महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,590

बाजींद भाग १३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 6080 8 Min Read

बाजींद भाग १३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग १३ – चंद्रगड. एक हजार दोन हजार लोकवस्तीचे गाव. महाबळेश्वर महादेवाच्या घनदाट अरण्यातील शेवटचे टोक. सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात बिकट अडचणीत वसलेले हे गाव. अशा घनदाट अरण्यात राहण्याचे धाडस केवळ वाघातच असते. चंद्रगड ची माणसे पण काही वाघापेक्षा कमी नव्हती. अश्या हजार दोन हजार वाघांचा म्होरक्या होता चंद्रभान सरदेसाई..!

बाराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊली समाधिस्त झाल्या आणि सर्व महाराष्ट्रावर जणू अवकळा पसरली.
राजे रामदेवराय यादवांचा वैभवसंपन्न महाराष्ट्र गनिमांच्या परकीय सत्ताधाऱ्यांच्या टोळधाडींची रतीबाने शिकार होऊ लागला.
कर्तृत्ववान मनगटांची कित्येक राजघराणी परकीय सत्तेची मांडलिक बनू लागली.!
सत्ता,जहागिरी,स्वार्थ यासाठी स्वकीयांच्या माना तलवारीने उडवणे म्हणजे पोरखेळ होऊ लागला होता..!
स्वाभिमान,स्वत्व नावालाही शिल्लक नव्हते असे म्हटले तरी वावगे ठरणार नव्हते.

पण अशा प्रतिकूल परिस्थितीत मूळचे क्षत्रिय तेज असणारी काही छोटी छोटी राजघराणी आजही महाराष्ट्रात नावापुरते का होईना आपले अस्तित्व टिकवून होती.
आजून परकीय किंवा स्वकीय मांडलिकांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या नव्हत्या…आणि पडल्याही असत्या तरी ही घराणी स्वाभिमानासाठी मरणही पत्करणारी होती.

अशा अगदी बोटावर मोजण्याइतपत शिल्लक असणाऱ्या राजघराण्यापैकी एक छोटेसे घराणे होते…चंद्रगड चे सरदेसाई घराणे..!

चंद्रभान सरदेसाई म्हणजे गावातील प्रमुख कारभारी.
गनिमांचा अन्याय,अत्याचार राजे चंद्रभान ऐकून होते.
म्हणून त्यांनी गावातील शे पाचशे तरुण पोरांची फौज तयार केली होती.
गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचे अतिप्राचीन मन्दिर गावात होते,त्याच्या मागे भव्य तालीम उभी केली होती.
त्यामध्ये कुस्ती,तलवार,भाला,गदा,धनुष्य यासह अनेक युद्धप्रकारचे प्रशिक्षण सुरु होते…!

बाजीराव सरदेसाई हा चंद्रभान सरदेसाई यांचा तरुण मुलगा.
आपल्या गावावर, देवावर, वाडीलांच्यावर त्याचे खूप प्रेम होते.
ऐन तारुण्यात कुस्तीसह इतर युद्धकला त्याने लीलया आत्मसात केल्या होत्या.

नेहमी स्वप्नात वावरणाऱ्या बाजी ला एकटे राहणे खूप आवडत असे.दिवस-दीवसभर घनदाट जंगलात तो फिरत असे.वेगवेगळ्या जंगली प्राण्यांचे आवाज त्याला समजू लागले होते.

पशुपक्ष्यांच्या अदभूत दुनिया तो समजून घेऊ लागला होता.किडा,कीटक मुंगी पासून ते क्रूर वाघ सिंहासारखे हिंस्त्र पशूंची गूढ भाषा त्याला अवगत झाली होती.
चिमणा चिमण्यायांचे भांडण सुद्धा त्याला समःत असे.
अस्वले, हत्ती सारेच त्याच्या ओळखीचे बनले होते.

सुर्य उगवण्याआधी बाजी उठत असे.
अंघोळ पाणी आवरून तालमीत कुस्तीचा सराव करत असे..अगदी दोन दोन तासांची लढत झाली की मग जोराचा ठेका सुरु होत असे.

जोराचा आकडा पाच हजार ओलांडत असे मग कुठेतरी त्याला दम लागत असे. त्यानंतर तलवारीचे हात,दांडपट्टा याचा सराव झाला की शेरभर तुपातला शिरा न्याहारीला येत सोबत पाच शेर देशी गाईचे आकरी दूध रिचवून बाजी धनुष्यबाण अडकवून आपल्या आवडत्या “पक्ष्या” घोड्यावर मांड ठोकून जंगलात जात असे…!

आणि जे व्हायचे तेच झाले.
गनिमांची नजर या चंद्रगड वर पडली.
चंद्रगड मारल्याशिवाय तळकोकणात जाणे अवघड होते हे जाणून मोगली सरदार हुसेनखान हा त्याच्या चार हजार कडवट स्वारासह आणि कुटुंबकबिल्यासह उतरला होता.

हुसेनखान ची खबर त्वरित चंद्रभान ला समजली आणि त्याने त्वरित बाजी व सहकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.

आता आपले गाव गनिमांची खास शिकार होण्याच्या भीतीने चंद्रभान हतबल होऊन बोलू लागला.
चार हजार सैन्यापुढे आपला टिकाव लागणे अवघड आहे त्यामुळे त्याच्या सैन्यात फूट पाडून त्याला जंगलात संपवणे हे उचित होईल त्यामुळे बाजी ला या कामाचा विडा दिला गेला.

बाजी ने आपल्या वडिलांना धीर देत आपण ही कामगिरी चोख बजावू अशी ग्वाही दिली.

बाजी ने त्याच्या विश्वासातील शंभर चिवट धारकरी निवडले आणि मध्यरात्री हुसेनखानाच्या छावणीत घुसायचे ठरवले..साधलेच तर खुद्द हुसेन ला ठार करु आणि मागे येऊ असा बेत ठरऊन ते १०० वीर वाघाच्या काळजाने निघाले.

काळा पोषाख, तलवार घेऊन ती १०० भुते जंगलाची वाट चालू लागली.

दरम्यान छावणी जवळ आल्याची चाहूल लागली.
मोगली चंद्रचांदणी चा ध्वज फडकत असलेली छावणी हुसेनखानाची आहे असे बाजीने ताडले आणि सर्व धारकर्यांना वेगवेगळी कामे सांगून स्वतासोबत 5 अंगरक्षक घेऊन तो स्वता छावणीकडे निघाला.

छावणी जवळ आली आणि त्याने मांजराची पावले टाकत, परिस्थितीचा अंदाज घेत छावणीच्या मागून चाल करायचे ठरवले.

छावणीच्या जवळ पोहचल्यानंतर बाजी ने कमरेची तलवार उपसली आणि छावणीच्या कणातीत घुसवून आत घुसला…!

हुसेनखान कुठे झोपला असावा याचा अंदाज बांधत त्याने तंबूच्या एका विभागात पाऊल टाकले तितक्यात मागून कोणीतरी त्याला घट्ट पकडले..!

क्षणात ती मिठी सोडवून त्याने समोरासमोर पवित्रा घेतला आणि समोर तोंड बांधलेला एक हशम दिसला आणि त्यांची लढाई ऐन तंबूतच जुंपली.

तलवारीच्या खनखनाटने सारी छावणी जागी झाली आणि तंबू कडे धाऊ लागली.

बाजी ने बगल देताच पुढचा हशम झुकला आणि तितक्यात त्याने आपली तलवार त्याच्या तोंडावर बांधलेल्या अवलानात घुसवली आणि ते कापड फाडले……तो हशम नसून एक स्त्री आहे हे बाजी ने पहिले…!

तिचे केस विस्कटले गेले आणि मशालीच्या उजेडात तिची सतेज कांती आणि बोलके डोळे दिसले आणि बाजींच्या हृदयाचा ठाव घेतला…!

आपण लढाईत आहोत याचे भान हरपून तो तिचे मूर्तिमंत सौंदर्य न्याहाळू लागला…इतक्यात शेकडो हशम एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले आणि दोरखंडाने त्याला बांधून मैदानात आणले गेले.

हुसेनखान स्वता युद्धाचा पोषाख घालून हातात नंगी तलवार घेऊन बाहेर आला आणि त्या स्त्री ला उद्देशून बोलला…बहुत खूब नूरजहा… हमे फक्र है की आप हमारी बेटी हो…!

बाजी ला कळले की ती मुलगी हुसेनखान ची मुलगी आहे.

चवताळलेल्या हुसेनखानाने रागाने बाजीकडे पाहत त्याची समशेर त्याच्यावर रोखली तितक्यात सारी छावणी थरारली.

साऱ्या जंगलात किडा,कीटक,साप,मुंगी पासून हत्ती, सिंह, वाघ एकाच वेळी प्रचंड गर्जना करत बाहेर पडले आणि समोर जो जो दिसेल तो तो त्यांची शिकार होऊ लागला.

हुसेनखान ला समजेना समोर काय होत आहे.
त्याची शूर फौज साप चावून, हत्तीच्या पायाखाली, अस्वलांच्या हल्लात, वाघाच्या तोंडी मरु लागली…उरलेली वाट दिसेल तिकडे पळत सुटली….सारी फौज अस्ताव्यस्त होऊन गेली…..!

काय घडत आहे बाजीला सुद्धा समजेना…एकटा तो सोडून सर्वाना कीडा मुंगी चावत होत्या….क्षणात एक हिंस्त्र वाघ छलांग मारत नूरजहा च्या समोर आला आणि तिच्यावर हल्ला करणार इतक्यात बाजी सावध झाला आणि क्षणात एका हाताने त्या मुलगी ला बाजू करत आपली तलवार त्या वाघावर रोखली….!

बाजी ची तलवार पाहताच त्या वाघाने सपशेल माघार घेतली.
हे पाहताच बाजी ला नवल वाटले…तो सर्वत्र पाहू लागला…ही सारी जनावरे माझ्यासाठी इथवर आली आहेत याचे त्याला खूपच नवल वाटले…!
त्याने पुढे होऊन सर्वांच्याकडे पाहत जोरात आरोळी ठोकली…”थांबा”…..!

त्याचा तो गगणभेदी आवाज ऐकून सारे पशु पक्षी स्तबद्ध झाले…हे पाहताच हुसेनखान सुद्धा भारावून गेला…!

चला मागे…जावा निघून…यांना आपली चूक समजली आहे….जावा निघून…!

बाजीचे हे शब्द ऐकताच सर्व सर्व किडा कीटक मुंगी, सर्प, हत्ती, वाघ, अस्वल, सिंह जसे आले होते तसे निघून गेले….!

एव्हाना हुसेनखानाची निम्म्यापेक्षा जास्त फौज मृत्युमुखी पडली होती, उरलेली जखमी होती…!

या हिंस्त्र प्राण्यांना केवळ शब्दाने मागे घालावंणारा हा वीर कोण याचे कुतूहल हुसेनखानाला लागले होते.
त्यांने बाजी च्या रुपात दैवी अवलीयाला पाहिले आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याच्या समोर नतमस्तक होऊन तलवार आडवी धरली…!

बोलला…ज्याच्या केवळ नावाने मोगली दरबारातील मोठमोठे सरदार अदबीने झुकतात, ज्याची तलवार शत्रूचे रक्त पिऊन मगच म्यानात जाते असा मी हुसेनशहा महम्मदशाही तुझ्यासारख्या विरासमोर शरण जात आहे….!

क्रमशः – बाजींद भाग १३ | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग १३

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a Comment