महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,06,598

गुप्तहेर बहिर्जी नाईक | शिवरायांचे शिलेदार

By Discover Maharashtra Views: 7812 6 Min Read

गुप्तहेर बहिर्जी नाईक | शिवरायांचे शिलेदार

स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.गुप्तहेर बहिर्जी नाईक.

छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव प्रसिद्धीस आले ते म्हणजे बहिर्जी नाईक यांचे. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक होते.

दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.

बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.

महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.

शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.

राजगडापासून जवळपास ५०० कि.मी. अंतरावर असणारी सुरत हि व्यापारी पेठ लुटण्याचे ठरताच सुरतेची संपूर्ण माहिती, एवढेच नव्हे तर कुठे निश्चितपणे भरपूर धन हाती लागेल अशा सुरतेमधील ठिकाणांची तपशीलवार माहिती आणण्याच्या कामी महाराजांनी बहिर्जी यांना पाठविले. अचूक योजनेसाठी लागणारी अचूक माहिती बहिर्जी नाईकांनी किती कसोशीने मिळविली हे सुरतेची केवळ पाचच दिवसात लुटलेली कोट्यावधींची संपत्ती सांगते. या माहितीसाठी बहिर्जींनी कुठली सोंगे घेतली, गुप्त जागी ठेवलेल्या धनाचा पत्ता कसा लावला हे आजही आपल्यासून गुप्त आहे.
१६७९ साली जालानापूर लुटून महाराज येत असताना ती बातमी लागून संगमनेराजवळ मोगली सैन्याने मराठ्यांना गाठून कोंडीत पकडण्याची वेळ आणली होती. या भागातील डोंगरातील गुप्त वाटांची माहिती असणाऱ्या बहिर्जी नाईकांनी महाराजांना लुटीसह सुरक्षितपणे पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर पोहचविले.

हेर हे राजाचे डोळे आणि कान असतात हि म्हण सार्थ करणारे बहिर्जी नाईक महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमांमागे,धाडसी हल्ल्यांमागे, दूरवरच्या प्रदेशात अचानक जाउन केलेल्या लुटीमागे आणि सुखरूप परत येण्यामागे असणारी कल्पक, चतुर, प्रसंगावधानी आणि हरहुन्नरी व्यक्ती.
अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.
संभाव्य समाधीस्थान – बाणूरगड (भूपाळगड), ता. खानापूर, जि. सांगली…

माहिती साभार – The Great Maratha Warriors Facebook Page

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment