महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,54,400

बाहुली विहिर

By Discover Maharashtra Views: 2756 3 Min Read

बाहुली विहिर –

महाराष्ट्रासारखा ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. परदेशात ऐतिहासिक स्थळ अप्रतिमरित्या सांभाळली जातात व अडगळ नाहीशी केली जाते. परंतु, आपल्याकडे अडगळ जपून ठेवत ऐतिहासिक वारसा वाऱ्यावर सोडला जातो. याचेच उदाहरण म्हणजे “स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित होणाऱ्या नागपूर शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वेळा-हरिश्‍चंद्र गावाच्या परिसरात असलेल्या ऐतिहासिक बाहुली विहिर आहे.

अमरावती-जबलपूर मार्गावरील वेळा-हरिश्‍चंद्र गावाच्या परिसरात प्राचीन दगडांपासून बनविलेली बाहुली विहीर म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट आणि जिवंत उदाहरण आहे. प्राचीन रेखीव काम आणि त्यावर देवी-देवतांचे कोरीव काम असलेल्या ऐतिहासिक विहिरीला एक मोठा इतिहास असल्याचे जुने-जाणते लोक सांगतात. आता या ऐतिहासिक वास्तूला विकासाची आणि सौंदर्यीकरणाची “तहान’ लागलेली आहे. विहिरीची तहान वेळीच भागविल्या न गेल्यास सुमारे 150 ते 200 वर्षे जुना ऐतिहासिक वारसा लवकरच इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही.

अंदाजे 25 फूट खोल असलेल्या विहीरमध्ये उतरण्यासाठी जवळपास 50 पायऱ्या बनविण्यात आलेल्या आहेत. याच विहिरीतून परिसरातील शेतीला मोटीच्या साहाय्याने पाणी दिल्या जात असल्याचे गावकरी सांगायला विसरत नाहीत. काही वर्षांआधीपर्यंत परिसरातील आजूबाजूला असलेल्या कित्येक गावांची तहान हीच विहीर भागवित होती. आता लोकांसह प्रतिनिधींनी व सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ऐतिहासिक विहिरीला उतरती कळा आलेली आहे.

बाहुली विहिरीला सध्या विकासाची आणि सौंदर्यीकरणाची गरज आहे. प्रशासनाद्वारा वेळीच दखल घेऊन विहीर व परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास या ऐतिहासिक वारशाचे अस्तित्व कायम राहणार आहे. जो समाज इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो. “स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित होणाऱ्या उपराजधानीच्या हाकेच्या अंतरावर लाभलेला ऐतिहासिक वारसा जतन करणे गरजेचे आहे.

इतिहास पुसल्या जाण्याची भीती –

ऐतिहासिक बाहुली विहिरीला सध्या अवकळा आलेली आहे. विहिरीवरील दारे, खिडक्‍या तुटल्या असून, भिंती मोडकळीस आलेल्या आहेत. आज विहिरीच्या परिसरातील प्राचीन दगड आणि कित्येक वस्तू चोरीला जाण्यास सुरुवात झाली आहे. विहीर आज पूर्णपणे गढूळ पाण्याबरोबरच प्लॅस्टिक, आजूबाजूचा कचरा, निर्माल्याने भरलेली असल्याने विहिरीची दुरवस्था झालेली आहे.

“चिअर्स’ अन्‌ “लवर्स पॉइंट’ –

शहरापासून हाकेच्या अंतरावर एकांत मिळत असल्याने या परिसरात दिवसेंदिवस जोडप्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनात पाण्याच्या बॉटल्स, प्लॅस्टिकचे ग्लास आणि दारूच्या बाटल्या आणून सकाळपासूनच इथे काही मद्यपी खास दारू पिण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी जमा होतात. विहीर परिसरात कुठेही नजर टाकल्यास रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बॉटल्स व सिगारेटची पाकिटे हमखास आढळून येतात.

Photo – Ashish Raut Photography
माहिती – विदर्भ दर्शन

Leave a Comment