचा सरदार नारोजी आणि त्याच्या सोबतच्या १०० मराठ्यांच्या मुंडकी कापून त्याचा मीनार उभारण्यात आला. तर ११/०१/१७०० रोजी रहिमतपूर येथे मराठा सैनिकांच्या डोक्यांचा मनोरा रचन्याच आला. लेखणीच्या एका फटक्यात अनेक हिंदू कारकूनांना, सैनिकांना काढून टाकल्याचे ही उल्लेख उपलब्ध आहेत. या शिवाय औरंगजेबाचे गुजरातच्या सुभेदाराला लिहिलेले पत्र प्रसिध्द आहे ज्यात तो लिहितो की, ‘या वेळी मी जिहाद करीत आहे आणि दुष्ट काफरांचा नायनाट करण्याकरिता अखंड परिश्रम करीत आहे..धर्माचा अभिमान असणाऱ्या प्रत्येक मुसलमानाने यावेळी जिहादीत गुंतलेल्या इस्लामच्या बादशहाला मदत केली पाहिजे.’ त्यामुळे त्याचे धर्मवेड उत्तरकाळात ही किती प्रचंड होते याची जाणीव होते. त्याने केलेल्या मंदिरांचे विध्वंस, मूर्तिभंजन, गावाची नामांतरे याबद्दल आपण जाणून घेऊ.

मंदिरांचे विध्वंस – यातील उल्लेख हे औरंगजेबाच्या बातमीपत्रातले (अखबारातील) आहे. यातील उल्लेखलेला विध्वंस हा औरंगजेबाच्या आदेशाने असून त्याची अंमलबजावणी तात्काळ होत असे. यातील महत्त्वाच्या नोंदी आपण पाहू.

१) १३ ऑक्टोबर १६६६- मथुरेत केशवरायाच्या देवळात दारा शिकोह याने एक दगडी कठडा बांधला आहे. बादशहाने ते ऐकून हुकूम दिला की, मुसलमानी धर्मात देऊळ बघणेसुद्धा निषिद्ध मानले आहे. या बेशिकोहाने (दारा शिकोहने) तेथे कठडा उभा केला आहे. ही गोष्ट मुसलमानास योग्य नाही. या कारणास्तव तो कठडा काढला पाहिजे. अब्दुन्नबीखानास हुकूम झाला की, तू जाऊन त्या देवळातील तो कठडा तेथून काढून टाक. त्यानंतर अब्दुन्नबीखानाने तो कठडा पाडून टाकला. (ऐत. फा. खं ६ ले. ३१)

२) १२ सप्टेंबर १६६७ आणि २६ सप्टे. १६६७- सीदी फौलादखानाने अर्ज केला की, हुकुमाप्रमाणे बेलदार लोक कालिकेचे देऊळ पाडण्यासाठी गेले व त्यांनी ते नष्ट देखिल केले. तेव्हा एका ब्राह्मणाने तलवार उपसली व तेथे उभा असलेल्या एका बघ्यास ठार केले व फौलाद खानावर हल्ला केला त्यात त्याला अटक केली. हिंदू व मुसलमान लोक शीतला देवीची व पीर पाबूचा जपजाप्य करण्यासाठी जात व एकत्र जमतात. हिंदू लोकांनी जावे पण एकत्र जमू नये. तसेच देवी पूजा होते ती थांबवावी. (ऐत. फा. खं ६ ले. ९२, ९४)

३) ८ व ९ एप्रिल १६६९- बादशहा इस्लाम सर्वत्र स्थापन करण्यासाठी उत्सुक आहे. सर्व प्रांतांच्या अधिकाऱ्यांना त्याने काफरांच्या शाळआ आणि मंदिरे पाडून टाकण्याचा आदेश दिला आहे व हे काम जल्दगतीने झाले पाहिजे. या अश्रद्ध लोकांची धर्माची शिकवण आणि सार्वजनिक आचरणे बंद केली पाहिजेत. बादशहाच्या हुकूमावरून काशी विश्वेश्वराचे देऊळ पाडून टाकण्यात आले. ( Maasir-I-Alamgiri pg 52,55)

४) २३ डिसें. १६७९ व २२ फेब. १६८०- काल यक्काताजखान व हिरा गवंडी यांनी राणाच्या तलवावरी देवळांचे नकाशे बादशाही नजरेखालून घातले व अर्ज केला की, ‘पाच कोसांवर दुसरा तलाव आहे’. हुकूम झाला की तेथील देवळे पाडावी……चित्तूर येथे ६३ देवळे पाडून टाकण्यात आली. (ऐत. फा. खं ६ ले. १३७, Maasir-I-Alamgiri pg 117)

५) १ जून १६८१- असदखानास हुकूम झाला की, ओढियांतील (ओरिसा) जगन्नाथाचे देऊळ पाडून टाकण्याबद्दल बंगालचा सुभेदार अमीरूलउमरा यास हुकूम लिहावा.

६) २९ जानेवारी १६८०- हसन अली खानाने राणाच्या वाड्यातून तंबू व इतर सामानाचे वीस उंटगाडे आणले व कळवले कीउदयपूरच्या जवळपासची १७२ मंदिरे पाडून टाकली गेली आहेत. खानाला बहादुर आलमगीरशाही ही उपाधी मिळाली.

७) १३ सप्टेंबर १६८२- बनारस येथील दिवाण रफीउलअमीन याच्या लिहिल्यावरून समजले की, ‘बिंदु महादेवाचे देऊळ पाडून टाकले. मशिदीच्या उभारण्याबाबत हुकूम व्हावा.’ हुकूम झाला की, उभारावी. (ऐत. फा. खं ६ ले.३०६)

८) २ जानेवारी १७०५- बादशहाचा मुक्काम पंढरपूर येथे. कालरात्री ख्वाजा मुहंमद शहामुहतसिब (नेतिक आचरणावर देखरेख ठेवणारा अधिकारी) याने बादशहाना पुढीलप्रमाणे विनंती करून कळविले–“मौजे पंढरपूर येथे एक देऊळ आहे. (दर मौजे पंढरपूर बुत्‌खाना हस्त. )” लष्करातील हिंदू माणसे तेथे गर्दी, यात्रा व पूजा करीत आहेत. (मर्दुमे हुनूदाने लष्कर मालूम हुजूम व बुतपरस्ती मी नुमायद) त्याप्रमाणे बादशहाने मुहंमद खलील व खिदमतराय, बेलदारांचा दारोगा मुहंमद अमीन यांना हुजुरात बोलाविले. (चुनांचे मुहंमद खलील, खिदमतराय दारोगा बेलदारान्‌, मुहंमद अमानशझु बहुजू तलबिदा) बादशहने आज्ञा केली की, देऊळ जमीनदोस्त (नष्ट) करावे, (फर्मूदंद के बुत्‌खानारा निस्‌मार नुमायंद) आणि लष्करातील कसाबानी देवळात जावे व गाई कापाव्या (व कसाबाने लष्करा दर बुतखाना बरवद. गावानृहलाल बकुनानद.) तरबियत खान बहादुरचा मुलगा मुहंमद इसहाक याने तेथे (देवळात) जाऊन गर्दी (यात्रा) पांगवावी. (मुहंमद इसहाक पिसरे तरबियतखान बहादुर रफ्ता हुजूम (गर्दी, यात्रा दूर नुमायद.) त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली. (चुनांचे अमलूआमद्‌) (मोग. दरबारची बात. खं३)

लोकांचे धर्मांतर- कोणही स्वतःहून आपला धर्म बदलला याची उदाहरणे क्वचित आहे. जबरदस्तीने, प्राणांच्या भितीने, दहशतीने धर्मांतर झाल्याचे किंवा केल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासाच्या पानातून ठिकठिकाणी दिसतात. उदाहारण खातर काही उल्लेख खाली देत आहे.

१) १९ सप्टेंबर १६६६- जगजीवन याने अर्ज केला की : ‘ह्या चाकराकडे सरकारांतून घेतलेले ५०० रुपये कर्ज आहे’. म्हणून मुसलमान होतो. हुकूम झाला की, सरकारातून ५०० रुपये द्यावे व मुसलमान करावे. (ऐत. फा. खं ६ ले.२३)

२) २२ एप्रिल १६६७- मकरंद वगैरे चार लोक मुसलमान झाले. परगणे खोहरी येथील कानूनगोई त्यांना दिली. चार खिलत दिल्या.(कित्ता ले.५०)

३) १७ व १६ मे १६६७- विजयसिंग व तिमराज मुसलमान झाले. त्यांना पोशाख दिला.

दूरगंज येथील वकील रुस्तुम मलन खंजर गंगाराम हा मुसलमान झाला आणि त्याला पोशाख दिला. (कित्ता ५७, ५८)

४) १७, २६ व २७ सप्टेंबर १६६७ – केवलराम हा शरीअत पन्हाच्या मध्यस्थीने मुसलमान झाला. एक अश्रफी व नऊ रुपये नजर केले. त्याच्यावर पूर्ण कृपा होऊन त्यास सरोपा व ‘कमालुद्दीन’ पदवी देऊन बहुमान करण्यात आला.

पंजराय खत्री मुसलमान झाला. त्यास खिलअत दिला.

परशराम वगैरे पाच हिंदू मुसलमान झाले. त्यांना पाच खिलअत दिले (कित्ता ले ९३, ९५, ९६)

५) १४ ऑगस्ट १६८०- दरबारखानास हुकूम झाला की, यावल येथील कैद्यांपैकी बायका व मुले यांना स्वतःच्या देखरेखीत ठेवून ३५ पुरुषांना इहतशामखानाच्या हवाली करावे. त्याने त्यांना मुसलमान करून नमाज शिकवावा. हुकूमावरून कोतवालाने त्यांना मुसलमान केले. (कित्ता ले.१६१)

६) ७ एप्रिल १६८५- जुम्दतुल्मुल्कास फर्मावले की, विविध प्रदेशांतील फौजदारांना व दिवाणांना हस्बुल्हुकूम लिहावा की, जे हिंदू लोक मुसलमान होत आहेत त्यातील प्रत्येक पुरुषास चार रुपये व प्रत्येक स्त्रीस दोन रुपये तेथील खजिन्यातून बक्षिस दिले आहेत. ते लोक खरोखर धर्मभावनेने आपणपृहून मुसलमान होतील तर यापुढे त्यांना पैसे देणे थांबवावे. (कित्ता ले.५९७)

या व्यतिरिक्त छोटे उल्लेख जरी पकडले तरी ही यादी खूप मोठी होईल. हे काही निवडक व ठळक उल्लेख आहेत. गावांची, किल्ल्यांची बदललेली नावे याचा उल्लेख तूर्त टाळला आहे येथे. औरंगजेबाने विध्वंसलेले मंदिरे आपल्याला पुन्हा मिळतील अशातला भाग नाही पण त्याकडे डोळसपणे दुर्लक्ष करणे हे मुर्खपणाचे लक्षण ठरेल. या राजवटीतल बादशहांनी केलेले अत्याचार विसरणे म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू काय हे विसरण्या सारखे आहे, जे की मोठे पाप आहे. बहुत काय लिहणे? तरी आपण सुज्ञ असा.

संदर्भ :-
छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर, गजानन भास्कर मेहेंदळे
ऐतिहासिक फार्सी साहित्य सहावा खंड, डॉ. ग. ह. खरे
शककर्ते शिवराय, विजयराव देशमुख
मोगल दरबारची बातमीपत्रे खं १ व २, सेतूमाधवराव पगडी
The religious policy of the Mughal Emperors, S. R. Sharma
मुसलमानी रियासत भा. १, गोविंद सखाराम सरदेसाई
Maasir-I-Alamgiri, Jadunath Sarkar

– प्रथमेश खामकर

Leave a Comment