महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,28,718

बाजींद भाग १७ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 6149 7 Min Read

बाजींद भाग १७ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग १७ – हुंदका देत रडत असणाऱ्या सावित्रीच्या खांद्याला धरत खंडोजी निर्धारी शब्दात बोलला…. सावीत्री….रडू नको. हा खंडोजी तुझ्या सोबत असताना बाजींद काय..साक्षात यम जरी आला तरी त्याला चार हात करावी लागतील या खंडोजी बरोबर…!

शिवछत्रपतींचा धारकरी आहे मी, आम्हाला भुते लागत नाहीत…उलट भुतानाच आम्ही लागतो.
या खुळचट मनाच्या कल्पना असतात साऊ… असे म्हणत खंडोजी ने तलवार उपसली आणि बोलू लागला…!

आता मला हा बाजींद व त्याचे झपाटलेले जंगल काय आहे याचा उलगडा केलाच पाहिजे..असे म्हणत तो उठला..!

त्याच्या नजरेत त्याच्या विचारांचा ठामपणा होता, दृढ निश्चय होता तो स्वतःच्या मनगटावर आणि चित्तात होते ते शिवछत्रपती.

ही हिम्मत, ही ताकत त्याच्यात आली होती ती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग जीवनप्रकाशामुळे..केवळ खंडोजीच नव्हे…त्यांचे सारे सारे सवंगडी उरात अशी जग जिंकायची उमेद ठेवत होते…!
मूर्तिमंत जिद्द, प्रेरणेचा झरा…महाराज शिवछत्रपती.

एव्हाना तांबडं फुटलं होत..!
त्याने पुढे होऊन रात्री ज्या आर्त किंकाळीने त्याचे लक्ष वेधून घेतले तिकडे मोर्चा वळवला.

समोरच एक मनुष्याचा देह गतप्राण होऊन पडलेला होता.
जरा निरखून पहिले अन जाणवू लागले की तो भिल्ल असावा.

कदाचित सावित्रीच्या पाठलागात तो इथवर पोचला असावा आणि “बाजींद” च्या येण्याने घाबरुन इकडे तिकडे लपला असावा व रात्री त्याला कोणीतरी ठार केले असावे…!

एक मोठा श्वास घेत खंडोजी ने सावीत्री चा हात धरला.
हातावर शिरक्याचे वैभवाचे प्रतीक उगवता सुर्य गोंदनाने गोंदले होता…!

खंडोजी बोलला…साऊ मला सांग…जर बाजींद तुझ्या समोर होता, तर त्याने तुला का ठार केले नाही ??

काहीशी घाबरत ती बोलली,

काल मी इथे पोहोचले आणि ती भयानक घटना घडली.
वेगवेगळी हिंस्त्र जंगली प्राणी किंचाळत होती.
मी क्षणात ओळखले की भिल्लांच्या भीतीने मी बाजींद च्या हद्दीत पाऊल ठेवले आहे.
आणि काल मी त्याला पाहिले.
घारे डोळे, कोवळी दाढी, अनामिक असे गूढ हास्य आणि सभोवतालच्या अणुरेणुचा स्वामी असल्याची एक प्रकारची मग्रुरी दिसत होती त्याच्या स्वभावात..!
माझी भीतीने गाळण उडाली होती, समोर दोन वाघ माझ्याकडेच येताहेत हे पाहताच मला मूर्च्छा आली..!
परत तो कुठे गेला मला काहीच आठवत नाही..!

जेव्हा जाग आली तेव्हा २ भिल्ल अजूनही माझ्या मागावर होते, ते माझ्या शुद्धीवर येण्याची वाटच पाहत बसलेले होते.
मी सावध होताच वासनात्मक नजरेने ते हसू लागले, मी त्यांच्यावर हल्ला करत मागे पळून जाण्याचा तयारीत होते तितक्यात जंगलात पुन्हा जनावरांच्या किंचाळया पडल्या व माझ्या अगोदर तेच भिल्ल धाऊ लागले..!

धावता धावता मी इथे पोहोचले तर दुरुनच तुम्ही येताना दिसला आणि माझे हृदय अक्षरशः आनंदाने भरुन गेले, जणू माझे आपलं कोणी माझ्यासाठी इथवर आले आहे..!
मी क्षणात तुमच्या मागे येऊन तुमचे तोंड दाबत इथे लपवले आणि समोर या भिल्लाला कदाचित बाजींद किंवा त्याच्या जनावरांनी मारुन टाकले असावे…!

सर्व प्रसंग सांगत असताना सावीत्री गहिवरून रडू लागली अन खंडोजीच्या मिठीत विसावली..!
तिच्या आकस्मित मिठीने खंडोजीच्या सर्वांगातून जणू वीज थरारली…!
त्याने तिला समजवत तिची मिठी सोडवली…तो बोलू लागला…!

“साऊ… तुला पहिल्यांदाच पहिले अन आयुष्यात प्रेम कशाला म्हणतात याची अनुभूती आली.
तु बेरडाशी एकटी सामने गेलेले ऐकले आणि माझ्या हातातून काही सुटत आहे असे वाटू लागले आणि मी कोणताही विचार न करता मोहिमेवर असूनही कर्तव्य विसरुन तुझ्यामागे आलो…मी जर तुला जंगलातून घेऊन आलो नसतो तर तुलाही गमावून बसलो असतो आणि माझे कर्तव्य सुद्धा…!
माझे जितके तुझ्यावर प्रेम आहे तितकेच माझ्या कर्तव्यावर…असे म्हणत त्यानेही साऊ ला मिठी मारली…दोघेही काही क्षण तसेच उभे होते…!
माझ्यावर विश्वास ठेव..मी सर्व ठीक करेन..!

काही क्षण गेले आणि जंगलात पुन्हा बाजींद च्या येण्याची चाहूल लागली.
पशु पक्षी जनावरे किंचाळू लागली…!

सावित्रीने क्षणात खंडोजीचा हात धरला आणि म्हणाली…चला…जवळच गुहा आहे…लौकर बाहेर पडूया…. बाजींद च्या तावडीतून जिवंत राहणे सोपे नाही…!

धीराच्या शब्दात खंडोजी बोलला….
साऊ माझ्यावर विश्वास ठेव…मी सामने होते त्याच्या…साधले तर १०० वर्षाची तुमची कल्पना खोटी ठरेल..आणि तू म्हणतेस तसे खरेच निघाले..तर मात्र असा अनुभव माझ्या हेरखात्याला सांगेन…दोन्ही साधले जाईल..!

असे म्हणत तो जिकडून आवाज येत आहे तिकडे जाऊ लागला….!

दाट जंगलात किर्र झाडीत चित्रविचित्र आवाज येत होते..पुढे जाईल तसे आवाज तीव्र होत होते…आणि एक वळण घेतले तो पुढे ते विहंगम दृश्य दिसले..!

कमरेला तलवार अडकवून तो धीरगंभीर पुरुष एका मोठ्या दगडावर उभा होता..आसपास जंगली जनावरे बसली होती…!

खंडोजी व सावीत्री ला पाहताच बाजींद ने स्मित हास्य केले आणि जोरात गर्जना केली….!

“स्वागत आहे योध्या, तुझे मी माझ्या जंगलात स्वागत करतो…असे बोलत तो दगडावरून खाली झेपावला…!

खंडोजी ला काहीच समजेना काय घडत आहे ते…हे भूत असेल तर हवेत का उडत आले नाही…जर नाही तर १०० वर्षे जगलेच कसे…डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले…सावित्रीच्या तर हृदयाची घालमेल सुरु झाली…!

प्रसंगाचे गांभीर्य राखत खंडोजी ने तलवार समोरून चालत येत असलेल्या बाजींद वर रोखली…!
ते पाहताच पक्षी, कीटक आणि प्राण्यांनी पुन्हा जोरात आवाज वाढवला..वाघांच्या डरकाळ्या फुटल्या…पण शांत बाजींद ने हात वर केला तसे सर्व प्राणी शांत झाले….!

त्याने मोठ्या आवाजात एक गूढ आवाज काढला…तो एक सांकेतिक आवाज होता, क्षणात सारी जनावरे, पशु, पक्षी तिथून निघून जाऊ लागले…जंगल एकदम मोकळे भासू लागले..!

समोर चालत येत असलेल्या बाजींद ने पुन्हा दोन्ही हात वर केले आणि डोळे मिटून पुन्हा एक गूढ आवाज केला…क्षण, दुसरा क्षण…जंगलाच्या बाजूने शेकडो घोडेस्वार हातात तलवारी, भाले घेऊन हजर झाले..!

सारे जंगल स्वारांच्या गर्दीने भरून गेले…त्यातल्या एका स्वाराच्या हातात भव्य असा परमपवित्र”भगवा ध्वज” होता…!

खंडोजीने हातातील तलवार टाकली…तो पुटपुटला…भगवा जरीपटका …?

ज्याच्यासाठी हजारो वीरांनी आयुष्याची होळी करुन, रक्त सांडून हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली निर्माण केले…असा स्वराज्याचा भगवा ध्वज त्या स्वाराच्या हातात पाहताच…खंडोजी कमरेत झुकला….एक …दोन…तीन….मानाचे तीन मुजरे त्याने त्या परमपवित्र ध्वजाकडे पाहून केले…!

क्रमशः बाजींद भाग १७ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a Comment