महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,189

बोधिसत्व अवलोकितेश्वर | आमची ओळख आम्हाला द्या

Views: 1507
3 Min Read

बोधिसत्व अवलोकितेश्वर | आमची ओळख आम्हाला द्या –

भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर तिथल्या कलावास्तूवर बौद्ध काळातील तत्त्वाचा व तत्त्वज्ञानाचा परिणाम झालेला दिसून येतो. बौद्ध चैत्य ,स्तूप, विहार यांच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा जाज्वल्य इतिहास अजरामर झाला आणि येणाऱ्या पिढीला तो आदर्श ठरला. लेणी चैत्यगृह यावरील शिल्पकलेमध्ये बौद्ध प्रतीके व बौद्ध देवता यांचा समावेश केला गेला. बुद्धकालीन वास्तुवैभवा मुळे भारताचा प्राचीन इतिहास समजण्यास मदत होते. इतिहासाचा अनमोल ठेवा ऊन ,वारा, पाऊस परकीय, स्वकीय आक्रमणाचा मारा सहन करीत तग धरुन उभा आहे .आज या बौद्ध लेण्यांमध्ये अतिक्रमण करून त्यांचे मूळ स्वरूप बदललं गेलं आहे. बौद्ध धर्मात अशा काही  प्रतिमा आहेत की, ज्या दुर्मिळ स्वरुपाच्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे मुंबई कान्हेरी लेणी क्रमांक ४१ मधील बोधिसत्व अवलोकितेश्वर प्रतिमा होय. या लेणींमधील बोधिसत्व अवलोकितेश्वर याची ही प्रतिमा अत्यंत आकर्षक व उठावदार आहे.

बोधिसत्व अवलोकितेश्वर यांची ही प्रतिमा समपादअवस्थेत उभी असून द्विभूज आहे. उजवा हात वरद मुद्रेत असून डावा हात कमरेवर स्थिरावलेला आहे. त्या हातात सनाल कमलकलिका  धारण केलेली आहे. ही कमलकलिका डाव्या खांद्याच्या वर टेकलेली आहे .डोक्यावर मुकुटा ऐवजी एकावर एक अनुक्रमे तीन,तीन,तीन व एक असे एकूण दहा लहान मुख कोरलेले आहेत.  मूळ मुख एक अशा पद्धतीने एकूण अकरा मुख या मूर्तीस आहेत. चेहऱ्यावर दिव्य तेज व शांती भाव, स्मितहास्य आहे. डोळे पूर्णतः बंद केलेले आहेत. कानातील कुंडले खांद्यावर स्थिरावलेली आहेत.

गळ्यात हार, कटकवलंय, कटीसूत्र, पादवलय इत्यादी आभूषणे या प्रतिमेवर आहे. कमरेभोवती गुंडाळलेले वस्त्र पायाच्या घोट्यापर्यंत आहे. त्यावरील कलाकुसर सुबक आहे. कटीवस्त्राच्या मोत्याच्या लडी नजाकतदारपणे वस्त्रावर रूळताना दिसत आहेत. नेसूच्या वस्त्राचा सोगा दोन्ही पायाच्या मधोमध अत्यंत खुबीने दाखवण्यात कलाकाराने यश संपादित केले आहे. ही मूर्ती भगवान बुद्धांच्या द्वारपालाच्या स्वरूपात आहे. मूर्तीच्या डोक्यावर पुष्पमालाधारी गंधर्व दाखवलेले आहेत. अवलोकितेश्वर महायान बौद्ध संप्रदायातील सर्वात लोकप्रिय बोधिसत्व आहे.

कोणत्याही दुःखी प्राणिमात्रांमध्ये दुःखाची भावना दूर करण्यासाठी दुःखाचा अंत करण्यासाठी  करूणामयी बोधिसत्व अवलोकितेश्वर येतात अशी भावना आहे. अशा पद्धतीचे एकमेव शिल्प कान्हेरीच्या लेणी मध्ये आढळून येते. अशा पद्धतीचे दुसरे शिल्प भारतात इतरत्र कोठेही आढळून येत नाही हे या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणावे.

सदर फोटो सूरज रतन जगताप मुक्त लेणी अभ्यासक यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार!

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

बोधिसत्व अवलोकितेश्वर

Leave a Comment