महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,838

बहुला किल्ला, नाशिक

Views: 2007
4 Min Read

बहुला किल्ला, नाशिक –

बहुला किल्ला (नाशिक), काल जाऊन आलो. आजवरच्या माझ्या बेस्ट दुर्गभटकंतींपैकी एक. या किल्ल्याच्या चढाईबरोबरच किल्ल्यापर्यंत जाणे, पोहोचणेच अवघड आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूला देवळाली आर्मी कॅम्प आहे. त्यांच्या तोफखान्याचा सराव या भागात केला जातो. बॉम्ब, तोफगोळे वापरले जातात. रविवार सोडून इतर सहाही दिवशी ही फायरिंग होते त्यामुळे या किल्ल्यावर रविवारीच जाता येतं. या भागात आर्मीचे फार कडक निर्बंध आहेत. इतर दिवशी दिसलेत तर पकडून काहीही न बघता अक्षरशः फटके देतात किंवा इतर कोणतीही शिक्षा होऊ शकते. गाड्यांच्या चाव्या किंवा गाड्याच जप्त करतात. काहीवेळा रविवारी सुद्धा जाऊ देत नाहीत. अर्थात सगळं नशिबावर. या सगळ्यामुळे गाडी लावायला फार अडचण होते आणि या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते.

गाडी मुंबई हायवेवर किंवा गौळाणे गावात लावलेलं आणि तिथून चालत गेलेलं बरं. या भागात जो डांबरी रस्ता आहे तो मिलिटरीचा असल्यामुळे त्यावर गाडी नेता येत नाही. आंबेबहुला गावात गाडी लावता येते असंही ऐकलं; पण तिथे गेल्यावरच परिस्थितीनुसार योग्य तसं करावं लागतं. या किल्ल्यावर जायचं असेल तर स्थानिकांना तर विचाराच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आधी जाऊन आलेल्या दुर्गभटक्यांचा सल्ला घ्या.

आम्ही गाड्या रायगडनगरजवळ मुंबई हायवेवरच लावल्या आणि तिथून चालत गेलो. संततधार पाऊस, धुकं आणि नेमकी माहिती नसल्यामुळे आमची प्रचंड पायपीट झाली. त्यात आमचं दुपारी ठरलं त्यामुळे आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला सुमारे चारला पोहोचलो. पावसामुळे पूर्ण ओले झालेलो, माझ्या चष्म्यावर पाणी आणि पुसायला कोरडं असं काहीच नाही, पोटात भुकेमुळे खड्डा पडलेला आणि सोबत खायला काहीच नाही, मळलेली वाट नसल्यामुळे प्रचंड चिखल, ज्यात पाय फसत होता, माझ्या सँडलचा बंद तुटलेला आणि अशा अवस्थेत जाम तंगडतोड. त्यात उशीर झालेला त्यामुळे अंधाराचं टेन्शन कारण अंधार पडला तर या रानात फार अवघड झालं असतं आणि मुख्य म्हणजे आर्मीवाल्यांचं सतत दडपण. पण खूप मजा आली. अर्थात सोबतच्यांनी चिवटपणा दाखवला. नाहीतर गेल्या दोन वर्षात अनेक किल्ल्यांपाशी जाऊनही सोबत्यांमुळे वर जाता नाही आले. बहुला किल्ला तसा फार उंच नाही पण दोनतीन ठिकाणी चढायला जरा अवघड आहे. मस्त किल्ला आहे.

देवळाली आर्मी कॅम्पच्या सरावामुळे या भागात आणि बहुला किल्ल्यावरही बऱ्याचदा तोफगोळ्यांचे अवशेष सापडतात. फायरिंगमुळे या किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे. तरीही किल्ला अनेक दुर्गावशेष सांभाळत उभा आहे. आर्मीच्या निर्बंधामुळे सध्याच्या काळात या दुर्गाचे दुर्गपण बऱ्यापैकी जपलं गेलंय असेही वाटून गेले. बहुलाच्या पायऱ्या तर अद्भुत, जबरदस्त. हरिहरगडाच्या पायऱ्या देखण्या असल्या तरी बहुला किल्ल्याच्या पायऱ्या अधिक थरारक आणि अवघड आहे यात दोन्ही किल्ले पाहिलेल्या कोणत्याही दुर्गभटक्याचे दुमत नसेल. सुमारे ७५-८० अंशाच्या, मध्ये तुटल्या आहेत त्यामुळे एकाच बाजूला धरायला, शिवाय धरायला खोबण्याही कमी, खाली डायरेक्ट उतार, काही पायऱ्या झिजून पूर्ण गुळगुळीत झाल्या आहेत, त्यात काल पावसामुळे सगळं ओलं, सटकाळं. अवघड आहे पण हा थरार अनुभवायला मजा येते.

किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी, जोत्यांचे, तटबंदीचे अवशेष. पायऱ्यांव्यतिरिक्त बहुला किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पायऱ्यांच्या अलीकडेच वाटेवर कातळकड्याच्या पोटात असलेली एक सुस्थितीतील प्राचीन लेणी. लेणीच्या स्थापत्यावरून आणि जवळच्याच पांडवलेणी (त्रिरश्मी लेणी) यावरून ही लेणी सातवाहनकालीन म्हणजे अठराशे ते दोन हजार वर्षांपूर्वीची असू शकते. या भागात सातवाहनकाळाच्या अनेक खुणा आहेत. हा किल्ला महाराजांच्या काळात मराठ्यांनी घेतला असावा. १८१८मध्ये कॅप्टन ब्रिग्जने घेतला आणि इंग्रजांनी किल्ल्याचे नुकसान केले. असा हा इतिहास आणि अवशेष लाभलेला छोटासा बहुला किल्ला.

आमची काल ओरिजिनल ट्रेकिंग झाली. किल्ल्याच्या पायथ्याला गाव, रस्ता नाही. पूर्वी जसं किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचायलाच प्रचंड पायपीट करावी लागायची तसं बहुला किल्ल्याच्या बाबतीत आहे. काल आम्ही खरोखरच पंधराहून अधिक किलोमीटर चाललो असू. बढाई बिलकुल नाही. कोणाला वाटत असेल तर या तिथे जाऊन दाखवतो. आमची जरी जरा जास्त पायपीट झाली असली तरी बहुला किल्ल्यावर जाण्यासाठी प्रत्येकालाच एक तास किंवा अधिकच पायपीट करावी लागते. आज फार थोडे किल्ले असे राहिलेले आहेत ज्यांवर आधुनिक खुणा नाहीत; बहुला अशा किल्ल्यांपैकी आहे. मला तर लहानपणी आठ-दहा-बारा वर्षांपूर्वी दुर्गभटकंती करताना जसा फील यायचा, त्याची आठवण काल झाली.

प्रणव कुलकर्णी.

Leave a Comment