महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,830

औरंगजेब आणि हिंदू देवळे भाग २

Views: 1385
5 Min Read

औरंगजेब आणि हिंदू देवळे भाग २ : अफवा आणि वास्तव –

ही सनद औरंगजेबाने १६ जमादी-उस-सानी, १०६९ हिजरी म्हणजेच २८ फेब्रुवारी १६५९ रोजी दिली आहे. या वेळी औरंगजेब अजून मुघल सिंहासनावर बादशहा म्हणून स्थापित झालेला नव्हता. त्याचे आपल्या  भावांबरोबर मुघल सिंहासनासाठीचे युद्ध सुरु होते. खजुआची लढाई झाली होती. त्याचा भाऊ शुजा हा त्याच्याकडून पराभूत होऊन बंगालला पळून गेला होता, परंतु अद्याप जिवंत होता. दाराशुकोह गुजरात मध्ये होता आणि तो औरंगजेबाच्या विरुद्ध लढण्यासाठी नवे सैन्य गोळा करत होता. राजपूत राजे कोणाच्या बाजूला जातील याचा अंदाज औरंगजेबाला नव्हता, त्यामुळे तो त्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी गोड गोड भाषेत पत्र लिहीत होता. एकंदरीत वरील दोन उदाहरणांमध्ये (मुहम्मद पैगंबर आणि सुलतान इल्तुतमिश ) वर्णन केलेल्या  परिस्थिती सारख्याच परिस्थिती मधून औरंगजेब त्यावेळी जात होता. त्यामुळे त्याला खोटे का होईना, परंतु आपण हिंदूंचे विरोधक नाही असे भासवून राजपूत वगैरे हिंदू सरदारांना आपल्या बाजूला वळवणे भाग होते. परंतु हे करताना सुद्धा तो एकच पाऊल मागे येतो हे लक्षात ठेवायला हवे !(औरंगजेब आणि हिंदू देवळे भाग २)

तो या सनदे मध्ये काय म्हणतो ते काळजीपूर्वक पहा :- ” हिंदूंची जुनी देवळे पाडू नयेत आणि त्यांना नवीन बांधू देऊ नयेत” म्हणजे येथे देखील त्याने कोणत्याही हिंदू देवळाला इनाम दिलेले नाही, किंवा नवीन हिंदू देऊळ बांधलेले नाही !

फक्त ‘तूर्त’ हिंदूंची जुनी देवळे पाडू नयेत असे सांगितले आहे, आणि त्याचे कारण हिंदूंबद्दलची सहिष्णुता नसून , त्याकाळची राजकीय परिस्थिती आहे. पुढील काळात औरंगजेबाचा हा हिंदूंबद्दलचा तात्कालिक पुळका  अचानक नाहीसा झाला (तो होणारच होता , कारण खोटाच होता तो ! ) आणि त्याने हिंदूंची जुनी  आणि पवित्र देवालये पाडली ! त्या बद्दलच्या समकालीन मुघल साधनांमधील नोंदी पुढील प्रमाणे :-

काशी विश्वनाथ ( सप्टेंबर १६६९ मआसिर ए आलमगिरी )

बादशहाच्या आज्ञेनुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी काशी विश्वनाथाचे देऊळ पाडले .

केशवराय मथुरा (जानेवारी १६७० मआसिर ए आलमगिरी)

रमझान महिन्यात, न्यायाचा पुरस्कार करणारा, पुंडावे उलथवून टाकणारा , सत्याचा जाणकार , विरोधकांवर विजय मिळवणारा आणि मुहम्मदाच्या कायद्याचे पुनरुत्थान करणारा असा बादशहा औरंगजेब याने ‘केशवराय  का डेरा ‘ या नावाने प्रसिद्ध असलेले मथुरा येथील देऊळ पाडून टाकायच्या आज्ञा त्याच्या अधिकाऱ्याना दिल्या. त्यानुसार थोड्याच वेळात काफिरांच्या धर्माचे (हिंदू धर्माचे ) हे प्रमुख बलस्थान जमीनदोस्त करण्यात आले आणि त्या जागेवर बराच खर्च करून एक मोठी मशीद बांधण्यात आली.  ”

पंढरपूर, महाराष्ट्र  ( २ जानेवारी १७०५, मुघल दरबारचे अखबार, संपादक सेतू माधवराव पगडी  )

बादशहाचा मुक्काम पंढरपूर येथे . काल रात्री ख्वाजा मुहंमद शहामुहतसिब याने बादशाहांना पुढीलप्रमाणे विनंती करून कळविले :-

” मौजे पंढरपूर येथे एक देऊळ आहे.  लष्करातील हिंदू माणसे  तेथे गर्दी , यात्रा व पूजा  करत आहेत. त्याप्रमाणे बादशहाने मुहंमद खलील व खिदमतराय , बेलदारांचा दारोगा मुहंमद अमीन यांना हुजुरात बोलाविले. बादशहाने आज्ञा केली की, देऊळ जमीनदोस्त करावे आणि लष्करातील कसाबांनी देवळात जावे व गाई  कापाव्या. तरबियत खान बहादूरचा मुलगा मुहंमद इसहाक याने तेथे (देवळात) जाऊन गर्दी (यात्रा) पांगवावी त्या प्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली. ”

सोरटी सोमनाथ ( इ.स. १७०२ मुघल दरबारचे अखबार, संपादक सेतू माधवराव पगडी  )

“सोमनाथाचे मंदिर  सोरठ सरकारात समुद्रात किंवा समुद्राच्या काठावर आहे, आमच्या राज्यकारभाराच्या सुरुवातीस ते उध्वस्त झाले व मूर्तिपूजा होत नव्हती, सध्या काय परिस्थिती आहे माहीत नाही. जर मूर्तिपूजक ( हिंदू ) तेथे पुन्हा पूजा करण्यात मग्न असले तर त्या मंदिराचा हार प्रकारे विध्वंस करावा . त्या इमारतीची नांवनिशाणी राहू नये . त्यांना ( मुर्तीपुजकांना ) तेथून हाकलून लावावे”

द्वारका   ( इ.स. १७०२ मुघल दरबारचे अखबार, संपादक सेतू माधवराव पगडी  )

गुजरातचा सुभेदार शहाजादा आज्जम याला बादशहाचा चिटणीस इनायतुल्ला याचे पत्र :-

“असे म्हणतात की सोरठमध्ये आणखी एक मोठे मंदिर आहे. ते उध्वस्त करण्यासंबंधी आपल्याला लिहिण्याची मला आज्ञा झाली आहे.”

औरंगजेबाने पाडलेल्या अशा शेकडो मंदिरांची उदाहरणे समकालीन पुराव्यासकट श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या आगामी पुस्तकात येणारच आहे , परंतु तूर्तास वरील उदाहरणावरून औरंगजेब कसा होता ? आणि त्याचे हिंदू देवळांबद्दलचे विचार आणि कृती कशी होती हे वाचकांना समजेल.

बहुत काय लिहिणे , आपण सुज्ञ असा !

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लेखन सीमा

संदर्भ :-

१) ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ संपादक श्री ग.ह.खरे
२)  Journal and proceedings of the asiatic society of bengal, new series , vol 7 year  1911(https://www.biodiversitylibrary.org/…/mobot317530021838…)
३) मआसिर ए आलमगिरी , साकी मुस्तैदखान
४) मोगल दरबारची बातमीपत्रे , सेतू माधवराव पगडी
५) Muslim slave system in medieval India, K.S Lal
६) The Contradictory teachings of the Quran, Ali Sina (https://myislam.dk/…/sina%20the-contradictory-teachings…)

चित्रे :-

१) केशवरायाच्या देवळा संबंधीचा  अखबार
२) १६ जमादी-उस-सानी, १०६९ हिजरी म्हणजेच २८ फेब्रुवारी १६५९ रोजी दिलेले मूळ बनारस फर्मान/सनद
३) मुघल बादशहा औरंगजेब

लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर

Leave a Comment