महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,681

बाजींद भाग १६ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

Views: 5964
6 Min Read

बाजींद भाग १६ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग १६ – चंद्रगड ची खरी दौलत म्हणजे ही जनावरे आहेत…या सर्वांची भाषा मला समजते. यांचे सुख दुःख सर्वकाही हे मला सांगतात व मी त्यांची माझ्या माझ्या परीने मदत करतो..!
खूप मजा येते यांच्यासोबत जीवन जगण्यात…!

यावर आश्चर्य व्यक्त करत नुराजहाँ बोलली…पण राजसाहब…या हिंस्त्र पशूंची भाषा तुम्हास कशी काय अवगत आहे ?
खरोखर हा केवळ चमत्कार आहे.
एखाद्या देवदूतालाच ही भाषा समजु शकते..
खरोखर आम्ही सर्व तुमच्यापुढे नतमस्तक आहोत.

यावर हसत बाजी उत्तरला.
काही नाही राजकुमारी…एकदा एकमेकांची मने समजू लागली की जगातल्या सर्व भाषा एकच आहेत याची अनुभूती येते..!
प्रत्येक प्राण्यांचे एक वेगळे विश्व असते, प्रत्येकाला समस्या, संकटे असतात…पण मन मोकळे करायला कोणीच नसते…ज्याला आपले आपले म्हणत असतो…ते सुद्धा आपल्या माणसांची मने ओळखायला अपुरे असतात..!

बघा ना…हा ची ची करणारा प्रचंड हत्ती..पण मनाने खूपच हळवा आहे….बिचारा सर्व गोष्टी मला सांगत असतो.
हे वाघ, सिंह, सर्प, विंचू….सर्वच्या सर्व बोलू शकतात.
त्यांनाही मन आहे…फक्त मनुष्य आणि ते यांच्यातील अहंकाराचा अभेद्य पडदा जोवर लंघून आपण पुढे जात नाही…तोवर..बोलणाऱ्या माणसांचीही मने आपण समजू शकणार नाही…..!

त्यांच्या दोघांची ही चर्चाच सुरु असतानाच एक घार उंच आकाशात घिरट्या घालत घालत मोठ्याने आवाज करत खाली येऊ लागली आणि बाजींच्या अंगावर सर्दिशी काटा आला…त्याने कान टवकारून त्या घारीकडे पहिले आणि बेभान होऊन तो पक्षा घोड्यावर स्वार झाला आणि बेताल दौडत चंद्रगड च्या वाटेला लागला…!

त्याच्या पाठोपाठ नुराजहाँ पण निघाली…तिला काही समजेना की बाजी असा बेभान होऊन का निघाला आहे…ती त्याला हाका मारत होती, पण काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता..!

त्याला घारीच्या एकसारख्या ओरडण्याचा अर्थ समजला होता……बाजी…तुझ्या चंद्रगड ची राखरांगोळी उठली आहे.
हजारो पठाण एका दिवसात जंगल पार करुन तुझ्या राज्यावर तुटून पडले आहेत…तुझी माणसे मरत आहेत….तुझ्या गावात आलेला हुसेनखान तुझा मित्र नसून तुझा घात करायला आलेला तुझा शत्रू आहे…”

बाजी च्या डोळ्यात आग होती.
त्याचे दौडणे बेभान झाले आणि लांबूनच लोकांच्या गगनभेदी किंचाळया त्याच्या कानी पडल्या…असंख्य लोक मोगली तलवारीखाली कापले गेले होते…शेकडो पठाण हातात नंग्या तलवारी घेऊन मुलाबाळांच्या कत्तली करत होते.
बाजी चा राहता महाल पेटला होता….सारे नष्ट झाले होते..!
राजे चंद्रभान हे हुसेनखानाशी लढता लढता गतप्राण झाले होते….!

काहीच शिल्लक नव्हते…केवळ मोगली अत्याचार दिसत होता…!

बाजी च्या डोळ्यात आता रक्त उतरले होते…समोर ते धिप्पाड मोगली हशम हातात रक्ताळलेल्या तलवारी घेऊन चंद्रगड वासीयांची कत्तल करत होते.
गोड बोलून आपला व आपल्या वडिलांचा केलेला हा विश्वासघात त्याला जिव्हारी लागला होता.
बाजी ने कमरेची तलवार उपसली आणि तुफान दौडत असलेल्या घोड्यावरून झेप टाकली ती सरळ समोर कत्तल करत असलेल्या हशमाच्या छातीवर.

तलवार छातीतून आरपार करत बाजी ने आकाशाकडे पाहत एक गगनभेदी किंचाळी फोडली आणि समोर दिसेल त्याचे तुकडे करु लागला..!

सळसळत्या नागिणीसारखी तलवार फिरू लागली आणि जो आडवे येईल त्याची खांडोळी उडू लागली.
बाजी ने केवळ एकट्याने तुफान कत्तल मांडलेली पाहून नुराजहाँ ने सुद्धा समशेर उपसली आणि तिनेही लढा सुरु केला.
आता हि लढाई केवळ बाजी ची नव्हती…तिची सुद्धा होती.
प्रत्यक्ष तिच्या बापाने असा घोर विश्वासघात केलेला तिला मनस्वी दुःखी करून गेला होता.
आता मरण आले तरी बाजी सोबत मरायला ती सिद्ध झाली आणि तिची समशेर तिच्याच फौजेचे रक्त पिऊ लागली..!

बाजी च्या किंचाळन्याने जंगलातील सर्व प्राणी चंद्रगड कडे दौडू लागली.
विषारी सर्प, काटे फेकणारी साळींदर, चित्ते, वाघ, सिंह, अस्वले, हत्ती…शेकडो प्राणी आपल्या जिवलग मित्रासाठी चंद्रगड वर तुटून पडले….आणि बाजी च्या एकाकी लढ्याला बळ मिळाले…!

हत्तीच्या पायाखाली कलिंगड फुटावे तसे मोगली सैनिकांची मुंडकी फुटू लागली.
सर्पां चावल्याने तोंडात फेस येऊन सैनिक मरु लागले…!
वाघ सिंह तर चिंध्या फाडाव्यात तशी माणसे फाडून टाकू लागळी.
साळींदराची काटे गळ्यात घुसत प्राण घेऊ लागली…!

आणि बाजी व नुराजहाँ ची तलवारी तुफान कत्तल करु लागली.

बघता बघता निम्म्यापेक्षा जास्त फौज कत्तल झाली होती.
जवळपास दोन तास चाललेले हे महाभयानक थरारनाट्य आता रंगात आले होते.

नुराजहाँ पुरती दमली होती.
तिच्या सर्वांगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या.
तिला चक्कर आली आणि ती तोल जाऊन पडली.

कत्तल आणि मरणाच्या भीतीने सारी फौज डोंगरवाटेने पळू लागली आणि बाजी चे लक्ष नुराजहाँ कडे गेले..!

त्याने क्षणात तलवार टाकली आणि तिची मान आपल्या हाती धरुन तिला सावध करु लागला…!

आता तिच्याशिवाय बाजी चे कोणी नव्हते….ती सावध झाली.

प्रचंड जखमेने रक्त खूप गेले होते..!

ती बोलू लागली…..राजे, मला माफ करा.
माझ्या वडिलांनी तुमचा क्रूर विश्वासघात केला, तुमच्यासाठी मला मरण आले, मी माझे पाप माझ्या रक्ताने धुवून जात आहे……तुमच्यासारखा वीर मी आजवर पहिला नाही….तुम्ही बाजी नाही…तर बाजींद आहात….बाजींद….बाजींद….!

असे बोलत नुराजहाँ ने डोळे मीटले…!
साऱ्या चंद्रगड बरोबर आयुष्यात प्रथमच केलेले प्रेमही बाजींच्या आयुष्यातून कायमचे गेले म्हणून तो उठून उभा राहून जोरजोराने रडू लागला….!

इतक्यात एक बाण सु सु करत आला आणि त्याने बाजींच्या छातीचा वेध घेतला……!
गतप्राण होऊन बाजींचे तो देह खाली कोसळला.

सारे संपले.

तेव्हापासून ते आजतागायत हे जंगल शापीत झाले आहे.
इथे येणारा प्रत्येक माणूस आजवर जिवंत माघारी गेला नाही.
आज १०० वर्षे होऊन सुद्धा बाजींद चे भूत या जंगलात भटकते..!

केवळ आम्हीच नव्हे तर मोठमोठे सत्ताधीश सुद्धा बाजींद च्या जंगलात पाऊल ठेवत नाही…!

आणि आज केवळ तुमच्या अल्लड पणामुळे एका भयानक संकटात आपण अडकलो आहोत…आपण आता बाजींद च्या जंगलात आहोत…आपले मरण नक्की…!

सावीत्री मोठ्या चिंतेत हि सारी कथा खंडोजी ला सांगत होती आणि तो लक्षपूर्वक ते ऐकत होता…!

क्रमशः बाजींद भाग १६ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a Comment