बाजी जेधे आणि बेलसरची लढाई –
कान्होजी जेधे यांनी अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी त्यांची निष्ठा हिंदवी स्वराज्यावर, शिवाजी महाराजांवर आहे हे सिद्ध केलं होतं. क्षणात आपल्या वतनावर पाणी सोडण्याचा त्यांचा किस्सा उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. कान्होजी जेधे हे नुसतं नाव ऐकलं तरी फक्त निष्ठावंतच नाही तर एका मोठ्या मनाच्या माणसाचं दर्शनसुद्धा होतं. पुढच्या काळात १६६० मध्ये जेव्हा शिवाजी महाराज सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटून पन्हाळगडावरून विशाळगडावर सुखरूप पोहोचले तेव्हा बांदल सेनेने केलेल्या त्यागाला आणि बलिदानाला लक्षात ठेऊन शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंनी त्यांचं मानाचं पहिलं पान बांदलांना द्यावं अशी विनंती केली आणि मोठ्या मनाच्या कान्होजींनी ती विनंती अगदी सहज मान्य केली. कान्होजींना पाच पुत्र होते पण पुढे त्यांच्या सारखेच कर्तबगार, शूर आणि निष्ठावंत होते त्यांचे जेष्ठ पुत्र बाजीराजे जेधे. आजच्या आपल्या व्हिडिओत पाहुयात की बाजी जेधेंनी असा काय पराक्रम केला म्हणून स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांना ‘सर्जेराव‘ ही पदवी दिली.(बाजी जेधे आणि बेलसरची लढाई)
बाजी जेधे आणि बेलसरची लढाई वीडियो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
बाजी जेधे आणि बेलसरची लढाई –
२५ जुलै १६४८ ला आदिलशहाने आज्ञा दिल्यामुळे मुस्तफाखानाच्या सांगण्यावरून बाजी घोरपडेंनी शहाजी राजांना अटक केली. या बाजी घोरपडेंना शहाजी राजांनीच आदिलशाहीत सिफारीश करून नोकरीला ठेवलं होतं. चांगले पांग फेडले बाजींनी. असो या अटकेवर एक पूर्ण व्हिडिओ पुढे बनवण्याचा आमचा मनसुबा आहे. या अटकेमागचा आदिलशहाचा उद्देश्य अगदी उघड होता, शहाजी राजांच आदिलशाहीतील वर्चस्व आणि त्यांचा वंश हे दोन्ही संपवण्याची राजकीय खेळी आदिलशहाची होती. त्यामुळे या अटकेनंतर आदिलशहाने फर्रादखानाला शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांच्यावर बंगळुरात तर फत्तेखानाला शिवाजी महाराजांवर हल्ला करायला महाराष्ट्रात आणलं. फौजेची संख्या कुठेही दिलेली नाही परंतु मेहेंदळेंच्या मते ५ एक हजाराचं सैन्य असावं. चिमुरड्या स्वराज्यासाठी एव्हढं मोठ्ठ सैन्य काय करायचं असं सारखं फत्तेखानाला वाटत होतं. या फत्तेखानाने पुरंदर गडाजवळ बेलसर नावाचं गाव घेतलं आणि बाळाजी हैबतराव या सरदाराला ,फाजलशाह आणि अशरफशहा वगैरे सरदार देऊन २००० च्या सैन्याबरोबर शिरवळचा सुभानमंगळचा गड घ्यायला पाठवलं. बाळाजी हैबतरावांनी तो अगदी सहज घेतला. आता फत्तेखान अगदी निश्चिन्त होता, त्याला वाटत होतं आता पुढे तलवारी म्यानच राहतील दरडावूनच स्वराज्याचा आणि पर्यायाने शिवाजी महाराजांचा निक्काल लावता येईल. पण झालं भलतंच शिवाजी महाराजांच्या धाडसी मावळ्यांनी सुभानमंगळ गड परत मिळवला. बाळाजी हैबतरावाचा मुडदा पडला.
पण हे फत्तेखानाला कळण्याच्या आधीच शिवाजी महाराजांनी दोन प्लॅन बनवले, हे आपण दोन भागात बघुयात. पहिला भाग म्हणजे शिवाजी महाराजांनी टाकलेला गनिमी काव्याचा डाव. ऑगस्ट १६४८ ला बेलसरला असलेल्या फत्तेखानाच्या छावणीच्या दिशेने शिवाजी महाराजांची एक तुकडी निघाली. यात काही शे स्वार असावेत तर ४०-५० स्वारांची एक भगव्या झेंड्याच्या निशाणाची तुकडी होती. एका स्वाराने भाल्यावर लावलेला भगवा ध्वज हातात घेतलेला होता. हा भगवा झेंडा असलेल्या ४०-५० स्वरांच्या तुकडीच नेमकं कारण काय ते माहित नाही पण काही संकेत देण्यासाठी या तुकडीने भगवा ध्वज सोबत घेतलेला असावा. ठरल्याप्रमाणे या सगळ्या मावळ्यांनी फत्तेखानाच्या छावणीला हळूहळू घेरलं, निशाणाची तुकडी थोडी मागेच थांबली. फत्तेखान आणि त्याची फौज आधी सांगितल्याप्रमाणे एकदम बिनधास्त होती, सुभानमंगळ गड तर घेतलाच आहे आता या मराठ्यांवर जरा आवाज चढवला की पटकन आपल्याला हवा तसा तह ते बिचकून करतील, मग चला परत विजापूरला. आणि इतक्यात इशारत झाली, सगळे मावळे गनिमी काव्याच्या तत्वानुसार या बेसावध फौजेवर लगबगीने तुटून पडले.
फत्तेखानाच्या फौजेची एकच तारांबळच उडाली. कोणाचे हात उडाले, कोणाचे पाय तर कोणाचं मुंडकं. तलवार हाती घेऊन सावध होऊन लढाई करण्याआधीच काहींना आपण ‘अल्लाला कधी प्यारे झालो’ हे सुद्धा कळलं नाही. फत्तेखानाच्या छावणीत एकच सावळा गोंधळ उडाला. फत्तेखान सावध झाला आणि पठ्याने लगेच आपल्या फौजेला सावरायचा प्रयत्न सुरु केला. हळू हळू आदिलशाही फौज सावध होऊन प्रतिकार करू लागली. संख्येने आदिलशाही फौज या तुकडीहून जास्त होती त्यामुळे सावध होताच त्यांचा प्रतिकार एकदम वाढला. पण गनिमी कावा करणाऱ्यांना हा प्रतिकार पहात, त्याच्यावर उत्तर देत उभं कुठे राहायचं असतं. मावळ्यांचं काम झालं ते हळूहळू लढत लढत यशस्वी माघार घ्यायला लागले. सगळ्या तुकड्यांना माघार घेणं जमलं पण काय झालं काय माहित शिवाजी महाराजांचं निशाण असलेल्या तुकडीला काही माघार घेता येईना. बाकीच्या तुकड्या पळून गेल्याने आता फत्तेखानाच्या सगळ्या फौजेने या निशाणाध्वज असलेल्या या तुकडीवर जोरात हल्ला चढवला. आता एक गोष्ट लक्षात घ्या मावळे म्हणजे मराठे अचानक शत्रूवर हल्ला करायचे आणि शत्रू सावध होताच पळून जायचे. ते घाबरून पळून जायचे नाहीत तर शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान झालं म्हणजे काम झालं हा विचार करून मराठे पळ काढायचे. पण आता इथे प्रश्न चक्क महाराजांच्या, हिंदवी स्वराज्याच्या निशाणाचा होता. निशाणाजवळचे सगळेच मावळे अंगातला आहे नाही तो सगळा जोर काढून शत्रूवर तुटून पडले. जीव गेला तरी चालेल पण निशाण शत्रूच्या हातात पडू द्यायचं नाही हा सगळ्यांचा निश्चय होता. तेव्हढाच चेव येऊन फत्तेखानाचे हशम निशाण कस हातात मिळवता येईल म्हणून दात ओठ खाऊन मावळ्यांवर तुटून पडत होते.
हळूहळू फत्तेखानाचे हशम निशाणाचा भाला ज्या मावळ्याच्या हातात होता त्याच्याजवळ पोहोचले. मावळे पराक्रमाची शर्थ करत होते पण बिचारे संख्येने कमी होते. आणि एव्हढ्यात धुळीचा लोट उठला, काही कळायच्या आत फत्तेखानाचे ५-६ हशम कापले गेले. एक मराठा योद्धा विद्युत वेगाने या धुमश्चक्रीत घुसला. हा हा म्हणता महाराजांच्या भगव्या ध्वजाच्या निशाणाच्या बाजूची शत्रूची गर्दी बाजूला सारून हा पठ्या निशाणाजवळ पोहोचला. निशाण जमिनीवर पडू न देता निशाण आणि निशाण धरलेल्या मावळ्याला आपल्या घोड्यावर बसवून त्याच विद्युत वेगाने शत्रूची फळी फोडून हा वीर पुरंदरच्या मार्गाला लागला. या धुमश्चक्रीत मराठ्यांचे काही मावळे धारातीर्थी पडले पण बाकी सगळे पुरंदर गडाजवळच्या झाडीत शिरले आणि पुरंदर गडाच्या मार्गाला लागले.
कोण होता हा वीर? तर बारा मावळातली एक मोठ्ठी आसामी आणि शहाजी राजांचे एक मतबर सरदार कान्होजी जेधे यांचा हा सुपुत्र बाजीराजे जेधे. यावेळी शहाजी राजांबरोबर कान्होजी जेध्यांनासुद्धा अटक करून कनकगिरीला ठेवण्यात आलं होतं. मराठ्यांच्या सगळ्या तुकड्या परत माघारी पुरंदरावर पोहोचल्या जिथे प्रत्यक्ष शिवाजी महाराज होते. महाराजांना बाजी जेध्यांचा पराक्रम कळला. फक्त निशाणाचा ध्वज शत्रूच्या गोटात सापडू नये आणि त्याचा अवमान होऊ नये म्हणून शत्रूच्या तोबा गर्दीत शिरून निशाण सोडवून आणलेल्या बाजी जेध्यांच महाराजांना खूप कौतुक वाटलं. आणि या तत्क्षणी बाजी जेध्यांना ‘सर्जेराई’ म्हणजेच ‘सर्जेराव’ ही पदवी मिळाली. सर्जा हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘भयंकर’ असा आहे, तर त्याचा दुसरा अर्थ ‘सिंह’ असा आहे. खरंतर फत्तेखानाच्या फौजेला त्यादिवशी बाजी सर्जेराव जेधे भयंकर सिंह वाटले असतील तर त्यात काही नवल नाही.
असो या गनिमी काव्याच्या डावाचा फत्तेखानावर हवा तो परिणाम झाला. फत्तेखानाने अविचाराने पुढची मोहीम ठरवली. आता पुढच्या मोहिमेत फत्तेखानाच्या सैन्याची प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी काय दैना केली पाहुयात पुढच्या भागात.
संदर्भ:
१. शिवभारत
२. जेधे करीना
३. पत्रसारसंग्रह लेखांक १९०१
Suyog Sadanand Shembekar