महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,74,584

बाजींद भाग २२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 5988 6 Min Read

बाजींद भाग २२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग २२ – खंडोजी ने मोठ्या धाडसाने बाजींद चे ते गूढ ज्ञान लिहलेली वही शिवछत्रपतीचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना सोपवून ते ज्ञान हिंदवी स्वराज्याच्या कामी यावे यासाठी ती जिवावरची जोखीम पत्करली.

त्या रात्री बाजींद ने चंद्रगड ची ती मूठभर मात्र चिवट फौज आमच्या रक्षणास ठेवली व तो जंगलात काहीतरी उद्देशाने निघून गेला.

सावीत्री बोलत होती आणि सखाराम व त्याचे साथीदार जेवण आटोपून थंडगार हवेच्या झुळकात ढगाळलेल्या रात्री ती रहस्यमय कथा ऐकत होते….!

सखाराम बोलला….”बाईसाहेब…बहिर्जी नाईक यांचे नाव मी पण ऐकले आहे, स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख……पण, बाईसाहेब पुढे काय घडले…”

सावित्रीने पुन्हा दीर्घ श्वास घेतला आणि ती बोलू लागली…..!

खंडोजी व मी मोठ्या उत्सुकतेने सारा चंद्रगड परिसर न्याहळत होतो व बाजींद च्या परतण्याची वाट पाहत होतो पण, तितक्यात जंगलात काहीतरी चमकले….क्षणाचाही विलंब न करता बाजींद ची फौज त्या दिशेने दौडू लागली…पाहतो तर एक किडकिडीत बांध्याचा ,काळा पोषाख परिधान केलेला “निशाणबारदार हारकारा” वाऱ्याच्या वेगाने नदीकडे धावू लागला…बघता बघता त्याने नदीत उडी मारुन पलीकडच्या दाट जंगलात पसार झाला…!

सर्वांच्या काळजाचा ठाव चुकला होता…हा हारकारा नेमका कोणाचा असावा ??
याने बाजींद व गूढ ज्ञानाच्या वहीच रहस्य तर नाही ना ऐकले….सर्व फौज काळजीत पडली व बाजींद कडे काही शिलेदार पाठवून दिले….!
काही वेळ तसाच गेला अन बाजींद च्या येण्याची ती भयानक चाहूल पुन्हा लागली…वाघ, सिंह, हत्ती, चित्ते..अगणित हिंस्त्र पशूंची भयानक डरकाळी व आसमंत गर्जून सोडणारा चित्कार पाहून सावीत्री व खंडोजी चे पण सर्वांग शहारले…!

बाजींद समोर येताच सर्व फौजेचे मुजरे झडले…खंडोजी व साऊ यांनी पण मुजरा केला..!

त्यांच्याकडे गंभीर नजरेने पाहत बाजींद बोलला….

“खंडोजी…तुम्ही शिर्के व सूर्यराव बेरड यांच्या युद्धात दरीवरून उडी मारुन नदीत पोहत जेव्हा इकडे येत होता तेव्हा सूर्यराव चा हारकारा तुमच्या मागावर होता…त्याने बाजींद च्या जीवनाचे व गूढ वहीचे रहस्य ऐकले आहे व तो वाऱ्याच्या वेगाने सूर्यराव पर्यंत पोहचला पण असेल…”

मोठा घात झाला आहे खंडोजी…आता सूर्यराव च्या एकाही माणसाला जिवंत ठेवणे म्हणजे साक्षात बाजींद च्या १०० वर्षाच्या परंपरेला मूठमाती देणे ठरेल…!

हे धर….असे बोलत बाजींद ने हातातून घेऊन आलेली ती गूढ ज्ञानाची वही खंडोजी कडे देत बोलू लागला…!

खंडोजी…मला वचन दे…ही वही फक्त बहिर्जी वाचतील व त्यांनाच तू देशील…तुला आई भवानीची आण आहे “

क्षणात खंडोजी उत्तरला…काळजी नसावी…प्रसंगी जीव द्यावा लागला तरी बेहत्तर ही जबाबदारी मी पार करीनच…तुम्ही बिनधास्त रहा..”

ठीक आहे…मला त्वरित सूर्यराव वर छापा मारायला हवा….तुम्ही निघा….तुम्ही आता थेट यशवंतमाची गाठा… सावित्रीचे वडील तुमची दोघांचीही काळजी करत आहेत…साऊ ला तिथे ठेव व संधी शोधून तिथून निघ व ही जबाबदारी पार पाड…तुझ्या प्रत्येक हालचाली आमचे घार, गिधाडे मला देतच राहतील…निघा आई भवानी तुम्हास यश देवो…!

आणि बघता बघता ती शे दोनशे चिवट वीरांची ध्येयवेडी सेना सूर्यराव चा खात्मा करायला निघून गेली….!

साऊ आणि खंडोजी ने पण शस्त्रे कमरेला अडकवली, खंडोजी ने ती गूढ वही मस्तकाला लावून नमस्कार केला व हरणाच्या कातडी अवलानात गुंडाळून पाठीवर बांधली व ते चंद्रगड चा निरोप घेऊन जंगलमार्गे यशवंतमाची कडे जाऊ लागले….!

चालत चालत बरेच जंगल पार करत ते खूप आत गेले होते.
सावीत्री खंडोजी ला बोलली……बहिर्जी नाईक ?
बहिर्जी नाईक कोण आहेत….बाजींद सारखा महायोद्धा ज्या माणसाची इतकी स्तुती व विश्वास ठेवतोय तो माणूस कोण आहे खंडोजीराव…?

खंडोजी हसला व बोलला….व्यक्ती ???
बहिर्जी नाईक व्यक्ती नाही…हात पाय तोंड आहे म्हणून त्यांना व्यक्ती म्हणता येईल…नाहीतर ते ना माणसात मोडले जातात ना जनावरांत….हिंदवी स्वराज्य पूर्णत्वास जावे म्हणून राजश्री शिवाजीराजे यांच्या सोबतीला ईश्वराने जणू आपला दूतच पाठवला असावा ….जसे हनुमंताविना रामायण अपूर्ण…..श्रीकृष्णाशिवाय महाभारत अधुरे…..अगदी तसेच बहिर्जी नाईक यांच्याशिवाय शिवभारत अपुरे होय….!

बहिर्जींचे वर्णन करताना खंडोजीच्या अंगावर काटे उभे राहिले होते तर डोळ्यात अश्रू….जड शब्दाने तो बोलू लागला…

साऊ…त्या महान अवलीयाने सारे जीवन शिवाजी नावाच्या देवावरुन अक्षरश ओवाळून टाकले ग….स्वतःचे आयुष्य काय जगलेच नाहीत ते…..आयुष्य सारे हिंदवी स्वराज्यासाठी वेचले…..माझ्यासारख्या शेकडो पैल्वानाच्यात देशभक्ती निर्माण करुन शिवाजी महाराजांच्या पवित्र कार्यात आणून आयुष्याचे सोनं केलं..!

बस्स…आता जगायचं तर शिवाजी राजांच्या कामासाठी…याच कामासाठी मरण जरी आलं तरी हसत स्वीकारायचं…आणि जर पुनर्जन्म खरा असेल तर याच शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या कामासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म मिळूदे अशी प्रार्थना आई भवानीला करेन…!

खंडोजी चे बोलणे साऊ शांतपणे ऐकत होती आणि तिचेही डोळे भरून आले.
ज्या बाजींद च्या कथा ऐकून रायगड पंचक्रोशी १०० वर्ष भीतीने गांगरून जायची असा बाजींद स्वतःच्या आयुष्याची ठेव एका अनोळखी माणसाच्या हाती देतोय कारण तो शिवाजीराजांचा माणूस आहे…..बहिर्जी नाईक सारखा माणूस स्वतःचा जीव ओवाळून टाकतो त्या स्वराज्यावर…हा खंडोजी जन्मोजन्मी सुख न मागता शिवाजीची चाकरी मिळू दे म्हणतोय…तिचेही डोळे पाणावले…तिला समजून चुकले की शिवाजी महाराज व त्यांचे कार्य किती थोर आहे ते….आबासाहेब पोकळ स्वार्थाला कवटाळून महाराजांशी वैर घेत आहेत याचीही जाणीव तिला झाली होती…तिला हुंदका आवरत नव्हता….!

तिने खंडोजी ला आश्वासन दिले की मी स्वता वडिलांना सांगेन की महाराजांचे कार्य किती उदात्त व पवित्र आहे ते…मी काही करुन त्यांना शिवाजी म्हाराजांच्या कार्यात सामील करीन….तिने तसा दृढ निश्चयच केला होता…!

यशवंतमाची….!

खंडू व साऊ गेल्यापासून सारी यशवंतमाची काळजीत होती.
सूर्यराव बेरडाच्या हल्ल्याने साऊ मरता मरता वाचली, जर खंडोजी नसता तर आज शिरक्याची अब्रू संपली असती.
सारे जंगल शोधून काढूनही ते दोघे सापडत नव्हते, राजे येसजीराव चिंतेत होते दरम्यान एका शिलेदाराने वर्दी दिली….राजे बाईसाहेब आणि खंडू राजवाड्यात आले आहेत….!

क्रमशः बाजींद भाग २२ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a Comment