महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,07,229

महापूराने औरंगजेबाची उडवली होती दैना

Views: 3439
5 Min Read

महापूराने औरंगजेबाची उडवली होती दैना – १ ऑक्टोंबर १७००

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सांगली आणि कोल्हापूर जिह्यात आलेल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या महापूराचा फटका मुघलसम्राट औरंगजेबालाही बसला होता. महापूराने औरंगजेबाची उडवली होती दैना. महापूरात त्याची तीन हजार सोन्याची नाणी, शेकडो सैनिक, हत्ती, उंट, घोडे वाहून गेले. माण नदीच्या पूरात तर त्याचा पाय मोडला आणि त्याला कायमचे अपंगत्त्व आले. महापूराने औरंगजेबाची कशी दैना उडविली, याची माहिती देणारी तत्कालीन कागदपत्रे उपलब्ध आहेत.

दक्षिण महाराष्ट्रात पंधरवडय़ापूर्वी आलेल्या महापूराने रंकापासून रावापर्यंत सर्वांचीच दैना उडविली. अभूतपूर्व असे नुकसान या महापूराने केले. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी याच दक्षिण महाराष्ट्रात आलेल्या महापूराने मुघलसम्राट औरंगजेबाचीही दैना उडविली होती. त्यावेळी कृष्णा, वारणा आणि माण नद्याला आलेल्या महापूरात औरंगजेबाच्या सैन्याची कशी धुळदाण उडाली, याच्या नोंदी तत्कालीन मुघल अखबारात आणि प्रत्यक्ष महापूर अनुभवलेला तत्कालीन लेखक साकी मुस्तैदखान, खाफिखान यांनी लिहून ठेवलेल्या वर्णनात केल्या आहेत. प्रसिध्द इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी या अखबारांचे भाषांतर करुन ठेवले आहे.

माण नदीच्या पूरात औरंगजेबाला अपंगत्त्व

सन१७०० च्या एप्रिल महिन्यात सातारा किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेब मिरजेकडे येण्यास निघाला. _तो भूषणगड, कलेढोण, झरे, आटपाडी मार्गे १२सप्टेंबर रोजी खवासपूरला पोहचला._ त्यावेळी १ ऑक्टोंबर १७०० रोजी माण नदीला अचानक पूर येऊन औरंगजेबाच्या छावण्या वाहून गेल्या. यामध्ये शेकडो सैनिक, उंट, हत्ती वाहून गेले. मुघल लष्कराची मोठी हानी या पूरात झाली.* यावेळी छावणीत हजर असलेल्या साकी मुस्तैदखान याने माण नदीला आलेल्या या भयंकर पूराचे वर्णन करुन ठेवले आहे. या पूरात पाण्यात बुडण्यापासून जीव वाचवताना औरंगजेबाचा पाय मोडला. त्याला कायमचे अपंगत्त्व आले.* माण नदीच्या महापूराने औरंगजेबाला चांगलीच अद्दल घडविली.

वारणेच्या महापूराने मुघल सैन्याची दैना

पुढे सन १७०२च्या जून महिन्यात विशाळगड जिंकल्यानंतर औरंगजेब मिरज-कराडकडे येण्यास निघाला. त्यावेळी मलकापूर, वडगांव मार्गे तो येण्यास निघाला. त्यावेळी प्रचंड पाऊस पडत होता. मार्गातील लहान-मोठे नाले, ओढे, दुथडी भरुन वाहत होते. वडगांव जवळ वारणा नदीला पूर आला. एक जुलै ते चार जुलै १७०२ या काळात नद्यांना मोठा पूर आला. त्यावेळी औरंगजेब आणि त्याचे सैनिक यांची जी दैना उडाली त्याचे वर्णन साकी मुस्तैदखान याने करुन ठेवले आहे. तो म्हणतो त्या भयंकर पावसाचे मी कसे वर्णन करु. दहा-दहा आणि वीस-वीस पावसाचा वर्षाव होत असे. कुणाला डोळे उघडण्याची अगर डोके वर काढण्याची सोय नव्हती. सामान वाहून नेणाऱया जनावरांची स्थिती काय वर्णावी. ज्यांना बुडून मरावयाचे होते, ते मेले. ज्यांच्या नशिबात वाचणे होते ते वाचले. पावसाचा वर्षाव तर निराधार सैनिकांच्या जीवाला त्रस्त करुन सोडत होता. थंड आणि झोंबणारे वारे माणसे आणि जनावरांचे प्राण हरण करीत होते. याच पूरात औरंगजेबाचा खजिना नदीपार होताना तीन हजार सोन्याची नाणी वाहून गेली. ही नाणी शोधण्यासाठी पुढे काही दिवस त्याने पगारी सैनिक नेमले हेते.

महापूरात वाहून गेले औरंगजेबाचे तंबू

या महापूरात औरंगजेब बादशहाचे सर्व तंबू भिजून वाहून गेले. त्यामुळे एका छोटय़ाशा तंबूत त्याला मुक्काम करावा लागला. यावेळी _वारणा नदी आणि वाटेत आलेल्या ओढय़ांना आलेल्या पूराचे वर्णन करताना मुस्तैदखान याने म्हटले आहे की, ती काय नदी होती! छे प्रलयकाळचे तुफानच ते. नदीची प्रत्येक लाट म्हणजे प्राण संकटच. एकेका नावेत माणसे तरी किती भरावीत. एक शवपेटीका आणि त्यात हजार मुडदे अशी त्याची स्थिती होती.

महापूर म्हणजे परमेश्वरी कोप

मुघल इतिहासकार खाफिखान यानेही तत्कालीन पूराचे वर्णन केले आहे. तो म्हणतो लोकांचे जे हाल झाले, ते मी कसे लिहू. घोडय़ांची निकामी झालेली शिखरे आणि मेलेल्या माणसांचे सामान पेटवून लोक थंडीचे निवारण करु लागले. ओढय़ाच्या काठावर पावला-पावलावर माणसे आणि जनावरे मरुन पडली होती. त्याची इतकी दुर्गंधी सुटली होती की, जीवंत माणसांना जीव नकोसा झाला.

यानंतर १७०२ च्या सप्टेंबर महिन्यात औरंगजेबाचे सैन्य मिरजेजवळ कृष्णानदी ओलांडत होते. त्याचे वर्णन करताना खाफिखान म्हणतो, नदी पोहून जाताना किंवा नावा बुडाल्यामुळे, किंवा लाटांच्या माऱ्यामुळे किती माणसे त्या नरभक्षक नदीला बळी पडली, याची मोजदाद करण्याची बुध्दी आणि हिंमत कोणात आहे! परमेश्वराचा कोप झाला तर पापी लोकांना शिक्षा देण्यासाठी तो असा दर्याच्या रुपाने वाहू लागतो. त्याच्या कोपाला तुफानी वादळाची जोड मिळते. स्वार्थी अप्पलपोटे आणि परमेश्वराकडे लक्ष न देणारे पापी यांना दैवाने त्या प्रदेशात ओढून नेले आणि त्यांची वित्त, अबू यांची भयंकर हानी केल्याशिवाय त्यांना बाहेर काढले नाही. असा निष्कर्ष या महापूरात बुडालेल्या औरंगजेबाच्या सैन्याविषयी खाफिखान याने काढला आहे.

तत्कालीन कागदपत्रे आणि इतिहास लेखकांनी लिहिलेल्या या वर्णनावरुन तीनशे वर्षांपूर्वी कृष्णा, वारणा आणि माण नदीला आलेल्या महापूराने औरंगजेब आणि त्याच्या सैन्याची कशी दैना उडविली, याचे इत्यंभूत वर्णन समजते. या महापूराने स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला चांगलीच अद्दल घडविली. या महापूरांनी त्याला कायमचे अपंगत्व बहाल केले. महापूरामुळे आलेल्या  अपंगत्त्वाच्या या खूणा बाळगत औरंगजेबाने आयुष्याची अखेर दक्षिणेतच घालविली. …महापूराने औरंगजेबाची उडवली होती दैना.

कृष्णा- वारणेच्या पुरांनी मुघलांना घडवली अद्दल, महापूरात औरंगजेबाला अपंगत्त्व, सैन्य, हत्ती-उंट वाहून गेले,

तीनशे वर्षापूर्वीच्या कागदपत्रात नोंदी.

पुढे औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रातच अहमदनगर येथे स.१७०७ मधे झाला. औरंगजेबाची  कबर औरंगाबाद जवळ  खुलताबाद येथे आहे.

लेखन –  डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment