महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,304

बाजी जेधे | सर्जेराव

By Discover Maharashtra Views: 4582 5 Min Read

बाजी जेधे | सर्जेराव –

महाराजांच्या शब्दासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या काही घराण्यांनी आपले सर्वस्व बहाल केले त्यातील एक घराणे म्हणजे कारीचे जेधे घराणे. शिवकाळात जेधे घराण्यातील कान्होजी जेधे व त्यांचा पुत्र बाजी उर्फ सर्जेराव या दोन कर्तबदार पुरुषांचे मोठे योगदान आहे. कान्होजी जेधे हे भोर जवळच्या कारी गावचे देशमुख होते.

कान्होजी जेधे यांचा जन्म कारी गावात झाला तर बालपण मोसे खोऱ्यात गेले. पुढे काही वर्ष ते शहाजी राजांसोबत दक्षिणेत होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केल्यावर शहाजी राजांच्या सांगण्यावरून कान्होजी जेधे स्वराज्यात आले. कान्होजी जेधे स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करीत असले तरी ते आदिलशाहीच्या सेवेत होते.

१६४८ साली  आदिलशहाने शहाजी राजांना कैद केले त्यावेळी कान्होजींनाही कैद  केले गेले. पुरंदरवर आदिलशाही सैन्याचा पराभव करून शिवरायांनी स्वराज्याची पहिली लढाई जिंकली. या लढाईत कान्होजींचे पुत्र बाजी जेधे सामील होते. बेलसरवर विजापुरी सैन्यावर मराठ्यांनी हल्ला केला तेव्हा स्वराज्याचा ध्वज धोक्यात आला असताना बाजीचे जेधेंनी  प्राणावर खेळून ध्वज सुखरूप परत आणला. या पराक्रमाने खुष होऊन शिवरायांनी त्यांना ‘ सर्जेराव ‘ हा किताब बहाल केला.

अफझलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी आदिलशहाने १६ जून १६५९ रोजी कान्होजी जेधे यांना अफजलखानास मदत करण्याचे फर्मान काढले ,पण कान्होजी जेधे यांनी वतनावर पाणी सोडून शिवाजी महाराजांना आपल्या पाच मुलांसह पाठिंबा दिला.

कान्होजींनी स्वराज्यावरची निष्ठा दाखवत १२ मावळचे देशमुख एकत्र आणून स्वतःसोबत अनेक मराठा सरदार स्वराज्यात आणले. प्रतापगडच्या युद्धात जेधेनी भरघोस कामगिरी पार पाडली. कान्होजी जेधे यांनी स्वराज्यासाठी केलेल्या सेवेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीच्या प्रथम पानाचा मान दिला.कान्होजी केवळ शुरच नव्हते तर त्याचं मनही आभाळाइतक मोठ होत.

पावनखिंडीच्या लढाईत महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचावे यासाठी ३०० बांदलवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. बांदलाच्या या कामगिरीसाठी शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीच्या प्रथम पानाचा मान देण्याचे ठरविले होते. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना आपले मनोगत सांगितले तेव्हा कोणतीही खळखळ न करता कान्होजीनी आपला मान बांदलास देऊन आपले औदार्य दाखवून दिले. पन्हाळ्यावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून चतुराईने सुटून आल्यानंतर शिवरायांनी पुण्यात लाल महालावर तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानाला  धडा शिकवायचे ठरवले .लाखभर फौजेच्या गराड्यात शाहिस्तेखान असतानासुद्धा अचानक छापा घालून त्यांना ठार करायचे अशी अचाट  धाडसी मोहीम शिवरायांनी आखली. मोगली फौजा स्वराज्यावर धाडी टाकून नासधूस  जाळपोळ करीत होत्या. याच सुमारास ऑक्टोबर १६६२  मध्ये शिवरायांनी कान्होजीचे पुत्र बाजी जेधे यांना पत्र पाठवून मोगल रोहिड खोर्‍यावर हल्ला करणार असल्याची  व यापासून रयतेचे संरक्षण  करण्यासाठी सावध राहण्याची सूचना करणारे पत्र पाठवले होते .

शाहिस्तेखानाने लाल महालावर हल्ला केला तेव्हा शाहिस्तेखानाच्या जीवावर आलेले बोटावर निभावले खान ठार झाला, या समजुतीने शिवराय तात्काळ महालातून बाहेर पडले .यावेळी बाजी जेधे  महालाबाहेर शिवरायांसाठी घोडा घेऊन तयारीतच होते. घोड्यावर बसून शिवराय बाजीं बरोबर झपाट्याने सिंहगडावर गेले. या अंतर्कनीय  हल्ल्याने घास्ती घेऊन शायिस्तेखान पुणे सोडून उत्तरेत निघून गेला. ह्यानंतर झालेल्या पुरंदरच्या तहा प्रमाणे शिवपुत्र संभाजीराजे यांना मोघलांची पंच हजारी मनसब पत्करावी लागली. संभाजी राजांबरोबर यावेळी बाजी जेदे तैनातीत होते. शिवरायांच्या आग्रा भेटीवेळी बाजी जेधे  सतत छत्रपती संभाजी राजांबरोबर असत.  आग्रा येथून हिकमतीने मोगली कैदेतून निसटल्यानंतर शिवरायांनी संभाजी राजांना काही काळ मथुरेला ठेवले व नंतर महाराष्ट्रात आले. त्यावेळीही बाजी जेधे शंभूराजांच्या बरोबर होते.

१६७६ ला छत्रपती  शिवरायांनी अत्यंत महत्वकांक्षी व दूरदृष्टीची अशी   दक्षिण भारतातील प्रदेश जिंकण्याची  मोहीम हाती घेतली.दिड वर्षे चाललेल्या या मोहिमेत कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र प्रदेशातील मोठा मुलुख शिवरायांनी स्वराज्यास जोडला. ह्या मोहिमेतील एक अत्यंत महत्त्वाची लढाई कर्नाटकातील येलबुर्गा गावी झाली. आदिलशाही सरदार अब्दुल रहिमखान मीयाणा व हुसेनखान मियाणा यांच्यावर सेनापती हंबीरराव मोहिते यांनी हल्ला केला. विजापुरी सैन्याला चारी कडून घेरून मराठ्यांनी त्यांची धुळधान ऊडविली.

पराभव समोर दिसतात हुसेनखान हत्ती  माघारी फिरून पळून जाऊ लागला .हे लक्षात येताच बाजीचे जेधे व त्यांचे पुत्र नागोजी जेधे यांनी त्याला अडविण्यासाठी हल्ला केला.नागोजींनी हत्तीवर हल्ला करून त्याची सोंड छाटली. अंबारीतून हुसेन खानाने मारलेला बान नागोजींच्या कपाळात घुसून हनुवटीतून  बाहेर आला .प्राणांतिक जखमेने नागोजी कोसळले .बाजी जेधे शेजारीच होते.हुसेनखानाला मराठ्यांनी कैद केले.बाण बाहेर काढताच नागोजी मरण पावले .पित्याच्या मांडीवर पुत्राने स्वराज्य रक्षणासाठी अखेरचा श्वास घेतला. नागोजी यांच्या पत्नी गोदूबाई या  कारी या गावी सती गेल्या.

छत्रपती शिवरायांनी कारीस येऊन जेध्यांचे सांत्वन केले व  प्रतिवर्षी एक शेर सोने द्यावयाची मोईन केली.छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजांच्या कारकीर्दीत बाजी जेधे स्वराज्यसेवा करीत होते .मोगलांनी  घेतलेला रोहिडा किल्ला बाजींनी जिंकून स्वराज्यात घेतला. १६९८ नंतर छत्रपती  राजाराम महाराज महाराष्ट्रात परतले त्याच सुमारास शके १५५० कार्तिक कृष्ण पंचमी इ.स.१६२८ रोजी  बाजी जेधे यांचा मृत्यू झाला. जेधे घराण्यातील तीन पिढ्या शहाजी राजांपासून छत्रपती राजाराम महाराजांपर्यंत स्वराज्य सेवा करून इतिहासात आपला ठसा उमटवून गेल्या.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

1 Comment