महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,787

आणि औरंगजेबचे पाय घसरले!

By Discover Maharashtra Views: 1809 3 Min Read

“युगपतीचे” पाय घसरले! …आणि औरंगजेबचे पाय घसरले!

छत्रपती संभाजी महाराजांची निघृण हत्या केल्यानंतर, औरंगजेब एकदम निश्चिन्त झाला होता, पण मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याची आग धगधगत ठेवली. पुढे २ मार्च १७०० मध्ये छत्रपती राजाराम महाराज, गेल्या १०-१२ वर्षात झालेल्या सततच्या धावपळीने आणि दगदगीने फार लवकर हा इहलोक सोडून गेले. आता तर औरंगजेबाला पक्की खात्री होती की ‘हिंदवी स्वराज्य‘ आपण संपवलंच. पण मराठ्यांनी आपली चिकाटी सोडली नाही. १५०-१५० वर्ष राज्य करणाऱ्या आदिलशाहीने आणि कुत्बशाहीने दोन वर्षातच आपली नांगी टाकली पण मराठ्यांनी इतके आघात होऊनसुद्धा आपली शस्त्र खाली ठेवली नाहीत. मुघल सैन्याची आणि सरदारांची ठिकठिकाणी मराठ्यांनी वाताहत केली. याच वेळी मराठ्यांच्या साथीने महाराष्ट्रातल्या निसर्गानेही मुघल सैन्यावर वचपा काढला. याबद्दल एक गमतीशीर प्रसंग खाफीखान सांगतो.

१ ऑक्टोबर १७०० मध्ये पावसाळा संपत आला होता तेव्हा खवासपूरच्या जवळ मुघलांनी छावणी केली होती. तिथे असलेल्या एका ओढ्याच्या कोरड्या पात्रात आणि त्याच्या बाजूला मुघलांनी त्यांच्या छावण्या थाटल्या. रात्री झोपाझोप झाल्यावर ओढ्याजवळच्या डोंगरात इतका पाऊस झाला की ओढ्याला पूर आला. सगळ्या तंबूंमध्ये पाणीच पाणी साठलं. खाफीखान म्हणतो ‘कयामतच्या दिवशी’ म्हणजे जजमेंट डे च्या दिवशी माणसं जशी उठतात तशी या छावणीतली माणसं उठली. छावणीत एकच सावळा गोंधळ उडाला. रात्रीच्या अंधारात जो आरडा ओरडा झाला त्यामुळे वातावरण कंपायमान झाले.

यावेळी औरंगजेब ‘शौचालयात’ होता. हा आरडा ओरडा ऐकून औरंगजेबाला वाटलं की मराठ्यांनी लष्करावर अचानक छापा घातल्यामुळे छावणीत आरडाओरडा सुरु आहे. म्हणून तो घाईघाईने उठून निघाला. यापुढे खाफीखानाने एकदम मजेशीर शब्दरचना केली आहे. तो म्हणतो “तो (म्हणजे औरंगजेब) घाईघाईने उठून येऊ लागला. त्या गडबडीत त्या ‘युगपतीचे पाय घसरले’ आणि त्याच्या पायाला भयंकर मार बसला. तो पाय कधीच बरा झाला नाही”. अर्थातच पुढे मरेपर्यंत औरंगजेब लंगडतच चालायचा.

औरंगजेब स्वतःला ‘तैमूरलंगचा’ वंशज म्हणत असे. हा तैमूरलंगही ‘लंगडत’ चालत असे. म्हणून पुढे परत खाफीखान म्हणतो ‘औरंगजेब शेवटपर्यंत लंगडतच राहिला, नाहीतरी तो तैमूरलंगाचा वारसच होता’.

महाराष्ट्र जिंकायला आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी, इथल्या प्राण्यांनी आणि निसर्गाने, तो अगदी मरेपर्यंत चांगलाच इंगा दाखवला. पदोपदी मराठ्यांनी औरंगजेबाला अद्दल घडवूनसुद्धा कित्येक जणांना औरंगजेबाच्या ‘चिकाटीचं’ कौतुक वाटतं. गनिमी काव्याचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या मराठ्यांना ‘पळपुटे’ म्हणणाऱ्या आणि भौगोलिक परिस्थितीबद्दल अनभिज्ञ असल्यामुळे कधी पूर, कधी अपघात अश्या गोष्टींना सामोरं जावं लागणाऱ्या मुघलांना म्हणजेच पर्यायाने ‘औरंगजेबाला’ हे युद्ध कधी कळलं होतं असं वाटत नाही. सुरुवातीपासूनच मराठ्यांना कमी लेखण्यातच औरंगजेबाला नेहमी धन्यता वाटली. याउलट मराठ्यांनी चिकाटी, धैर्य अबाधित ठेवून ‘मराठ्यांना’ तुच्छ लेखून हरवू पाहणाऱ्या या ‘युगपतीला’ आणि त्याच्या ‘सो कॉल्ड’ ‘मुघल साम्राज्याला’ देशोधडीला लावलं.

संदर्भ:
१. खाफीखान

– सुयोग शेंबेकर

Leave a Comment