महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,26,462

औसा किल्ला | Ausa Fort

By Discover Maharashtra Views: 4591 17 Min Read

औसा किल्ला | Ausa Fort

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला सोलापुर,नळदुर्ग, औसा, परांडा, उदगीर यासारखे एकापेक्षा एक बलदंड व भक्कम भुईकोट पहायला मिळतात. हे सर्व किल्ले आजही सुस्थितीत असुन या किल्ल्यांची रचना महाराष्ट्रात इतरत्र आढळणाऱ्या भुईकोट किल्यांपेक्षा खुपच वेगळी आहे. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने त्या अनुषंगानेच येथे किल्ल्याची रचना केली गेली. येथे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचे नैसर्गिक सुरक्षा कवच नसल्याने किल्ला लढवय्या बनविण्यासाठी त्याला जाडजुड दुहेरी अथवा तिहेरी तटबंदी बांधुन संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक खोदण्यात आले. इतकेच नव्हे तर किल्ल्याला एकामागे एक अशी दरवाजाची साखळी रचुन आत जाण्याचा मार्ग दुष्कर केला गेला. अशा या बलदंड दुर्ग साखळीतील औसा किल्ला (Ausa Fort) हा एक महत्वाचा भुईकोट किल्ला.

औसा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लातुर शहर गाठावे लागते. लातूर शहरापासुन औसा हे तालुक्याचे शहर २० कि.मी.अंतरावर असून तेथे जाण्यासाठी बस व खाजगी वाहनाची सोय आहे. औसा शहरात प्रवेश केल्यावर जुन्या औसा शहराभोवती असलेल्या तटबंदीतील दरवाजाची कमान पाहायला मिळते. गावाबाहेर असलेला औसा किल्ला बस स्थानकापासुन साहारण १.५ कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याच्या दरवाजा समोरील खंदकात नव्याने वस्ती झाली असुन येथुन समोरच बुरुजात बांधलेला किल्ल्याचा दरवाजा नजरेस पडतो. या वस्तीतुन वाट काढत किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाता येते पण हा किल्ल्याचा खरा प्रवेशमार्ग नाही.

किल्ल्याचा पहिला दरवाजा वस्ती सुरु होण्यापूर्वी डावीकडे असुन खंदकाबाहेरील तटबंदीत बांधलेला आहे. पुर्वाभिमुख असलेला हा दरवाजा लोहबंदी दरवाजा म्हणुन ओळखला जातो. खंदकातील दरवाजाकडे उतरत जाणारा हा मार्ग दोन्ही बाजुस दगडांनी बंदिस्त केलेला असुन दरवाजाच्या आत व बाहेर दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या बांधलेल्या आहेत. खंदकाच्या आतील एका देवडीत तांदळा स्थापन केलेला आहे. या दरवाजातुन आत आल्यावर समोरच किल्ल्याची दुहेरी तटबंदी व लांबवर पसरलेला किल्ल्याचा खंदक नजरेस पडतो. किल्ल्याची बाहेरील तटबंदी साधारण ३० फुट उंच असुन आतील तटाची उंची ४५ फुट आहे. हा खंदक सर्व बाजुंनी २० फुट खोल असुन याची रुंदी मात्र १०० फुटापासून २५० फुटापर्यंत आहे. दरवाजाकडील भागात हि रुंदी २०० फुट आहे.

खंदकातुन तटाला फेरी मारल्यास तटबुरुजावर मोठया प्रमाणात शरभशिल्प, व्याघ्रशिल्प,हत्तीशिल्प व कमळाची नक्षी पहायला मिळते. तटबंदीत तीन ठिकाणी खंदकात उतरणारे चोर दरवाजे असुन पश्चिमेकडील बुरुजावर २ शिलालेख आहेत. त्यात या बुरुजाची दुरुस्ती मुर्तजा निजामशहा याच्या काळात झाल्याचा उल्लेख येतो. खंदकात मोठया प्रमाणात दलदल असुन हि फेरी आपल्याला डिसेंबर महिन्यानंतर करता येते. या काळात या खंदकात शेतीदेखील केली जाते. खंदकात असलेली दलदल किल्ल्याच्या संरक्षणाचा भाग आहे. खंदकात विहिरी खोदलेल्या असून संकटकाळात या विहीरीतुन खंदकात पाणी सोडुन हि दलदल टिकवण्याची सोय केली आहे. खंदकातील माती अतिशय चिकट असुन आजही ओल असताना या शेतातुन धडपणे चालता येत नाही. मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे.

आपण प्रवेश केलेल्या लोहबंदी दरवाजा पासुन आतील किल्ल्याचा दरवाजा उजवीकडे साधारण २०० फुटावर आहे. खंदकातील वस्तीतुन वाट काढत आपण आतील किल्ल्याच्या पहिल्या पुर्वाभिमुख दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाजवळ असलेल्या या खंदकात एकुण तीन विहीरी खोदलेल्या आहेत. यातील दोन विहिरींना आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. अहशमा/ नौबत दरवाजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दरवाजाची रचना या भागातील इतर भुईकोटापेक्षा पुर्णपणे वेगळी आहे. दुरून पाहिले असता हा दरवाजा जमिनीपासुन १२ फुट उंचावर असल्याचे दिसुन येते. मुळ किल्ला बांधताना किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी या दरवाजाखाली शिडी असावी व आता आपण प्रवेश करतो हा मार्ग नंतरच्या काळात बांधल्याचे दिसुन येते.

दरवाजाच्या विरुद्ध बाजुस असलेल्या खंदकाच्या भिंतीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. येथील खंदकाची रुंदी पहाता येथे काढता घालता येणारा पुल नसावा व दलदल पार करण्यासाठी वेगळीच सोय केली असावी. या दरवाजा शेजारी संरक्षणासाठी कोणतेही बुरुज नसुन हा दरवाजाच एका मोठया बुरुजात बांधलेला आहे. दरवाजाच्या वरील बाजुस चौदा हत्ती कोरलेली गजशिल्पपट्टी असुन त्यावर दोन्ही बाजुस सजावटीसाठी मिनार बांधले आहेत. तटाबाहेर सज्जे काढलेले असुन या सज्जातील जंग्यातुन दरवाजा व तटबंदीजवळ आलेल्या शत्रुवर बंदुकीचा मारा करण्याची सोय केलेली आहे. तटबंदीचा सर्वात वरील भाग व चर्या विटांनी बांधल्या आहेत. पुरातत्व खात्याने येथे नवीन लाकडी दरवाजा बसवलेला असुन येथील अणकुचीदार खिळे असलेला मुळ लाकडी दरवाजा आत ठेवलेला आहे. या दरवाजातुन आत शिरणारा मार्ग नागमोडी वळणाचा असुन या मार्गावर अह्शमा दरवाजा वगळून एकुण पाच दरवाजे आहेत.

दुसऱ्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर अरीतखान नावाने ओळखला जाणारा तिसरा पुर्वाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाच्या वर व दोन्ही बाजुस सज्जे बांधलेले असुन या सज्जांच्या तळाशी हत्तींचा शिल्पपट बसवलेला आहे. अहशमा दरवाजाप्रमाणे या दरवाजावर देखील दोन छोटे मिनार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या दरवाजांमधील जागेत दोन देवड्या असुन तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याचा तिसरा व चौथा दरवाजा यामध्ये साधारण ३० फुटांचे अंतर असून या भागात कमानीवजा देवड्या आहेत. यात उजवीकडील एका देवडीच्या कमानीवर ३ ओळींचा मराठीतील शिलालेख असुन त्यात लोहबंदी दरवाजाच्या बांधकामाची नोंद आहे.

किल्ल्याचा चौथा दरवाजा चीनी दरवाजा म्हणुन ओळखला जातो. दोन बुरुजात बांधलेल्या या पुर्वाभिमुख दरवाजाच्या व बुरुजाच्या वरील बाजुस सज्जे बांधलेले असुन बुरुजाला लागुन तटावर जाण्यासाठी प्रशस्त जिना आहे. या दरवाजावरील केवळ एक मिनार शिल्लक आहे. या दरवाजाच्या आत उजवीकडे तीन तर डावीकडे पाच देवड्या आहेत. यातील एका बंद देवडीत अनेक लहान तोफा तसेच मोठया प्रमाणात तोफगोळे ठेवलेले आहेत. येथे डावीकडे परकोटात उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे. किल्ल्याचा पाचवा दरवाजा तटबंदीत बांधलेला असुन हा दरवाजा पार करून आत आल्यावर समोरच तटबंदीला लागून असलेल्या चौथऱ्यावर एका ओळीत वेगवेगळ्या धाटणीच्या ९ तोफा मांडून ठेवलेल्या आहेत. यातील एक तोफ पंचधातुची आहे.

समोर बुरुजाला लागून किल्ल्याचा सहावा दरवाजा आहे पण तेथे न जाता डावीकडे वळून आधी परकोटातील वास्तु पाहुन घ्याव्यात. वाटेच्या सुरवातीला राणीमहाल नावाची वास्तु असुन या वास्तुच्या केवळ भिंती व दरवाजा शिल्लक आहे. वाडा पाहुन पुढे आल्यावर तटाला लागुन इशरत महाल नावाची दुसरी वास्तु आहे. येथुन पुढे गेल्यावर बाहेरील तटबंदीच्या बुरुजात बांधलेली तवे विहीर आहे. वाटेने सरळ किल्ल्याच्या पश्चिम टोकावर गेले असता अर्धगोलाकार आकाराची दुसरी विहीर पहायला मिळते. हिच्या आकारावरून हिला चांदविहीर नाव पडलेले आहे. इथे आपली पडकोटातील अर्धी फेरी झाली असल्याने आपण संपुर्ण किल्ल्याला वळसा घालू शकतो किंवा मागे फिरून पुन्हा दरवाजाकडे येऊ शकतो. आतील किल्ल्याला वळसा घातला तरीही आपण याच दरवाजात येतो पण हा मार्ग मोठया प्रमाणात झुडपांनी भरलेला आहे. सहाव्या दरवाजात बुरुजाला लागून एक थडगे आहे. पुरातत्व खात्याने येथे देखील नव्याने लाकडी दरवाजा बसवलेला आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर चारही बाजुस बांधलेल्या २१ कमानी पहायला मिळतात.

काही जणांच्या मते येथे बाजार तर काहींच्या मते राजवाडा होता पण निजामाच्या शेवटच्या काळात किल्ला वापरात असताना या ठिकाणी तहसिल कार्यालय होते. तहसील कार्यालयाच्या मागील बाजुस तीन कमानी असलेली मशीद असुन मशिदीसमोर हौद आहे. येथील कोपऱ्यावरील ओवरीत किल्ल्यात जाण्यासाठी सातवा व शेवटचा दक्षिणाभिमुख दरवाजा असून हा दरवाजा घड्याळ दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या दरवाजाची केवळ कमान शिल्लक आहे. या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर जाणारी बांधीव पायवाट दिसते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजुस दोन दालनाचे दारूकोठार तर डावीकडे झरोके असलेला उथळ तलाव पहायला मिळतो. हा तलाव म्हणजे गडावरील सर्वात सुंदर अशी जलमहालाची वास्तु आहे. या वास्तुत उतरण्यासाठी लहान पायरीमार्ग असुन आत उतरल्यावर बारा कमानीवर तोललेला ७०x४५ फुट लांबीरुंदीचा जलमहाल पहायला मिळतो.

महालावरील तलाव काही ठिकाणी पाझरत असल्याने यात थोडेफार पाणी जमा झाले आहे. तलावाखाली असलेल्या या वास्तुतील गारवा पहाता उन्हाळ्यात याचा उपयोग राहण्यासाठी व इतर काळात तळघर म्हणुन केला जात असावा. या महालात सरपटणारे प्राणी असल्याने फिरताना सावधगिरी बाळगावी व विजेरीचा वापर करावा. जलमहालाच्या डावीकडे तटाला लागुन दोन कोठारे आहेत. यातील एका कोठारात परकोटात उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे. हे पाहुन मुख्य वाटेने पुढे जाताना वाटेवरच १० फुट लांबीची एक मोठी तोफ पडलेली आहे. वाटेच्या उजवीकडे कटोरा बावडी नावाची पायऱ्या असलेली एक मोठी विहीर आहे. वरील बाजुस अष्टकोनी तर आतील बाजुस गोलाकार असलेल्या या विहिरीत एकाखाली एक दोन कमानीदार दरवाजे आहेत.

विहिरीशेजारी असलेल्या दालनातुन या दरवाजात जाण्यासाठी पायरीमार्ग आहे. विहिरीशेजारी दगडी चौथरा असुन त्यावर पाणी खेचण्याचा दगडी रहाट बांधलेला आहे. येथे पाणी खेचून ते हौदात जमा करून खापरी नळाने गडाच्या इतर भागात फिरवले आहे. हे खापरी नळ आजही या चौथऱ्यात पहायला मिळतात. येथुन पुढे जाणारी पायवाट आपल्याला तटातील बुरूजावर घेऊन जाते व येथुन आपली तटबंदीवरील गडफेरी सुरु होते. या तटावरून फिरताना आपल्याला तटावरील, किल्ल्याच्या आतील तसेच परकोटातील सर्व अवशेष पहायला मिळतात. तटावर प्रवेश केल्यावर उजवीकडून आपल्या गडफेरीस सुरवात करावी. येथे पहिल्याच बुरुजावर आपल्याला मोठी मकरमुखी तोफ पहायला मिळते. याच्या पुढील बुरुजावर दोन मोठया तोफा असुन एक गोलाकार आहे तर दुसऱ्या तोफेला कंगोरे आहेत. या नंतरच्या मोठया बुरुजावर कोणतीही तोफ नाही पण बुरुजाखाली एक थडगे आहे. यापुढील बुरुजावर एक दहा फुट लांबीची पंचधातूची तर दुसरी भग्न झालेली तोफ आहे.

येथे असलेली पंचधातूची तोफ इतिहासदृष्टया अतिशय महत्वाची व दुर्मीळ म्हणता येईल कारण महाराष्ट्रात आढळणाऱ्या बहुतांशी तोफा पोर्तुगीज अथवा इंग्लिश बनावटीच्या आहेत पण हि तोफ मात्र स्पिनिश बनावटीची असुन त्यावर स्पेन राजवटीचे चिन्ह व इतर काही मजकुर कोरलेला आहे. एकेकाळी शत्रूची भंबेरी उडवणारी हि तोफ आज मात्र जाळीबंद झाली आहे. याच्या पुढील बुरुजावर आपल्याला किल्ल्यावरील सर्वात मोठी १२ फुट लांबीची तोफ पहायला मिळते. या बुरुजापुढे तटाला लागून एका उध्वस्त वास्तुचे अवशेष आहेत. याच्या पुढील बुरुजावर आखुड पण रुंद व्यासाची अजून एक तोफ पहायला मिळते. किल्ल्यावरील बहुतांशी बुरुजावर तोफा फिरवण्यासाठी लोखंडी गज अथवा दगडी आरी असुन तोफा डागल्यानंतर थंड करायला लागणाऱ्या पाण्यासाठी वेगवेगळ्या आकाराची लहान कुंड बांधलेली आहेत. येथुन पुढे आपण झेंडा रोवलेल्या बुरुजावर येतो. या बुरुजावर देखील एक तोफ ठेवलेली आहे. येथे समोरच सहाव्या दरवाजा शेजारील बुरुजावर इंग्रज अधिकारी कर्नल फिलीप मेडोव्स टेलर याने दुरुस्त केलेली जमुना नावाची तीन मजली वास्तु आहे. या भागाच्या दौऱ्यावर असताना तो येथे रहात असे. हि किल्ल्यावरील सर्वात उंच वास्तु आहे.

सहाव्या दरवाजा शेजारून तसेच तटावरून या वास्तुत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन या वास्तुच्या छतावरून पुर्ण किल्ला व किल्ल्यात येणारा संपुर्ण प्रवेशमार्ग नजरेस पडतो. शंकरपाळीच्या आकाराचा हा किल्ला खंदक वगळता साधारण १३ एकरवर पसरलेला असून किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत लहानमोठे २३ बुरुज तर आतील तटबंदीत १९ बुरुज आहेत. येथुन तहसील कार्यालया मागील तटबंदी पार करत आपण तहसील कार्यालयाच्या टोकावरील बुरुजावर येतो. या बुरुजावर लोखंडी जाळीत बंदिस्त केलेली पंचधातूची दुसरी ८ फुट लांबीची तोफ आहे. या तोफेवर पर्शियन भाषेत मुहम्मद बिन हुसेन निजामशहा असा नामोल्लेख असुन मागील बाजुस सुर्यमुख कोरलेले आहे. येथुन पुढचा बुरुज पार केल्यावर त्यापुढील बुरुजावर १० फुट लांबीची अजून एक तोफ पहायला मिळते. तटबंदीवरून परकोट, खंदक पहात आपण सुरवातीस पाहिलेल्या चांद विहिरीच्या बुरुजाजवळ येतो. या बुरुजाच्या पुढील बुरुजावर अजून एक तोफ पहायला मिळते. किल्ल्याच्या या भागात असलेल्या तटबंदीत मोठया प्रमाणात राहण्याची सोय तसेच कोठारे आहेत. येथुन पुढे आल्यावर आपण पायवाटेने तटावर प्रवेश केला त्या ठिकाणी येतो व आपली गडफेरी पुर्ण होते.

बहमनी काळात औसा किल्ल्यात टांकसाळ होती व या टांकसाळीतील नाणी औसा किल्ल्याच्या नावाने प्रसिद्ध होती,पण आज हि टांकसाळ नेमकी कुठे होती ते सांगता येत नाही. याशिवाय किल्ल्याबाहेर सय्यद सादात यांचा दर्गा आहे. औसा किल्ल्यावर आजही लहानमोठया ३० पेक्षा जास्त तोफा आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक किल्ल्यात आपल्याला तोफा पहायला मिळतात पण महाराष्ट्राच्या इतर भागात असलेल्या किल्ल्यात तोफा दिसत नाहीत. इंग्रजांनी १८६२ साली केलेल्या पहाणीत अनेक किल्ल्यावर मोठया प्रमाणात तोफा असल्याची नोंद केलेली आहे पण आज हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पण तोफा नाहीत. या तोफांचे नेमके काय झाले हा अभ्यासाचा विषय आहे. मराठवाड्यातील किल्ले निजामाच्या ताब्यात असुन त्यावर वावर होता म्हणुन या तोफा सुरक्षित होत्या पण हे किल्ले ओंस पडल्यावर स्थानिकांनी येथील पंचधातुच्या तोफा कापुन त्याचे तुकडे काढायला सुरवात केल्याने या तोफा जाळीबंद करण्यात आल्या. केली.

किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने किल्ला पहाण्याची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत आहे. पुरातत्व खात्याने किल्ला संरक्षित स्मारक असल्याचा फलक लावला आहे पण किल्ल्याची माहीती देणारा एकही फलक नाही. किल्ल्यात कोठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने सोबत पुरेसे पाणी बाळगावे. किल्ला अगदी अलीकडील काळापर्यंत नांदता असल्याने आतील वास्तु सुस्थितीत आहेत. शिवाय पुरातत्व खात्याने या वास्तुंचे चांगल्या प्रकारे संवर्धन केले आहे. संपुर्ण किल्ला व्यवस्थित पाहण्यास २ तास पुरेसे होतात.

औसा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरात राहण्याची तसेच जेवणाची सोय आहे. जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने औसा शहराचा उल्लेख “औच्छ” असा केलेला आहे. त्यानंतर औसाचा रहिवासी असलेला कवी जैनमुखी कनकामर याने आपल्या करकंड चरयू या काव्यग्रंथात औसा नगराचा असई असा उल्लेख केला आहे. बोरगाव येथे सापडलेला राजा विजयादित्य याच्या शके ११५० म्हणजे इ.स.१२२८ मधील ताम्रपटात औसा नगरीचा उल्लेख उच्छीव त्वरीशत असा येतो. यादवकालीन खोलेश्वराच्या काळातील अंबाजोगाई शिलालेखात उदगीर बरोबर औसाचीही नोंद येते. पण यात औसा किल्ला असल्याची नोंद कोठेही आढळत नाही. यादव साम्राज्याच्या अस्तानंतर औसा प्रांत आधी खिलजी व नंतर बहमणी सत्तेच्या अमलाखाली आला.

बहमनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याची बहमनीचा वजीर म्हणुन नियुक्ती झाली व याच्या काळातच औसा किल्ला बांधल्याच्या नोंदी येतात. इ.स.१४९२ मध्ये बहामनी सरदार कासीम बरीद याला या प्रांताची सुभेदारी मिळाली व औसा किल्ला त्याच्या अमलाखाली आला. इ.स.१५२६ मध्ये बहमनी साम्राज्याचे ५ तुकडे पडल्यावर कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. मराठवाड्याचा हा प्रांत आदिलशाहीजवळ असल्याने आदिलशाही व बरीदशाही यांच्यात सतत सत्तासंघर्ष होत राहिला. बरीदशाहीच्या अस्तानंतर औसा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात आला पण लवकरच मुर्तजा निजामशहाच्या काळात हिजरी १०१४ मध्ये मलीकअंबरने किल्ल्याचा ताबा घेतला. मलीकअंबरने औसा शहराचे नामकरण अमरापूर केले पण ते रुळले नाही. निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात इ.स.१६३५मध्ये झालेल्या तहात औसा किल्ल्याची नोंद येते. इ.स.१६३६ मध्ये शहाजहानने मराठवाडा जिंकला त्यावेळी औसा किल्ला मुघलांच्या अमलाखाली आला. शहाजहानने किल्ल्यावर मुबारकखान याची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. गावात औरंगजेबच्या काळात १६८८ साली बांधलेली जामा मशीद असुन या मशीदीतील पर्शियन शिलालेखात औरंगजेब व मशीद बांधणारा सोहराबखान याच्या नावाचा उल्लेख आहे.

इ.स.१६९९ ते १७०० या काळात मराठा सरदार धनाजी जाधव व मोगल सरदार झुल्फिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या. मुघली सत्ता खिळखिळी झाल्यावर मुघलांचा सुभेदार निजाम उल मुल्क आसफजहा याने निजामशाहीची स्थापना केली व या भागाचा ताबा घेतला. यानंतर फेब्रुवारी १७६० मध्ये सदाशिवभाऊ पेशवे ह्यांच्या नेतृत्वाखाली उदगीर येथे मराठे आणि निजाम याच्यात झालेली लढाई उदगीरची लढाई म्हणुन इतिहासात प्रसिद्ध आहे. या लढाईत निजामाचा पराभव झाला व तहानुसार निजामाचा ८५ लाखाचा मुलुख स्वराज्याला जोडला गेला. यावेळी औसा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला पण लवकरच मराठे उत्तरेकडील पानिपतच्या राजकारणात गुंतलेले पाहुन निजामाने औसा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. निजामाने इंग्रजांशी शरणागती पत्करल्याने या राज्यातील किल्ल्याचे लढाईत नुकसान झाले नाही. हैद्राबादच्या निजामाने १८५२ मध्ये हा भाग इंग्रजांकडे गहाण ठेवला होता. इंग्रजांचा ताबा ह्या भागावर १८५७-५८ पर्यंत होता. त्यावेळी कर्नल मेडीज टेलर हा ब्रिटीश कमिशनर म्हणून नळदुर्ग जिल्ह्याचा प्रमुख होता. भारत स्वतंत्र झाल्यावर १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत किल्ला निजामाच्या ताब्यात होता इतकेच नव्हे तर किल्ल्यात सरकारी कार्यालये असुन ती देखील वापरात होती.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment