महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,529

बहादुरगड | Bahadurgad

By Discover Maharashtra Views: 4062 9 Min Read

बहादुरगड | Bahadurgad…

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीच्या उत्तरतीरावर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा किल्ला उभा आहे तो म्हणजे पेडगावचा उर्फ बहादूरगड(Bahadurgad) उर्फ धर्मवीरगड. श्रीगोंदापासुन पेडगाव हे अंतर साधारण १३ कि.मी. तर दौंडपासुन २१ कि.मी.आहे. भीमा व सरस्वती या दोन नद्यांच्या बेचक्यातील साधारण लंबगोलाकार आकाराचा बहादुरगड पुर्वपश्चिम पसरलेला असुन ९० एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेला आहे. गावात शिरल्यावर किल्ल्याचे विखुरलेले अवशेष दिसायला सुरवात होते. किल्ल्याला एकुण पाच दरवाजे असुन नदीच्या दिशेने एक चोरवाट आहे. यातील मुख्य प्रवेशमार्ग गावाच्या बाजूला आहे. किल्ल्याचे चार दरवाजे ढासळलेले असुन केवळ कमानी कशाबशा उभ्या आहेत तर नदीच्या बाजुस असणारा पाचवा दरवाजा त्यातील देवड्यांसह आजही सुस्थितीत उभा आहे पण तो दगड लावून बंद करण्यात आला आहे. यातील पहिला दरवाजा हा गावाच्या बाजुला, दोन दरवाजे पश्चिम दिशेला,एक दरवाजा नदीच्या बाजुला तर पाचवा दरवाजा किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला भवानी मंदिराच्या दिशेला आहे.

गावातील किल्ल्याचा दरवाजा इतर चार दरवाजापेक्षा आकाराने सर्वात जास्त मोठा असुन आत शिरण्यापूर्वी दरवाजाबाहेरच ७ फुट उंचीच्या मारुतीच्या मूर्तीचे दर्शन होते. दरवाजा शेजारील दोनही बुरूज ढासळलेले असुन आत शिरल्यावर लगेचच उजव्या बाजुला भैरवनाथाचे मंदिर तर डाव्या बाजूला उध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात. बहादुरगडावर साधारणपणे १३व्या शतकात बांधलेली पाच प्राचीन मंदिरे असुन हि मंदिरे अनुक्रमें भैरवनाथ-रामेश्वर-मल्लिकार्जुन-लक्ष्मीनारायण-बाळेश्वर या नावानी ओळखली जातात. ही सर्व मंदिरे काळ्या पाषाणात बांधलेली असुन यातील भैरवनाथ मंदीर स्थानिकांच्या ताब्यात तर उरलेली चार मंदीरे व किल्ला पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेत. सध्या भैरवनाथ मंदिराला गावकऱ्यांनी रंगरंगोटी केल्याने त्याचे मूळ सौंदर्य लयाला गेले आहे. उरलेली चार मंदिरे मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असल्याने डागडुजी केल्याने सुरक्षित स्थितीत आहेत. भैरवनाथ मंदिरासमोर अनेक शिल्प मुखवटे, वीरगळ, सतीशिळा पडलेली दिसतात. यात एक गजलक्ष्मीचे शिल्प असुन लोकांनी या शिल्पाला अबीर फासुन व तेल वाहुन शनिदेव बनविले आहे. मंदिरासमोर एक दिपमाळ असुन आजुबाजुला काही दगडी तोफगोळे पडलेले दिसतात. याशिवाय मंदिराशेजारी पुरातत्व खात्याने किल्ल्यावर सापडलेल्या मुर्ती व इतर अनेक अवशेष एका ठिकाणी जमा करून ठेवले आहेत. हे सर्व पाहून समोर तटबंदीकडे जाणारा रस्ता धरायचा.

किल्ल्याची दक्षिणेकडील तटबंदी भीमा नदीला समांतर आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तू आज उद्‌ध्वस्त झालेल्या असुन वाटेत झाडीझुडपांत लपलेले अनेक घरांचे, वाड्यांचे अवशेष दिसतात. किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी सुस्थितीत उभी असून सर्वत्र काटेरी रान माजलेले आहे. भैरवनाथ मंदिरांपासुन थोडे अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजुला सर्वप्रथम उध्वस्त रामेश्वर मंदीर व पुढे पडझड झालेले मल्लिकार्जुन मंदिर दिसते. पुढे काही अंतरावर हत्तीमोटेची इमारत असुन या इमारतीसमोर किल्ल्यातील उर्वरीत दोन मंदिरे दिसतात. हत्तीमोटेची इमारत हि या किल्ल्यातील सर्वात उंच इमारत असुन तेथुन संपुर्ण किल्ला व परीसर पहाता येतो. येथुन किल्ल्यासाठी वापरण्यात आलेली पाणीपुरवठा योजना आपल्याला ठळकपणे दिसुन येते. भीमा नदीच्या पात्रातील पाणी सर्वप्रथम लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागे असलेल्या खंदकात उचलले जात असे. तेथुन ते मोटेने उचलुन खापरी नळाच्या सहाय्याने हत्तीमोटेच्या खाली असणाऱ्या हौदात आणले जात असे व तेथुन पुन्हा हत्तीमोटेच्या इमारतीवर उचलुन खापरीनळाच्या सहाय्याने संपुर्ण किल्ल्यात फिरवले जात असे.

किल्ल्यात फिरताना ठिकठिकाणी आपल्याला या खापरी नळाच्या वरील बाजुस हवेसाठी बांधलेले उछवास पहायला मिळतात. हि योजना आजही कार्यरत करता येईल इतकी स्पष्ट आहे. हत्तीमोटेसमोर असलेले लक्ष्मीनारायणाचे मंदिर आजही चांगल्या अवस्थेत असुन आत शिवलिंग आहे. मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मुर्ती पाहण्याजोग्या आहेत. याच्या समोरील बाळेश्वर मंदिर मात्र अर्धवट ढासळलेल्या अवस्थेत असुन याच्याही आत शिवलींग आहे. एकंदरीत पहाता किल्ल्याच्या आतील पाचही मंदीरे आजही प्रेक्षणीय आहेत. बाळेश्वर मंदिराच्या बाजूला तटबंदीला लागुन एका वाड्याचे अवशेष दिसतात. मंदिरांच्या मागील बाजूला तटबंदीबाहेर भीमा नदी असुन किल्ल्याची या भागातील तटबंदी काही प्रमाणात ढासळली आहे. लक्ष्मीनारायण मंदिरापासून थोडे अंतर चालून गेल्यावर बालेकिल्ल्याची तटबंदी व प्रवेशव्दार लागते. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजुस पडझड झालेली कचेरीची वास्तू दिसते.

प्रवेशव्दारातुन आत शिरल्यावर समोरच राजदरबार व अनेक वाड्यांचे चौथरे दिसतात. या ठिकाणी औरंगजेब आणि संभाजीराजांची भेट झाल्याची शक्यता वर्तविली जाते. राजदरबाराच्या मागील बाजुस तटबंदीला लागुन असलेले दुमजली महालाचे बांधकाम पाहण्यासारखे आहे. याला चुन्याचा गिलावा करण्यात आला असुन इथेच औरंगजेबाचा मुक्काम असल्याचे सांगितले जाते. या महालाच्या खिडक्यांमधून भीमा नदीचा सुंदर देखावा दिसतो. या महालाशेजारी हमामखाना असुन महालाच्या खालील बाजुस भीमानदीच्या पात्रात बोटीसाठी बांधलेला धक्का दिसुन येतो. येथुन तटबंदीच्या कडेने पुढे गेल्यास आपल्याला तटबंदीत असलेला व दगडाने बंद केलेला नदीच्या दिशेने असलेला सुस्थितीतील दरवाजा दिसतो. येथुन पुढे तटबंदीबाहेर भवानीदेवीचे मंदिर आहे. गडाच्या पुढील भागातील तटबंदीतुन तेथे जाण्यास दरवाजा आहे पण या भागात प्रचंड प्रमाणात काटेरी झुडुपे वाढलेली असल्याने आपल्याला या दरवाजापर्यंत पोहोचता येत नाही. या मंदिरात जाण्यासाठी गडाबाहेर पडुन संपुर्ण तटबंदीला वळसा घालुन तेथे जावे लागते. भवानीदेवीचे मंदिर एका चौथऱ्यावर उभे असुन त्याच्या कळसाचे बांधकाम मध्ययुगीन मुस्लीम शैलीत आहे. मंदिराला स्वतंत्र अशी तटबंदी असुन चार टोकाला चार बुरूज आहेत. गडावर मुक्काम करायचा असल्यास हि जागा योग्य आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. संपूर्ण किल्ला व परीसर फिरण्यास ४ तास लागतात. बहादूरगड पाहून आपल्याला या भागातील सिध्दटेकचा गणपती आणि राशीनचे मंदिर व हलते मनोरे पहाता येतील.

बहादूरखानाने हा किल्ला बांधला आणि त्याला बहादूरगड हे नाव दिले असे दिसत असले तरी किल्ल्यातील पाच प्राचीन मंदीर समुह पहाता हा किल्ला आधीपासुन अस्तित्वात असावा व बहादुरखानाने त्याची पुनर्बांधणी केली असावी असे वाटते. गडावरील प्राचीन अवशेष पहाता पेडगावचा भुईकोट १३व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधला गेला असावा. शिवाजी महाराजांचे आजोबा वेरूळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट मोकास होता. निजामशाहीच्या काळात पेडगाव हे महत्त्वाचे केंद्र होते. येथून बावन्न परगण्यांचा कारभार चालत असल्याच्या काही ऐतिहासिक नोंदी सापडतात. कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार व औरंगजेबाचा दूधभाऊ बहादुरखान ज्याला कोकलताश अशी पदवी होती त्याने १६७२ साली भीमा नदीच्या काठावर पेडगाव येथे वास्तव्यास असताना या किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याला बहादुरगड असे नाव दिले असावे. हा किल्ला बराच काळ पुणे प्रांतातील मोगल सैन्याची युध्दसामुग्री साठवण्याचे मुख्य ठिकाण होते. बहादुरगड हे किल्ल्याचे प्रचलित नाव असले तरी ब्रिटीश गॅझेटीअरमध्ये या किल्ल्याची नोंद पेडगावचा भुईकोट अशी आहे.

बहादूरगड छत्रपती शिवाजी महाराजांनी बहादुरखानाच्या केलेल्या फजितीसाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बहादूरखानाने बहादूरगडामध्ये् शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरबी घोडे औरंगजेबाकडे पाठवण्यासाठी गोळा केले असल्याची माहिती महाराजांच्या गुप्तहेरांनी आणली. शिवाजी महाराजांनी नऊ हजारांचे सैन्य बहादूरगडावरील खजिना लुटण्यासाठी पाठवले. या सैन्याच्या दोन तुकड्या तयार करण्यात आल्या. एक दोन हजाराची तर दुसरी सात हजारांची. दोन हजारांच्या तुकडीने बहादूरगडावर जोरदार हल्ला केला व गडबड उडवून बहादूरखानला किल्ल्याबाहेर काढले व माघार घेवून पळायला सुरवात केली. बहादूरखानाला हुलकावणी देत खूप लांबवर आणल्यावर मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला. गडामधे असणारा खजिना आणि घोडे ताब्यात घेवून मराठयांनी रायगडाकडे कूच केली. बहादुरखान पाठलागावरून परतल्यावर त्याला शाही खजिना लुटल्याची बातमी कळली व मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आपली इभ्रत वाचवून त्याला गप्प बसावे लागले.

१ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजीराजे कोकणात संगमेश्वर येथे आले असता गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. मराठयांचे संख्याबळ कमी असल्याने प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे हल्ला परतवू शकले नाहीत व संभाजीराजे व सोबत कवि कलश जिवंत पकडले गेले. संभाजीराजे व कवि कलश यांना बहादुरगड येथे आणण्यात आले. यावेळी औरंगजेबाने आपली अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. संभाजीराजे आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून त्यांची मानहानीकारक धिंड काढुन त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. त्यांना स्वराज्य, खजिना व किल्ले मोंगलांच्या ताब्यात देण्यास सांगितले पण संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. औरंगजेबाने त्यांचे डोळे काढण्याचा हुकुम दिला. या सर्व शिक्षा आधी कवी कलश यांच्यावर करून नंतर त्या राजांना दिल्या जात होत्या. त्यानंतर दोघांचीही जीभ छाटण्यात आली व शेवटी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. संभाजी राजांच्या ह्या बलीदानाला हा किल्ला साक्षीदार ठरला पण त्याबद्दल इथे काहीही माहिती मिळत नाही. नंतर त्यांना पेडगावहून भीमा- इंद्रायणी संगमावरील तुळापुर वढू येथे नेउन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या देहाची विटंबना करून त्यांचे अवशेष नदीपात्रात टाकण्यात आले. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी धर्मनिष्ठा सोडली नाही.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment