महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,938

औरंगजेबची शेवटची लढाई | 1 मे 1705

By Discover Maharashtra Views: 1778 10 Min Read

औरंगजेबची शेवटची लढाई | 1 मे 1705 –

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले रायगडावर 03-04-1680 रोजी अकल्पितपणे निधन झाले.औरंगजेब सारख्या मराठ्यांच्या कट्टर शत्रूस वाटायला लागले की आता मराठ्यांना संपविण्याची सुवर्णसंधी आली आहे.ह्या विचाराने प्रचंड सैन्य,सामग्री,धन घेऊन औरंगजेब बऱ्हाणपुर मार्गे औरंगाबाद इथे 22 मार्च 1682 रोजी पोहोचला.त्याने नाशिक जवळील रामशेज हा किल्ला जिंकून महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ,नारळ फोडण्याचे नियोजन केले होते.यामागे एक भावनिक कारण होते.औरंजेबच्या पिताश्रीनी.. शहाजहान ने 47 वर्षांपूर्वी म्हणजे 1634-35 मध्ये दक्षिण मोहिमेची सुरुवात रामशेजचा किल्ला जिंकूनच केली होती.शहाजहानसाठी तो शुभ शकुनच ठरला होता. एप्रिल 1682 मध्ये मोगली सैन्याने रामशेजला वेढा घातला.पण औरंगजेबच्या बाबतीत रामशेज किल्ल्यावरील हल्ला हा अपशकुन ठरला.(औरंगजेबची शेवटची लढाई)

मनुष्यबळ,शस्त्रे,साधनसमग्री यापैकी कुठल्याही बाबतीत कसलीही बरोबरी नसून सुद्धा किल्ल्यावरील मराठी सैन्याने मोगली फौजेचा डटकर सामना केला.मोगलांकडे 35000 ची फौज,शाहबूदिन गाजीउद्दीन फिरोज जंग सारखा कसलेला सेनापति,त्याच्या सोबत राजाराव बुंदेला,कासिमखान ,रामसिंह बुंदेला वगैरे अनुभवी सरदार असून सुद्धा त्यांना किल्ला जिंकणे कठीण जाऊ लागले.मानवी प्रयत्न अयशस्वी ठरू लागल्याने हताश होऊन मोगली सैन्याने मंत्र तंत्र,जादूटोणा यांचा पण सहारा घेऊन पाहिलं पण रामशेज किल्ल्यावरील मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारात तसुभर पण फरक पडला नाही.मराठ्यांपुढे आपली डाळ शिजत नाही हे बघून औरंगजेब वैतागला आणि डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटून म्हणाला की…` संभाजीचा पाडाव करिपर्यंत मी हे पागोटे पुन्हा घालणार नाही..`.( 30-07-1682 ) शेवटी कंटाळून मोगलानी ऑक्टोबर 1682 मध्ये रामशेजचा वेढा उठवला.

मोगल आणि मराठे यांच्यात पुढे पंचवीस वर्षे चाललेल्या प्रदीर्घ लढ्याची ही सलामी मॅच होती जी मराठयाणी जिंकली.मराठ्याना नेस्तनाबूत करण्यासाठी,मातीत मिळविण्यासाठी इथे जवळ जवळ 25 वर्षे ठाण मांडून बसलेल्या आलमगीर बादशाहची इछा,स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही.

पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत मोगली सैन्य आणि मराठ्यांचे अनेक ठिकाणी सामने झाले. बऱ्याचदा मराठे पैसे घेऊन किल्ला सोडल्याचे नाटक करून बादशाही फौजा पुढील मुक्कामावर पोहोचे पर्यन्त दिलेले किल्ले परत ताब्यात घेऊन टाकत.याशिवाय मोगली फौजांची रसद पण मारली जाई.त्यामुळे औरंगजेबला सुरुवातीस वाटत होते तसे मराठ्यांशी झुंजणे सोपे निघाले नाही.तो जाईल तिथे,भेटेल तिथे मराठ्यानी त्याला तीव्र प्रतिकार केला.नेतृत्वात बदल होऊन देखील ( छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज आणि रणरागिनी ताराराणी ) मराठ्यांच्या प्रतिकारावर त्याचा विपरीत परिणाम झाला नाही,उलट तो दिसामाजी अधिकाधिक कडवा होत गेला.जशी वर सांगितल्या प्रमाणे मराठ्यांवरील पहिली स्वारी– रामशेजची स्वारी औरंगजेबला कठीण गेली तसाच प्रकार त्याच्या आयुष्यातील शेवटच्या लढाई बाबत झाला.

औरंगजेबची अंतिम लढाई सध्याच्या कर्नाटक राज्यातील विजापूर पासून सुमारे 72 मैल अंतरावर कृष्णा आणि भीमा नद्यांच्या मधील शोरापूर प्रदेशात वास्तव्य असणाऱ्या बेरड ( बेडर चा अपभ्रंश )  जमातीच्या पिऱ्या नायक ( काही ठिकाणी पीड नाईक म्हणून पण उल्लेख केलेल्या आढळतो.) ह्या सरदारा बरोबर वागीनखेडा ह्या ठिकाणी झाली.छत्रपती संभाजी महाराजांच्या नृशंस हत्ते नंतर मोगलांशी पंचवीस वर्षे उसळलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील कर्नाटकीय संस्थानिक आणि मराठे यांच्यातील परस्पर साह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून वागीनखेडा येथील बेडरांच्या किल्ल्यात मराठे सरदारांच्या कुटुंबियाना मिळालेला आश्रय हे होय.मोगली सैन्याचा महाराष्ट्रातील विविध किल्ल्याना वेढा पडलेला असताना अनेक मराठे सरदारानी आपला कुटुंब कबिला प्रत्यक्ष रणभूमी पासून दूर वागीनखेडा येथील किल्ल्यात सुरक्षित ठेवला होता.ज्या प्रमाणे मराठ्यानी महाराष्ट्रात औरंगजेबशी संघर्ष चालविला होता तद्वतच बेडरांनी पण त्यांच्या भागात मराठ्यांच्या मदतीने चालवला होता.त्यामुळे बेडर सुद्धा औरंगजेबच्या हिट लिस्टवर होते.तोरणा किल्ला 10 मार्च 1704 ला आपल्या फौजेतील मावळ्यांच्या मदतीने काबिज केल्यावर औरंगजेबने आपला मोर्चा बेडरांकडे वळवला.खेड इथे काही महीने विश्रांती घेऊन 22 ऑक्टोबर 1704 रोजी वागीनगेरे ह्या बेडरांच्या राजधानीकडे कूच केले.आधी सांगितल्या प्रमाणे बेडर आणि मराठे यांची समान शत्रू विरुद्ध युती होतीच.पिऱ्या नाईकने पण आपला बंदोबस्त चांगला करून ठेवला होता.त्याला ताराराणीं कडून पण मदत आली होती.

धनाजी जाधव आणि पिऱ्या नाईक यांचे खूप सख्य असून धनाजीरावांची मुले,माणसे वाकिणखेड्यासच होती.बादशाही फौज 8 फेब्रुवारी 1705 रोजी वाकिनखेडयास पोहचली आणि तिने पिऱ्या नाईकच्या गढीस वेढा घातला.किल्ल्याच्या पायथ्याशी तलवरखेडा नावाचे एक गाव होते.किल्ल्यात राहणाऱ्या लोकाना दैनंदिन उपयोगाच्या वस्तु घेण्यासाठी हे एकमेव ठिकाण होते.ह्याच्या जवळ धेडपुरा म्हणून अजून एक गाव होते जिथे गरीब बेडर शेतकरी राहत असत.अशा तऱ्हेने त्या भागात मनुष्य वस्ती असणारी हीच तीन ठिकाणे होती. किल्ल्याच्या पूर्व आणि उत्तर दिशेस काही टेकड्या होत्या ज्या किल्ल्याला वेढा घालणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त होत्या.यात एक ‘ लाल टेकडी ‘होती ज्यावरून किल्ल्याच्या काही यातील भाग दृष्टीस पडायचा.वेढा चालू असताना किल्ल्याच्या मोक्याच्या जागा,मर्म स्थानांचा काही मोगल सरदार शोध घेत असताना एक दिवस त्यांनी अचानक किल्ल्यावर हल्ला चढवला आणि लाल टेकडी वर तैनात बेडर सैनिकांना पळवून लावून टेकडीवर ताबा मिळवला.ताबडतोब किल्ल्यातून बेडर पायदळ मुंग्या,टोळधाडी प्रमाणे मोठ्या संख्येने बाहेर पडून त्यांनी मोगली फौजेस तेथून हाकलले.

26 मार्च 1705 ला धनाजी जाधव आणि हिंदुराव घोरपडे पाच सहा हजार घोडदळ घेऊन पिऱ्याच्या मदतीला आले.त्यांनी वेढा घालणाऱ्या मोगली फौजेला सामोरे जाऊन तिला तिथेच खिळवून ठेवले.त्यावेळी किल्ल्यातून पण मोगली फौजांवर जोरदार मारा सुरू झाला.त्याच वेळी मराठ्यांच्या निवडक 2000 घोडेस्वारानि  किल्ल्याच्या मागील दरवाजातुन, किल्ल्यात आश्रय घेतलेल्या मराठा स्त्रिया,मुले यांना बाहेर काढून वेगवान घोड्यांवर बसवून आपल्या सोबत नेले.ह्या स्वारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या मागे पायदळ सैनिकांची एक तुकडी तैनात होती.जोपर्यंत मराठे पिऱ्याच्या मदतीसाठी राहतील तोपर्यंत त्यांना रोज खर्ची देण्याचे पिऱ्या ने कबूल केले होते.त्यामुळे मराठे मोगली छावणीच्या आसपासच रेंगाळत आणि त्यांची रसद मारत/तोडत असत.सैन्याचा अन्नधान्य ,पिण्याचे पाणी तसेच जनावरांचा चारा यांच्या पुरवठ्यात अडचणी येत गेल्याने  मोगलांच्या सर्व हालचाली प्रभावित झाल्या.

आपल्या फौजेची दुर्गति पाहून औरंगजेब ने झुलफिकारखान आणि दाऊद खान पन्नी ह्या आपल्या भरोशाच्या सरदारांना ताबडतोब बोलावले.पिऱ्या नाईकाला पण अधिकची कुमक,रसद जमविण्यासाठी वेळ पाहिजे होता.त्यानुसार त्याने आणि मराठ्यांनी व्यूहरचना केली.पिऱ्या नाईकने अब्दुल गणी नावाच्या एका गोडबोल्या पण खोटारडे वागण्या बद्दल बदनाम असलेल्या काश्मिरी व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने औरंगजेबच्या हेर खात्याचा प्रमुख हिदायत केश याच्याकडे आपला भाऊ सोम शंकर बरोबर  शरणागतीचा प्रस्ताव पाठवला.शरण आल्यावर बेडर समूहाची सरदारकी,जमेदारी आणि शाही मनसब देण्याचे औरंगजेब ने मान्य केले.सोमशंकरने आपल्या भावाबद्दल माफी मागून किल्ला मोगलाना देण्याचे कबूल केले.बादशाही सरदारांनी किल्ल्याचा ताबा घेण्यास वर जावे व येताना पिऱ्या नाईक त्यांच्या बरोबर येईल असे ठरले.सोमशंकरला खाली ठेवून औरंगजेबचे सरदार किल्ल्यावर गेले.मात्र दोन दिवस आजारी असल्याचे सांगून पिऱ्या नाईक कुणालाच भेटला नाही.तिसऱ्या दिवशी कळले की पिऱ्या नाईक किल्ल्यात नाहीय.बादशाह संतापल्याने सोमशंकर आपण किल्ला ताब्यात देतो असे सांगून किल्ल्यावर आला आणि त्याने आलेल्या सरदारांना अटकेत ठेवून युद्धाची तयारी सुरू केली.ही बातमी मिळाल्यावर औरंगजेबने पण आपल्या भरोशाच्या सरदारांना बुलावा धाडला.

नसरत जंग 27 मार्च ला आला आणि त्याने दुसऱ्याच दिवशी शाही घोडदळ घेऊन बेडरांवर हल्ला चढवून त्यांना लाल टेकडी वरुन खाली तलवारखेड्या पर्यन्त ढकलले.ह्यात दलपत बुंदेलाचे असंख्य राजपूत सैनिक मारले गेले.अन्य एक टेकडी बेडरांच्या ताब्यात होती,ते तिथून मोगली सैन्यावर हल्ले चढवित होते.ती पण मोगलांनी काबिज केली.बेडर तिथून धेडपूरा इथे आले. नसरत जंगने आसपासच्या पिण्याच्या पाण्याच्या साठयान्वर सुद्धा कब्जा केला.27 एप्रिलला त्याने तळवरखेड्यावर हल्ला चढवला.त्याच वेळी     झुलफिकारखान पण बादशहा च्या मदतीस आला.पुढे लढाई चालू ठेवणे निरर्थक वाटल्याने पिऱ्या नाईक आपल्या मराठे साथीदारांबरोबर किल्ल्याच्या मागील बाजूने पळून गेला.दुसऱ्या दिवशी जेव्हा किल्ल्यातून प्रतिकाराची काही लक्षणे दिसेनाशी झाली तेव्हा मोगली सैन्य किल्ल्यात शिरले,तिथे त्यांना कुणीही दिसले नाही.शत्रूने किल्ला सोडल्याची बातमी मोगली तळावर पसरताच सैनिक,बाजारबुणगे,गुंड,बदमाशानी किल्ल्यावर धाव घेतली.तिथे त्यांना जळत असलेली घरे दिसली,त्यातील एकाची आग जवळील दारूच्या कोठाराला लागून मोठा स्फोट होऊन कित्येक जण ठार झाले.अशा तऱ्हेने तीन महिन्यांच्या संघर्षानंतर 1 मे 1705 रोजी किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. पण त्यापासून त्यांना मानसिक समाधान शिवाय अन्य काही लाभ झाला नाही.बेडरांचा म्होरक्या मोगलाना चकवून निसटून गेला आणि मराठ्यांच्या मदतीने मोगली फौजेला छळत राहिला.औरंगजेब ने वाकिनखेड्याचे नाव बदलून रहमान बक्ष असे ठेवले. ही औरंगजेबच्या आयुष्यातली औरंगजेबची शेवटची लढाई ठरली.

वाकिनखेड्याची लढाई संपल्या नंतर औरंगजेब आठ मैल अंतरावर असलेल्या देवापुर नावाच्या निसर्गरम्य गावात 22 ऑक्टोबर 1705 पर्यन्त राहीला.तिथून त्याचा म्हैसूरवर स्वारी करण्याचा विचार होता. हिजरी सनाच्या हिशेबाने तो नव्वदीच्या आसपास पोहचला होता.हिंदुस्थानचा जरी तो आलमगिर असला तरी निसर्गाच्या लेखी तो केवळ एक प्राणिमात्र होता.त्यामुळे निसर्गाचे जरा,व्याधी,मृत्यू हे नियम त्यालाही लागू झाले.त्याची तब्बेत सारखी बिघडायची,शुद्ध हरपायची,कित्येकदा त्याच्या मृत्यूच्या अफवा सुद्धा पसरायच्या.मराठ्यांचे छापे,धाडी यात काहीच कमी होत नव्हती.23 ऑक्टोबर 1705 रोजी औरंगजेब ने देवपूरहून मुक्काम हलवून परतीच्या प्रवासासाठी म्हणून अहमदनगरकडे प्रयाण केले. वाटेत जागोजागी थांबत तो 20 जानेवारी 1706 रोजी अहमदनगर इथे पोहोचला.वाटेत मराठे त्याच्या पाठोपाठच असायचे. अगदी शाही कबिल्यावर सुद्धा छापे मारायची ते हिम्मत करत.

औरंगजेब बरोबर असलेला त्याचा सरदार व इतिहासकार भीमसेन सक्सेनाने स्वतः बघितलेल्या  स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे की.. सगळीकडे मराठ्यांचे प्रभुत्व दिसत आहे,त्यांनी सगळे रस्ते,वाटा अडविल्या आहेत. लुटालूट करून ते आपली गरीबी दूर करत आहेत.त्यांनी भरपूर पैसा गाठिस बांधला आहे. मी असे ऐकले आहे की ते प्रत्येक आठवड्यात मिठाई आणि पैसे वाटून सम्राटाच्या दीर्घायुष्याची कामना करतात.कारण त्यांच्यासाठी तो परमेश्वरापेक्षा कमी नाही जो त्यांना हवे ते देत आहे..

औरंगजेबचा परतीचा प्रवास सुरू झाला होता,पण तो दिल्ली ऐवजी अल्लाह कडे पोहोचला,तारीख होती 20 फेब्रुवारी 1707.मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आपले उत्तरायुष्य पणाला लावले पण नियतीने त्याच्या पदरात निराशाच टाकली.औरंगजेबची शेवटची लढाई.

संदर्भ:
1-मराठ्यांचा इतिहास खंड एक.संपादक ग.ह.खरे आणि अ.रा.कुलकर्णी.
2-मराठी रियासत,खंड दूसरा,लेखक गो. स. सरदेसाई.
3-औरंगजेब-जदूनाथ सरकार.( हिन्दी रूपांतर )
4-मआसिर-ए-आलमगीरी .मराठी अनुवाद. रोहित सहस्त्रबुद्धे
5-भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांची -पराग लिमये.

Leave a Comment