महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,627

बाजींद भाग १० | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

Views: 6277
10 Min Read

बाजींद भाग १० | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग १० – कुठे गायब झालात तुम्ही काल रात्री मला सोडून ?

खंडोजी ने प्रश्नार्थक मुद्रेने त्या चौघांना सवाल केला…!

यावर सखाराम बोलला…गायब..आणि आम्ही ..?

तुम्हीच काल संध्याकाळी त्या दाट जंगलाच्या जाळीत आम्हा चौघाना गुंगारा देत गायब झालात…!

आणि हो…..रात्री तुमची सावित्री पण भेटली होती आम्हाला….तिनेच आम्हाला तुमची पूर्ण कथा सांगितली ..पण आम्हाला कशी झोप लागली आम्हालाच समजेना…!

आम्हाला इथे कोणी कसे आणले तेवढे सांग बाबा ….नसता डोक्याला ताप झाला आहे…!

कुठली अवदसा सुचली आणि तुझे ऐकून तुझ्या मागे आलो असे झाले आहे …!

काहीसा वैतागल्यागात सखाराम खंडोजी ला बोलला…!

काय…?
सावित्री होती काल तिथे ?
अहो, मी तिलाच शोधायला काल जंगलात बाजूला गेलो,काळ सकाळीच मला ती तुम्ही भेटला त्या वडाच्या झाडाजवळ भेटणार होती,तिच्या वडिलांची फौज पण १० कोसावर आपली वाट पाहत आहे..!

तिथेच तुम्हाला नेऊन तुमच्या प्रश्नाचा निवडा करण्यासाठी आमचे वस्ताद काका तुम्हाला महाराजांच्या जवळ घेऊन जातील आणि आम्ही आमच्या वाटेने जाऊ असे नियोजन होते माझे ..पण..तुम्ही अचानक कुठे दिसेनासे झालात आणि रात्रभर तुमचा शोध घेत मी पहाटे त्या महादेवाच्या पडक्या मंदिराजवळ पोहोचलो तर तिथे एक वाघ रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला दिसला….मला वाटले इथे अजूनही वाघ असतील,आपल्या जीवाला धोका आहे, म्हणून मी मंदिरात आलो,तर तिथे तुम्ही चौघे झोपला होतात.

मग एका एका खांद्यावरती घेऊन पहाटेच या डोंगरावर आणले …..म्हणून तुम्ही चौघे आणि मी जिवंत आहे…आणि तुम्ही उलट मलाच प्रश्न विचारताय ?

खंडोजी चे ते बोलणे ऐकून त्या चौघाना जरा धीर आला.
अहो,खंडोजीराव आम्हाला माफ करा,पण भीतीने आमची बुद्धी काम करेना,त्यात रात्रभर तुमच्या सावित्रीने तुमची जी कथा सांगितली,त्यावरून तर जास्तच शंका आली.
आम्ही साधी जंगलात राहणारी शेतकरी धनगर लोक,तुमच्या थोरा मोठ्यांच्या भांडणाची शिकार नको व्हायला….आम्ही जातो माघारी,…राहिला सवाल आमच्या वाडीच्या सुरक्षेचा,तर बघू..सगळ्यांना घेऊन काहीतरी निवडा होईलच…!
सखाराम निर्धारी आवाजात बोलून गेला….!

अहो,आता ३-४ कोसावर वस्ताद काकांचे गुप्त ठिकाण आहे आमच्या …कशाला मागे जाता ?

सरळ महाराजांच्या कानावर तुमचा विषय घाला,तुमची समस्या कायमची मिटेल आणि सारा वाडा सुखी होईल…माझ ऐका ,माघारी फिरून रात्रभर चाललेली मेहनत वाया जाईल…!

खंडोजी च्या त्या प्रश्नावर चौघांनी पण विचार केला …मागे जाऊन काय प्रश्न सुटणार नाही.
खंडोजी तर महाराजांचा हेर आहे,तो तर किमान खोट बोलायचा नाही….साधले तर सगळेच चांगले साधले जाईल….असे म्हणत चौघांनी होकारार्थी मान हलवत खंडोजी सोबत जायचा निर्णय घेतला….!

एव्हाना सूर्य चांगलाच वर आला होता,भुकेने ते चौघेही हैराण झाले होते.

त्यांनी खंडोजी ला प्रश्न केला….
खंडोजी राव …कुठतरी न्याहारी मिळेल का बघूया का ?

यावर त्वरित खंडोजी म्हणाला, चला चला….या डोंगराच्या खालीच मझा घोडा बांधला आहे ,त्यावर खाण्यापिण्याचे साहित्य आहे ..चला आपण निघू…असे म्हणत टे पाचही जण डोंगर उतरू लागले…!

घोड्याचे नाव घेताच सखाराम ला त्याचा घोडा आठवला, काल ओढा पार करताना काय दिसले त्याला काय माहिती ,कुठे पळून गेला.
पण, माझा घोडा खूप इमानदार आहे, अशी साथ सोडून जाणार नाही कधी, नक्कीच काय तरी आक्रीत बघितलं असणार त्याने…येईल तो नक्की परत,मला विश्वास आहे…आपल्या मनाशीच सखाराम बोलत होता…!

बराच वेळ डोंगर उतरत असताना त्याना दुरूनच खंडोजीचा घोडा दिसू लागला…आणि खंडोजी ला पाहून त्याचे खिंकाळणे सुरु झाले….!

खंडोजी ने घोड्याच्या मानेवर, तोंडावर मायेने हात फिरवला.

रात्रभर पावसात भिजून गारठलेल्या घोड्याला त्याने दिलासा मिळाला.
त्याने घोड्यावर एका घोंगडयात बांधलेली चटणी, कांदा आणि नाचणीची भाकर काढली.

खंडोजी ने घोड्याचे दावं सोडलं आणि त्याला चरायला सोडलं…!

पाचही जण भाकरीचा तुकडा मोडून खावू लागले …!

खाता खाता दूरवर सखाराम चा काल गायब झालेला घोडा दूरवर दृष्टीस पडला.
त्याला पाहताच सखाराम आनंदाने उठून उभा राहिला..!
त्याने जोरजोरात त्याच्याकडे पाहत हाका मारायला सुरवात केली आणि त्याच्या रोखाने चालू लागला.
आपल्या धन्याची हाक ऐकून सखाराम चा घोडा धावत त्याच्याकडे येऊ लागला…सखाराम खूप आनंदी झाला.
पाठीमागून खंडोजी ने सखाराम च्या पाठीवर हात टाकला,आणि “जातीवन्त जनावर दिसतंय”

व्हय…लय जीव हाय माजा हेज्यावर…!

पण, काय झाले कोणास ठाऊक, समोरून धावत येणारा सखाराम चा घोडा क्षणात थांबला, सखाराम कडे पाहत पाहत मागे सरकू लागला, आणि क्षणात सुसाट वेगाने मागे पळून गेला…!

त्याचे धावणे पाहताच सखाराम पण मागे लागला, पण घोडा क्षणात जंगलात गायब झाला.

खिन्न मनाने सखाराम खन्डोजी जवळ आला, म्हणाला…काय याला आक्रीत दिसतय समजना… मला सोडून कवाबी असा वागला नव्हता आजवर….नक्कीच कायतरी आक्रीत हाय”

जाऊदे, जातोय कुठं…येईल माघारी, चला चार घास खाऊन घेऊया…असे बोलत खंडोजी व सखाराम माघारी आली.

सर्वजण भाकरी चटणी कांदा खाऊ लागली..!

सखराम बोलला…..खन्डोजीराव, रात्री सावित्री बाईनी तुमची कथा सांगितली…खरच मला अभिमान वाटला कि मी एका मराठेशाहीच्या हेरासोबत हाय.
पण, मला पुढ काय झाल तुमच सांगशीला का ?
त्या डोंगरावरून तुम्ही दोघांनीही खाली नदीत उडी का मारली ?

त्यानंतर काय झाले….!

किंचित हसत खंडोजी बोलू लागला……

काय सांगू मंडळी, आयुष्यात केवळ व्यायाम, धाडस आणि मेहनत याच्या जीवावर महाराजांच्या सैन्यात प्रवेश मिळवला होता.
ऐन तारुण्यात खुद्द बहिर्जी नाईकांचा खास मर्जीतला हेर झालो होतो..आयुष्यात प्रेम म्हणजे काय असते हे कधी समजून घ्याला वेळच मिळाला नव्हता…!
पण, शिर्क्यांच्या लेकीला जेव्हा पहिल्यांदा पहिले, तेव्हा त्या रात्री डोळ्याला डोळा लागला नव्हता…..सारख तिचा तो चेहरा आठवायचा प्रयत्न करत होतो..!

मनात एकप्रकारची ओढ निर्माण झाली होती….!

त्या रात्री बेरडांच्या हल्ल्यात तिने एकाकी चढाई केल्याचे समजताच माझा तोल गेला..मी वस्ताद काकाना सांगून तिचा जीव वाचवायला सुर्यरावांच्या फौजेचा एकट्याने पाठलाग केला…मी जाणून होतो सूर्यराव आणि महाराजांचे कोणतेच वैर नव्हते…पण साऊ साठीची तळमळ स्वस्थ बसून देत नव्हती…!

मी धोक्यात असल्याची खबर काकांनी खेडेबार्याला पोहोच केली आणि २०० मावळ्यांची तुकडी माझ्यासाठी धावून आली…..मी जर साऊ ला तिथेच सोडून गेलो असतो तर नक्कीच सूर्यरावाने तिला एकतर मारून टाकले असते नाहीतर यातना देत शिर्क्याना झुकवले असते..आणि जर शिर्क्यांच्या हाती दिले असते तर माझे गुपित तिला समजले होते, आणि ती सुध्दा जातिवंत होती,तिने नक्कीच हे सर्व तिच्या बापाला सांगितले असते आणि आमचा शिर्क्यांच्या राज्याचा पाडाव करायचा बेत फसला असता, म्हणून मी कोणताही विचार न करता वस्ताद काकांचाही हुकुम डावलून तिला घेऊन त्या भयान कड्यावरून नदीत उडी मारली….!

दुथडी भरून वाहणाऱ्या त्या नदीत आम्ही दोघेही पडलो…..साऊ च्या नका तोंडात पाणी गेल्याने तिची शुद्ध हरपली…पण मी शुद्धीत होतो…तिचा हात धरून कसा बसा पोहू लागलो…पण पाण्याच्या वेगाने मी खूप दूरवर वाहत वाहत एका भयान जंगलात पोहोचलो….!

खंडोजीने साऊचा हात धरून तिला नदीच्या काठावर पण जंगलाच्या तोंडावर असलेल्या एका विशाल दगडावर झोपवले आणि कमरेला असलेले कट्यार, खंजीर काढून बाजूला ठेवला आणि शेल्याने तोंड पुसत साऊ च्या डोक्याखाली शेला ठेवला…….सावित्रीचे ते सौंदर्य खंडोजी कितीतरी वेळ पाहत होता…..त्याच्या हृदयाची कंपने तीव्र होत होती…आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्या तरी स्त्रीचे सौंदर्य तो पाहत होता.

तितक्यात अचानक सावित्रीला जाग आली.

डोक्यावर हात ठेवत ती वेदना सहन करत उठली आणि बाजूला उभा असलेल्या खंडोजीकडे कटाक्ष टाकला आणि दोन्ही हात छातीवर नेत बोलले….दूर व्हा…!

क्षणात खंडोजी ने शेला तिच्या हातात देत बोलला….घाबरू नका बाईसाहेब..तुम्ही सुखरूप आहात…!

त्वरित हाताला हिसडा मारत तो शेला घेऊन तिने खांद्यावर छातीवर झाकत सावरत बोलली…..मी सुखरूप राहीनच…तुम्ही तुमची काळजी करा….!

आमच्या वडिलांचा विश्वास घात करून त्यांच्या वाड्यात प्रवेश मिळवला आणि आमच्या खबरा शिवाजी महाराजाना देता ?
एका पैलवानाला शोभत का ही गद्दारी ?

खंडोजी बोलला……गद्दारी…आणि आम्ही ?

गद्दारी केली तुमच्या वडिलांनी……सारा महाराष्ट्र शिवाजीमहाराजांच्या मागे ठाम असताना तुटपुंज्या फौजेच्या जीवावर मराठेशाहीशी वैर शोभते का शिर्क्यांना ?

सूर्यराव बेरडांच्या हातात शस्त्र घ्याला मजबूर करणारे तुमचे बापजादे शिवाजी महाराजांची महती काय समजणार ..?

यावर सावित्री खवळून बोलली….ते काहीही असो….शिर्क्यांची जरी दौलत महाराजांच्या सैन्यापुढे तोकडी असली तरी आमच्या राज्यापुरते आम्ही सुखी आहोत….कोणीही दुखी नाही…आमच्या आबांच्या वर निष्ठा बाळगणारी कित्येक जण तरी आहे….!

निष्ठा ..?

खंडोजी सुध्दा संतापाने बोलला …!

निष्ठा सत्कारणी असावी….आगलाव्या आगंतुक आदिलशाहिवर कसली निष्ठा ?

ज्यांना माणुस आणि जनावरे यातला भेद माहिती नही…ज्यांचा इतिहास हा कत्तली आणि जाळपोळी ,बलात्कार,लुटालूट यांनी भरलेला आहे.
३५० वर्ष जुलूम जबरदस्ती करणारे तुमचे आदिलशाही हात तोडून टाकले आमच्या महाराजांनी..!

आज महाराष्ट्र सुखात आहे,तो केवळ महाराजांच्या पुण्याईमुळे…बस्स…आम्ही त्यांच्यासाठी जीवही देऊ…!

बोलून ताकत वाया घालवू नका…क्षणात सावित्री बोलून गेली…असेल हिमत तर माझ्याशी चार हात कर आणि तुझा प्राण वाचव…मी पण माझ्या राज्यासाठी प्राण देऊ शकते…!

सावित्रीच्या आकस्मित आव्हानाने खंडोजी सावध झाला, तितक्यात सावित्री ने खंडोजी वर जबरदस्त प्रहार सुरु केले…खंडोजीचा तोल गेला, पण क्षणात सावध होऊन त्याने गिरकी घेत, सावित्री चा हात मुरगळुन मागे आवळत बोलला….बाईसाहेब…आम्ही शिवछत्रपतींचे शिपाई आहोत, स्त्रिया वर कधीच हात उगारत नसतो…बऱ्या बोलान गप्प बसा नाहीतर हात पाय बांधून उचलून न्यावं लागेल…!

सवित्रीचा हात घट्ट मागे धरल्याने तिचा आवेश पूर्ण मावळला…!

हे सर्व सुरु असताना जंगलातून एक बाण वेगाने बाहेर आला ज्याने खंडोजी च्या पायाचा वेध घेतला,एका आर्त वेदनेने खंडोजी ला भोवोळ आली,आणि तो सावीत्री ला सोडून खाली पडला…!
क्षणात सावित्री सावध होऊन पळून जायच्या बेतात होती,
तितक्यात जंगलातून पाच पन्नास काळीकभिन्न नरभक्षक आदिवासी जमात हातात भाले, बरचें घेऊन बाहेर आली…त्यांचे ते उग्र कुरूप चेहरे पाहताच सावित्री भयकंपित झाली….!

क्रमशः बाजींद भाग १० | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग १०

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे, © राजमुद्रा चैनल

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग १

बाजींद सर्व भाग – बहिर्जी नाईक यांची कहाणी

Leave a Comment