महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,100

बहादूरखान पुन्हा फसला….

Views: 1373
8 Min Read

बहादूरखान पुन्हा फसला….

बहादूरखानाच्या अंगाचा तिळपापड होत होता. तो मारे औरंगजेबाला मोठ्या मोठ्या बढाया मारून आला होता की दक्षिणेत जाऊन मी या जमीनदाराचा म्हणजे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करतो. पण झालं काय तर महाराजांच्या फक्त ९००० मावळ्यांनी बहादूरखानाला भिकेला लावलं. छावणीतले सगळे २५ लाख होन आणि २०० उत्तम घोडे तर नेलेच वर सगळ्या छावणीलाही आग लावली. आता या सीवाला सोडायचं नाही असा निश्चयच केला त्याने. सहा महिने झाले असतील नसतील या ‘पेंडीच्या गुरूंकडे’ महाराजांचा वकील आला. आता मराठ्यांची चांगलीच जिरवूयात अशी तयारी केलेला बहादूरखान एकदम पेचातच पडला, त्यात मराठ्यांना तह करायचाय हे ऐकून तर त्याला गुदगुल्याच व्हायला लागल्या. आता महाराजांना असा कोणता तह मुघलांशी करायचा होता हे पाहुयात आजच्या भागात. नेहमीप्रमाणेच ऐतिहासिक संदर्भांसहित.बहादूरखान पुन्हा फसला….

हा लेख व्हिडिओ स्वरूपात खालील लिंकवर पाहू शकता:

जुलै १६७४ ला मराठ्यांनी बहादुरखानाची म्हणजेच मुघलांची पेडगावाची छावणी नुसतीच धुवून काढली नाही तर त्याची राखरांगोळीसुद्धा केली. याबद्दल सविस्तर माहिती उजवीकडे वर दिसणाऱ्या आमच्या मागच्या भागात दिलेली आहे. सभासद बखरीनुसार दक्षिणेत कोणताच सरदार शिवाजी महाराजांना थांबवू शकत नाहीत म्हणून औरंगजेब उदास झाला. त्याला हा बहादूरखान म्हणे ‘आपण शिवाजीवर जातो. त्यास हालखुद (जगाच्या जागी,नरम) ठेवतो. त्याचे लष्कर पातशाही मुलखात न ये असे करतो…’ आणि झाले भलतेच हो. महाराजांचे लष्कर पातशाही मुलखात तर आलंच वर बहादुरखानाची सगळी छावणी साफ करून गेलं. आता कुठल्या तोंडाने औरंगजेबाला समोर जायचं असं झालं बहादूरला.

दरम्यान एका आघाडीवर विजय मिळाला म्हणून ते यश साजरं करत बसण आणि पुढच्या संधीची वाट बघत बसणं हा शिवाजी महाराजांच्या स्वभावाचा पोतच नव्हता. नवनवीन संधी निर्माण करण हा महाराजांचा हातखंडा होता. महाराजांना आता झटपट आपल्या पुढच्या मोहिमा हातावेगळ्या करायच्या होत्या. पुढचा प्लॅन अदिलशाहीवर हल्ला असा होता. महाराजांना कोकण किनारपट्टी, फोंडा, कारवार आणि कोल्हापूर जिंकायचं होतं. फोंड्याचा किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी अनाजींना पुढे पाठवले, कोल्हापूर जिंकायचं म्हणून दत्ताजींना पाठवले. महाराजांची ही सगळी तयारी जानेवारी, फेब्रुवारी १६७५ च्या दरम्यान पूर्ण झाली. तेव्हढ्यात महाराजांना खबर मिळाली की बहादूरखान झाल्या पराभवामुळे महाराजांविरुद्ध एक मोठी आघाडी उघडणार आहे. बहादूरच्या फौजेने फेब्रुवावरी १६७५ मध्ये भिवंडीवर हल्ला करून तिथली बरीच घरं जाळली. एव्हढी सगळी तयारी झाल्यावर जर आयत्या वेळी बहादूरखानाने म्हणजे मुघलांनीपण आघाडी उघडली तर दोन आघाड्यांवर प्रतिकार करणं कठीण होऊन बसेल हा विचार करून महाराजांनी या ‘पेंडीच्या गुरूंना’ पुन्हा एकदा गुंगारा द्यायचं ठरवलं.

शिवाजी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी लावली. महाराजांनी सांगितलं की “मी माझे १७ किल्ले मुघलांना देईन, याबदल्यात औरंगजेबाने संभाजी राजे यांना ६००० ची मनसबदारी द्यावी आणि मला औरंगाबादेपासून ते भीमेपर्यंतचा मुलुख द्यावा.” हे ऐकल्यावर बहादूरखानाला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. त्याला वाटलं मराठ्यांचा अभिषिक्त छत्रपती वगैरे सगळा सगळा खेळ झाला, याचा मुलगा आपला मनसबदार म्हणजे नोकर आणि याच्याशी आपला तह झाला की कुठे तोंड दाखवेल हा छत्रपती म्हणून? दुसरीकडे बहादूरच्या मनात हाही विचार आला कि शिवाजी महाराजांची फौज म्हणजे भुतं आहेत भुतं, कधीही कुठूनही येतात, दिवस नाही रात्र नाही. सहा महिन्यांपूर्वी झालेली स्वतःची फजिती त्याला चांगलीच आठवत होती. या अश्या भूतांशी कोण झगडा मांडेल. आणि जर समोरून शिवाजी महाराज तह करण्यासाठी पुढाकार घेत असतील तर संपलाच ना प्रश्न. एकाच घावात, तह झाल्याने हिंदवी स्वराज्याच सार्वभौमत्व संपेल, मराठी सैतानी भूतांशी लढाया कराव्या लागणार नाहीत आणि मुघलांचा मान अबाधीत पण राहील. बहादूरने लगेच या तहाला मान्यता मिळावी म्हणून औरंगजेबाकडे अर्ज पाठवला. आणि इथेच खरी गोम होती. यावेळी औरंगजेब पंजाबमध्ये होता. तिथून औरंगजेबाचं प्रत्युत्तर यायला किमान तीन महिने तरी लागणार होते. बहादूर औरंगजेबाकडे अर्ज पाठवून निश्चिन्त झाला.बहादूरखान पुन्हा फसला….

आणि महाराज लगेच कामाला लागले. पुढील काही दिवसात महाराजांनी फोंड्याचा किल्ला घेतला. आदिलशहाचा किल्लेदार महंमदखान फार चिवट होता, पण महाराजांनी अर्धा शेर वजनाची ५०० सोन्याची कडी तयार केली आणि आपल्या मावळ्यांना सांगितलं जी ५०० मंडळी पहिले गडावर पोहोचतील त्यांना हि मिळतील. मे १६७५ मध्ये गड फते झाला खासा किल्लेदार मुहंमदखान पकडला गेला. या आधी मार्च १६७५ मध्ये दत्ताजींनी कोल्हापूर घेतलं. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांचे काही भाग सोडता बाकी सगळी कोकणपट्टी मराठ्यांच्या राज्यात आली. महाराजांचा मनसुबा पुरा झाला.

इकडे जुलै १६७५ मध्ये, म्हणजे पाच महिन्यांनी औरंगजेबाने फर्मान पाठवलं. औरंगजेबाचा आनंद गगनात मावेना. मराठ्यांच्या अभिषिक्त छत्रपतीला आपल्या दूधभावाने तह करायला भाग पाडलं, त्याचा मुलगा आपला नोकर होणार कसला राजाभिषेक आणि कसला राजा एकदा शिवाजी महाराजांनी हे फर्मान स्वीकारलं की सगळा भातुकलीचा खेळ ठरेल, हा विचार करून आपल्या दूधभावावर बहादुरखानावर बेहद्द खुश होऊन औरंगजेबाने त्याची मनसब वाढवली आणि एक हत्ती त्याला भेट म्हणून पाठवला. बरोबर ‘मागील सगळ्या अपराधांची क्षमा केलेय’ असं फर्मान शिवाजी महाराजांवर बादशाही कृपा दाखवून पाठवलं. बहादूरला तर स्वर्ग अगदी दोन बोटांवर आला. महाराजांच्या वानरसेनेशी लढायला नको, मनसब वाढली आणि हत्ती मिळाल्याने फौजेत मान वाढला.

लगेच त्याने हे फर्मान राज्यांकडे पाठवलं. पाठवलं म्हणजे काय मुघलांच फर्मान स्वीकारायची काही औरच नाटकं असायची. हे फर्मान ज्याला दिलं असेल त्याने दोन कोस पायी चालत जाऊन हे फर्मान स्वीकारून, डोक्यावर घेऊन परत यायचं असला काहीतरी खुळचट प्रघात मोगलाईत होता. आणि झाली गम्मतच बहादुरखानाच्या वकिलांनी या बादशाही कृपा करणाऱ्या फर्मानाची खुशखबर शिवाजी महाराजांना जाऊन कळवली. महाराजांनी सगळं शांतपणे ऐकून प्रतिप्रश्न केला की “तुमच्या बहादूरखान साहेबांनी असा काय पराक्रमाचा दबाव आमच्यावर आणलाय म्हणून आम्ही लाचार होऊन हा असला अपमानास्पद तह तुमच्याशी करावा? बऱ्या बोलाने इथून निघून जा नाहीतर अपमान पावलं”. मुघलांच्यावर म्हणजेच बहादूरखान साहेबांवर एक सणसणीत चापरख बसली. स्वप्नरंजनातून बहादूर खाडकन जागा झाला.

शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा मुलुखही बळकावला, मुघलांना बेसावधही करून ठेवलं आणि शेवटी ठरलेल्या तहाला नकार देऊन बहादुरखानाच्या डोळ्यासमोर भरदिवसा काजवे चमकावले. बहादूरखानाला आता कुठे तोंड लपवू हे कळेना सगळ्यात गंमत म्हणजे बादशहाने भेट म्हणून दिलेला हत्ती आता बहादूरखानाला बघवत पण नव्हता. औरंगजेब तर रागाने वेडपिसाच झाला. अरे आम्हा मुघलांच फर्मान म्हणजे काय चेष्टा आहे का? जे डोक्यावर घेऊन भले भले मिरवतात त्या फर्मानाची एक साधा जमीनदार दखलपण घेत नाही? बहादरूखानावर तर तो खास चिडला की आज शिवाजी महाराज तह करून १७ किल्ले देणार म्हणतात, मुलाला शाही चाकरीत पाठवणार म्हणतात आणि उद्या सरळ मुकरतात? काय थट्टा लावलेय ही, फर्मान मागवून घेण्याआधी शहानिशा नाही का करवून घेता आली? बहादूरखान काय उत्तर देणार कप्पाळ? मागच्या जुलैत त्याचे आधीच एक करोड आणि घोडे गेले या जुलैत उरली सुरली इभ्रतसुद्धा गेली.

आता कोणी नुसतं खानाकडे पाहिलं तरी त्याला हे आपल्यालाच हसतायत खास असच वाटायला लागलं. अश्या प्रकारे महाराजांनी बहादुरखानालाच नाही तर औरंगजेबाला म्हणजे मुघलांना हे दाखवून दिलं कि मराठे सैनिकी कारवाईतच नाही तर मुत्सद्दीपणात सुद्धा कोणाहून कमी नाहीत. तुम्ही मला ‘सिवा’ म्हणा की जमिनदार म्हणा, तुमच्या मोगलाईत तुमची फर्मान डोक्यावर घेऊन लोकं नाचत असतील, पण मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्यात याची किंमत शून्य आहे. पेडगावात छावणी करून राहणाऱ्या या पेंडीच्या गुरूंना आणि त्यांच्या मालकांना महाराजांनी अश्याप्रकारे पेडगावचा शहाणा करून सोडलं. ‘बहुत काय सांगणे, आपण सुज्ञ असा’. धन्यवाद.

संदर्भ:
१. सभासद बखर
२. पत्रसारसंग्रह लेखांक
३. Shivaji and His Times

Leave a Comment