बाजींद भाग २१ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…
बाजींद भाग २१ – पावसाचा जोर कमी झाला आणि अंधाऱ्या रस्त्याचा मागोवा घेत सखाराम व त्याचे साथीदार चालू लागले.
मध्येच वीज चमकायची आणि त्याच्या लख्ख प्रकाशात त्या रायगड परिसरातील भयान जंगलाचे स्वरूप समोर दिसायचे आणि क्षणात पुन्हा काळोख पसरायचा..!
जवळपास एक प्रहर होत आला ते चालत चालत एका विस्तीर्ण पठाराजवळ आले होते.
दूरवर काहीतरी ऐकू येत आहे याची चाहूल सखाराम ला लागली आणि त्याने कान देऊन ऐकले व बोलला…गड्यानो..दूरवर माणसांची वस्ती असण्याची दाट शक्यता आहे,मला माणसे असल्याचा आवाज येत आहे.
चला…तिकडे जाऊया..!
असे म्हणताच..सर्वजण त्या आवाजाच्या बाजूने चालू लागली.
हळूहळू तो आवाज तीव्र होऊ लागला आणि सोबत घोड्याच्या खिंकाळन्याचाही आवाज येऊ लागला…!
सखाराम ने पाहिले कि समोर कोणाची तरी छावणी पडली आहे.
पिवळा ध्वज त्यावर गरुडाचे चिन्ह असणारे निशाण समोर डौलत होते.
सावधपणे ते हळूहळू छावनिकडे सरकू लागले इतक्यात त्या चौघांच्या पाठीला कोणीतरी तलवारी लावल्या….एक म्होरक्या उच्च रवात बोलू लागला……कोण र तुम्ही ?
राजे येसाजीराव शिर्क्यांच्या छावणीची टेहळणी करता काय ?
तोवर दुसरा बोलला…..आर बोलून ताकत काय वाया घालवतोस…घाल रपाटा डोस्क्यात…!
सावध झालेल्या सखाराम ने जाणले कि ही छावणी सावित्रीच्या वडिलांची आहे …त्याने प्रसंगावधान राखत त्या शिलेदाराला सांगितले…,
आओ शिलेदार आम्ही राजकुमारी साहेब सावित्रीबाईंचे पाहुणे आहोत….सोडा आमास्नी…!
काय…?
राजकुमारीसाहेबांचे पाहुणे …?
एक जण बोलून गेला…!
होय, त्यांनीच रात्री इकडे बोलावले म्हणून आलोय आम्ही..!
त्याचे ते बोल ऐकताच त्या म्होरक्याने तलवारी खाली घेतल्या आणि त्या चोघांच्याकडे बघत बोलू लागला….,
तुम्हाला राणीसाहेबांचे नाव माहिती आहे म्हणजे नक्कीच तुमची ओळख असेल….चला आमच्या सोबत आम्ही राजकुमारी साहेबाना वर्दी देतो…त्यांनी जर तुम्हाला ओळखले नाही,तर तुमचे मरण नक्की…चला…!
त्या चौघांना धक्का देत छावणीकडे आणले गेले..!
ठायी ठायी हातात नंग्या तलवारी घेऊन पहारा देणाऱ्या त्या छावणीत केवळ शे-पाचशे वीर उभे होते.
मुख्य छावणीवर शिर्क्यांचा गरुडध्वज वार्यावर हिंदोळे देत होता..!
पलीत्यांच्या प्रकाशात छावणी उजळून निघाली होती. नुकत्याच झालेल्या पावसाने गारठलेली घोडी ,बैल अंग झिन्झाडत होती..!
त्या शिलेदाराने सावित्रीच्या कक्षात जाऊन वर्दी दिली आणि ते ऐकताच आत बिछान्यावर पहुडलेली सावित्री धावतच बाहेर आली…..!
सखाराम ने सावित्रीला पाहताच सुटकेचा उच्श्वास टाकला..!
सकाळी कुठे गायब झालात तुम्ही सारे ?
गंभीर मुद्रेने सावित्रीने त्या चौघांना प्रश्न केला.
काय ?
आम्ही गायब ?
बाईसाहेब रात्री आम्ही त्या मंदिरात झोपलो ,पण आम्हाला जाग आली ते एका डोंगरावर..ऐन वेळी खन्डोजीराव तिथे आले नसते तर त्या भुकेल्या वाघांनी आमची न्याहारीच केली असती….!
सखाराम उत्तरला…!
काय ?
खंडोजी आलेला…..कुठे आहे तो..?
त्याला शोधून शोधून आमच्या सर्वांचा उर फाटला आहे आणि तो असा लपंडाव खेळतोय…?
माझे डोके बधीर होत आहे बाईसाहेब….आज दिवसभर खन्डोजीराव आमच्या सोबत या जंगलातल्या डोंगरकापर्यातून इथवर चालत आले आणि सूर्य अस्ताला गेल्यावर कुठेतरी गायब झाले …..आता लिहून ठेवा तो सकाळी इथे उगवणार नक्की…!
खंडोजी दिवसभर तुमच्या सोबत होता ?
सावित्रीने प्रतिप्रश्न केला ..?
तो का असा वागत आहे समजेना..मी व माझ्या यशवंतमाचीची सारी फौज त्याला शोधत आहोत ..!
चला…मी तुम्हाला माझ्या वडिलांची ओळख देते करून..असे म्हणून सावित्री व ते चौघे महाराज येसाजीरावांच्या कक्षात गेले…..!
एका उंच अशा माचानीवर भरजरी कपडे घालून एका पुराणपुरुषाप्रमाणे बैठक घालून सोबत २-३ वीरांसोबत बैठकीत व्यस्त असलेल्या राजे येसाजीरावानी सावित्री आणि त्या चौघाकडे पाहिले…तसे काही न सांगता समोर बसलेले २-३ वीर उठून राजे येसाजी आणि सावित्रीला मुजरा करत निघून गेले…!
या या …बसा ….समोर असलेल्या बैठक व्यवस्थेकडे बसायची खून करत राजे येसाजी बोलू लागले …!
कालच मला आमच्या साऊ नी तुमची व्यथा सांगितली…!
तुमच्या गावाची अडचण खूप मोठी आहे गड्यानो….नक्कीच राजे शिवाजी भोसले यात लक्ष घालतील तर हा त्रास कायमचा मिटेल….पण तुमचे अभिनंदन कि इतक्या मुसळधार पावसात जीव मुठीत धरून तुम्ही लोक गावासाठी बाहेर पडलात…तुमच्यासारखी समाजाची सेवक लोक हल्ली बघायला मिळत नाहीत रे ..!
सावित्री..यांचा चांगला पाहुणचार कर आणि उद्या मात्र खन्डोजीला शोधूनच काढले पाहिजे….!
खन्डोजीचे नाव घेताच सावित्री आणि राजे येसाजींच्या डोळ्यात पाणी आले ….ते सावरत राजे बोलले….साऊ वेळ फार नाही ग आता……फक्त उद्याची रात्र…काय करायचे असेल ते आजच करा……परवाचा सूर्योदय आणि शिर्के साम्राज्य……….!
बोलता बोलता राजे येसाजीचा शब्द जड झाला आणि ते उठून पाठमोरे झाले….!
डोळ्यावर आलेले पाणी पुसत सावित्री निर्धारी आवाजात बोलत उठली…..आबा, काळजी करू नका..!
मी तुमचीच लेक आहे ……उद्या खंडोजी ला घेऊनच मी इकडे येते….तुम्ही विश्रांती घ्या…!
असे बोलून सावित्री त्या चौघांना घेऊन वेगळ्या छावणीत परतली..!
नोकर चाकाराना बोलावून घेतले आणि सखाराम व त्याच्या सहकार्यांच्या भोजनाची व्यवस्था केली ..!
दिवसभर मर मर चालून पोटात भुकेने काहूर उठले होते..!
जेवणाचे नाव उच्चारताच चौघांचेही चेहरे कमळासारखे फुलले…!
पंचपक्वान्न ठेवलेली थाळी चौघांनी संपवायला प्रारंभ केला…!
साऊ समोर बसूनच ते पाहत होती…….
ती म्हणाली…सावकाश होऊदे भाऊ…ठसका लागेल…!
घोटभर पाण्याचा घुटका घेत सखाराम बोलला….बाईसाहेब दिसभर खंडूजी न काल रातीची तुमची कथा सांगितली आमास्नी…..लय लय पुण्यवान मानस हायसा तुम्ही म्हणून तुम्हास्नी बाजिंद न तेच्या राज्यात बोलावून घेऊन १०० वर्षाचे आक्रीत उलघडून सांगितले ते……!
क्षणभर गंभीर होऊन सावित्रीने किंचित हास्य केले आणि बोलू लागली…!
होय, पुण्य तर केलेच होते माझ्या बाप जाद्यानी पण….आम्हाला काय माहिती होत कि नियती आमच्याशी इतका क्रूर खेळ खेळत आहे …!
सावित्री पुन्हा तिच्या आयुष्याच्या गूढ गर्भात विसरून बोलू लागली…..!
बाजिंद ने आम्हाला तिथे बोलावून घेतले आहे याची जाणीव आम्हाला झाली, पण त्यापेक्षाही त्याच्यावर अभिमान एका गोष्टीचा होता कि १०० वर्षे हि वेडी माणसे स्वताचे जीवन न जगता ,इतके गूढ ज्ञान असून देखील त्याचा गैरवापर न करता प्रसिद्धी पासून दूर राहून देशाचे काम करत होती…!
त्या रात्री आम्हाला बाजिंद ने सारे चंद्रगड फिरवून दाखवले, पाहुणचार केला आणि रात्र होताच एका गंभीर विषयाचे बोलणे करायला सुरवात केली….!
खंडोजी….१०० वर्षे आम्ही ज्या संधीच्या शोधात आहे, ती आम्हाला तुमच्या रूपाने मिळाली आहे….!
माझे एक काम कराल ?
बाजिंद ने मोठ्या गंभीर मुद्रेने प्रश्न केला ..!
खंडोजी ने होकाराठी मान हलवत म्हणाला……बाजिंद ….मला माहिती नाही आपले जन्मोजन्मीचे काय नाते असावे …पण तुमचे हे जे कार्य आहे ते महाराजांच्या कार्यापेक्षा कमी नाही आहे …!
नाही, नाही खन्डोजीराव…..महाराज हिमालय तर आम्ही कुठली तर भुरटी टेकडी..ते गरुड तर आम्ही डास..!
अरे ३५० वर्षाची गानिमांची भीती सामान्य माणसांच्या मनातून काढून असामान्य कामगिरी करवून घेणारे शिवाजीराजे हे जणू शिवाचे अवतार वाटतात कधी कधी…!
माझे एक काम कराल ?
हो नक्कीच..आदेश द्या ..खंडोजी बाजिंद ला म्हणाला….!
ऐक, खंडोजी….मी बाजिंद च्या तपस्येची,संघर्षाची कमाई असलेले ते गूढ विज्ञान लिहलेली वही हिंदवी स्वराज्याच्या महान कार्याला देऊ इच्छितो…!
तू ती वही स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याकडे देशील का
खंडोजी चे डोळे विस्फारले गेले…हृदयाची कंपने अतितीव्र झाली…!
निसर्गाच्या अनंत किमयेच्या एका कुलपाची चावी माझ्याकडे मिळत आहे हे ऐकूनच तो भान हरपून गेला….!
त्याला सावध करत बाजिंद बोलला…..बोल खंडोजी..माझ्यापुढे तुझ्या इतका प्रामाणिक आणि विश्वासू माणूस दुसरा कोणीच नाही….कारण……बहिर्जी नाईक हे गुप्तहेर शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब व्यतिरिक्त माहिती असेल तर तो फक्त तू आहेस …आणि हि वही फक्त आणि फक्त नाईकांच्या हाती गेली तरच स्वराज्याचे काम अनंत पटीने वाढेल………!
बोल….करशील एवढे काम ?
क्षणात खंडोजी उत्तरला……!
होय….करेन हे काम मी…!
क्रमशः बाजींद भाग २१ | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग २१
संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव