स्वराज्याचा तिसरा डोळा
छत्रपती शिवाजी महाराजांनी म्लेंच्छ पातशाह्या उलथून टाकत हिंदवी स्वराज्य उभे केले. आणि या अत्यंत दिव्य अशा कार्यात त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे या बारा मावळातील निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन स्वराज्यासाठी.
अर्थात हिंदवी स्वराज्याच्या शूर मावळ्यांचे कार्य जाणून घेत असताना इतिहास आपल्यासमोर अशा एका अज्ञात शिलेदाराला समोर आणतो ज्याचे नाव संबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे परंतु त्यांचे कर्तृत्व आजही इतिहासाच्या पानांमध्ये कैद आहे. हे शूर मावळे म्हणजेच एक निष्णात बहुरूपी अन शिवरायांच्या हेरखात्याचे प्रमुख, स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून संबंध देशात ज्यांची ओळख आहे असे “बहिर्जी नाईक.”
छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक होते. गुप्तहेर खात्याच्या साहाय्याशिवाय गणिमाच्या मुलखात मोहिमा करणे म्हणजे दुर्लभ कार्य. कारण गणिमाच्या गोटातील इत्यंभूत हालचाली, त्या प्रदेशातील महत्वाची ठाणी, शत्रू सरदारांची कमकुवत स्थाने, आणि युद्धप्रसंगी अत्यंत महत्वाची ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट शोधण्याचे काम गुप्तहेर खाते करीत असे. म्हणजे एखाद्या युद्धाच्या विजयाचा पायाच रचने जणू गुप्तहेर खात्याचे काम.
बहिर्जी नाईकांचा इतिहास
बहिर्जी नाईक यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात खुपच कमी संदर्भ आहेत. बहिर्जी नाईक यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील बाभुळगाव. शिवाजीराजांनी अठरापगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणाऱ्यास शिवरायांनी इनाम जाहीर केले, तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात. तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत सुरुवातीपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित.
बहिर्जी नाईकांचे कार्य
शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली तेव्हापासून शिवरायांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते जवळपास १६८८ पर्यंत स्वराज्याची सेवा केली. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. शत्रूच्या गोटात जाऊन आपल्या शब्दांनी समोरच्याच्या काळजाचा वेध घेऊन नकळत त्याच्याकडून हवी ती माहिती काढून घेण्याचे असामान्य कसब हे बहिर्जी नाईक यांच्याकडे होते. त्याचबरोबर बहिर्जी नाईकांना अनेक जाती अन धर्मांचे रीतिरिवाज ठाऊक होते. चक्क विजापूर दरबारी तसेच आग्रा दरबारी वेषांतर करून बहिर्जी वावरत असत. या लांडग्यांच्या कळपात भेदक नजर असलेले हे लांडगे कधीच बहिर्जीना ओळखू शकले नाहीत वा बहिर्जीनी कधी तसा कधी संशय सुद्धा येऊन दिला नाही. यावरूनच आपणाला त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचा अंदाज येतो.
स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे नियम देखील खूपच कडक अन शिस्तबद्ध होते. जर एखाद्याने दिलेली माहिती खोटी निघाली तर त्याचा कडेलोट केला जाई त्यामुळे गुप्तहेर खात्याची कार्यक्षमता ही वाखाणण्याजोगीच होती. बहिर्जी नाईकांनी आपल्या गुप्तहेर खात्यातील सहकार्यांसाठी विशिष्ट अशी सांकेतिक भाषा विकसित केली होती जी फक्त त्या खात्यातील हेरांनाच समजत असे त्यामुळे कोणतीही खबर आणताना कमालीची गुप्तता पाळली जायची. बहिर्जी नाईक हे अनेक पशु व पक्षांचे आवाज हुबेहूब काढण्यात निपुण होते, त्याचा उपयोग ते विशिष्ट सांकेतिक संदेश देण्यासाठी करत असत. बहिर्जी नाईक हे कोणताही वेष घेऊन शिवरायांसमोर आले तरी राजे त्यांना नेहमीच ओळखत असत. पण बाकी कोणालाच बहिर्जी ओळखू येत नव्हते. बाकी लोकांना जणू वाटे बहिर्जी नाईक म्हणून कोणी इसमच नाही एवढ्या गुप्ततेने ते वावरायचे. आता जर स्वराज्यातील लोकांनाच ओळखता येत नसतील तर गनिमाची बातच सोडा.
बहिर्जी नाईक हे शत्रूच्या गोटात जाऊन माहिती काढण्यात पटाईत होतेच पण त्याचबरोबर तलवारबाजी, दांडपट्टा यात पण निपुण होते. कारण गुप्तहेर फक्त चलाख असून चालत नाही, शत्रूच्या गोटात असताना कितीतरी वेळा मरणाशी झुंज देण्याचा प्रसंग अंगावर येऊ शकतो त्यामुळे हत्यारबाजीचे पण कसब लागतेच. अन बहिर्जी नाईक याच्याच बळावर अटीतटीच्या वेळी शत्रूला धूळ चारायचे. शत्रूपक्षात एखादी आवई उठवण्यात आणि शत्रूला चुकीची माहिती देण्यात बहिर्जी खूप पटाईत होते.
आग्रा भेट
औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसासाठी शिवराय अन शंभूराजे काही निवडक सहकाऱ्यांसह जेव्हा आग्ऱ्याला गेले होते त्याआधी काही दिवस गुप्तहेर खात्याचे लोक आग्ऱ्यात दाखल झाले होते आणि आग्र्यातील तसेच दिल्ली दरबारातील अनेक महत्त्वाच्या खबरा ते वेळोवेळी महाराजांना देत असत. जवळपास ४०० ते ५०० हेर त्यावेळी वेषांतर करून आग्ऱ्यात वावरत होते. काहींनी भिकाऱ्याचे रूप घेतलेले, काही चपला शिवणारे, तसेच कोणी छत्र्या नीट करणारे, कोण भोई झाले होते असे वेगवेगळ्या रुपात स्वराज्याचे हेर बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली आग्ऱ्यात वावरत होते. औरंगजेबाच्या दरबारापासून कुंभाराच्या वाड्यापर्यंत असे अनेक हेर जागोजागी कार्यरत होते. शिवरायांच्या आग्रा भेटीवेळी शिवरायांनी आग्ऱ्यात १०० भुतांची एक टोळी पाठवली आहे अशी आवई उठवून तिथल्या शत्रू सैन्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य बहिर्जी नाईक यांनी केले होते. तसेच शिवराय अन नंतर शंभूराजे राजगडाकडे जाताना वाटेच्या सुरक्षिततेची हमी सुद्धा बहिर्जींनी घेतली होती.
अफजलखान ची स्वारी
सन १६५९ साली जेव्हा विजापूरच्या आदिलशहाचा बलाढ्य सरदार अफजलखान स्वराज्यावर चालून आला होता त्यावेळी खान विजापूरहून निघाल्यापासून बहिर्जी त्याच्यावर पाळत ठेऊन होते. अफजलखान हा महाराजांना ठार मारणार आहे हा निरोप सुद्धा राजांना बहिर्जी नाईक यांनी दिला. जेव्हा अफजलखान स्वराज्यावर चालून आलेला तेव्हा बहिर्जी नाईक यांनी विश्वास दिघे यांच्यासोबत अनेक गुप्त खबरा राजांना दिल्या. दिघे यांना त्यांनी खानाच्या भटारखान्यात पेरले होते. तसेच पंढरपूरच्या मंदिरात फकीर बाबा बनून जाणारे अन लोकांचा आत्मविश्वास जागा करणारे देखील बहिर्जीच होते. त्याचबरोबर आपल्या सैन्याची पराभूत मानसिकता बदलण्यासाठी शिवरायांनी आपल्या तलवारीत आई भवानीने प्रवेश केला अशी आवई पसरवायचे ठरवले, तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईकांनी ही जबाबदारी सहजरित्या पार पाडून सगळ्या सैन्यात ही खबर पेरली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदळ, हत्ती, तोफा-दारूगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली. तसेच शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
जेव्हा शाहिस्तेखान लाखाच्या वर फौज घेऊन स्वराज्यावर चालून आलेला तेव्हा त्याने पुण्याच्या लाल महालात ठाण मांडली होती. तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक यांनी दौलतखान ला सोबत घेऊन वेषांतर करून खानाच्या जनानखान्यापासून ते माळ्याच्या घरापर्यंत सगळी माहिती राजांना पुरवली. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे अशी सर्व माहिती बहिर्जींनी राजांना दिली.
तो कारतालब खान जेव्हा बोरघाटातून पुण्याकडे निघाला अन राजांनी पेणच्या अवतीभवती आपले सैन्य जमवायला सुरुवात केल्याची बातमी खानाकडे आली. खानाचा प्रवास बोरघाटमार्गेच सुरू झाला, पण अचानक लोणावळ्याकडे न जाता तो थोडासा दक्षिणेकडे वळला. त्याचवेळी बहिर्जी नाईक यांनी खान बोरघाटातून न येता उंबरखिंडीतुन येतोय ही खबर राजांपर्यत पोचवली. आणि राजांनी उंबरखिंडीत जंगलात आपले सशस्त्र सैन्य पेरले व त्या चिंचोळ्या वाटेत खानाची कोंडी केली अन खान सपशेल पराभूत झाला.
तसेच ज्यावेळी राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा राजे व सिद्दीच्या बातम्या अर्थातच गुप्तहेरांमार्फत म्हणजेच बहिर्जी नाईक यांच्यामार्फत त्यांना हव्या तशा आणि हव्या तिथे पोहोचवल्या जात होत्या. यात राजांनी दोन गोष्टी साधल्या. जौहरला बेसावध ठेवून पळून जाण्याचा मार्ग प्रशस्त केला आणि त्याच वेळी आदिलशाहा व जौहरमधे फूट पडली. या साऱ्या राजकारणाचा परिणाम म्हणजे पुढे आदिलशाहाने विषप्रयोगाने जौहरचा खून केला.
महाराजांनी तीनवेळा सुरत लुटली, औरंगजेबाचे जणू नाक त्यावेळी महाराजांनी कापले. सुरतेच्या लुटीवेळी म्हणजे स्वराज्यापासून(राजगडापासून) जवळपास १५० कोस एवढं लांब अंतर असलेल्या सुरत या व्यापारी ठाण्याची इत्यंभूत माहिती बहिर्जींनी राजांना दिली. त्यावेळी बहिर्जी नाईक भिकाऱ्याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच, संपत्तीच्या ठावठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी गोळा करून राजांना दिली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार ) जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळले तेव्हा त्यांची भीतीने घाबरगुंडी उडाली.
तसेच शिवरायांच्या निधनानंतर सुद्धा संभाजी राजांसोबत अनेक मोहिमांमध्ये बहिर्जी नाईकांनी महत्वाची भूमिका बजावली.
बुऱ्हाणपूर लुटीच्या वेळी तेथील बहादूरपुर्यासह बाकी सतरा पुऱ्यांची तसेच तिथल्या धनाची जशीच्या तशी माहिती बहिर्जींनी संभाजी राजांपर्यंत पोचवली. येण्या-जाण्यासाठी कोणता मार्ग वापरावा, जाताना पर्यायी मार्ग काय असावेत हे बहिर्जीनी अगोदरच ठरवून ठेवलेले. तसेच लुटीच्या अगोदर काकरखान च्या मनात धडकी भरवण्याचे काम बहिर्जींनी चोख पार पाडले.
संभाजी राजांनी जेव्हा जंजिऱ्याचा मोहीम हाती घेतली अन कोंढाजी बाबा फर्जंद यांना जंजिऱ्यावर पाठवले तेव्हा बहिर्जी नाईकांनी रायगडावरून जंजिरा तसेच जंजिऱ्यावरुन रायगडावर अशा वेळोवेळी खबरा पोचवल्या.
रामशेजची ऐतिहासिक झुंज सुरू असताना किल्लेदार व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यामध्ये दुवा बनून बहिर्जींनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. रसद कोणत्या मार्गे पोचवावी, खानाच्या सैन्याला कसा गुंगारा द्यावा याबद्दल सर्व खबरा बहिर्जींनी पोचवल्या.
संभाजीराजे जेव्हा दिलेरखानाकडे गेले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक हे वेषांतर करून सावलीसारखे संभाजी राजांसोबत होते. ते परत येताना देखील बहिर्जींनी मोलाची भूमिका बजावली.
तत्कालीन काळात कोणत्याही तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, शत्रूच्या परिसरातील भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाची’ एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही तत्कालीन काळातील सर्वश्रेष्ठ हेरयंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता? औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते. इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते ‘बहिर्जी नाईक.
आपल्याकडे पूर्वीपासूनच रिवाज आहे, आपण कायम नायक म्हणजे हिरोलाच सगळं श्रेय देतो, त्यालाच डोक्यावर घेऊन नाचतो. सहाय्यक असतो त्याच कार्य कधीच आपल्याकडे लक्षात ठेवले जात नाही. त्याचप्रमाणे गुप्तहेर म्हणजेच सहाय्यक मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसते, प्रसिद्धीचे वलय त्यांच्याभोवती कधीच नसते. कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात, सगळं एकदम गुप्तपणेच साधावे लागते. सेनानी लढाईत लढतात पण गुप्तहेरांना शांततेच्या काळातदेखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तहेरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य आणि एकमेवाद्वितीय असे व्यक्तिमत्त्व होते हे सिद्ध होते.
बहिर्जी यांच्या कारकिर्दीत त्यांना एकदाच ओळखले ते म्हणजे जॉर्ज ओग्झेन्डन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणाऱ्या हेन्री ओग्झेन्डनचा हा भाऊ). सुरतेची लूट चालू असताना वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा. महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारीसमोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले हे त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले होते. पण त्यावर कृती होण्याआधिच सुरतेची लूट झाली.
हॉलिवूड चित्रपटातील एखाद्या सुपरहिरोला सुद्धा जमणार नाही अशी अविश्वसनीय कामगिरी बहिर्जींनी प्रत्यक्षात करून दाखवली. त्यांची तुलना ही आजच्या काळात कोणाशीच होऊ शकत नाही. दुर्दैवाने हे असाधारण असं व्यक्तिमत्त्व ऐतिहासिक साहित्यात खूपच उपेक्षित राहिले.
बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. पण साधारणतः १६८८ च्या दरम्यान ‘भूपाळगडावर हेरगिरी करताना त्याचा मृत्यू झाला’, ‘लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले’ अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात. आणि स्वराज्यरक्षक संभाजी या सध्या सुरू असलेल्या मालिकेत पण अशाच प्रकारच्या घटनेने त्यांचा मृत्यू झाला असे दाखवले गेले.
बाणूरगड (म्हणजेच भूपाळगड) महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे. येथून पुढे सोलापूर जिल्हा सुरू होतो. मराठी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी त्या बाणूरगडावर आहे. मागे शासनातर्फे कुंभारकिन्ही धरणाला ‘बहिर्जी नाईक सागर’ हे नाव दिले गेले. हीच काय ती आपण या ‘सर्वोत्कृष्ट’ हेरास वाहिलेली छोटीशी आदरांजली.. ! स्वराज्यासाठी घर सोडले, गाव सोडले, संसार सोडला, आयुष्यात फक्त एकच देव मानून कार्य करत राहिले, ते देव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. या त्यांच्या देवाला कायमच खबरांचा नैवेद्य बहिर्जी नाईक दाखवत राहिले. अशा या स्वराज्याच्या शूर वीर मावळ्याला माझे शत शत नमन.
©-सोनू बालगुडे पाटील