महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,855

बहादूरशाह जफर, शेवटचा मुघल बादशाह

By Discover Maharashtra Views: 1563 8 Min Read

बहादूरशाह जफर, शेवटचा मुघल बादशाह –

दुपारचे ४ वाजले होते. पावसाळा संपला होता. नोव्हेंबर १८६२ सालचा तो गारठाट हिवाळ्याच्या दिवस होता. रंगून मध्ये ब्रिटिशांची एक तुकडी एका कैद्याचे धडगे घेऊन तुरुंगाच्या मागच्या बाजूस यायला निघाली होती. तुरुंगाच्या भिंतींच्या पलीकडे रंगून नदी संथ वाहत होती. तुरुंगाच्या भिंतींभोवती किल्ल्याचा जो भाग होता जो ब्रिटिशांनी १० वर्षांपूर्वीच जिंकून जाळून टाकला होता. ज्या मृत कैद्याला आणले जात होते त्यावेळी सैनिकांबरोबर त्या कैद्याची २ मुलं आणि एक मुल्लाही येत होता.(बहादूरशाह जफर)

बायकांना तिथे येण्यास परवानगी नव्हती. इतर रंगूनचे रहिवासी त्या राज कैद्याला शेवटचे पाहण्यासाठी आणि वंदन करण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर गर्दी करून होते. परंतु ब्रिटिश सैनिकांनी वाट रोखून धरली होती. ब्रिटिशांनी सर्व तयारी आधीच करून ठेवली होती. दफनाचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी लवकरात लवकर आटोपला आणि दफनाच्या ठिकाणाची जागा भविष्यात कोणाला कळू नये म्हणजेच शव सुद्धा सापडू नये म्हणून तसा बंदोबस्तही करून ठेवला.

ते शव होते शेवटचा मुघल बादशाह बहादूरशाह दुसरा याचे आणि त्याची २ मुलं म्हणजे मिर्झा जवान बख्त आणि मिर्झा शाह अब्बास. बहादुरशहा हा तैमुर, अकबर, शाहजहान यांचा थेट वंशज. तो जफर म्हणजे विजय या नावाने प्रसिद्ध होता. त्याचा जन्म १७७५ रोजी झाला. त्याच्या वडिलांचा म्हणजे अकबरशाह दुसरा याचा तो सगळ्यात मोठा मुलगा. बहादुरशहा च्या जन्माच्या वेळी ब्रिटिश हे त्यातल्या त्यात विनम्र होते ज्यांना तेव्हा तरी राजकारणात म्हणावा तसा रस नव्हता.(संधी मिळत नव्हती.) परंतु पुढे हळू हळू ब्रिटिशांनी स्वतःचे रंग दाखवायला सुरवात केली. आणि बहादूरशाह जेव्हा त्याच्या साठीत बादशाह बनला तेव्हा ब्रिटिशांना पूर्णपणे हाकलून देणे हे केवळ अशक्य बनले होते.

परंतु असे असून सुद्धा बहादूरशाहने राज्यात आपला चांगला जम बसवला होता. दिल्ली दरबारात अनेक विद्वानांची नेमणूक केली होती. तो स्वतः एक उत्तम कवी होता. मिर्झा गालिब, झाउक सारख्या अनेक कवींना, गझलकारांना त्याने संधी दिल्या. त्याने फक्त उर्दू आणि पर्शियन मध्ये नाही तर ब्रज भाषा आणि पंजाबीतही कविता केल्या आहेत. याचबरोबर तो एक चांगला कॅलिग्राफर, सुफीलेखक आणि वास्तुविशारद होता.

१८५० पर्यंत ब्रिटिशांनी त्याचे बरेच हक्क काढून घेतले होते. त्याचे नाण्यांवरून नाव काढून टाकले होते, मुख्य दिल्लीचा कारभारही त्याच्या हातून काढून घेतला होता. स्वतःच्या घरातून म्हणजेच लाल किल्ल्यातून त्याला बाहेर काढले होते. समकालीन ब्रिटिश लेखक लिहितो की एवढे मानसिक छळ बहादूरशाहने काहीही न बोलता सहन केले. तो शेवटपर्यंत पूर्णपणे निष्पाप राहिला.

बहादूरशाहचा परिवार –

बहादूरशाह जफरला ताज महल बेगम आणि झीनत महल बेगम अशा २ बायका आणि १६ मुलगे(अनौरस धरून) होते. तो जेव्हा १८३७ साली बादशाह बनला तेव्हा ताज महल बेगम त्याची मुख्य पत्नी होती. त्याने १८४० साली ६४ वयाचा असताना १९ वर्षाच्या झीनत महल बेगमशी लग्न केले. पुढे तिला मुख्य बेगम बनवून ताज महल बेगमला विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा संशयावरून कैदेत टाकले आणि स्वतःचा १५वा मुलगा मिर्झा जवान बख्त(झीनत महल चा मुलगा) याला युवराज घोषित केले.

उठाव –

पुढे मे महिन्यात १८५७ चा उठाव सुरू झाला. मेरठ वरून ३०० सैनिक दिल्लीत आले आणि दिसतील त्या ख्रिश्चनांना मारायला,कापायला सुरवात केली. या बंडखोर सैनिकांनी मुघल बादशाह बहादूरशाह जफर याला आपला नेता बनवला. अगदी सुरवातीपासूनच हा उठाव यशस्वी होऊ शकत नाही हे माहीत असून सुद्धा बहादूरशाह जफरने ब्रिटिशांच्या त्रासाला कंटाळून उठावाचे नेतृत्व स्वीकारले. मुघलांची राजधानी असलेल्या दिल्लीचे पुन्हा एकदा रणांगणात रूपांतर झाले. उपस्थित असलेल्या ३०० बंडखोर सैनिकांच्या मदतीला इतर कोणत्याही देशाचे,राज्याचे सैन्य नव्हते. म्हणावा तसा पैसा नव्हता, दारुगोळा नव्हता. पुढे काही दिवसातच दिल्लीत उपासमार सुरू झाली. असे खचलेले सैन्य ब्रिटिशांच्या बलाढ्य सैन्यापुढे किती दिवस टिकेल? १४ सप्टेंबर १८५८ रोजी ब्रिटिश सैन्य शीख आणि पठाणांच्या मदतीने दिल्लीत घुसले. लूटमार सुरू झाली. कापाकापी सुरू झाली. दिल्लीच्या एका मोहल्यामधेच १४०० नागरिकांचे प्राण गेले.

एडवर्ड व्हायबर्ट नावाचा १९ वर्षाचा ब्रिटिश अधिकारी तिथे उपस्थित होता. हो ह्या हत्याकांडाचं वर्णन करतो की,

>”it was literally murder… I have seen many bloody and awful sights lately but such a one as witnessed yesterday, I pray I never see again.”

म्हणजेच, हे अक्षरशः खून होते… मी हल्ली बरीच रक्तरंजित आणि भयानक दृश्ये पाहिली आहेत पण काल जे मी पाहिले आहे ते मला पुन्हा कधीच पहायला मिळू नये अशी मी प्रार्थना करतो.

मिर्झा गालिब जो तेव्हा दिल्लीमध्येच राहत असे त्याच्या पत्रांवरून त्यावेळची दिल्लीतील सामान्य लोकांची परिस्थिती दिसून येते.

तो लिहितो,

>गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील प्रत्येक घराचा, दुकानाचा दरवाजा बंद आहे. दुकानात ना विक्रेते आहेत ना खरेदी करणारे. असा एकही गहूपीठ विक्रेता नाही ज्याच्याकडून आम्ही पीठ घेऊ शकू. एकही धोबी नाही ज्याच्याकडून आम्ही कपडे धुऊन घेऊ शकू. केस कापण्यासाठी एकही नाव्ही नाही आणि घराच्या साफसफाई साठी कोणी कामगार नाही. मी आधी लिहिल्याप्रमाणे या ५ दिवसात आम्हाला पीठ आणि पाणी आणण्यासाठी कधी कधी जायला मिळत होते पण तेही नंतर अशक्य झाले कारण गल्लीचा दरवाजा दगडांनी बंद केला गेला होता. आमचे सर्व प्रयत्न आता थंड पडले आहेत आणि दुःख आमच्या रक्तात अग्निसारखे जळत आहे.

बहादूरशाह जफर आणि त्याच्या परिवाराने आत्मसमर्पण केलं. बादशहाच्या बहुतेक सर्व १६ मुलांना पकडलं गेलं. पुढे फासावर लटकवलं गेलं. बादशहाची २ मुले आणि १ नातू अनुक्रमे मिर्झा मुघल, मिर्झा खिज्र सुलतान आणि मिर्झा अबू बक्र यांना नागडं करून गोळ्या मारण्यात आल्या.

ब्रिटिश कॅप्टन विल्यम हॉडसन ज्याने हे सर्व केलं तो त्याच्या बहिणीला पत्र लिहिताना म्हणतो की,

>In 24 hours, I disposed of the principal members of the house of Timur the Tartar. I am not cruel but I confess I did enjoy the opportunity of ridding the earth of these wretches.

बहादूरशाहला एका तुरुंगात सगळ्यांसमोर कैदेत ठेवण्यात आले. त्यावेळी तिथे आलेला ‘द टाइम्स’ चा पत्रकार लिहितो की,

>”त्याच्या(बादशहाच्या) तोंडून एक शब्दही निघत नव्हता. अशाच शांततेत त्याने दिवस रात्र घालवले. त्याचे डोळे निरस दिसत होते आणि नेहमी जमिनीच्या दिशेने खाली असायचे. तुरुंगाच्या खोलीत बसण्यासाठी असलेल्या चारपाय व्यतिरिक्त काहीच नव्हते. काही जणांनी त्याला स्वतःच रचलेल्या कवितेच्या पंक्ती गुणगुणताना, भिंतीवर जळक्या काठीने लिहिताना ऐकले, पाहिले. एवढे छळ होत असताना सुद्धा बादशहाच्या चेहऱ्यावर राजा डेव्हिड प्रमाणे तेज होतं. असा हा बादशाह ईस्ट इंडिया कंपनीच्या कैदेत आहे ज्या कंपनीला याच्या पूर्वजाने शाह आलम ने १७६५ साली बंगाल, बिहार आणि ओडिसाचे अधिकार दिले होते.”

पुढे एका महिन्याने बहादूरशाह जफर वर गुन्हा दाखल झाला. त्याला दिल्लीतून हाकलण्यात आलं आणि रंगून येथे तुरुंगात ठेवण्यात आलं. पुढे याच तुरुंगात ७ नोव्हेंम्बर १८६२ साली ८७ वर्षीय शेवटच्या मुघल बादशाहचे निधन झाले.

बहादूरशाह च्या मृत्यूनंतर त्याच्या दरबारातील विद्वान, कवी, राजकुमार, व्यापारी अशा सगळ्यांनाच शोधून शोधून पकडण्यात आले. काहींना फाशी दिली गेली. काहींना नव्याने बांधलेल्या अंदमान येथील तुरुंगात पाठवले गेले. ज्यांना जीवदान दिले त्यांची सगळी संपत्ती वगैरे काढून घेतली गेली. त्यांना भिकारी बनवलं गेलं. (मिर्झा गालिब हे अशा प्रकारे गरिबीला सामोरे गेले.)

बादशहाच्या घराण्यातील ज्या वृद्ध स्त्रिया होत्या त्यांना वेश्यालयांचे प्रमुख केलं गेलं. ज्या तरुण स्त्रिया होत्या त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं गेलं. घराण्यातील पुरुषांपैकी जे कोणी उरले होते त्यांना ५ रुपये महिना पेन्शन चालू केली.

चित्र – दिल्लीमधून रंगून तुरुंगात जाण्याआधी शेफर्ड द फोटोग्राफर याने काढलेला बहादूरशाह जफर चा फोटो.

संदर्भ –
The Last Mughal -William Dalrymple.
My Diary in India – In the year 1858–59 – William Russell.
Dastanbuy – The diary of the Indian revolt of 1857 – Mirza Ghalib – translated by Khwaja Ahmad Faruqi.

©ओंकार ताम्हनकर

Leave a Comment